• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

पंचतारांकित प्रेमकथा!

संजय डहाळे तिसरी घंटा

marmik by marmik
March 24, 2026
in तिसरी घंटा
0
पंचतारांकित प्रेमकथा!

व्यावसायिक रंगभूवरील साचेबद्ध मनोरंजनाच्या सीमा ओलांडून वास्तवावर भाष्य करण्याचा प्रयत्न आजच्या तरुणाईच्या नाटकांमध्ये प्रामुख्याने दिसतो. सादरीकरण सशक्त करण्याचा हा एक प्रयोगच आहे. रंगकर्मींची नवी पिढी आपल्या शैलीत काही सांगू बघतेय. अशा निर्मितीच्या यशापयशाचा विचार न केलेलाच बरा, कारण सादरीकरणातलं वेगळेपण आणि समकालीन पिढीच्या संवेदना त्यात असतात. विषय, आशय, अभिव्यक्तीची शैली सर्वकाही प्रवेश असल्याचे मानावेच लागेल. प्रामुख्याने प्रायोगिक एकांकिका, नाटके, कलात्मक चित्रपट, लघुपट यांसाठी सध्या चर्चेत असणारे ग्लॅमरस रंगकर्मी हे ‘ठरलंय फॉरेव्हर’ या नाटकाच्या निमित्ताने एकत्र आलेत.

तिसरी घंटा झाली. दर्शनी पडदा दूर झाला की नाटक सुरू होतं, हे आता कालबाह्य म्हणावं लागेल. अगदी ‘मुंबईचे कावळे’ हे प्रायोगिक नाटक उदाहरणादाखल घ्या. त्या प्रयोगात प्रेक्षकांमध्ये बसलेला एक प्रेक्षक आहे, तो ‘चलाऽऽ नाटक लवकर सुरू करा! किती वेळ लावता?’ -अशी ओरडा-ओरड करतो. घोषणाही देतो. एवढंच नव्हे तर, सोबत बसलेल्या प्रेक्षकांनाही बोलायला लावतो. नंतर तोच थेट स्टेजवर जातो आणि नाटक सुरू होतं. नेमका हाच प्रकार या नाटकात प्रारंभी आहे. पण त्यात भूमिकांबद्दल भाष्य आहे. कथानकाचे सूतोवाच आहे. निवेदिका गप्पांच्या ओघात बरंच काही विश्वासात घेऊन सांगाण्याचा प्रयत्न करतेय. आणि ती या नाटकाची लेखिका तसेच सहकलाकारही आहे. तर एकूणच पडदा उघडण्यापूर्वीपासूनच सादरीकरणातली प्रायोगिकता नजरेत भरते.

अबीर राजवाडे आणि मीरा देसाई या दोघा प्रेमी जीवांची ही प्रेमकहाणी. यांची पहिली भेट, पहिलं प्रेम हे एका महत्त्वाच्या कामाच्या निमित्ताने होते. चित्रपटाचे कथानक तयार करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आलीय. ती दोघांना एकत्रितपणे पूर्ण करायची आहे. त्यासाठी जुळवाजुळव सुरू झालीय. प्राथमिक चर्चा होते आणि हा ‘सिलसिला’ वाढतच जातो. कथेत वेगळं काय करता येईल, यावरलं मतप्रदर्शन अन् वादविवादही होतात. कथानकात आणि वैयक्तिक जीवनात जवळीक साधण्याचा प्रयत्न होतो. तो विस्कटतोही. टोकाचे भांडण, वादळही होते. कल्पनेतल्या गोष्टीसाठी चित्रपटलेखन तसेच प्रत्यक्ष या दोघांची गोष्ट अशा दोन पातळ्यांवरला हा खेळ, जो एकेका प्रसंगातून उलगडत जातो! शेवटापर्यंत पोहोचतो.

दोघेजण वेगवेगळ्या लोकेशनवर भेटतात. अगदी मुंबई दर्शन ते अलिबागच्या समुद्रकिनार्‍यापर्यंत पोहचतात. चायनीज हॉटेल असो वा फिल्म फेस्टिवल कार्यक्रम एकमेकांना सोबत असते. दोघेजणांवर नाटक स्थिरावते पण तरीही एका अदृश्य भोवर्‍यात दोघे एकमेकांत अडकलेत. हा भोवरा प्रेमाचा की विरहाचा की भावभावनांचा कल्लोळ नुसता!
अबीर काहीसा घाबरट, बेपर्वा, तर दुसरीकडे मीरा ही अत्यंत शिस्तप्रिय. तो संयमी, स्वप्नाळू तर ती आक्रमक. फाडफाड इंग्रजीत सुपरफास्ट. तो गोंधळलेला, ती काहीदा संयमी. शांत… असे दोघांच्या स्वभावातले पैलू आहेत. त्यासाठी नाचगाणी, शब्दकोडी, टोमणे, चिडविणे, हे सारं काही ते ही प्रेमाची गोष्ट गोड करण्यासाठी करतात. संहिताकार असलेल्या सूत्रधाराच्या साक्षीने गोष्ट पुढे सरकते. कथानकात खास काही सांगण्यासारखं नाही, कारण ही निव्वळ प्रेमकथा आहे. जी बघताना सुखावून जाणं अभिप्रेत आहे. हीच यामागली खरी गम्मत!

एखाद्या चित्रपट दिग्दर्शकाला नाटक दिग्दर्शित करण्यास दिले तर काय होईल, याचा प्रत्यय दिग्दर्शनात पदोपदी येतो. इथे दिग्दर्शक परदेशी चित्रपट निर्मितीचा अभ्यासक्रम पूर्ण करून आलाय. त्याचाही परिणाम झालाय. चित्रपट, लघुपट, नाटक याचा अनुभव ऋषी मनोहर याच्या गाठीशी आहे. फिल्ममेकिंगची मास्टर डिग्री त्याच्या हाती आहे. संवाद किंवा कथानकापेक्षा नाटकात सादरीकरण नंबर वन झालंय, जे डोळे दिपवते, तरुणाईच्या वयात अलगद घेऊन जाते. मालिका, चित्रपट, संगीताचे कार्यक्रम यांचा भपका यात आहे. ऋषी मनोहर आणि अभिनेता कपिल रेडकर या दोघांनी परदेशी मनोरंजननगरीत भटकंती केलीय. त्यामुळे त्यांचे सूर चांगले जुळून आलेत.
नाटकाचे नेपथ्य सुमीत पाटील यांचे आहे. पूर्वी एकाच वेळी अनेक स्थळे दाखविणे शक्य नसल्याने संवादातून पात्रे स्थळांचे वर्णन करायचे. त्यावरून रसिक ते स्थळ गृहीत धरायचे. पण आजच्या ‘एआय’च्या प्रगत जमान्यात नेपथ्यरचनेत लाटा, समुद्र आकाश, पूल, हॉटेल, घर, बगीचा, अगदी खिडकीतून दिसणारा निसर्ग, पक्षी- हे सारं काही ‘एलईडी’च्या स्क्रीनच्या आधारे आकाराला आलंय. तंत्रमंत्राचा भरगच्च वापर केलाय.

पीटर ब्रूक यांनी म्हणे ‘महाभारता’च्या वातावरणनिर्मितीसाठी थेट पॅरिसजवळच्या एका उघड्या खाणीत प्रयोग केला होता. आता तर सर्व इफेक्ट रंगमंचावर नव्या ‘एलईडी’च्या करिश्म्याने साकार होऊ शकतात. नेपथ्यासाठी रंग, पोत, आकार, ध्वनी सबकुछ एका बोटाच्या खाणाखुणांवर आलंय. यातील दृश्यानुभवातून डोळे अक्षरशः दिपवतात. त्यामागचे नेपथ्यरचनेतील परिश्रम नजरेत भरतात आणि हेच या नाटकाचे प्रमुख आकर्षण म्हणावे लागेल.

संगीतकार अनिरुद्ध निमकर याचे हे पहिलेच व्यावसायिक नाटक असले तरी त्याची संगीतक्षेत्रातील वाटचाल कॉलेजतरुणांनी डोक्यावर घेतलेली आहे. संगीताचा नवा बाज देण्याचा प्रयत्न या नाटकात त्याने निश्च्िातच केलाय, जो नाटकाला गती देण्यास मदतच करतो. ताल आणि सूर या प्रेमकथानकात महत्त्वाची कामगिरी पार पाडतात. विविधतेने भरलेल्या वाद्यांचा वापर त्याने केलाय. नेपथ्य, संगीत, प्रकाश योजना यांची भट्टी चांगली जुळली आहे. झगमग आहे!

या नाट्याची संहिता ही अक्षता आचार्य हिची आहे. सोबत रसिकांशी सुसंवाद साधण्याचेही काम ती सहकलाकार म्हणून करते. यापूर्वी चित्रपट व प्रायोगिक नाटकांमुळे ती चर्चेत होती. ‘मल्हार’ चित्रपटातला अभिनय तसेच ‘थर्ले फॉरएव्हर’ याचा लेखन पुरस्कार लक्षात राहाण्याजोगा. नव्या पिढीवर झालेले इंग्रजी भाषेचे पोषण, संस्कार यामुळे नाटकात इंग्राजळलेला मुलामा आहे. ज्याचा काहीदा अतिरेक होतो, तो खटकतो. तरीही प्रेमकथा म्हणून संहिता ‘प्रवेश’ आहे. तिच्यात हळुवारता आहे. भाषा आजची, जी आजच्या पिढीशी ‘रिलेट’ करते.

मिलिंद फाटक, रसिका जोशी यांचे लेखन, दिग्दर्शन, अभिनय असलेले ‘व्हाइट लिली आणि नाइट रायडर’ हे नाटक आजच्या डिजिटल चॅटिंगवर होतं. दोघा विवाहेच्छुकांचं भावनिक कथानक त्यात मांडलेलं होतं. दोघांचा संवाद, भेट, अपेक्षांची जुळवाजुळवी आणि पुन्हा फक्त व्हर्चुअल चॅटिंग, यात माणूसपण हरविलेलं. या नाटकाची आठवण हा प्रयोग बघताना आल्याखेरीज राहात नाही. नीरज शिरवईकर याचं ‘आमने-सामने’ हे काही वर्षापूर्वीचं नाटक आजही तरुणाईचा विषय म्हणून जोर धरून आहे. त्यात लग्नसंस्थेच्या घुसमटीवर ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ हा पर्याय दाखवला होता. पण भावनिक, मानसिक, शारीरिक गुंतवणुकीचं काय? प्रेमाचं आकर्षण आणि दोघांचं वैयक्तिक स्वातंत्र्य- यामुळे कितपत सुख मिळेल! अशी नाती यशस्वी ठरतात काय? हा विषयही या अबीर-मीरा यांच्या प्रेमकथेत ओघात आलाय. पण नाटकात रंजकता गच्च भरलेली आहे.

अष्टपैलू अभिनेत्री ऋता दुर्गुळे हिने मीरा देसाई-पालकर ही मध्यवर्ती भूमिका ताकदीने पेलली आहे. दुर्वा, फुलपाखरू यांसारख्या मालिकांमधून घराघरात पोहचलेली ही अभिनेत्री. अनन्या, टाइमपास हे तिचे चित्रपटही चर्चेत होते. अभिनयासोबत निर्मितीतही तिने सहकार्य केलंय, हे विशेष. कोरोनाच्या संकटानंतर आलेल्या नाटकांत ‘दादा, एक गुड न्यूज आहे!’ या नाटकात ती दिसली होती. एका मध्यंतरानंतर पुन्हा एकदा या नाटकातून तिची रंगभूमीवर एंट्री झालीये, जी रसिकांच्या अपेक्षा वाढविणारी आहे. प्रेमातले आणि विरहातले अनेक संवाद तिने सुरेख सादर केलेत- देहबोली शोभून दिसते. कपिल रेडकरसोबतची जोडी छानच. दोघांचं ट्युनिंग मस्त जमलं आहे.
अबीरच्या भूमिकेतला कपिलचा वावर हा संगीत आणि अभिनय याने बहारदार झालाय. गोड गळ्याची देणगी त्याला मिळाली आहे, तिचा पुरेपूर वापर करण्यात आलाय. पियानोवरली गाणी मस्तच. ‘तू जा गेलीस तर… मला ना काही पर्वा!’- हे गाणं विरहातल्या भावना नेमकेपणानं सांगतं. एखाद्या इंग्रजी नाटकाप्रमाणे सारी मांडणी आहे. ज्यातलं वेगळेपण नजरेत भरतं. तीनच पात्रांचं हे नाटक आणि तिघेही पूर्ण तयारीचे!

चित्रपट, मालिका, शॉर्ट फिल्म यातून व्यावसायिक रंगभूमीवर ग्लॅमरस रंगकर्मी येताना जरूर दिसताहेत. त्यांचे स्वागतच. माध्यम बदलले असले तरी हरकत नाही. पण ही मंडळी इथे कितपत स्थिरावतात, हे देखील दिसेल. नवनवीन रंगप्रवाह, स्थित्यंतरे येतच असतात. हे रंगभूमीच्या सुदृढपणाचे लक्षणच म्हणावे लागेल. ऑल द बेस्ट, सही रे सही, यदाकदाचित- याच्या पुढे काय, की ‘जून ते सोनं’ म्हणायचं याच्या उत्तराच्या प्रतीक्षेत रसिक आहेत.

नवी दृश्यभाषा; लाइव्ह गाणी, ‘एलईडी’ची पार्श्वभूमी आणि आधुनिक कथनशैली- हे सारं यात नाट्य पुरविण्यासाठी गच्च भरलंय. काहीदा प्रयोग बघताना हा नाटकातला सिनेमा की सिनेमातलं नाटक?- असाही प्रश्न उभा राहणं स्वाभाविक आहे. तरुण प्रेक्षकांना रंगभूमीकडे खेचण्यासाठी अशी नाटके कितपत साथ देतील, हे बुकिंगवरल्या गणितांवर अवलंबून असेल, पण एकूणच संहितेवर सादरीकरणाचा विजय असंच म्हणावं लागेल. रंगभूमीच्या नव्या जाणीवा तपासून बघण्यासाठी अशी नाटके मोलाचे काम करीत असतात. आता या ‘ठरलयं’चं रसिकराजा कसे काय स्वागत करेल, हे काळच ठरवेल!

ठरलंय FOREVERR
लेखन- अक्षता आचार्य
दिग्दर्शन- ऋषी मनोहर
नेपथ्य- सुमीत पाटील
प्रकाश- तेजस देवधर
संगीत- अनिरुद्ध निमकर
गीते- सुजय जाधव
निर्माते- ऋषी मनोहर, कपिल रेडकर
सहनिर्माती- ऋता दुर्गुळे
सूत्रधार- प्रणित बोडके, नितीन नाईक
छायाचित्रे- संजय पेठे

Previous Post

इराणी सिनेमाचं गारूड!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.