धर्माच्या नावाखाली माणूस जो वेडाचार करतो, ज्या प्रकारे युद्धात आपल्याच बांधवांचा बळी घेतो, ते पाहिल्यावर प्राणी आपल्याला हसत असतील का?- स्वप्नाली शिंदे, माळशिरस
स्वप्नाली ताई, प्राण्यांना का यांच्यात ओढताय? समजा प्राणी हसलेच तर ते आपली बदनामी करतायत, असं वाटून, त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी कोणी एखादी समिती नेमली तर बिचार्या प्राण्यांनी कोणाकडे तक्रार करायची? जिथे मनुष्यप्राण्यांची तक्रार नोंदवून घेतली जात नाही, तिथे क्षुल्लक प्राण्यांची तक्रार नोंदवून घेतली जाईल? तुमचा हा प्रश्न जर प्राण्यांनी वाचला तर मात्र ते नक्की हसतील? (मनुष्य प्राणी तरी काय करतो? अशा गोष्टींवर मिम्स करतो, जोक करतो, वाचतो आणि हसतो.)
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणतात की जगातला संघर्ष थांबवण्याची ताकद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात आहे, हे अमेरिकेला पण माहिती आहे. हे असं बोलतायत हे अमेरिकेच्या अध्यक्षांच्या कानावर गेलं तर युद्ध थांबेल काय?-प्रतीक पानसे, वाघोली
ट्रम्पची भीती कोणाला दाखवताय? त्याला मराठी कळत नाही आणि जे कळत नाही त्यावर आपण काही बोलायचं नाही, फक्त खी खी करून हसायचं हा विश्वनेत्यांचा अजेंडा आहे… असं तुम्हाला वाटेल पण हीच विदेशी नीती आहे… आणि मुख्यमंत्री बोलले तर काय झालं! सगळ्यांनीच पीएमच्या विरोधात बोलायचं का? त्यांच्या बाजूने बोलायला नको का? ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी ही म्हण उगाचच आमच्या उत्तरात शोधू नका.
गॅस आणि खनिज तेल आपण आयात करतो, ती आयात थांबल्यावर आपल्या नाकी नऊ आलेले आहेत. असं असताना आपण सगळ्या जगाचा ऊर्जा प्रश्न सोडवायला समर्थ आहोत, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी का म्हणाले असतील?-विनायक जोशी, रोहे
ते इतर वेळी जे काही म्हणतात त्याच्यावर तुम्ही लगेच काहीतरी म्हणता, पण आपण नॉन बायोलॉजिकल आहे असं जेव्हा ते म्हणाले त्याबद्दल तुम्ही काहीच बोलत नाही. ज्या दिवशी ते आपल्या नॉन बायोलॉजिकल असण्याची पॉवर दाखवतील तेव्हाच तुमची तोंड बंद होतील का? ( लक्षात घ्या, त्यांची खरी पॉवर तुम्हाला दाखवली नाहीये म्हणून तुम्ही असे प्रश्न विचारताय. त्यांच्या त्या पॉवरबद्दल जाणून घ्यायचं असेल तर सोनम वांगचुक यांच्या बातम्या बघा…)
ज्या नेत्याला आपल्या देशाच्या हितांच्या रक्षणासाठी दुसर्या देशाशी युद्ध पुकारणं अत्यावश्यक आहे, असं वाटेल, त्याने सगळ्यात आधी आपल्या आणि आपल्या मंत्रिमंडळातल्या सहकार्यांच्या मुलांना सैन्यात भरती केलं पाहिजे, अशी अट घातली तर जगातली सगळी युद्धं एका फटक्यात थांबतील. कशी वाटते ही आयडिया तुम्हाला?-प्रकाश अनवलीकर, सांगली
लाठीचार्ज होऊ शकेल अशा मोर्चालाही न जाणारे नेते सैन्यात भरती होतील? आणि समजा नेते सैन्यात भरती झालेच, तर युद्ध थांबवा म्हणून कोण कोणाला सांगणार? मी युद्ध थांबवलं म्हणून जगभर कोण बोंब मारणार? आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न- युद्ध थांबवण्याच क्रेडिट घ्यायला कोण पुढे येणार? वॉर रुकवा दि पापा म्हणत बापाच्या गळ्यात पडून कोण जाहिरात करणार? खूप प्रश्न निर्माण होतील आणि तुमची आयडिया नेत्यांच्या अंगाशी आली तर तुम्हाआम्हाला सैन्यात भरती होणं कंपल्सरी करतील. मग कळेल कधी कधी आपली आयडिया आपल्याच… अंगाशी येते.
गटार गॅससारखं क्रांतिकारक आधुनिक तंत्रज्ञान आपल्या देशाकडे असताना आणि त्याचे थोर संशोधकही भारतीयच असताना आणि देशात गटारांची संख्याही कमी नसताना आपल्याकडे गॅसची टंचाई होऊ कशी शकते?-दिलशाद शेख, रायगड
काही नाही हो हे विरोधक उगाचच बोंब मारतायत असं संशोधकांनीच सांगितलं नाहीये का? अशा विरोधकांची तोंडही गप्प होतील जेव्हा तोंडातून निघणार्या गॅसचा वापर करण्याचं तंत्रज्ञान आपल्याकडे विकसित होईल. मग भले त्या गॅसला विरोधक गटार तोंडातला गॅस म्हणोत…
आपल्याकडच्या एका टिल्लू टॉम मंत्र्यासारख्या नेत्यांची गलिच्छ विद्वेषी बडबड ऐकल्यावर राज्याची गटार गॅसची गरज पूर्ण करायला हे काही नाही हो एकटेच पुरेसे आहेत, हे सर्वसामान्यांच्याही लक्षात येते; सरकार त्यांचा योग्य वापर का करून घेत नाही?-महेंद्र देसाई, अमरावती
सरकार त्यांचा योग्यच वापर करून घेत आहे… तुम्ही सरकारला शिकवू नका… आज देश जो गॅसवर आहे तो काय उगाच आहे का? तुम्हाला हवा तसा वापर सरकार का करून घेईल? तुमच्यामुळे सरकार नाहीय. (तुमचा वापर करून घेऊन सरकार आलंय. तुमचा वापर संपला. आता सरकारमुळे तुम्ही आहात.)
संविधानाची शपथ घेऊन सत्तेत आलेले मंत्री राज्यातल्या नागरिकांमध्ये धर्माच्या आधारावर कसा भेदभाव करू शकतात?-संदीप गव्हाणे, सोलापूर
तुम्ही क्रोनोलॉजी चुकताय. मंत्री धर्माच्या आधारावर नागरिकांमध्ये भेदभाव करून मंत्री बनतात आणि मग संविधानाची शपथ घेतात. क्रोनोलॉजी लक्षात घ्या तुमच्या शब्दांची सुद्धा आणि… मंत्री बनण्याची सुद्धा… आणि तरी तुम्हाला वाटत असेल की संविधानाची शपथ घेऊन मंत्री, मंत्री झालेले आहेत.. तर तुम्ही चुकीचे आहात हे तुम्हाला तेव्हाच कळेल जेव्हा संविधान बदलले जाईल…(असं संविधान हातात घेऊन भाषण करणारे म्हणतात…)
विचारून टाका प्रश्न
तुम्हालाही अभिनेते संतोष पवार यांना प्रश्न विचारायचाय…? मग वाट कसली बघताय…? उचला पेन आणि टाका विचारून प्रश्न… हा प्रश्न थेट ‘मार्मिक’च्या [email protected] या ईमेल आयडीवर पाठवून द्या… किंवा आमच्या पत्त्यावर पाठवा. मार्मिक प्रश्नाला संतोष पवार उत्तर देतील…
