
‘अर्ध्या, काय ऐकू येईना झालं का?’ अर्ध्या नम्याच्या मोटरसायकलवर मागं बसून स्टँडमधी घुसला कुठं नाही तर मागून स्कुटीवर येणारे कोरडे काका विचारायला लागले.
‘हा हेडफोन लावेल असतील त्यानं..!’ त्यावर आधी नमितच कारण देऊ लागला.
‘नाही, हो काका! खरंच ऐकलं नाही मी! ऐकलं असतं तर मागं तरी बघितलं असतं ना?’ अर्ध्याला आरोप सहन होत नाही. मग ऐकून घ्यावं का? एकतर हे कोरडे काका भयानक हट्टी आणि हेकेखोर माणूस. आपलं तेच खरं, बाकी सगळंच झूठ ठरवणारे.
‘बरं, एवढा वेळ नाहीय माझ्याकडे! लवकर चला बरं!’ इति कोरडे काका.
‘काका, आता कामावर निघालोय. आधीच मला उशीर झालाय. त्यात कुठं चला म्हणताय?’ अर्ध्या चिडक्या स्वरात बोलला.
‘अरे राष्ट्रकार्य काही कळतं की नाही? तुमच्या पिढीला? त्यासाठी काही क्षण दिले तर काय पहाड कोसळणार आहे का?’ कोरडे काकांचा थोडा आवाज वाढला.
‘पण काका नेमकं करायचं काय आहे?’ नम्यानं नमतं घेत विचारलं.
‘हे इथं नगर आहे ना? त्याला पंडितजींचं नाव देऊन कमान उभारलीय तिचं विधिवत उद्घाटन करतोय आपण.’ कोरडे काका कवतुकानं आणि उत्साहानं सांगू लागले.
‘ह्या दिवसांत पंडित नेहरूंच्या नावे कमान? काय रे, काका बदलले का?’ अर्ध्यानं शंकेनं नम्याच्या कानात विचारलं.
‘अरे ते धनादाळ आहेत ना कुणी? त्यांच्या नावाची पाटी असंल.’ नम्यानंही हळू आवाजात उत्तर दिलं. मोठ्यानं कोण बोलंल काकांपुढे? उगाच भांडणाचा आट!
‘अरे काय खुसुरपुसूर करताय? चला लवकर! नेताजी येतील इतक्यात..!’ काका वैतागून कावले.
‘काका पण नेताजी येणार म्हंटल्यावर कश्याला नेताय आम्हाला? म्हणजे आम्ही एकतर तुमचे मेंबर नाही, परत तुमची…’ नम्या टाळायला लागला.
‘हां, ते माझ्यावर सोड! मागे ट्रिपल तलाक कायदा झाला तेव्हा फटाके फोडायला, मिठाई वाटायला गल्लीतल्या महिला नेल्या होत्या मी बुरखे घालून. मी सगळं मॅनेज करू शकतो. ते माझ्यावर सोड.’ काका बोलूच देईनात! तोच स्टँडमधून बाहेर मोकाट जनावरं निघालेत, त्यातल्या एकाला हात लावून काकानं श्रद्धेनं दर्शन घेतलं.
‘काका वळू!’ नम्या ओरडणार तोच अर्ध्यानं मागून त्याचं तोंड दाबलं. असती एखाद्याची श्रद्धा! त्याच्यात ही मोकाट जनावरं काकांच्याच कृपेनं गावभर हिंडतात. मागं सरपंच काही अॅक्शन घ्यायचं बोलला, तर काकानं गौमाता, राष्ट्रमाता आणि बरेच चित्रविचित्र शब्द वापरून ग्रामसभेत भाषण झोडलेलं. धर्मद्रोही होण्यापेक्षा मोकाट जनावरं परवडली म्हणत सरपंचानं हात जोडलेले.
‘पण काका, कामावर लाल शेरा पडंल, त्याच्यात आम्ही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर!’ अर्ध्या कुरकुरायला लागला. निदान त्यामुळे तरी त्यांनी नाद सोडावा?
‘त्यांना म्हणावं राष्ट्रकार्यासाठी एक दिवस एक घंटा दिल्याने अडचण काय आहे? तुझ्या बॉसचा नंबर दे नाही तर मला! मी बघतो.’ काकांनी आज अगदी पिच्छाच पुरवला!
‘नको नको! येतो आम्ही!’ आज खाडा पडला तरी चालंल पण कोरडे काकानं कंपनीत नुसता शिपायाला फोन लावला तर उद्यापासून कंपनीचं गेट बंद व्हायचं! अर्ध्या त्याच धाकानं नको बोलला.
‘चल लवकर मग… आणि येताना कोपर्यावरच्या माळ्याकडून मोठे हार घेऊन ये. सत्काराला!’ काका तसे स्कुटी घेऊन पुढे निघाले.
‘अर्ध्या, आज दिवस बेक्कार दिसतोय बघ!’ नम्याचा चेहरा आताच पडला. अजून कार्यक्रम व्हायचाय!
‘जावं तर लागंल, नाहीतर महिना बेक्कार जाईल आपला! चल थोडं टाईमपास करत जाऊ. नंतर तोंड दाखवून पळून जाऊ. काय?’ अर्ध्या आयडिया देत बोलला खरा! पण होईल असं? ही त्यालाच फार शंका!
नम्या पुन्हा किक मारून मोटरसायकल घेऊन हळू हळू निघाला! काकानं सांगितलेलं माळ्याकडून हार माळा न्यायचं. म्हणून मग नम्यानं माळ्याच्या दुकानापुढं गाडीला ब्रेक लावला. अर्ध्या, नम्या दोघं उतरून दुकानात डोकावू लागले. तिथं कुणी दिसत नाही. म्हणून मान वळवली तर थोडं अंतर सोडून पुढं माळीवाला मघाची काकाची मोकाट जनावरं हुसकावतोय.
‘ओ, कोरडे काकाच्या माळी द्या!’ नम्या पुढाकार घेत बोलला.
‘पैसे? पैसे कोण देणार?’ ढोरांनी वैतागलेला माळी डायरेक पैश्यांवर आला.
‘काका म्हणले राष्ट्रकार्य… अर्ध्या काही पुटपुटला न् पुटपुटला तोच नम्या त्याचं बोलणं थांबवत बोलला. ‘कोरडे काका बोलले, तुम्हाला बिल बनवून ठेवायला. कार्यक्रम संपला रे संपला की ते येणारे चेक घेऊन.’ नम्यानं थाप ठोकली. बहुतेक माळ्याला ती खरी वाटली तसा तो माळी काढायला लागला.
पण गप्प राहील तो अर्ध्या कसला? त्यानं एक झेंडूचं नकळत फूल उचललं नि ते डोळे मिचकावत कान टवकारून दूर उभारलेल्या मघाच्या वळूच्या दिशेनं फेकलं. त्यानं ही ते चटकन फस्त केलं.
‘घ्या!’ माळी हार-माळा पुढे करत बोलला. तसं अर्ध्याचं लक्ष परत हारांवर आलं.
‘कॅरीबॅग द्या ना एक.’ एवढ्या माळी हातात कश्या न्यायच्या हा अर्ध्याला प्रश्न.
‘बंदी आहे कॅरीबॅगवर!’ माळी डाफरला. तसं नम्या पुढं होऊन त्या मोठमोठ्या हार-माळी अर्ध्याच्या हातात देऊन ‘गप्प चल.’ बोलला. एकतर थाप ठोकून माळी मिळवल्या, त्याच्यात त्याच्याशी हुज्जत घालायची म्हणजे?
अर्ध्या दोन्ही हातांनी हार आवळत, काही गळ्यात अडकवत गप्प मागं बसला. नम्यानं एका किकमधी गाडी चालू केली आणि ते निघाले.
‘अर्ध्या, एवढं लवकर जाऊन उभं राहण्यापेक्षा काही खाऊन जाऊ काय?’ नम्य्ाानं एक फर्मास प्रस्ताव दिला.
‘हा चालंल!’ अर्ध्यानं तर तो लगेच स्वीकारला. एकतर काकानं नऊचा टायमिंग सांगितलाय उद्घाटनाचा! पण त्याचे नेताजी वेळेत येतील याचा भरवसा काय? आणि वाजलेच बारा तर उपाशी रहावा का तवर?
एक गाड्यापुढं नम्यानं गाडी थांबवली. दोन डिश पोह्याची ऑर्डर देऊन तो आणि अर्ध्या दाटीवाटीनं बाकड्यावर बसले.
‘अर्ध्या, माळा घेऊन बायको शोधायला चालला का?’ पोह्यावाला डायरेक अर्ध्याचं नाव घेत बोलला. अर्ध्याला प्रश्न पडतो, याला नाव कळलं कसं?
‘नाही रे! ते पंडितजींचं नाव द्यायचंय ना? त्या नव्या नगराला. तिथल्या सत्काराला घेऊन चाललोय.’ नम्यानं स्वतःच सांगून टाकलं.
‘कोरडे काकाचं काम दिसतंय. माझ्याकडे पण आले होते. शंभर एक जणांचा एक वेळचा नाष्टा म्हणून पोहे दे म्हंटले. पण मी सरळ सांगितलं, घर जाळून फुकटचं राष्ट्रकार्य करायला रिकामा नाही मी! आधी पैशे द्या. जेवढे पैशे तेवढे डिश पोहे तयार करून पाठवतो. मग काय गेले मुकाट्यानं!’ बोलता बोलता पोहेवाल्या पोरानं दोन डिश दोघांच्या हातात टेकवल्या. डिश हातात घेतल्यावर दोघांनाही आपणच काकापुढं चुक्ष् कसं ठरतो? याचा सवाल पडलाय.
दोघं पैशे देऊन गाडीवर बसून कार्यक्रमस्थळाकडं निघाले. अर्ध्या हार सावरू लागलाय, तर त्याला एकदोन फुलं मोकळे झालेले दिसले. ते हातात घेत असताना त्याची नजर रस्त्याच्या कडेला जाते, तर तिथं तोच काकांचा वळू दिसला. ‘यो, यो’ करून अर्ध्यानं पुन्हा त्याच्यापुढं दोन फुलं फेकले. खाईल तरी बिचारा! पायदळी जाण्यापेक्षा मुक्या जित्राबाच्या पोटात जाईल. दुसरं काय?
आयला ही तर बरीच गर्दी जमलीय. अर्ध्या बघायला लागला. जशी गाडी कार्यक्रमाच्या ठिकाणाकडं जायला लागली तशी गर्दी अंगावर यायला लागलीय. तरी त्याच्यातून हळू हळू वाट काढत नम्यापुढं निघाला. पाहुण्यांच्या आधी पोहोचलं तर बरं!
‘ए वळू!’ एकजण पुढून बोंबलला.
‘तुझा बाप वळू!’ अर्ध्या शिव्या द्यायला कधी हटलाय? तेव्हा आता हटेल? त्याच्या शिवी हासडण्याचा परिणाम म्हणा की आणखी काही! लोकं दणादण बाजूला व्हायला लागले. तसा नम्याचा स्पीड वाढला. पुढं कमान दिसायला लागलीय. तिथं काही भडक टोप्या घातलेले भडक माणसं दिसू राहिले. पण यांची मोटरसायकल बघून ते बाजूला पळायला लागले. का? ते दोघांनाही कळत नाही.
‘अर्ध्या, माऽऽळाऽऽऽ…’ कोरडे काका एकदम कोरड्या घश्यानं ओरडले. ते माळा अर्जंट मागताय असं समजून अर्ध्यानंही लगेच त्यांच्या दिशेनं माळा फेकून दिल्या. नम्याला त्याची भणकच नाही, तो गाडी पुढे नेऊच राहिला. शेवट एक कोपर्यातली जागा बघून त्यानं गाडी लावली. उतरताना त्याची नजर अर्ध्यावर आल्यावर लगेच त्यानं विचारलं, ‘अर्ध्या माळा रे?’
‘त्या काय काकाला दिल्या..!’ अर्ध्या बोट दाखवायला आणि काकाच्या दिशेनं नजर जायला एक वेळ झाली.
तर… काका नव्या कमानीखाली निपचित पडला होता. मघाचा वळू नाचत, ढूसण्या देत काकाच्या अंगावरच्या माळा ओरबाडू राहिला होता. लोकं त्याला हाकलायचा प्रयत्न करू राहिले होते. हे बघून अर्ध्याची तंतरली.
आता काय करायचं, याचा एक मिनिटं विचार करून नम्या गाडीला किक मारायला लागला. ‘अर्ध्या, पळ.’ त्यानं म्हणताच अर्ध्याची तंद्री भंगली आणि तो पटकन गाडीवर बसला. दोघं गाडीच्या धुरात गायब पण झाले…

