
रवांडा या आफ्रिकन देशात ७ एप्रिल ते १९ जुलै या काळात नरसंहार झाला.
९ लाख माणसं मेली.
युद्धाचं वेळापत्रक असं.
१ ऑक्टोबर १९९०. आरपीएफ (रवांडा पॅट्रियॉटिक फ्रंट ) या टुट्सींच्या सैन्यानं युगांडामधून रवांडावर आक्रमण केलं.
१ नोव्हेंबर १९९०. आरएएफ (रवांडा रेव्होल्युशनरी फ्रंट) या रवांडाच्या सैन्यानं (मुख्यतः हुटूंची संघटना) आरएएफचं आक्रमण परतवलं. टुट्सी रवांडात परतले.
१९९२. दोन वर्षं आरपीएफनं आक्रमण केलं, आरएएफनं आक्रमणं परतवली.
४ ऑगस्ट १९९३. तांझानियात आरुषा या ठिकाणी आरपीएफ आणि आरएएफ यांच्यात समझौता झाला, संघर्ष संपवून दोघांनी रवांडात एक संयुक्त सरकार स्थापन करायचं ठरलं. एक पाच कलमी कार्यक्रम ठरला.
२१ ऑक्टोबर १९९३. बुरुंडीच्या हुटू प्रेसिडेंटचा खून टुट्सी मिलिशियानं केला. दंगल झाली. दोन्ही बाजूचे हज्जारो लोक मेले.
६ एप्रिल १९९४. किगाली विमानतळावर उतरत असलेल्या विमानात स्फोट रवांडा आणि बुरुंडीचे प्रेसिडेंट या घातपातात मारले गेले. दोघेही हुटू जमातीचे.
७ एप्रिल १९९४. रवांडातल्या हुटू सैन्यानं टुट्सींच्या हत्याकांडाला सुरुवात केली.
२१ एप्रिल १९९४. युनोचे १० सैनिक मारले गेले. युनोनं सैनिकसंख्या २५४८वरून २७०वर आणली.
१७ मे १९९४. युनोनं सैनिक वाढवले, मदतकार्याला सुरुवात केली.
७, जुलै १९९४. आरपीएफच्या सैन्यानं किगाली सर केलं.
१९ जुलै १९९४ आरपीएफनं सरकार स्थापन केलं. अंतर्गत युद्ध आणि हिंसा संपली.
***
रवांडामध्ये दोन प्रमुख जमाती. हुटू आणि टुट्सी. हुटू ८५ टक्के आणि टुट्सी १५ टक्के.
हुटू लोक शेतकरी असतात. शेती करत असल्यानं एका जागी स्थिर असतात. शरीरानं धिप्पाड असतात.
टुट्सी हा पशुपालक जमात. जंगलात, डोंगरकपारीत फिरत असतात. संख्येनं ते दुसर्या क्रमांकावर येतात. रवांडातला निसर्ग आणि हवामान पशू धष्टपुष्ट करण्यासाठी उपकारक असतं. रवांडातल्या गायबैलांची शिंग पाचेक फूट लांब आणि मजबूत असतात. टुट्सी डोंगरदर्यात फिरत असल्यानं काटक असतात.
दोघांचाही मूळ वंश बांटू. बांटू वंशात सुमारे ४०० जमाती आहेत. हुटू आणि टुट्सी या जमाती रवांडा, युगांडा आणि बुरुंडी या तीन देशांत पसरलेल्या आहेत. देश ही राजकीय ओळख झाली. जमाती ही ओळख मानत नाहीत. ते आपापल्या जातींना चिकटून असतात, ते हवे तसे हवे तिथं जात असतात, देशाची हद्द त्यांच्या दृष्टीनं निर्रथक असते. मूळ वंश कॉमन असल्यानं दोघेही किन्यारवांडा नावाची भाषा बोलतात, या भाषेला लिपी नाही. भाषेला विसाव्या रूप आलं. दोन्ही जमातींचा धर्म एकच, सण आणि जगरहाटी एक, इतिहास एक, संस्कृतीही एकच होती.
नरसंहारात हुटू जमातीच्या लोकांनी प्रामुख्यानं टुट्सी जमातीचे ८ लाख लोक मारले. हा नरसंहार हुटूंनी ठरवून केला, व्यवस्थित नियोजनपूर्वक केला, हुटूंचं सरकार होतं, सरकारी यंत्रणा त्यासाठी वापरली गेली. रवांडाच्या सरकारची नोकरशाही, लष्कर आणि पोलिस या नरसंहारात गुंतले होते. जुवेनाल हबियारिमाना हे हुटू पुढारी १९७५पासून रवांडाचे पंतप्रधान होते. त्यांनी हुटू जमातीच्या लोकांना एकत्र करून टुट्सी जमातीच्या लोकांविरोधात मोहीम चालवली. त्याच मोहिमेचा परिणाम म्हणून नरसंहार झाला.
***
६ एप्रिल १९९४ रोजी रवांडाचे प्रेसिडेंट हबियारिमाना आणि बुरुंडीचे प्रेसिडेंट टेरियामा वाटाघाटी आटोपून विमानानं रवांडात परतत होते. दोघेही हुटु होते. विमान रवांडाच्या राजधानीत किगाली विमानतळावर उतरायच्या सुमारास एकापाठोपाठ एक अशी दोन मिसाईल विमानावर आदळली. स्फोट झाला. विमान खलास झालं. त्यात दोघेही मारले गेले. जनरल बॅगासोरा रवांडाचे लष्करप्रमुख होते, सरकारात दुसर्या क्रमांकाचे नेते होते.
७ एप्रिलपासून लष्कर आणि पोलिसांनी किगालीमधली टुट्सी माणसं मारायला त्यांनी सुरुवात केली.
***
किगालीमध्ये सरकारी लष्कराचे सात हजार लोक होते. त्यात भर होती प्रेसिडेंटच्या खास गार्ड्सची, या खासमखास सैनिकांची संख्या होती दोन हजार. बॅगासोरानं तयार केलेल्या खाजगी सेनेचे दोन हजार कार्यकर्ते सैनिक होते. त्यांची एकूण संख्या ११ हजार.
१९९०पासूनच रवांडात तणाव होते, हुटू-टुटसी मारामार्या सुरू होत्या. युनोची शांतीसेना तेव्हापासूनच किगाली शहरात मुक्कामाला होती. जनरल डिलेर युनोसेनेचे प्रमुख होते. त्यांनी आपल्या वरिष्ठांना कळवलं की काही तरी भयंकर घडतंय, माझ्याकडं फक्त १ हजार सैनिक आहेत, ते अपुरे आहेत, अधिक सैन्य पाठवा. अधिक कुमक आली नाही.
युवा शाखेचे आणि पक्षाचे लोक किगाली शहरात फिरले. त्यांच्याकडं याद्या होत्या. कोण हुटू आहेत आणि कोण टुट्सी आहेत, याची नोंद त्या यादीत होती. टुट्सीच्या घरात जाऊन एकेका माणसाला कोयत्याचे घाव घालून मारण्यात आलं. स्त्रियांना विवस्त्र करून त्यांच्यावर बलात्कार झाला, त्यांच्या मुलाबाळांसमोर, इतर कुटुंबियांसमोर. बलात्कार आटोपल्यावर त्यांचे अवयव कोयत्यानं तोडण्यात आले, त्यांच्या योनीत भाले आणि दंडुके घुसवण्यात आले. ज्यांनी टुट्सीना वाचवण्याचा प्रयत्न केला, टुट्सीना लपवलं त्या हुटूंनाही मारण्यात आलं.
हा उद्योग चालला होता तेव्हा काही लोकांनी यात हात धुवून घेतले. टुट्सीच्या घरात घुसत. धमकी देत. पैसे दिले की पळून जायला सांगत. काही ठिकाणी घरात घुसून स्त्रियांकडं सेक्सची मागणी केली. ज्यांनी लैंगिक व्यवहाराला परवानगी दिली त्यांच्याशी व्यवहार करून त्यांना पळून जायला दिलं. तेवढे लोक वाचले.
दुसर्या आठवड्यात हे उद्योग करणार्यांना हुटूंना हुडकून ठार मारण्यात आलं.
टुट्सींची संख्या एवढी होती की असं एकेकट्याला मारत बसलं तर फार वेळ लागणार होता. घाऊक हत्यांची योजना ठरली.
सरकारनं जाहीर केलं की झालं ते खूप झालं, आता चर्चा करून मधली वाट काढली जाईल. कोण खरंच देशद्रोही आहेत आणि कोण निष्पाप आहेत त्याची शहानिशा केली जाईल, त्यानुसार निर्णय होईल. तेव्हा लोकांनी सरकारी कार्यालयात जमावं, चर्चमध्ये जमावं. धर्मकर्मीना सांगण्यात आलं की त्यांनी लोकांना गोळा करावं. झुंडीच्या झुंडी चर्चकडं रवाना झाल्या.
एक उदाहरण.
अँजेलिक बुकावू किसी.
नियामाटा गाव. भाले आणि कोयते घेऊन माणसं घरात घुसली. घरात अँजेलिकचे सासरे, नवरा, तीन मुलं होती. अँजेलिकचा नवरा मध्ये पडला, मुलांना वाचवण्यासाठी. त्याचे तुकडे करण्यात आले. नंतर मुलांचा नंबर. हातोड्यांनी त्यांची डोकी फोडण्यात आली. नंतर वडील. अँजेलिक एका मुलाला घेऊन पळाली, मागच्या दारानं चर्चकडं धावत गेली. मारेकरी तिचा पाठलाग करत होते. शांततेच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून लोकं चर्चकडं निघाली होती, पोचली होती. त्या गर्दीत अँजेलिक चर्चमध्ये घुसली. चारेक हजार माणसं होती.
‘टुट्सीनी उभं रहायचं…’
एका माणसानं ऊंच आवाजात आदेश दिला. माणसं उभी राहिली.
चर्चच्या दारात उभ्या असलेल्या लोकांच्या हातात मशीनगन होत्या. गोळ्यांची लड. उभी माणसं धडाधड कोसळली. तरीही काही सेकंद गोळीबार चालू होता. अँजेलिकनं जमिनीवर लोळण घेतली, मेल्याचं सोंग केलं. काही वेळानं सारं शांत झाल्यावर अँजेलिकनं पळ काढला. एका जमावानं पाठलाग केला. जमावातल्या कोणी तरी भाला फेकला, तो अँजेलिकच्या मुलाच्या डोक्यात घुसला. मुलगा जागच्या जागी मेला. अँजेलिक पळतच राहिली. समोर युनोचे सैनिक होते. त्यांच्यामुळं अँजेलिक वाचली. तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं.
अत्याचार करणार्यांना प्रोत्साहन होतं. कपडे, युनिफॉर्म, दारू, जेवण दररोज दिलं जात होतं. नोकरीचं आश्वासन होतं. लूट करताना शेतकर्याला मारा आणि त्याची जमीन हडप करा असे आदेश होते. लुटारू मंडळी जनावरं, घराचे दरवाजे, छप्परं इत्यादी काढून नेत होते. मशीन गन, बंदुका पुरवल्या होत्या, त्यांच्या वापरण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं होतं. उखळी तोफाही देण्यात आल्या होत्या. शस्त्रं अपुरी होती, मारेकर्यांना कोयते मॅचेट देण्यात आले. अनेकांनी तर स्क्रू ड्रायव्हर आणि घरगुती चाकूही वापरले.
***

हान्विएर मुन्यानेझाची कहाणी.
आम्ही चर्चमध्ये गोळा झालो. चर्चपासून काही अंतरावर हुटू युवक सेनेचे कार्यकर्ते, पोलिस, सैनिक दबा धरून होते. ते चर्चच्या सर्व दरवाजांतून आत घुसले. त्यांच्या हातात सुरे, सोटे होते. आत शिरल्या शिरल्या त्यांना माणसांवर सपासप वार करायला सुरुवात केली. एकच कल्लोळ माजला. माझी बहीण सोबत होती. मारेकर्यानं तिच्यावर सोटा उगारला. मारणारा हुटू होता. बहिणीनं त्याला ओळखलं. ती म्हणाली, ‘मारायचं असेल तर पटकन मार, माझे हाल करू नकोस.’ मारेकर्यानं तिच्या डोक्यावर सोटा हाणला. ती खाली पडली. शेजारीच असलेली बाई ओरडली, ‘अरे ती गरोदर आहे’. मारेकर्यानं सुरु हातात घेतला. बहिणीच्या पोटावर वार केले. वार केले म्हणजे व्यवस्थित फळ कापावं तसे. तिचं पोट फाडलं. आतल्या अर्भकाला मारलं. मी ओरडले. मारेकर्यानं माझ्या डोक्यावर सोटा हाणला. मी पडले. मारेकर्यानं माझे डोळे उघडून मी जिवंत आहे की मेलेय ते तपासण्याचा प्रयत्न केला. मी मेलेल्या माणसासारखे डोळे केले. मी मेलेय असं त्याला वाटलं, दोघांनी मला उचललं, फरफटत बाहेर नेऊन प्रेतांच्या ढिगार्यावर टाकलं. पाठोपाठ आणखी प्रेतं माझ्या अंगावर येऊन पडली. काही वेळानं आसमंत शांत झाला. मग गावातले टुट्सी गोळा झाले, त्यात माझे वडीलही होते. मला जवळच्या एका इमारतीत नेण्यात आलं. मलमपट्टी करण्यात आली, औषधोपचार झाले.’
***
बीटा मुकामासाबोची कहाणी.
बीटा शेजारच्या टुट्सी घरामध्ये होती. नवरा बायको आणि दोन मुलांचा टुट्सी संसार. युवा सेनेचे कार्यकर्ते घुसले. टुट्सींचं घर आहे याची खात्री झाली. एका स्त्रीला बाहेर काढलं. मारलं. ती खाली पडली. दोघा तिघांनी तिला फरफटत नेऊन सांडपाण्याच्या डबक्यात टाकलं. नंतर तिच्या नवर्याला मारलं. त्याला डबक्यात नेऊन टाकलं. हा सारा प्रकार त्या घरात लपलेली बीटा पहात होती. तिनं दोन्ही मुलांना लपवलं. मारेकरी गेल्यावर तिनं मुलांना घेऊन पळ काढला. हुटू होती म्हणून ती वाचली, दोन्ही टुट्सी मुलं वाचली.
सारं शांत झाल्यानंतर युवा सैनिक गोळा झाले. त्यांनी घराचे दरवाजे आणि खिडक्या उचकटल्या. घरावरचं छप्पर उचकटलं. घेऊन गेले. सैनिक गरीब घरचे होते. दारं खिडक्या हा त्यांनी केलेल्या कामाचा मोबदला होता.
***
नरसंहाराच्या बातम्या जगभरात पसरत होत्या, युनोकडं त्या पोचत होत्या, अमेरिका-प्रâान्स-बेल्जियम याही देशात इंटेलिजन्सची माणसं माहिती देत होती. दररोज हजारो माणसं मरत आहेत हे स्पष्ट झालं होतं.
युनोच्या सैनिक दलाचे रवांडातले जनरल डिलेर अधिक कुमक मागत होते. युनोमध्ये चर्चा सुरू झाली. जेनोसाइड अर्थात नरसंहार हा शब्द उच्चारायला कोणीही तयार नव्हते. मंडळी अंतर्गत युद्ध, जातीय हिंसा असे शब्द वापरत होते. हा रवांडाचा अंतर्गत प्रश्न आहे असं म्हणून मंडळी हात झटकत होती.
युनोनं आपले सैनिक वाढवले तर नाहीतच, पण होते तेही परत मागवले. युनोची ३० हजार माणसं रवांडात विविध मानवकल्याणाची कामं करत होती. त्यांनाही सुरक्षित बाहेर काढण्याची मोहिम युनोनं हाती घेतली.
आरपीएफ या टुट्सी सेनेचे २५ हजार सैनिक रवांडात होते. नरसंहार सुरू झाल्यानंतर महिना दीड महिन्यात रवांडाच्या लोकांनी २ लाख टुट्सींना मारलं होतं. आरपीएफला वाटत होतं की आता जेवढे टुट्सी मरू शकतात तेवढे मेले आहेत, शक्य होतं ते पळून गेले आहेत. त्यामुळं रवांडात आता फक्त आरपीफचं सैन्य आणि रवांडाचं सैन्य यांच्यातच लढाई व्हायची आहे. संख्येच्या हिशोबात आरपीएफचं बळ रवांडाच्या सैनिकांपेक्षा जास्त होतं. अशा स्थितीत युनोनं किंवा आणखी कोणाचं सैन्य बाहेरून येऊन युद्ध थांबलं तर आरपीएफच्या हातातोंडाशी आलेला यशाचा घास काढला जाईल. त्यामुळं आरपीएफनं बाहेरून हस्तक्षेपाला विरोध केला. पण वास्तव असं होतं की किगालीतच अजून एक लाख टुट्सी शिल्लक होते. बाहेरून हस्तक्षेप झाला असता तर ते वाचले असते, पण ते घडलं नाही, त्यांचाही जीव गेला.
आरपीएफनं किगालीवर ताबा मिळवला.
९ जुलै १९९४ रोजी युद्ध थांबलं. आरपीएफनं जाहीर केलं की त्यांचा विजय झाला. घडलं ते असं की रवांडाचं उरलं सैन्य आणि मिलिशिया राजधानी सोडून शेजारच्या झैरेमध्ये पळून गेले.

