‘अध्वर्यू अर्थात अर्ध्या आज ओव्हरटाईम करून नेटकाच बस स्टँडवर उतरला. तो तिथं चिनूभैय्या कुठल्या कार्यक्रमाची जाहिरात लावणार्या पोरांना मार्गदर्शन करत उभा.
‘काय चिनूभैय्या? काय जोर आहे?’ अर्ध्याने विविध भारतीचं बटन फिरवलं.
‘अर्ध्या आता येतोय होय? अरे आपल्या मंडळाचा प्रमुख कार्यकर्ता तू! तुला शोभतं का हे..?’ चिनूभैय्याच्या तोफेचं तोंड फिरलं.
‘म्हणजे काय? हीच वेळ राहते ना माझी यायची? उलट अर्धा तास लवकर आलोय मी!’ अर्ध्या बाजू मांडायला लागला.
‘अरे आपल्याला कार्यक्रम घ्यायचा आहे,’ चिनूभैय्या समजावणीच्या सुरात.
‘मागल्या महिन्यात झाली ना शिवजयंती? आता आणखी कसला कार्यक्रम?’ अर्ध्याला पडलेला पहिला प्रश्न.
‘अरे ती शिवजयंती होती. आता प्रबोधनात्मक, डोळे उघडणारं कीर्तन आहे,’ चिनूभैय्या अर्ध्याला सांगायला लागला.
‘कीर्तन? कुणाचं चांदोरीकर बुवाचं…? लोकासांगे ब्रह्मज्ञान अन्…’ अर्ध्या अडखळला.
‘नाही आठवत तर का जोर देतो इवल्या मेंदूवर?’ चिनूभैय्या फिरकी घ्यायच्या मूडमधी!
‘त्यापेक्षा त्या नाचणारीला बोलवायचं? हे बुवा-बाबा नाचत्या त्यापेक्षा ती बरी नाचते. आणि दिसते ही..!’ अर्ध्याच्या पोटातलं ओठावर आलं.
‘नाही रे हे आपले बुवा आहेत. फक्त गुटखा-मावा ह्यावर बोलत नाहीत! त्यांचा परीघ खूप मोठा आहे,’ चिनूभैय्याची ज्ञान गंगा खळाखळा वाहायला लागली.
‘तू बघितला म्हणजे मोठा असलाच पाहिजे. यर्हीच बोलशील का तू?’ अर्ध्यानं होकाराची मान डोलावली.
‘कोण आहे हे नाही विचारलंस?’ चिनूभैय्याला अजून खंत.
‘विचारून उपेग काय? तसाही एवढ्यात रात्री आठलाच झोपायची सवय लावायचीय मला.’ अर्ध्या त्याच्याच मूडमध्ये.
‘अरे आपल्या लोकांसाठी जागलं पाहिजे,’ चिनूभैय्याचा मोलाचा सल्ला.
‘खतरे में जागो! नारा ऐकून कानाचे पडदे फाटायची वेळ झाली. आता ते ऐकायला जागायची गरज काय?’ अर्ध्यानं तक्रारीचा सूर लावला.
‘अरे आपल्या बक्कळ बंधू समाजावर किती अन्याय होतोय ठाऊक आहे का तुला? नसणारच त्याच्यामुळे तू असं बोलतोय,’ चिनूभैय्या चिडक्या स्वरात बोलला.
‘अन्याय? कुणी? कधी केला?’ अर्ध्याला प्रश्न पडला.
‘हे बघ नाक्यावर मोठमोठे दुकानं कुणाचे आहेत?’ चिनूभैय्याचा अर्ध्याला प्रश्न.
‘व्यावसायिकांचे!’ अर्ध्यानं भाबडेपणानं उत्तर दिलं.
‘हो ते व्यावसायिकच आहेत. पण कुठले..?’ चिनूभैय्यानं राग आवरत विचारलं.
‘आपल्या गावचेच आहेत नं?’ अर्ध्या तितक्याच निरागसपणे उत्तरला.
‘अरे म्हणजे कुठल्या समाजाचे आहेत?’ चिनूभैय्यानं राग आवरत तरीही मूठ आवळत विचारलं.
‘माझी ममी म्हणते अशी चटकन कोणाची जात विचारायची नसते. त्यामुळं आजपर्यंत कुणालाच जात विचारली नाही. अगदी तुलापण नाही.’ अर्ध्याचा निरागसपणा टपकायला लागला.
‘अरे अर्ध्या! विचारायचं! म्हणजे कळतं ना? कोण आपलं? कोण परकं…’ राग आवरत चिनूभैय्या कमालीच्या शांतपणे बोलला.
‘मग सांग. तू कुठल्या समाजाचा?’ अर्ध्यानं थेटपणे चिनूभैय्याला विचारलं.
‘मलाच विचारशील? अरे आपण आणि आपला समाज बक्कळ बंधू समाज आहे. हे विसरला की काय?’ चिनूभैय्यानं अर्ध्याला खडसावलं.
‘आयला हे मी विसरलोच होतो!’ अर्ध्यानं घाईनं जीभ चाचरली.
‘हेच! तुझ्यासारखे लोक आपल्या समाजात वाढले, ज्यांना आपलं परकं कोण? हे कळत नाही! म्हणून त्याचा गैरफायदा ह्या ह्या लोकांनी घेतला,’ चिनूभैय्या भुसात मुद्दे शोधू लागला.
‘कसा काय?’ अर्ध्यानं फार गहन चर्चेत सहभागी असल्याचा अविर्भाव आणत विचारलं.
‘मग त्यांनी दरेक गावात मोक्याच्या जमिनी घेतल्या. विकल्या कुणी?’ चिनूभैय्यानं डोळ्याला डोळा भिडवत विचारलं.
‘आमच्या तर पणज्याच्या काळात जमिनी विकल्या गेल्या. तव्हा कुठं पहायला कोण होतं? हा आता लोक म्हणतात. त्यांनी दारू-दरफडे आणि बाईच्या नादापायी बट्ट्याबोळ केला म्हणून…’ अर्ध्याची कॅसेट वाजायला लागली.
‘अरे पण घेतल्या त्यांनी ना?’ चिनूभैय्या गाळीव इतिहास शिकवायला लागला.
‘हो रे! हे माझ्या लक्षातच आलं नाही,’ अर्ध्या विस्मयानं आठवू लागला.
‘शिवाय हे त्यांच्या दुकानात कामं करायला त्यांचीच माणसं ठेवतात. हे माहितीय का?’ चिनूभैय्यानं लिस्ट उघडली.
‘असंल असंल बाबा! पण तो नम्याचा मावसभाऊ काय करत असतो त्यांच्या दुकानात..?’ अर्ध्याला प्रश्न पडतात फार.
‘अरे एखादा अपवाद ठेवतात ते! पण असं त्यांच्या पदरी कामं करणं फार धोकादायक असतं बरं?’ चिनूभैय्या धोकाची घंटा बडवू लागला.
‘का पण?’ अर्ध्यानं बाळबोधपणे विचारलं.
‘ते गुपचूप जेवणात तुकडे तुकडे टाकून आपली पोरं बाटवतात,’ चिनूभैय्या अख्खी रेसिपी सांगू लागला.
‘फार भयानक आहे रे!’ अर्ध्या हळहळला.
‘ हे तर काहीच नाही. तुझ्यासारखी लग्नाळू पोरं हेरून त्यांना नवरी त्यांच्या समाजाची देववून वर पैसाअडका देवून त्यांना फसवतात,’ चिनूभैय्या पान नं दोनवर.
‘अरेरे!’इति अर्ध्या!
‘वर ही मंडळी एक रुपयाचा कर भरत नाही. इथल्या ह्याऽऽऽ त्याऽऽऽ चं फार नुकसान करत आहेत. माहिती आहे का?’ चिनूभैय्या काही थांबायचं नाव घेत नाही.
‘फार वाईट!’ अर्ध्या मान डोलवायलाच बसलेला.
‘त्यात भर म्हणजे आपल्या स्फूर्तीगीताचे दोन कडवेच म्हणतात ती!’ चिनूभैय्याची यादी वाढू लागली.
‘काय सांगतो?’ अर्ध्या आश्चर्यचकित झालेला.
‘बरं आपल्याला स्वातंत्र्य कुणी आणलं?’ चिनूभैय्या इतिहासाच्या पुस्तकात शिरला.
‘सांगतो काय मी? माझा पणजोबा अट्टल बेवडा. रखेल ठेऊन वाया गेलेला… तेव्हा त्याला असं काही झेपलंच नसणार.’ मोकळा ढाकळा अर्ध्या लगेच उत्तरला.
‘अरे पण आपल्याच लोकांनी आणलं ना?’ चिनूभैय्या थेट प्रश्न करायला लागला.
‘म्हणजे ज्यांनी आणलं त्यांना सध्या आपलं म्हणायचंय का?’ अर्ध्याला बारीक शंका यायला लागली.
‘हे बघ! तू असले उलटसुलट प्रश्न करत नको जाऊ! तू एकदा येच! कीर्तनाला! म्हणजे तुझ्या मनात असले भलते प्रश्न येणार नाही!’ हिरमुसलेला चिनूभैय्या करवादून बोलला.
‘काय नाव आहे बुवाचं?’ अखेर अर्ध्या लायनीवर आला.
‘श्री श्री डफळे बुवा करकोचेकर!’ चिनूभैय्यानं छाती फुगवून नाव सांगितलं
‘ते नेमकं काय सांगत्या?’ अर्ध्यानं शॉर्टमधी विचारलं.
‘हे बघ. आपली संख्या झपाट्यानं कशी कमी होतेय? ते घरटी वीस-वीस जण कसे जन्माला घालताय? त्यांचा अख्खी भूमी कब्जात घेण्याचा कसा डाव आहे? त्यांनी पद्धतशीर कसं आपल्याविरुद्ध युद्ध कसं छेडलंय? आपला बक्कळ समाज कसा झोपलाय. ह्या सगळ्या बाबींवर ते तीन तास झोतात कीर्तन देतात,’ चिनूभैय्या सविस्तर सांगायला लागला.
‘आणि हे कीर्तन कुठंय म्हणालास तू?’ अर्ध्या आता पत्त्यावर आला.
‘बाजार समितीच्या आवारात. सगळ्या शेतकर्यांकडून, व्यापार्यांकडून वर्गणी गोळा करून कार्यक्रम आखलाय आम्ही!’ चिनूभैय्या गर्वानं सांगू लागला.
तोच तिकडून नम्या मोटारसायकल घेऊन स्टँडवर आला. डोळ्यावर गॉगल, केस विस्कटलेले असा नम्या जवळ आला. चिनूकडं त्यानं फक्त एकदाच निरखून बघितलं. तसं चिनू घाईने निघून गेला.
‘काय बोलत होता रे अर्ध्या तुम्ही?’ नम्यानं अर्ध्याला विचारलं.
‘ते बाजार समितीत कीर्तन आहे ना? तिथं ये म्हणत होता. बक्कळ समाजाच्या…’ अर्ध्याचं बोलणं नम्यानं अर्ध्यात थांबवलं.
‘तो करकोचे का? साला! शेतकर्यांकडून पैसे उकळून ह्या बेण्यांनी कधी भाव अवेळी कोसळण्यावर आंदोलनं केलीत का? की कीर्तन केलीत? ही मोकाट जनावरं गाव धोक्यात घालताय त्यावर करकोचे काही बोलतो का? खतरे में जागो! बोंबलत जाताना चिन्या त्याच्या परदेशात राहणार्या भावाला ह्या युद्धात सहभागी व्हायला बोलावेल का? हे भेकड टगे, भाकड बाता मारून खिसे फस्त करतात. पण तुझ्या-माझ्या नोकरीवर, शेतमालाच्या भावावर, सगळ्यांच्या सगळ्या मूलभूत प्रश्नांवर कधी जागो! म्हणायला ही करकोचे आलीत का?’ नम्यानं प्रश्नांच्या भडिमारानं अर्ध्याला विचार करायला भाग पाडलं.
‘खरंय रे! ही करकोचे, चिन्या मंडळी एकजात क्ष्त्र् खाऊ! मागे कश्यासाठी ह्या मंडळींनी पैसे वर्गणी म्हणवून घेतले. त्याचं झालं काय? त्याचा हिशेब त्यांनी आजवर दिला नाही. वर आपल्या सारख्या पोरांना रक्षक म्हणून हे तपासा. तमक्याला झोडा सांगणार. अख्खा विखार पसरवणार. यांच्या मालकाची पोरं मात्र राजरोस कत्तलखाने चालवणार. वेडे आपण ठरतो रे!’ अर्ध्याला ़कंठ फुटला.
‘मग आता? जायचं ना? एखादा पिच्चर बघू! आणि झाडून सारी मित्र कंपनी गोळा करून जे शक्य ते चांगलं काही करायचा प्रयत्न करू? तू तयार आहेस ना?’ नम्याच्या विचारण्यावर अर्ध्या किंचित हसला.
