• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

‘तुर्क-अर्क’ यांचा लाफ्टरक्लब!

संजय डहाळे ( तिसरी घंटा)

marmik by marmik
March 11, 2026
in तिसरी घंटा
0
‘तुर्क-अर्क’ यांचा लाफ्टरक्लब!

एक काळ असा होता की, महाराष्ट्रातील साखर कारखान्यांचे गणेशोत्सव दणक्यात व्हायचे. नाटकवाल्यांची जणू ती दिवाळीपूर्वीची दिवाळीच! गणेशोत्सवात मुंबईतील व्यावसायिक नाटकांचे प्रयोग अगदी ठरलेलेच. त्याच मांडवाखालून नव्या नाटकांचे शुभारंभी प्रयोग आणि त्या मागोमाग दौरेही सुरू व्हायचे. काळ बदलला. पण त्या आठवणी आजही सुखावून जातात. ‘तरुण तुर्क, म्हातारे अर्क’ हे त्यातील एक शुभारंभी प्रयोग झालेलं नाटक. इचलकरंजीच्या डेक्कन स्पिनिंग मिलमध्ये ११ सप्टेंबर १९७२ या दिवशी या नाटकाचा शुभारंभी प्रयोग झाला. नंतर मुंबईत पुढल्याच महिन्यात ५ ऑक्टोबरला रवींद्र नाट्यमंदिरात प्रयोग झाला. या नाटकाने ३० दिवसात ४० प्रयोग, ९० दिवसात १०० प्रयोग असे अनेक विक्रम या नाटकाने केले आहेत.

पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरात तर त्या काळी कायम हाऊसफुल्ल रेकॉर्डब्रेक प्रयोग झालेत. त्याच नाट्यगृहात १४ जानेवारी १९७२ला मकर संक्रांतीच्या सणाला एकाच दिवशी सकाळ, दुपार, रात्र असे प्रयोग झाले. एका नाटकाचे एकाच दिवशी, एकाच नाट्यगृहात तीन प्रयोग करण्याची संकल्पना मूळची नाट्यमंदारचे निर्माते राजाराम शिंदे यांची. जी तिथे सर्वप्रथम साकार झाली. यातील सकाळच्या पहिल्या प्रयोगाला खुद्द शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना निमंत्रित करण्यात आले होते. आपल्या बोचर्‍या राजकीय व्यंगचित्रातून उभ्या जगाला हसविणार्‍या शिवसेनाप्रमुखांना प्रा. बारटक्के यांनी मनमुराद हसविले! याच्या आठवणी राजाराम शिंदे यांनी अनेकदा रंगवून सांगितल्या होत्या… असो.

या नाटकाच्या प्रवासात पुढे टर्निंग पॉईट… १० मे १९७४पासून या नाटकाचे हक्क स्वतः प्रा. मधुकर तोरडमल यांनी नाटककार म्हणून स्वतःकडे घेण्याबद्दल नोटीस दिली आणि वादविवाद सुरू झाले. प्रकरण कोर्टापर्यंत पोहोचले. दरम्यान १ जून १९७४ म्हणजे दुसर्‍याच महिन्यात ‘नाट्यमंदार’ने ‘फार्स किंग’ आत्माराम भेंडे यांना बारटक्केच्या भूमिकेत घेऊन नाटकाचे प्रयोग सुरू केले. ६८ प्रयोगही झाले, पण गर्दी खेचणारे विक्रमी प्रयोगांचे विनोदी नाटक कोर्टकचेरीत अडकले. उभयतांनी तडजोड करण्याचा सल्लाही न्यायालयाने दिला. या नाटकाच्या प्रवासातला हाही खडतर प्रवास नाट्यपूर्ण म्हणावा लागेल. खूप दिवस बंद असलेले एखादं अस्ताव्यस्त घर जर एखाद्या सुगृहिणीच्या हाती दिले तर काय होईल, नेमकं तसंच या नाटकाच्या नव्या निर्मितीत ५४ वर्षानंतर २०२६ या वर्षात झालंय. नाटक तेच पण संदर्भ बदललेले…

नाटककार प्रा. मधुकर तोरडमल हे नगरच्या महाविद्यालयातील प्राध्यापक. त्यांनी या नाटकापूर्वी गंभीर विषयावरली नाटके दिली. त्यात भोवरा, काळे बेट, आश्चर्य नंबर दहा, विकत घेतला न्याय, यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. दहा-बारा वर्षे प्राध्यापकी केलेल्या प्रा. तोरडमल यांनी सोबतकार ग. वा. बेहरे यांच्या सूचनेनंतर हे मनोरंजनात्मक नाटक लिहिले. बेहरे यांचा आग्रह या नाट्यलेखनामागे प्रामुख्याने आहे आणि त्यांनी त्याचे सोने केले. प्राध्यापक आणि विद्यार्थी यांच्या प्रेमाची अंशतः परतफेड जणू त्यातून झालीय. त्या काळचे महाविद्यालयीन जीवनातले पडसाद यातील प्रेमकथेतून मस्त जुळले आहेत. मुख्य म्हणजे नाटककार म्हणून त्यांनी ‘हा-ही- हे’ची भन्नाट बाराखडीही जुळविली, जी परवलीची ठरली.

एक कॉलेज त्यातील हॉस्टेल. तिथे बंडा आणि प्यारे हे दोघे ‘तरुण’ विद्यार्थी वर्षानुवर्षे राहात आहेत. हॉस्टेलची रूम जण त्यांचे घरच बनली आहे. प्रेमप्रकरणं करणं, सिग्रेटी ओढणं, मौजमजा करणे- याला प्राधान्य. शिक्षण ही बाब दुय्यम. असे हे कलंदर. त्यात मुकुंदा हा स्त्रैण विद्यार्थी नव्याने येतो, जो रूम पार्टनर म्हणून त्यांचा हक्काचा टाईमपास ठरतो. यांच्यात थोराड असलेला दीनानाथ थत्ते, जो कॉलेजमधली ‘रेक्टर’ पार्वती हिच्या प्रेमात आहे. त्यामुळेच थत्ते याने कॉलेजात अ‍ँडमिशन घेतलंय. भरीस भर म्हणजे कॉलेजमधले प्राध्यापक, हॉस्टेलचे प्रमुख प्रा. बारटक्के हे देखील पार्वतीवर नजर ठेवून आहेत. तरुण प्यारेचं लफडं समोरच्या गर्ल्स हॉस्टेलमधल्या ठमीशी जमतंय. कॉलेजातले तरुण प्रेमवीर आणि प्रौढत्वाकडे झुकलेले म्हातारे- यांची अशी ही ‘तुर्क-अर्क’ची मेजवानी दोन अंकात हसवणूक करते.
‘म्हातारे अर्क’ या टीममधले प्रा. बारटक्के आणि पार्वतीबाई हे दोघे वसतिगृहाचे प्रमुखपद सांभाळणारे रेक्टर. प्रा. बारटक्के यांना ‘दोन डोळे शेजारी पण भेट नाही संसारी!’ अशी खंत आहे. पार्वतीशी जवळीक साधण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. एकदा दोघांची भेट होते. गुलाबाचे फुल पार्वतीला देण्यासाठी प्राध्यापक आणतात खरे, पण वेंधळेपणामुळे फुलांच्या पाकळ्या ते स्वतः खातात. पुढे प्रेमपत्रांच्या गोंधळात गोंधळ मुलं एन्जॉय करतात.

‘तरुण तुर्क’ टीममधले बंडा आणि ठमी! खिडकीतून ‘पार’करुन प्रेम प्रकरण हृदयापर्यंत पोहचलेलं. दोघांच्या लग्नाच्या निमित्ताने सारेजण एकत्र येतात. यावेळी प्रा. बारटक्के यांना सरबताऐवजी ‘व्होडका’ देण्यात येते. मग काय प्राध्यापकांचा तोल जातो. दारू चढते… असं सगळं समज-गैरसमज, फसवाफसवी, लपवाछपवी यातून आकाराला आलेलं भरगच्च विनोदी कथानक रसिकांना पन्नास वर्षापूर्वीच्या काळात अलगद घेऊन जाते. मूळ संचातला प्रयोग बघितलेला रसिकवर्ग आजही आहे. त्यांनी मूळ प्रयोग आणि आजचा प्रयोग यात तुलना न केलेली बरी. नव्या दमाचा नवा प्रयोगही निश्चितच खळखळून हसवितो.

डोक्यावर इंग्रजी स्टाईलची हॅट, फ्रेंचकट टिपिकल मिशा, सस्पेंडर्सच्या साह्याने खांद्यावर अडकविलेली पँट, गबाळा काळा कोट, गळ्यात अडकवलेल्या दोरीवर लटकता चष्मा आणि हातात जुनाट छत्री असा ‘अवतार’ म्हटला की रसिकांच्या डोळ्यांपुढे प्रा. मधुकर तोरडमल यांचा प्राध्यापक बारटक्के येणं स्वाभाविकच. हाच बारटक्के या नव्या संचात अतुल तोडणकर याने समर्थपणे साकारलाय. मूळ नाटक बघितले नसेल त्यांना ही पर्वणीच म्हणावी लागेल. काहीसा वेंधळा, प्रेमळ, विसरभोळा अशी ही व्यक्तिरेखा त्याने तपशिलांसह उभी केलीय. नमुनेदार बाराखडी हे तर या व्यक्तिरेखेचे प्रमुख वैशिष्ट्यच. त्यातून हास्याचे फवारे उडतात. ही बाराखडी अश्लीलतेकडे झुकणार नाही, याचीही दक्षता घेतलेली दिसते. अतुलचे हे पुनरागमन त्याच्या चाहत्यांना भरपेट हसविणारे ठरेल, यात शंकाच नाही. पार्वतीसोबतचा प्रसंग तसेच दारूचा प्रसंग चांगला जमला आहे. सर्वनामांची बाराखडी तर धम्मालच!

मनाचा हिरवटपणा असणारा दीनानाथ थत्ते उर्फ थत्तेकाकांच्या भूमिकेत विनोदाची उत्तम जाण असलेले अभिनेते अभिजित चव्हाण यांनी बाजी मारली आहे. देहबोली शोभून दिसते. ही भूमिका मूळ प्रयोगात दीनानाथ टाकळकर यांनी केली होती. हा थत्तेकाका प्रâेश दिसतो. नीता पेंडसे यांनी पार्वतीची भूमिका केली असून त्यांचा संयमी अभिनय लक्षात राहतो. मुकुंदाच्या भूमिकेत चिंतन तांबे यांनी कमाल केलीय. लवचिक अभिनय, बायकी स्वर यातून तो हक्काचे हशे वसूल करतोय. बालनाट्यापासून सुरू झालेला चिंतनचा प्रवास आज एका उंचीवर पोहचला आहे. अन्य भूमिकेत सोहन नांदुर्डीकर (प्यारे), स्वानंद देसाई (बंडा), नितेश देशपांडे (बाबा), श्रुती पाटील (ठमी)- ही ‘टीम’ शोभून दिसते. पात्रनिवड अचूक आहे. याचे श्रेय अर्थातच दिग्दर्शक राजेश देशपांडे यांना जाते.

गाजलेली जुनी नाटके नव्या चौकटीत फिट्ट बसविण्याचे कौशल्य दिग्दर्शक देशपांडे यांच्याकडे आहे. नाट्य कुठेही रेंगाळणार नाही किंवा अतिरेक होणार नाही, त्याचे पुरेपूर भान दिग्दर्शनात आहे. कलाकारांवर परिश्रम घेतल्याचे जाणवते. नाट्य भरकटणार नाही तसेच नव्या-जुन्या रसिकांच्या पचनी पडेल, याची पुरेपूर खबरदारी दिग्दर्शकाने घेतली आहे. स्वरूपात बदल जरूर आहे, पण आशय कायम ठेवला आहे, जो पकड घेणारा आहे.

नेपथ्यकार संदेश बेंद्रे यांनी वसतीगृहाची खोली, खिडकीतून दिसणारे दुसरे लेडीज हॉस्टेल, बगीचा हे सारं काही नाट्याला अनुरूप उभं केलंय. हालचालींना कुठेही अडथळा होणार नाही, या प्रकारे रचना आहे. त्यामुळे वातावरणनिर्मिती उत्तम होते. संगीताची जबाबदारी तुषार देवल यांची आहे. जी यथायोग्य. टायटल साँग ताल धरायला लावणारे. प्रकाशयोजना श्याम चव्हाण आणि रंगभूषा संतोष पेडणेकर यांची आहे. मंगल केंकरे यांनी दिलेले गेटअप चांगले आहेत. विशेषतः प्रा. बारटक्के यांची वेशभूषा नोंद घेण्याजोगी. सार्‍या तांत्रिक बाजूंची जमवाजमवी परिणामकारक.

‘११ नाटकांच्या नवलकथा’ यासाठी नटसम्राट, तो मी नव्हेच, पुरुष, सखाराम बाईंडर, अश्रूंची झाली फुले, वस्त्रहरण, विच्छा माझी पुरी करा, ती फुलराणी, रायगडाला जेव्हा जाग येते, हसवाफसवी आणि तरुण तुर्क म्हातारे अर्क, या नाटकांची निवड यापूर्वी केली होती. त्याला पुस्तकरूपही मिळाले. ही वैशिष्टपूर्ण गद्य नाटके जणू अमरत्वाचे वरदान घेऊनच जन्माला आलीत. ‘तरुण तुर्क’ हे एका वळणावरलं नाट्य म्हणून नाट्यप्रवाहातलं निशाण आहे. त्याची निर्मिती निर्माते दिनू पेडणेकरांच्या पंचकन्यांनी केलीय. त्याचे कौतुक करावे तेवढे कमीच; कारण अडचणीच्या वेळी त्या सार्‍या ठामपणे प्रथमच निर्मात्या म्हणून उभ्या राहिल्या. निर्मितीमूल्यात कुठेही तडजोड केलेली नाही. प्रियांका पेडणेकर, मधुरा पेडणेकर, योगिता गोवेकर, प्राची पारकर, विजया राणे- या त्या पंचकन्या. निर्मितीक्षेत्रातला हा नवा पायंडा पाडला आहे.

गाजलेल्या, चर्चेतल्या जुन्या नाटकांची भाऊगर्दी आज व्यावसायिक रंगभूमीवर झालीय. या पुनरुज्जीवित नाटकांना उदंड प्रतिसाद मिळतोय. ‘जुनं ते सोनं’ असं म्हणायला भान पाडणारा हा काळ. यातील ‘एक फूल, दोन भुंगे’ यांची दे धम्माल अनुभविण्यासाठी तसेच विक्षिप्त, नमुनेदार प्राध्यापकाच्या भेटीसाठी हा रंगयोग जुळून आलाय. विनोदी नाटकांच्या परंपरेतला जुना हास्यगोळा नव्या बाटलीत पेश केलाय, जो ‘तुर्क-अर्क’चा लाफ्टरक्लबच!
तरुण तुर्क; म्हातारे अर्क
लेखक- प्रा. मधुकर तोरडमल
दिग्दर्शक – राजेश देशपांडे
नेपथ्य – संदेश बेंद्रे
संगीत – तुषार देवल
रंगभूषा – संतोष पेडणेकर
वेशभूषा – मंगल केंकरे
प्रकाश – श्याम चव्हाण
निर्मात्या – पंचकन्या
निर्मिती संस्था : – अनामिका / कौटुंबिक कट्टा
प्रकाशित – साईसाक्षी

Previous Post

उद्घाटन

Next Post

गेम करतो गेम!

Next Post
गेम करतो गेम!

गेम करतो गेम!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.