• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

पालकांनाही ड्रेसकोड हवा?

टोक्या टोचणकर (टोचन)

marmik by marmik
March 21, 2026
in टोचन, विनोदी लेख
0
पालकांनाही ड्रेसकोड हवा?

सध्या माझा मानलेला परमप्रिय मित्र पोक्या त्याला पडलेल्या एका अतिशय गहन प्रश्नातून मार्ग कसा निघू शकेल या विचारात व्यग्र आणि मग्न आहे. असा प्रश्न आजपर्यंत जगात कधीच कुणाला पडला नसेल. अशावेळी त्याला त्याचे शाळेचे दिवस आठवतात. तो युनिफॉर्म आठवतो. हे सारं त्याला आता आठवायचं कारण म्हणजे मुंबईतील प्रभादेवी येथील एका इंग्लिश शाळेने मुलांना त्या शाळेत सोडताना किंवा घरी नेताना पालकांनी नाईट गाऊन किंवा शॉर्ट घालून येऊ नये, असा सल्ला दिल्याची बातमी पोक्याने वृत्तपत्रात वाचली आणि त्यावर काय प्रतिक्रिया द्यावी, असा प्रश्न त्याला पडला. त्या इंग्लिश शाळेने पालकांच्या कपड्यांविषयीची ही सूचना शाळेच्या प्रवेशद्वारावरच लावली होती. याबाबत त्या शाळेतील एका शिक्षकाने शाळेची भूमिका काही पालकांसमोर मांडली. ते म्हणाले, शाळेच्या परिसरात शिस्त आणि सभ्य वातावरण टिकवण्यासाठी हा नियम करण्यात आला आहे. पालक औपचारिक पोशाखात नसतील तर त्यांना शाळेच्या इमारतीत प्रवेश दिला जात नाही. आम्ही कामगारांना किंवा चहा विक्रेत्यांनाही शॉर्ट घालून शाळेत येऊ देत नाही. पालकांवर असे नियम लागू करावे का याबाबत मात्र एकमत नाही.

बॉम्बे इंटरनॅशनल स्कूल असोसिएशनचे माजी अध्यक्ष आणि मुक्तांगणचे व्यवस्थापकीय विश्वस्त सुनील मेहता यांनी या निर्णयाचं समर्थन केलं आहे. याबाबत ते म्हणतात, अशा नियमांची गरज आहे असे मला वाटते. यामुळे मुलांवर नकारात्मक प्रभाव पडणार नाही आणि त्यांना शाळेचा आदर करायला शिकता येईल. मुले गणवेशात असली तरी पालकांनीही सभ्य पोशाखात असणे महत्त्वाचे आहे. याबाबत काही पालकांनी म्हटले आहे की सकाळी घाई गडबडीच्या वेळी मुलांना शाळेत सोडण्यासाठी कपडे बदलण्यास पुरेसा वेळ नसतो.
आता पोक्याला असा प्रश्न पडला आहे की समस्येवर योग्य तोडगा काय काढावा. या नियमांबद्दल दोष शाळेला द्यावा की पालकांच्या पेहरावाबद्दल त्यांना दोषी ठरवावे? मी त्याला शाळेची बाजू योग्य असल्याचं सांगितलं, त्याचबरोबर सध्या रस्त्यावर शॉर्ट घालून फिरणार्‍या अनेक तरुण मुली, शाळकरी मुलीही दिसतात. हे आपल्या व्यक्तिस्वातंत्र्याचे एक अविभाज्य अंग आहे, हे मान्य केल्याशिवाय गत्यंतर नाही, असं पोक्याला सुनावलं. सार्वजनिक ठिकाणीही अशांचा मुक्त संचार असतो, तो बदलत्या फॅशनेबल जगाचा एक भाग आहे. असंही त्याला सांगितलं. त्यांच्या आई-बापांनाही त्यात वावगे काही वाटत नाही. मग तू कशाला विचार करतोस?

काहींच्या मते कपड्यात संस्कृती असते, तर काहींच्या मते नसते. ती नेमकी कुठे असते हे ज्याचे त्याने हुडकायला हवं, असा पोक्त सल्लाही मी त्याला दिला. वाटल्यास तू गेल्या एक-दोन वर्षात आपल्या अंगप्रदर्शन करणार्‍या चित्रविचित्र पेहरावामुळे प्रसिद्धीस आलेली मॉडेल उर्फी जावेद हिची याबाबतीत मुलाखत घे, किंवा तिच्याबरोबर तिच्यासारख्या नट्यांचीही प्रतिक्रिया घे, आणि त्या काय सांगतात, आपली बाजू कशी मांडतात हे जाणून घे, तरच तुझ्या डोक्यात जास्त प्रकाश पडेल, असेही पोक्याला सुनावलं. त्यामुळे तो आणखीनच वैतागला. एपस्टिन फाईलमध्ये अडकलेले डोनाल्ड ट्रम्प आणि इतर यांच्याही मुलाखती घे, म्हणजे तुझ्या ज्ञानात आणखीन भर पडेल, असेही त्याला डिवचलं. पण पोक्या माझ्याहून हुशार निघाला. तो म्हणाला, तुम्ही मला जास्त सल्ले देऊ नका. मी या बाबतीत महाराष्ट्रातील आणि मुंबईतील नामांकित संस्कृतिरक्षक, व्हिडियो मास्टर सन्माननीय भाजप नेते किरकिटजी थोमय्या यांची स्फोटक मुलाखत घेणार आहे. गंमत म्हणजे, दुसर्‍या दिवशी तो ती मुलाखत घेऊनच आला. तिचा हा संक्षिप्त भाग-

किरकिट थोमय्या : कोणी कुठले कपडे घालावे की घालू नये याबाबत मी काहीच सांगणार नाही. आपले पूर्वज वल्कले नेसत. त्यावेळी संस्कृती कुठे गेली होती? वात्सायनाचा पूर्र्ण स्टडी मी केला आहे. त्यापासून खूप काही शिकलो आहे. माणसाने प्रत्येक गोष्टीचा वापर जरुरीपुरताच करावा. कपड्यांचा सुद्धा. काही वेळेला ते शोभून दिसतात, काही वेळेला नकोसे वाटतात. आपण जन्माला येताना उघडे असतो, जाताना उघडे जातो, कपडे ही माणसाने माणसासाठी केलेली कृत्रिम व्यवस्था आहे. तिच्यात नैसर्गिकता नाही. त्यामुळे कोणी किती कपडे घातले, तोकडे घातले की अतितोकडे घातले याला माझ्या दृष्टीने काही अर्थ नाही. कपड्यावरून माणसाची परीक्षा करू नये, या मताचा मी आहे. आदिमानव याला मी आदर्श मानतो. स्त्री-पुरुष आकर्षण ही नैसर्गिक गोष्ट आहे. त्याचा बाऊ करण्यात हशील नाही. मी याबाबतीत किती मुक्त विचाराचा आणि मोकळ्या मनाचा आहे हे जगाला माहित आहे. मागे माझे नको त्या अवस्थेतले व्हिडिओ लोक चवीने बघत होते, त्याला आंबटशौकीनपणा म्हणतात. त्यामुळे माझे काहीच वाकडे झाले नाही, उलट मला पब्लिसिटी मिळाली आणि जगात माझे नाव झाले. आजही मी डोळ्यासमोर दिसलो की लोक तोंड लपवतात, मी नाही. निसर्गाने स्त्रीला सौंदर्याचे, तरुण पुरुषाला शक्तिसामर्थ्याचे वरदान दिले आहे. प्रत्येकाने आपल्या सोयीनुसार त्याचे प्रदर्शन केले तर मला त्यात काहीही वावगे वाटत नाही. शाळेचा गणवेष ही तर एक क्षुल्लक बाब आहे. गणवेशात मुलांना जखडून ठेवणे हा त्याच्यावरील अन्याय आहे. उलट दरदिवशी त्यांना हवे तसे रंगीबेरंगी कपडे घालू द्या. त्यांच्या पालकांवर कसली बंधने लादता? त्यांनाही त्यांच्या मनाप्रमाणे कपडे घालू द्या, मुलांना शाळेत पोहोचवण्यासाठी आणि घरी आणण्यासाठी. कपड्यांवर संस्कार अवलंबून नसतात. मन साफ पाहिजे माझ्यासारखे. नजरा चांगल्या पाहिजेत स्त्रियांकडे पाहण्याच्या. ते धोतर-कोट, नऊवारी साडी, कोपरापर्यंतचे पोलके, विसरा आता. जमाना बदलतो तसे आपणही बदलले पाहिजे. नंगेसे, अर्धनंगेसे खुदा भी डरता है, एवढे मात्र लक्षात ठेवा.

Previous Post

राशीभविष्य (२१ ते २७ मार्च २०२६)

Next Post

नाय नो नेव्हर

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.