• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

महागडी आणि वेळखाऊ रो रो रो रो ऽ

टोक्या टोचणकर (टोचन)

marmik by marmik
March 17, 2026
in टोचन
0
महागडी आणि वेळखाऊ रो रो रो रो ऽ

मुंबई ते विजयदुर्ग रो-रो पॅक्स बोट सेवेचा शुभारंभ अलिकडेच भाऊच्या धक्क्यावर मोठ्या थाटामाटात पार पडला, तेव्हा माझा मानलेला परमप्रिय लाडका मित्र पोक्याला खूप आनंद झाला. पण तिचं दरपत्रक पाहून ही सेवा सामान्य माणसासाठी आहे की श्रीमंत लोक आणि व्यापार्‍यांसाठी आहे, या शंकेने तो पुरता निराश झाला. केवळ बोटीत बसण्याची हौस म्हणूनही सामान्य कोकणवासी या सेवेचा आनंद घेऊ शकणार नाही, या काळजीने तो आणखीनच हैराण झाला. भाऊच्या धक्क्यावरून त्या बोटीतून विजयदुर्गला जायचं आणि तिथून द्राविडी प्राणायाम करीत अवाच्या सव्वा खर्च करून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी, विजयदुर्गच्या इतर गावी जायचं म्हणजे वेळ आणि खर्चाचा ताळमेळ त्याच्या डोक्यात बसतच नव्हता. केवळ जलप्रवासाचं पर्व कोकणात सुरु झालं यावर तो समाधान मानायला तयार नव्हता. मला म्हणाला, या बोटसेवेचं भाडं बघूनच डोळे पांढरे व्हायची वेळ आलीय. प्रवासी तिकिटाचे दर तर बघा, इकॉनॉमी क्लास तीन हजार रुपये, प्रीमियम इकॉनॉमी क्लास पाच हजार रुपये, बिझनेस क्लास सात हजार रुपये, प्रथम श्रेणी क्लास नऊ हजार रुपये. या बोटीतून दुचाकी, चार चाकी वाहनेही नेता येतील. वाहनांसाठी दर एक्सएल नऊ हजार रुपये, एल (लार्ज) आठ हजार रुपये, एम (मीडियम) सात हजार रुपये, एस (लहान) सहा हजार रुपये, दुचाकी एक हजार रुपये, सायकल सहाशे रुपये, एअर कंडिशन आसनव्यवस्था असलेल्या या बोटीचं दरपत्रक पाहून सामान्य कोकणी माणसाला त्या एसीमध्येही दरदरून घाम फुटल्याशिवाय राहणार नाही, असं पोक्याचं ठाम मत आहे.

अडचणीची आणखी एक गोष्ट म्हणजे बोटीत नेटवर्क नसल्याने प्रवाशांना मोबाईलचा वापर करता येणार नाही. अतिजलद वंदे भारत रेल्वे सेवा आणि विमानसेवेपेक्षा महाग आणि वेळकाढू प्रवास प्रवाशांनी का करावा असा प्रश्न तो मनापासून विचारतो. कोकणवासियांची परवड पाहून त्याला स्वस्थ बसवत नव्हतं म्हणूनच कोकण रेल्वेचे संस्थापक सदस्य आणि महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघाचे सल्लागार सुरेंद्र हरिश्चंद्र नेमळेकर यांचं याबाबतीत पोक्याने मत विचारले, तेव्हा ते म्हणाले, विजयदुर्गला पोहोचल्यावर पुढे घरापर्यंत आणि मुंबईला घरून भाऊच्या धक्क्यापर्यंत प्रवास खर्चही जोडला तर बजेट अजून वाढणार यालाच म्हणतात, चार आण्याची कोंबडी आणि बाराण्याचा मसाला.त्यापेक्षा रात्री दहा वाजता वसईवरून सावंतवाडीकरता पॅसेंजर गाडी सोडली तर कोकणातील सर्व प्रवासी सव्वादोनशे रुपयात सावंतवाडीपर्यंत पोहोचतील आणि तिथून एसटीने आपापल्या घरी जातील. या गाडीला भिवंडी आणि कोपर रोडसह कोकणातील प्रमुख स्थानके घेता येतील आणि सकाळी परतीच्या प्रवासाला निघालेली पॅसेंजर रात्री पुन्हा वसईला दहा वाजता पोहोचेल. यावर कोकणातील लोकांनी विचार करावा, हे त्यांचं म्हणणं पोक्याला योग्य वाटतं.

पोक्याला त्याने साठ वर्षांपूर्वी सिंदिया आणि चौगुले कंपनीच्या भलामोठ्या, लांबरुंद, तळमजल्यासह दोन मजली बोटीतून केलेला प्रवास आजही आठवतो. त्या आठवणी सांगताना तो इतका रमतो की सांगता सोय नाही… त्या आठवणी त्याच्याच शब्दात ऐका… मुंबईतून बोटीने कोकणात जायची सुरुवात घरापासून व्हायची. चाळीतली शेजारी-पाजारी मंडळी खाली उभ्या असलेल्या टॅक्सीपर्यंत यायची. एप्रिल-मे महिन्याच्या सुटीत ही कोकणची बोटवारी व्हायची. निरोप देताना शेजार्‍यांच्या डोळ्यात पाणी दाटलेलं असायचं. गावी पोचल्यावर पत्र पाठवा, असं आग्रहाने सांगितलं जायचं. टॅक्सी भाऊच्या धक्क्याबाहेर उभी राहायची. बोटीत आमच्याबरोबरचे बोजे, पत्र्याच्या ट्रंका, गावी काही कमी पडू नये म्हणून चहा पावडर, साखरेसकट घेतलेलं थोडंफार वाणसामान असलेल्या पिशव्या घेऊन लाल डगल्यातली हमाल मंडळी बोटीत तळ, पहिल्या किंवा दुसर्‍या मजल्यावर चादर पसरून भरपूर जागा अडवायचे. कुठलाही हमाल कधीच लबाडी करणारा नव्हता. आम्ही नेहमीच बोटीच्या दुसर्‍या मजल्यावर जास्त पैशाचं तिकीट विकत घेऊन जागा पकडायचो. ती बोट म्हणजे प्रचंड मोठी इमारतच असायची. भोंगा झाला की सुटायची. सभोवार सगळीकडे उसळणारं पाणी आणि दूरवर ठिपक्यासारखी दिसणारी मुंबई हळूहळू नजरेआड व्हायची. प्रचंड लाटांच्या आवाज आणि त्यात हेलकावणारी बोट रत्नागिरी, मुसाकाजी, रनपार बंदरं घेत, सिंधुदुर्गातील प्रत्येक बंदरावर थांबत थेट गोव्यापर्यंत जायची. बोट कधी किनार्‍याला लागत नसे. ती खूप अंतरावर समुद्रात नांगर टाकून उभी असे. किनार्‍यावरुन आलेले लाकडी पडाव बोटीतील खलाशी खेचून बोटीजवळ आणत. तिथून प्रवाशांना पडावात उतरवणं ही मोठी कसरत आणि प्रसंगी भीतीदायक स्थिती असे. एकदा का पडाव किनार्‍यावर लागले की बाजूला उभ्या असलेल्या एसटी किंवा बैलगाडीतून आंबे, फणस, काजू खाण्याची स्वप्नं बघत चाकरमानी आपापल्या गावाच्या घरात जात.

मुंबईहून सुटणार्‍या या महाकाय बोटींची वैशिष्ट्यंही खास होती. सिंदीया कंपनीच्या बोटींचा वेग तसा कमी होता. त्या आडव्या डुलत डुलत पाणी कापत, तर चौगुले स्टीमाशिप कंपनीच्या तिन्ही बोटी अत्यंत आधुनिक, अधिक प्रशस्त आणि उभ्याने (व्हर्टिकल) पाणी कापत अधिक वेगाने जात. पहिली ‘कोकण सेवक’ दुसरी ‘रोहिणी’ आणि तिसरी ‘सरिता’ या त्या तीन बोटी. बोटीत एका टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंत फिरता येई. जेवणाची ऑर्डर दिल्यावर जेवण पुढ्यात येई. काही गोवेकर मंडळी मजेत मद्यपान करीत जेवणाचा आस्वाद घेत. बोटीच्या डेकवर म्हणजे अगदी टॉपच्या भागात हवा खायला जाणे हा एक मस्त टाइमपास असे. रात्रीच्या अंधारात सभोवती काळोख आणि प्रकाशमान बेटासारख्या बोटीतला प्रवास हा एक सुखद अनुभव असे. पुढे समुद्रातील गाळामुळे ही बोटसेवा बंद झाली आणि तो गाळ काढण्याची तसदी कोणत्याही सरकारने घेतली नाही… आता ही मुंबई विजयदुर्ग रो रो बोट सेवा सुरु झाल्यामुळे ती स्वस्त आणि मस्त सफर आठवली!

Previous Post

नाय नो नेव्हर

Next Post

गंध नवारंभाचा… भिंतीरंगाचा!

Next Post
गंध नवारंभाचा… भिंतीरंगाचा!

गंध नवारंभाचा... भिंतीरंगाचा!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.