• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

शाहिरा,घ्या मानाचा मुजरा!

श्रीराम रानडे (मी यांचा सांगाती)

marmik by marmik
March 17, 2026
in मनोरंजन, यांचा मी सांगती
0
शाहिरा,घ्या मानाचा मुजरा!

माझ्या शाळकरी वयात, जीवनात दोन अतिशय महत्त्वाच्या घटना आमचं जीवन उजळवून गेल्या. मी १९५६ साली एसएससी परीक्षा दिली. आम्हा पोरांना नुकतीच मिशी फुटू लागली होती. काहीतरी वेगळं करून दाखवण्यासाठी हात फुरफुरत होते आणि `गोवा मुक्तिसंग्राम’ चा लढा सुरू झाला. `सालाझारका नंगा नाच- नही चलेगा, नही चलेगा’ अशा घोषणांनी आम्ही ११वीतल्या पोरांनी मिरज हायस्कूलचे पटांगण दणाणून सोडले होते. त्याचे प्रतिसाद आजही कानात घुमताहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट- `संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन.’ भाषावार प्रांतरचना झाली आणि मराठी- गुजराती असं द्विभाषिक राज्य महाराष्ट्रावर लादले. हा महाराष्ट्रावर उघड उघड अन्याय होता. या निर्णयाविरुद्ध आवाज उठविण्यासाठी काँग्रेस वगळता इतर सर्व विरोधी पक्ष एकत्र आले आणि त्यांनी संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना केली. आचार्य अत्रे यांची मुलुख मैदान तोफ भाषणांमधून, लिखाणातून आग ओकू लागली. मुंबई-बेळगाव-कारवार-निपाणी-बिदर-भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे ही आरोळी घुमू लागली. शाहीर अमरशेख, अण्णाभाऊ साठे, शाहीर गवाणकर यांची डफावर कडक थाप मारून गगनभेदी आवाजातील गाणी ऐकताना बाहू स्फुरू लागले.

द्विभाषिकांचा दुतोंडी कावा
लवतोय माझा डोळा डावा
साडेतीन कोटी सिहांचा छावा
पकडाय बांधलाय पिंजरा नवा
आम्ही ते वळखलं जवाच्या तवा
शाहीर सांगतील गावोगावा
अशी आवेशपूर्ण गीते ऐकत ऐकतच माझं कॉलेजशिक्षण सुरू होतं.
राष्ट्रसेवादल कलापथक १९५८मध्ये आपला कार्यक्रम करण्यासाठी मिरजेला आले होते. मिरजेच्या ’हंसप्रभा’ थिएटरात (आता बालगंधर्व रंगमंदिर) हा कार्यक्रम झाला आणि या कला पथकातील लीलाधर हेगडे या कलाकाराने माझे लक्ष वेधून घेतले. कार्यक्रमाचे स्वरूप असे होते- पहिल्या भागात राष्ट्रीय गीते, पोवाडे, समूह नृत्ये, कविता वाचन आणि मध्यंतरानंतर `बिन बियाचं झाड’ हे व्यंकटेश माडगूळकर लिखित, एका लोककथेवर आधारित लोकनाट्य! लोककलेतून लोकशिक्षण हे ब्रीद डोळ्यापुढे ठेवून राष्ट्रसेवादलाने कलापथक सुरू केले आहे. प्रा. वसंत बापट, प्रा. सदानंद वर्दे, सुधा वर्दे, राम नगरकर, मधू कदम, बापू देशमुख, निळू फुले, प्रमिला दंडवते, लीलाधर हेगडे आणि असे अनेक कलाकार या कार्यक्रमात सहभागी होते. या कार्यक्रमानेच मी झपाटून गेलो. विशेषत:
`भव्य हिमालय तुमचा माझा
केवळ माझा सह्यकडा
गौरीशंकर उभ्या जगाचा
मनात पूजीन रायगडा’
या प्रा. वसंत बापट यांच्या स्वरचित कविता वाचनाने मी भारावून गेलो. काव्य वाचनाचा तो आदर्श वस्तुपाठच होता. लीलाधर हेगडे आणि सहकार्‍यांनी वसंत बापट लिखित महाराष्ट्राच्या पोवाड्याने-
तटा तटा तुटती बंद
भुवईवर चढते धुंद
औट हात देहात अचानक
वादळ घुसमटुनी येते
उचंबळे हृदयात पुन्हा ते
इतिहासाशी दृढ नाते
या मराठीच्या मंदिरी। आसमानावरी। थोर कितीतरी। शारदा पुत्र कीर्तीवंत। कवी कथाकार कलावंत किती शाहीर किती संत।। काय आवेशाने, तडफेने शाहीर डफावर कडाड थाप मारून साभिनय पोवाडा सादर करीत होता. एकेक जडावाचा शब्द तितकाच तोलामोलाने शाहीर आणि मंडळी रसिकांच्या काळजापर्यंत भिडवीत होती.
मध्यंतरानंतर
कविता नाटक दोन्ही चरणी
रुणझुणती घुंगरू!
ओंकार स्वरूपी पूर्ण प्रतापी
नाच गणाचा सुरू।।
या गणाने `बिनबियाचं झाड’ या वगनाट्याला सुरुवात झाली आणि त्याची रंगत प्रवेशा-प्रवेशातून आणि नृत्य-गायन-अभिनयापासून पराकोटीची वाढतच गेली.
साधी चार ओळींचा लोककथा. राजा ऋषींचे बोलणे चोरून ऐकतो. संतापलेला ऋषी त्याला शाप देतो, `राजा तू आमचे बोलणे चोरून ऐकलेस. मी तुला शाप देतो. तुला गाढवाचे कान येतील.
`असा दिला ऋषीने शाप शूखते मेला
सोडून मृगया आला थेट वाड्याला
सारी रात जागला, सकाळी उठला
पाही ऐन्यात-पाही ऐन्यात
डोईला कान बघा फुटले वीत-वीत
जी-जी-जी’
राजा महालाबाहेर येईना. दिवस उगवून चार घंटे झाले, तरी राजा बाहेर येईना. प्रधानाला शंका आली- आज असे काय बरे विपरीत घडले? त्याने राजगायकाला, राजवैद्याला, राजज्योतिषाला पाचारण केले. आणि महाराजांच्या बाहेर न येण्याचे कारण विचारले. राजगायक, राजज्योतिषी आणि राजवैद्यच्या भूमिका करणार्‍या तीन पात्रांनी गायनाने आणि अभिनयाने धमाल उडवून दिली. त्यातला राजज्योतिषाचं काम करणार्‍या कलाकाराने जबड्याची विलक्षण हालचाल करून बोबड्या शब्दात भविष्य वर्तवले- मला असं वाटतं की आजच्या ग्रहमानप्रमाणे राजे साहेबांच्या शरीरावर काहीतरी अनैसर्गिक बदल संभवतात. त्या कलाकारानं आपल्या देहबोलीतून, संवादामधून आणि हालचालींमधून असा काही हशा पिकवला की मी डोळे विस्फारून बघतच राहिलो. ते होते शाहीर लीलाधर हेगडे! आवेशाने समरगीते, पोवाडे गाणारे, वगातील मधली मधली कथानक उलगडून दाखविणारे शाहीर लीलाधर हेगडे आणि आता राजज्योतिषाचा अफाट अभिनय साकारणारे लीलाधर हेगडे हे एकच का असा प्रश्न मला पडला. काहीही करून या कलापथकात सामील व्हायचंच असा निश्चय करूनच मी घरी परतलो.

शाहीर लीलाधर हेगडे यांच्यासोबत श्रीराम रानडे

त्याच काळात पुढील शिक्षणाच्या बहाण्याने मी पुण्यात आलो आणि काही काळातच राष्ट्रसेवादलाच्या पुणे शहर कलापथकात सामील झाल्ाो याला कारण म्हणजे श्याम पटवर्धन! या श्याम पटवर्धनाविषयी लिहिल्याशिवाय माझ्या पुढील लेखनाला काही अर्थच उरणार नाही. `श्याम पटवर्धन’ असा जरी मी एकेरी उल्लेख करीत असलो तरी श्यामराव पटवर्धन हे माझ्यापेक्षा कमीत कमी २०-२५ वर्षांनी मोठे. मेघ:श्याम पटवर्धन. मूळचे जमखंडीचे. हे पटवर्धन यादवाडकर पटवर्धन म्हणून ओळखले जातात. माझा मोठा भाऊ बाळ रानडे हा काही काळ शालेय शिक्षणासाठी जमखिंडीला होता. तो शालेय जीवनापासूनच राष्ट्रीय चळवळीशी संबंधित होता. श्याम पटवर्धन, श्याम वाटवे, किसनराव फडके या राष्ट्रीय चळवळीतील लोकांशी त्याचा संबंध आला. श्याम पटवर्धन, रत्नाप्पा अण्णा कुंभाराच्या मार्गदर्शनाखाली भूमिगत चळवळीत सामील झाले. चळवळ चालविण्यासाठी- पैशांची अत्यंत गरज होती. त्यासाठी त्यांनी एक अत्यंत धाडसी योजना आखली. महाराष्ट्राचे दैवत असलेल्या जेजुरी गडावरील खंडोबाच्या देवस्थानावर दरोडा घालायचा. रत्नाप्पाण्णा कुंभाराचा उजवा हात म्हणजे श्याम पटवर्धन. या दरोड्याची सर्व सूत्रे शामरावांचा हाती होती. त्यांनी ही मोहीम फत्ते केली, पण पोलिसांनी या सर्व आरोपींना अटक केली. कोर्टाने त्यातील १६ आरोपींना वेगवेगळ्या काळासाठी सक्त मजुरीची शिक्षा सुनावली त्यातील १७वा आरोपी होते प्रसिद्ध मराठी लेखक व्यंकटेश माडगूळकर. केवळ अल्पवयीन म्हणून त्यांची समज देऊन सुटका करण्यात आली.

प्रा. सदानंद वर्दे आणि शाहीर लीलाधर हेगडे

१९४७ साली भारत स्वतंत्र झाला आणि श्यामरावांकडे सारे लोक बेचाळीसचा हिरो म्हणून बघू लागले. पण त्यानंतर त्यांनी विधायक कार्याला वाहून घेतले. त्यांचे आणि बाळचा धाकटा भाऊ म्हणून आम्हा रानडे परिवाराचे आजही घनिष्ट संबंध आहेत. महाराष्ट्र शाहिरी पथकात तेही कलावंत म्हणून काम करीत, त्यामुळे त्यांची आणि लीलाधरची खास दोस्ती! मला कला पथकात सामील करून घ्या अशी मी श्यामरावांना कळकळीची विनंती केली आणि त्यांनी ती मनावर घेऊन कलापथक प्रमुख शाहीर लीलाधर हेगडे यांच्याबरोबर परिचय करून दिला. एके दिवशी संध्याकाळी पुण्यातील जीवन हॉटेल (आताचे ग्राहक पेठ) समोरील फुटपाथवर लीलाधर हेगडे यांनी एका फाटक्या अंगाच्या माणसाशी माझा परिचय करून दिला. ‘हा राम रानडे, श्याम पटवर्धन यांच्या ओळखीचा. याला कलापथकात घे. बघ याचा काही उपयोग होतो का! आणि हा निळू फुले! पुणे शहर कलापथक प्रमुख. याला भेट.’ अशा प्रकारे शाम पटवर्धन आणि लीलाधर हेगडे यांच्यामुळेच माझा ‘राष्ट्रसेवादल कलापथक, पुणे’मध्ये चंचूप्रवेश झाला. पुढील सहा-सात वर्षे मी निळू फुले यांच्याबरोबर सावलीसारखा होतो.
याच काळात राष्ट्रसेवादल मध्यवर्ती शाखेमार्फत `महाराष्ट्र दर्शन’, `भारत दर्शन’, `आजादी की जंग’, `शिवदर्शन’ असे कार्यक्रम सादर केले. मात्र यातील एकाही कार्यक्रमात माझी वर्णी लागली नाही. निळूच्या मार्गदर्शनासाठी मुंबईहून पुण्याला कार्यक्रमासाठी आलेल्या लोकांना पाणी तापवून दे, चहा-नाश्ता आणून दे, बंबात ढलपी टाकून पाणी तापवा, बादलीत गरम पाणी भरून बाथरूममध्ये नेऊन ठेवा अशा `सेवाकार्यातच’ गुंतून गेलो.
१९६५मध्ये वाराणसी येथे समाजवादी पक्षाचे अधिवेशन झाले आणि प्रजा समाजवादी, आणि संयुक्त समाजवादी असे वेगवेगळे गट तयार झाले. दोन्हीही पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष पुण्यातीलच एकाच सदाशिव पेठेत राहणारे. प्रजासमाजवादी पक्षाचे अध्यक्ष ना. ग. उर्फ नानासाहेब गोरे आणि संयुक्त समाजवादी पक्षाचे अध्यक्ष श्री. म. (एस. एम. उर्फ अण्णा जोशी.) ’नाना’ आणि `अण्णा’ हे दोन वेगवेगळ्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष. अर्थातच पुण्यामध्येही दोन गट निर्माण झाले. निळूने कलापथक सोडले.
तो दिवस आजही मला स्पष्टपणे आठवतो. रविवारचा दिवस. सकाळी १०.३०ची वेळ. पुण्यातील संभाजी उद्यानात लीलाधर हेगडे, राम नगरकर, निळू फुले आणि मी एकत्र जमलो. मी तिथे का आणि कसा हजर होतो हे कोडे मला आजतगायत उलगडलेले नाही. तिघांची चर्चा सुरू झाली. मी फक्त शांतपणे श्रवणभक्ती करीत होतो. चर्चा हळूहळू तापू लागली. दिवसा अत्यंत कमी बोलणारा निळू त्यादिवशी पेटून उठला होता. यांना जोड्यानं मारलं पाहिजे, असे जळजळीत उद्गार त्याच्या तोंडून निघाले. मी आजपासून कलापथक सोडले, असे निर्वाणीचे वाक्य टाकून निळू तेथून निघून गेला. आम्ही तिघे केवळ मूक होऊन हे दृश्य पाहत होतो.
१९५६ ते १९६४ हा आठ वर्षांचा काळ हा माझ्या आयुष्यातील अत्यंत दुर्दैवी भाग. माझं कुठेच धड काही जमत नव्हतं. ना शिक्षण, ना नोकरी; घरच्यांसाठी मी एक मोठा ’प्रॉब्लेम’ बनलो होतो. फक्त साहित्य, नाटक, सिनेमा, तमाशा, गायन, नर्तन आणि कलेची विलक्षण ओढ या गोष्टीमुळेच मी कसाबसा तगून होतो. १९६४मध्ये पुण्यातील वॉटरवर्क्समधील नोकरी सोडून मी नुकताच मुंबईमध्ये टेलिफोन खात्यात शिकाऊ उमेदवार म्हणून दाखल झालो होतो. आणि महिनाभरातच मला कळून चुकले होते, ’ये अपने बस की बात नही.’ बोंबला! आता पुढे काय, या संभ्रमावस्थेत मी दादर (पश्चिम) स्टेशनच्या समोरील रस्त्यावर लीलाधर भेटला. त्यांनी नुकत्याच स्थापन केलेल्या साने गुरुजी आरोग्य मंदिराच्या ऑफिसच्या कामासाठी काही वह्या, वस्तू खरेदी करण्यासाठी आला होता. आम्ही दुकानात जाऊन वस्तू खरेदी केल्या. बाहेर आल्यावर मी त्याला माझी सर्व चित्तरकथा सांगितली. त्याने ती शांतपणे ऐकून घेतली आणि माझ्या खांद्यावर आश्वासक हात ठेवत म्हणाला, ’राम! काय काळजी करू नको. आपली चुनाभट्टी येथील आरोग्य मंदिराची झोपडीवजा जागा आहे. काहीही लागले तरी भेट! तुझ्या राहण्याची, जेवणाची आणि नोकरीची व्यवस्था मी करतो.’ केवढं मोठं आश्वासन! पण तशी वेळ आली नाही. मी पुण्यात स्थिरावलो. विद्या महामंडळ संस्थेत शिक्षक म्हणून नोकरीस लागलो. सर्व शिक्षण पूर्ण केले. १९८९ साली आचार्य अत्रे शिक्षक पुरस्कार, १९९०मध्ये आदर्श शिक्षक पुरस्कार मिळवून १९९३मध्ये स्वेच्छानिवृत्ती घेतली. विद्या महामंडळ या शैक्षणिक संस्थेचा अध्यक्ष या नात्याने गेले तीन वर्षे पद सांभाळले आणि आता वयोपरत्वे काम होत नाही म्हणून निवृत्त झालो. याला कारण म्हणजे माझ्या अत्यंत पडत्या काळात माझ्या मागे उभी असलेली लीलाधर हेगडेसारखी उत्तुंग माणसे!

उत्तुंग आमुची उत्तर सीमा इंच इंच लढवू असं लिहिणारे कविवर्य वसंत बापट आणि लीलाधर हेगडे म्हणजे उत्तर पेशवाईतील प्रख्यात कलाकार होनाजी बाळा यांचा आधुनिक काळातील अवतारच. होनाजी सयाजी शिलारखानेने काव्य रचावे आणि बाळा कारंजकराने ते फडावर गावे, त्याप्रमाणे वसंत बापटांनी रचना करावी आणि लीलाधर हेगडे यांनी ती खड्या आवाजात सादर करावी. हे एक अतूट नातेच होते.
पुण्यात मुक्काम असला म्हणजे लीलाधर माझ्या घरी आवर्जून येत असे. गप्पांचा आणि आठवणींचा फड रंगात येत असे. त्यांच्यासमवेत काम केलेल्या ’गल्ली ते दिल्ली’ या वगनाट्याचा अनेक आठवणींची उजळणी होत असे. एकदा तो आला असताना माझी धाकटी कन्या डॉ. आरती रानडे हिचे कॅनडानिवासी मित्र निलेश आणि नेत्रा आले होते. दोघेही साहित्य, संगीत कला, नाटक याचे अभिजात आवड असलेले. बघता बघता गप्पांना रंग चढला आणि लीलाधरनं खणखणीत आवाजात प्रा. वसंत बापट लिखित महाराष्ट्राचा पोवाडा गायला. निलेशने तो रेकॉर्ड केला. आज ते रेकॉर्डिंग माझ्यापाशी नाही पण निलेशने ते जपून ठेवले असेल याची मला खात्री आहे. त्याचप्रमाणे माझे शेजारी (कै.) माधवराव लिमये हेही आमच्या समवेत रंगलेल्या गप्पांमध्ये सहभागी झाले होते.
आणखीन एक गोष्ट मुद्दाम सांगण्यासारखी म्हणजे लीलाधर हा मिरजेचा जावई आहे. लीलाधरचे सासरे मूळचे मिरजेचे नंतर ते पुण्यात स्थायिक झाले. मिरजेतील सुप्रसिद्ध अंबाबाई तालमीचे ते ज्येष्ठ कार्यकर्ते. दरवर्षी मे महिन्यामध्ये अंबाबाई तालीम संस्थेतर्पेâ मैदानी आणि मर्दानी सामने भरतात. त्याला ते पंच म्हणून आवर्जून उपस्थित राहायचे. त्यांचे आडनाव काकनुरकर. माझा धाकटा भाऊ जगदीश रानडे यांचा वर्गमित्र आणि नंतर पुण्यातील गरवारे महाविद्यालयात प्राध्यापक असलेला हरी देसाई उर्फ बाबा देसाई यांचे मामा म्हणजे काकनुरकर. या हरिभाऊचे आणखीन एक खास वैशिष्ट्य म्हणजे हा `चैत्रबन’ या पुण्यातील नामांकित संगीत क्षेत्रात कार्य करणार्‍या संस्थेचा संस्थापक सदस्य आहे. लीलाधरची पत्नी म्हणजे सुहासिनी (पूर्वी मुगी काकनुरकर म्हणून ओळखली जायची) तिचा भाऊ बाळासाहेब काकनूकर त्यांची पत्नी (शांताराम आठवले यांची कन्या) पद्मा काकनूरकर (आकाशवाणी निवेदिका) ही सारी मंडळी माझ्या स्नेही परिवारातीलच आहेत.
लीलाधर हा नुसताच शाहीर नव्हता, तो एक उत्तम लेखकही होता. त्याच्या नावावर प्रौढ वाङ्मय, बाल वाङ्मय आणि विविध प्रकारचे साहित्य अशी तीसपेक्षा अधिक पुस्तके आहे त्यातील अनेक पुस्तकांना राज्य सरकारचे आणि केंद्र सरकारचे पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. शिवसेनेचे नेते आणि पत्रकार ़वैâ.प्रमोद नवलकर हे लीलाधरची योग्यता पूर्णपणे जाणून होते. राजकीय मतभेद असले तरी त्यांच्यात प्रेम, जिव्हाळा आणि स्नेहबंध कायम स्वरूपाचा होता. लीलाधरच्या अनेक कामाशी त्यांनी सर्व प्रकारचे सक्रिय सहाय्य केलेले आहे.
’मी आणि माझी शाहिरी’ हे लीलाधर हेगडे यांचे आत्मकथनात्मक पुस्तक मी वाचतो आहे. गेल्या १०० वर्षांचा राजकीय. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि अनेक क्षेत्राचा इतिहास त्यांनी अत्यंत प्रभावीपणे मांडला आहे. जिज्ञासू वाचकांनी हे पुस्तक जरूर वाचावे आणि तरुण पिढीला वाचण्यासाठी आणि आचरणासाठी प्रवृत्त करावे. (’मी आणि माझी शाहिरी,’ लेखक लीलाधर हेगडे साने गुरुजी आरोग्य मंदिर प्रकाशन, पहिली आवृत्ती, ५ फेब्रुवारी २००६ मूल्य रुपये दोनशे.) प्रा. वसंत बापटांची या पुस्तकाला विलक्षण बोलकी अशी मुक्तछंदातील प्रस्तावना आहे. त्यातील काही ओळी उद्धृत केल्याशिवाय माझ्या लेखनाला समाधान मिळणार नाही…
’एका धडपडणार्‍या मुलाची कहाणी
लीलाधर
एक सैनिक कार्यकर्ता आणि कलाकारही
मग उशिरा बार भरलेल्या वृक्षासारखा साहित्याच्या अंगणात डवरून आलेला.
सारांशच सांगायचा तर
उद्याच्या पिढीला
सर्वांगी समर्थ करणारे
साने गुरुजी आरोग्य मंदिर
हीच आहे आज
लीलाधरच्या गुणसंपदेची साक्ष…’
-वसंत बापट
’पुन्हा प्रपंच’ या पुस्तकाला लिहिलेल्या प्रस्तावनेत महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु.ल. देशपांडे लिहितात,- किशोरवयात लीलाधरने हाती डफ घेतला तो देखील, मनाला पटेल त्याचाच मी पोवाडा गाईन- कोणाचा भाडोत्री शाहीर होणार नाही या प्रतिज्ञेने. त्याची विनोदी लेखणीही वरपांगी खट्याळपणा करत, थट्टा करत असताना दिसली तरी त्याच प्रतिज्ञेशी इमान ठेवून आहे. याची साक्ष या पुस्तकाच्या पानापानात आढळेल्ा.-पु. ल. देशपांडे
आणि स्वतः लीलाधर हेगडे आपल्या कलापथकातील विविध दौर्‍यांविषयी म्हणतात- ’या दौर्‍यांमुळे माझा वैयक्तिकही फार फायदा झाला. आत्मविश्वास वाढला. आपली कष्ट करण्याची किती हिम्मत आहे, लोकांची मने ओळखण्याची पात्रता किती, सर्वांना सांभाळून घ्यायची कुवत किती, स्टेजवर काम करण्याची लायकी किती व हिशोब ठेवण्याची वृत्ती किती, या सर्व गोष्टी कसाला लागल्या. हा काय कमी फायदा झाला आहे? पण त्यात आमच्या सहकार्‍यांनाही श्रेय दिले पाहिजे.’ -लीलाधर हेगडे (मी आणि माझी शाहिरी, पृष्ठ क्रमांक १०५)

Previous Post

दागिने कोणी चोरले?

Next Post

साऊथ इंडियन कँटीन…

Next Post
साऊथ इंडियन कँटीन…

साऊथ इंडियन कँटीन...

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.