• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

काव्या चुकलीच; पण…

प्रशांत केणी (खेळियाड)

marmik by marmik
March 23, 2026
in इतर
0
काव्या चुकलीच; पण…

पाकिस्तानचा फिरकी गोलंदाज अबरार अहमद याला ‘द हंड्रेड’ लीगमधील सनरायझर्स लीड्स संघात स्थान दिल्यामुळे संघमालकीण काव्या मारन अडचणीत सापडलीय. पाकिस्तानी खेळाडूंवरील ‘अलिखित बंदी’ची धूसर लक्ष्मणरेषा काव्यानं ओलांडली. ती चुकलीच; पण वस्तुस्थिती काय आहे, याचा घेतलेला वेध.

 

सनरायझर्स लीड्स संघात पाकिस्तानचा फिरकी गोलंदाज अबरार अहमदला स्थान का देण्यात आलं? या संघाची मालकी ‘सन टीव्ही नेटवर्क’ या चेन्नईस्थित मीडिया समूहाकडे. काव्या मारन ह्या कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी. मग भारतीय मालकीणीनं इंग्लंडमधील ‘द हंड्रेड’ लीगमध्ये एका पाकिस्तानी खेळाडूला संघात का घेतलं? हे तमाम भारतीयांना पटलेलं नाही. स्वाभाविकपणे समाजमाध्यमांवर त्यावर यथोचित धुरळा उडाला.

या ग्रुपला भारतीय क्रिकेटमधील मोठी ओळख मिळाली, ती त्यांच्या ‘आयपीएल’ संघांमुळे. डेक्कन चार्जर्सची हकालपट्टी करण्यात आल्यानंतर २०१३पासून सनरायझर्स हैदराबाद हा संघ कार्यान्वित झाला. आता यंदाचं ‘आयपीएल’ २८ तारखेपासून सुरू होणार आहे. यातला पहिलाच सामना सनरायझर्स हैदराबाद हा संघ गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाशी खेळणार आहे. परंतु भारतद्वेष्ट्या अबरारची निवड करणार्‍या काव्याकडून जणू देशद्रोहच घडलाय, असं वातावरण निर्माण झालंय. त्यामुळेच सनरायझर्स हैदराबादवर ‘आयपीएल’मध्ये बंदी घालण्यात यावी, ही मागणी जोर धरू लागलीय.

काव्याचं कवित्व!
काव्या मारन ही गेली काही वर्षं सनरायझर्स संघाचा चेहरा बनलीय. लिलावात सोबतच्या जाणकार मार्गदर्शकांकडून निर्देशित केलेल्या खेळाडूंना संघात खरेदी करण्यासाठी झेंडा उंचावणं तसंच ‘आयपीएल’चा सामना चालू असताना सीमारेषेपलीकडे मालकांसाठी दिलेल्या विशिष्ट आसनावर बसून सामन्याचा आस्वाद घेणं, हे तिचं दिखाऊ कार्य. पण संघ व्यवस्थापन, लिलाव रणनीती आणि प्रâँचायझी कार्यप्रणाली हे तिचं खरं कार्य.पण या मालक उद्योगपतींकडे प्रेक्षकांचं लक्ष असावं आणि त्यांच्या विविध मुद्रा क्रिकेटरसिकांना पाहता याव्यात, म्हणून प्रक्षेपण कंपनी एक विशिष्ट कॅमेरा काव्यावर ‘लक्ष्यपूर्वक’ योजलेला असतो. ही योजना एकट्या काव्यासाठीच नसते, तर नीता अंबानी, प्रीती झिंटा, शाहरुख खान, जुही चावला या तमाम ‘आयपीएल’ मालकांच्या वाट्याला हा प्रकाशझोत येतोच. या ‘लक्ष्यवेधी’ प्रक्षेपणाला वैतागून एकदा काव्या ‘चल हट्’ असंही एका कॅमेरामनला म्हणाली होती. पण तरीही तिचा आनंद किंवा खेळाडूचा झेल सुटला, धावचीत झाल्यास तिच्या दु:खाच्या मुद्रा पाहण्याजोग्या असतात. त्या पुढे समाजमाध्यमांवर मीम्सरूपीही चर्चेत राहतात.
३४ वर्षांची काव्या वॉर्विक बिझनेस स्कूलमधून ‘एमबीए’ झाली. २०१८पासून तिने कौटुंबिक व्यवसायात लक्ष घातलं. पण आयपीएलमुळे माध्यमांनी तिची दखल घ्यायला सुरुवात केली. ती इतकी की, संगीतकार अनिरुद्ध रविचंद्रनशी तिचा नाजुक नातेसंबंध जुळतोय का? याचंही चर्चितचर्वण झालं. या मारन कुटुंबाकडे सन टीव्हीसारखी माध्यमं आणि काही उद्योगांची मालकी आहे. तिचे वडील कलानिधी मारन हे सन ग्रुपचे प्रमुख आणि क्रिकेट संघाचेही सहमालक आहेत. तिची आई कावेरी मारन यांचं कार्यक्षेत्र सोलर टीव्ही कम्युनिटीपर्यंत मर्यादित ठेवण्यात आलंय. या कुटुंबाची पहिली आणि मोठी ओळख सांगायची तर काव्याचे आजोबा मुरासोली मारन. हे तमिळनाडूच्या राजकारणात वजन असलेल्या द्रमुकचे ज्येष्ठ नेते होते. काव्याचे काका दयानिधी मारन हे माजी केंद्रीय मंत्री आणि द्रमुक नेते आहेत. इतकी मोठी राजकीय आणि व्यावसायिक पार्श्वभूमी लाभल्यामुळे काव्याला स्वकर्तृत्व फुलवण्यासाठी क्रिकेटचं व्यासपीठ देण्यात आलं असावं. या समूहाकडे भारत आणि इंग्लंडमधील लीगशिवाय दक्षिण आप्रिâकेमधील ‘एसए२०’ लीगमधील सनरायजर्स ईस्टर्न केप या संघाचाही ताबा आहे.

वादग्रस्त हॅरी पॉटर!
अबरार अहमद हा पाकिस्तानचा लेग-स्पिन गोलंदाज. नुकत्याच झालेल्या ट्वेंटी-२० विश्वचषकात तो संघात असूनही एकही सामना त्याच्या वाट्याला आला नाही. कसोटी पदार्पणातच इंग्लंडविरुद्ध पहिल्या डावात ७ बळी आणि सामन्यात १० बळी घेत त्याने छाप पाडली होती. गेल्या चार वर्षांत १० कसोटी, १५ एकदिवसीय आणि ३८ ट्वेंटी-२० सामने तो देशाकडून खेळलाय. ‘हॅरी पॉटर’ हे त्याचं टोपणनाव. पण त्याची मैदानावरील आणि समाजमाध्यमांवरील कृती वादग्रस्त. आयसीसी चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत भारतीय फलंदाज शुभमन गिलला बाद केल्यानंतर अबरारनं वादग्रस्त पद्धतीनं हा आनंद साजरा केला होता. तसंच मार्च २०२५मध्ये समाजमाध्यमांवरील एका पोस्टमध्ये त्यानं लिहिलं होतं : ‘रमजान सुरू होण्यापूर्वी या अप्रतिम संध्याकाळी शेवटचा कप चहा घेत आहे!’ ही पोस्ट २०१९मध्ये भारतीय विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या ‘चहा’संदर्भातील प्रसंगाचा उल्लेख केल्यामुळे वादाच्या भोवर्‍यात सापडली. परिणामी अबरारला भारतीयांकडून समाजमाध्यमांच्या वेशीवर टांगण्यात आलं.

भारतीय मालकीचे संघ
‘द हंड्रेड’च्या लिलावात काव्याच्या सनरायझर्स लीड्स संघानं अबरारसाठी एक लाख, ९० हजार पौंड्सची म्हणजे भारतीय रुपयांत दोन कोटी, ३४ लाखांची बोली लावली. इंग्लंडचा आदिल रशीद स्पर्धेला मुकणार असल्यामुळे संघाला दर्जेदार फिरकी गोलंदाजाचा अभाव जाणवत होता. त्यामुळेच अबरारला संघात घेण्यात आलं, असं स्पष्टीकरण सनरायझर्स लीड्सचे मुख्य प्रशिक्षक डॅनियल व्हेटोरी यांनी दिलं. पण यावर विश्वास कोण ठेवणार? ‘आयपीएल’मध्ये २००९पासून पाकिस्तानी खेळाडू खेळलेला नाही. या वर्षीपासून बांगलादेशच्या खेळाडूंनाही ‘आयपीएल’ची दारं बंद झाली. कोलकाता नाइट रायडर्सनं मुस्ताफिजूर रेहमानला संघात स्थान दिल्यामुळे वादळ उठलं. पण तिथे आपली लीग असल्यामुळे नियमही आपलेच लागू करता आले. रेहमानची निवड रद्द करता आली. त्यामुळेच संतप्त बांगलादेशानं भारतात खेळण्यावर बहिष्काराचं हत्यार उगारलं आणि श्रीलंकेत सामने खेळण्याची मागणी केली. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) भारताच्या ताब्यात असल्यामुळे बांगलादेशाची ही मिजास खपवून घेण्यात आली नाही. परिणामी त्यांनी ट्वेंटी-२० विश्वचषकातून माघार घेतली. मग पाकिस्ताननंही भारताशी सामना न खेळण्याचं धोरण स्वीकारलं होतं. पण त्यातून प्रक्षेपण कंपनीचा आणि बीसीसीआयचा मोठा तोटा होणार असल्यामुळे भविष्यात आर्थिक आकडेवारी घसरू नये, या भीतीपोटी पाकिस्तानशी सामना होईल, याची काळजी घेण्यात आली.

‘द हंड्रेड’ लीगमध्ये सनरायझर्स लीड्सशिवाय एमआय लंडन, मँचेस्टर सुपर जायंट्स आणि सदर्न ब्रेव्ह असे भारतीय मालकांचे चार संघ खेळतात. देशात असलेली पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्या विरोधातली लाट पाहता या खेळाडूंवर ‘अलिखित बंदी’ असणार ही काळ्या दगडावरची रेघ होती. मात्र, याची कुणकुण लागताच इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉननं ‘एक्स’वर सावधगिरीचा इशारा देताना म्हटलं की, ‘इंग्लंड आणि वेल्सनं या प्रकरणाकडे गांभीर्यानं पाहावं आणि असं होता कामा नये.’ वॉनची भीती रास्त होती. कारण देशोदेशीच्या लीगसमध्ये हा छुपेपणाने ‘आयपीएल पॅटर्न’ राबवण्यात येतोय.

२०२३ पासून दक्षिण आप्रिâकेची ‘एसए२० लीग’ सुरू झाली. यातील सर्व सहाही संघ भारतीय मालकीचे. त्यामुळेच या लीगमध्ये पाकिस्तानी खेळाडूंना स्थान नाही. हीच कथा संयुक्त अरब अमिरातीमधील ‘आयएलटी२० लीग’ची. या स्पर्धेतीलही बहुतांश संघ भारतीय मालकीचे. त्यामुळेच पाकिस्तानच्या खेळाडूंना तिथेही मर्यादित वाव मिळतोय. अशीच स्थिती अमेरिकेतल्या मेजर लीग क्रिकेटची. तिथेही भारतीय मालकीचे संघ असल्यामुळे पाकिस्तान आणि बांगलादेशच्या खेळाडूंची ‘आई जेऊ घालिना आणि बाप भीक मागू देईना’ अशी अवस्था झाली आहे.

लीग त्यांची, नियम आपले?
अबरारला सनरायझर्स लीड्सनं करारबद्ध केल्यामुळे निर्माण झालेल्या वादावर ‘बीसीसीआय’चे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी स्पष्ट केले आहे की, ‘हा परदेशी लीगचा विषय असल्यानं आपली संघटना यात कोणताही हस्तक्षेप करू शकत नाही. हा निर्णय पूर्णपणे त्या संघमालकाचा आहे आणि ‘बीसीसीआय’चं कार्यक्षेत्र केवळ आयपीएलपुरतं मर्यादित आहे.’ शुक्ला यांनी या प्रतिक्रियेतून वस्तुस्थितीचं यथार्थ दर्शन घडवलंय. आयपीएल ही भारतामधील लीग असल्यानं तिथे आपण आपले नियम पूर्णत: राबवू शकतो. पण दुसर्‍या देशातल्या लीगमधील नियम निर्देशित करू शकत नाही. तूर्तास, पाकिस्तानी खेळाडूंवरील ‘अलिखित बंदी’ची ही धूसर लक्ष्मणरेषा काव्यानं ओलांडली. त्यामुळेच ती अडचणीत आलीय. आता आयपीएल आठवड्यावर येऊन ठेपलंय हा ‘काव्या’त्मक विरोध कोणत्या टोकाला जातो, ते पाहणं उत्सुकतेचं ठरेल!

Previous Post

फटकारे बाळासाहेबांचे

Next Post

बक्कळ

Next Post
बक्कळ

बक्कळ

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.