
डोनाल्ड ट्रम्प
सर्व जगाला खतम करुनीया
अमेरिकेतच एकटा राहीन
स्मशान शांतता ध्येयच माझे
विश्वशांतीचा संदेश देईन
शांतीदूत मी या विश्वाचा
नकोत युद्धे विनाशकारी
मानवता हा एकच धर्म
त्याच्यासाठी ही ललकारी

नकोच चिंता नको काळजी
झाले गेले विसरा आता
जगामध्ये या तुमच्यासाठी
मी तर नोबेल एकच नेता
अयातुल्ला खामेनी
इराणचा जरी धर्मगुरु मी
मी गेल्यावर का हा जल्लोष
अर्धे इराण माझ्या बाजूने
अर्ध्यांचा का इतका रोष?

सर्वेसर्वा तर होतो त्यांचा
त्यांच्यासाठी सारे केले
स्वाभिमान मी जपला माझा
इराणचेही नावच झाले
स्वैराचार नि स्त्री-स्वातंत्र्य
त्याचा होतो कट्टर दुष्मन
पुरेपुर मी नडलो त्यांना
दुखावले का त्यांचे मी मन?
अरविंद केजरीवाल
मद्य न पीता चढली त्यांना
मद्य-फ्रॉडची असली झिंग
बाटलीत दारु नव्हतीच त्यांच्या
चौकशीत त्या फुटले बिंग

मुळापासुनी फसले जेव्हा
झिंगाट नेत्यांचे हे नाटक
खोटा अभिनय खोटा मेकअप
उघडे पडले असली मर्कट
उघडे वाघडे झाले तरीही
अजून नाही जिरली खाज
एकच प्याला धरुनी हाती
पुन्हा नाचती सोडून लाज
देवेंद्र फडणवीस
उगाच गमजा करू कशाला
महाराष्ट्राला दिला न न्याय
अपराध्यांना पाठी घालून
पीडितांवर केला अन्याय

कळतही होते सगळे मजला
अजूनही ते कळते आहे
न कळल्याचे करतो नाटक
धरले तरीही पळते आहे
लोक ऐकती जरी आशेने
विकासाच्या या पोकळ गप्पा
कर्जापोटी राज्य बुडाले
तिजोरीचीही मर्जी खप्पा
भारतीय कुत्रे
गलगोटीयाच्या कुत्र्यापेक्षा
कितीतरी हुशार आम्ही कुत्रे
तो कुत्रा तर चावत नाही
त्याच्यासारखे आम्ही ना भित्रे

लचके तोडण्यात आम्ही हुशार
त्या कुत्र्याला नाही ती सर
आम्ही करतो भू भू भू भू
तो तर नुसता मुकाच लोफर
चीनी कुत्रेही तसेच यांत्रिक
त्यांना नसते बुद्धीमत्ता
त्यांचा पट्टा मालका हाती
उठता बसता खाती लाथा

