अमेरिकेतल्या न्यायाधीशांवर काही संस्कार वगैरे आहेत की नाही? सरळ आपल्या देशाच्या राष्ट्राध्यक्षाचा आदेश कचर्यात टाकून दिला त्यांनी! मला तर भीती वाटायला लागली आहे की उद्या असं काही भारतात होतंय की काय!
विलास पिंगळे, पारनेर
भारतातल्या न्यायाधीशांचे टेन्शन तुम्ही घेऊ नका, आपलं पद, पैसा आणि जीव कसा वाचवायचा हे त्यांना बरोबर कळलेलं आहे. त्यामुळे त्यांचा आदर्श ठेवा आणि स्वतःचं पद, पैसा आणि जीव याची चिंता करा आणि असे प्रश्न विचारू नका.
आमच्याकडे एक काका आहेत… ट्रम्पने ५० टक्के टॅरिफ १८ टक्के केलं, तेव्हा ते म्हणाले, बघा विश्वगुरूंचा दणका! अमेरिकन न्यायालयाने टॅरिफ बेकायदा ठरवलं, तेव्हाही नाचत नाचत आले, म्हणाले, बघा विश्वगुरूंचा दणका! काहीही झालं, ते कुणीही केलं तर तो विश्वगुरूंचा दणका कसा असतो?
प्रकाश परब, लांजा
ज्यांना ‘नसतो’ पाठीचा मणका…त्यांनाच ‘कळतो’ विश्वगुरूंचा दणका…आणि ज्यांना ‘असतो’ पाठीचा मणका…त्यांना ‘बसतो’ विश्वगुरूंचा दणका… असेच प्रश्न सोशल मीडियावर विचारा… आणि पाठीचा मणका आहे की नाही हे चेक करा…
मी कोणत्याही लग्नात, बारशाला, पिकनिकला मित्रांबरोबर, नातेवाईकांबरोबर जातो, तेव्हा सगळ्यांना लायनीत उभं करून हातात हात घेऊन एकसाथ हात वर करायला लावतो, त्याने सगळ्यांमध्ये जोश संचारतो, असं माझं मत आहे. पण तरीही हल्ली मला कोणी मित्र-नातेवाईक कोणत्याही कार्यक्रमाला बोलावत नाहीत. मी गेलो की सगळी पांगापांग होते. असं का होत असेल?
विराज नेवरेकर, कुडाळ
स्वतःच्या सवयी चेक करा, त्या सवयींची सवय तुमच्या मित्रांना नसेल. कोणीही शेकहॅन्डसाठी हात पुढे केला नाही, तरी तुम्ही तुमचा हात पुढे करता का? हात धरायला दिल्यावर बोट धरता का? समोरच्याची इच्छा नसताना जबरदस्ती त्याच्या गळ्यात पडता का? समोरच्याचं बोलणं कळलं नाही तरी तो विनोद आहे असं समजून हसता का? फोटो काढताना मध्ये कोणी आला तर त्याला हाकलून देता का? अशा सवयी असतील तर कोण कशाला बोलावेल तुम्हाला? पण तुम्ही तुमच्या सवयी सोडू नका, बोलावण्याची वाट बघू नका, जा बिनधास्त! जी काही बिर्याणी, केक बिक असेल ते खाऊन या. तुम्ही तुमच्या सवयीचे गुलाम असलात, तरी तुम्हाला टाळणारे लोक तुमचे गुलाम होतील हे लक्षात घ्या.
काका, अलीकडे ना मला वर्गात उत्तर देता आलं नाही, तर शिक्षक मला म्हणतात गलगोटिया कुठचा! घरी प्रगतिपुस्तक दाखवलं, तर वडील थोबाडीत मारून आईला ओरडून म्हणतात, हा गलगोटिया कोणत्या मुहूर्तावर जन्माला आला कोण जाणे! बसमध्ये सुटे पैसे नसले तिकीटाला की कंडक्टरही, चल रे फूट गलगोटिया असं म्हणून बसमधून हाकलतो. ये गलगोटिया आखिर है क्या? नील बापट, कोथरूड, पुणे
आम्ही लहानपणी काही कामधंदा नसला की एकत्र येऊन जमिनीत खड्डा खणून त्याला गल म्हणायचो आणि त्यात गोट्या खेळायचोष्ठ त्याच पद्धतीने कामधंदा नसणार्यांनी एकत्र येऊन काढलेली युनिव्हर्सिटी असावी ही. दुसर्याने बनवलेलं कसं विकायचं? जे विकता येत नाही त्याचं नाव बदलून ते आपलंच आहे हे कसं दाखवायचं? दुसर्याने तयार केलेल्या वस्तू ह्या आपणच तयार केल्या आहेत असं ‘न लाजता’ जगाला कसं सांगायचं? अशा पद्धतीचे शिक्षण या युनिव्हर्सिटीत दिलं जात असावं आणि अशा युनिव्हर्सिटीचे तुम्ही स्कॉलर असावेत, असं तुमच्या चेहर्यावर दिसत असावं…त्यामुळे समोरचे तरी तुम्हाला दुसरं काय बोलणार?
संतोषराव, माजी राज्यपाल कोश्यारी हे माझे आदर्श आहेत. त्यांच्याप्रमाणेच मीही पद्मभूषण किताब मिळवू इच्छितो. त्यासाठी मी काय करायला हवं असं वाटतं तुम्हाला?
निरंजन बोडारे, वर्धा
पुरस्कार मिळवण्याचं सोडा, तो मिळाल्यानंतर तो स्वीकारताना कोशारींनी लोकांच्या शिव्याशाप सहन केल्या, ती सहनशक्ती तुमच्यात आहे का ते चेक करा; काही नतद्रष्ट त्याला कोडगेपणा म्हणतात… तर तेवढा कोडगेपणा तुमच्यात आहे का हे बघा. असेल तर आता जे करत असाल ते चालू ठेवा. एक दिवस हा पुरस्कार तुम्हालाही मिळेल याची खात्री बाळगा.
कुठे बाहेर जायचं असलं तर पुरुषांना पाच मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागत नाही तयार व्हायला. बायकांना मात्र दीड तास सहज लागतो. हा इतका फरक का?
तन्मय बोरकर, ठाणे
तुम्ही पुरुष आणि स्त्री असा भेदभाव करू नका. तुम्हीही बायकांसारखीच तयारी करा. आम्ही तर म्हणतो बायकांपेक्षा जास्त वेळ घ्या. स्त्री पुरुष समानतेच्या युगात पुरुषांना बायकां एवढा वेळ मिळायलाच हवा.
ज्या जगात एपस्टीनसारखे नीच लोक आहेत, त्याच्या संगनमताने लहान, कोवळ्या मुलींवर लैंगिक अत्याचार करणारे उद्योगपती, सेलिब्रिटी, राजकारणी आहेत, त्यांच्या कृतींचं समर्थन करणारे पत्रकार आणि सर्वसामान्य लोक आहेत… त्या जगात देव असेल का हो?
श्रद्धा वेलकर, परभणी
काय श्रद्धा ताई, तुमच्या सारख्या लोकांना नीच वाटणार्या लोकांच्या कृतीचं समर्थन करणार्यांचा देव कोण आहे हे तुम्हाला माहीत नाही का? जशी तुमची श्रद्धा तुमच्या देवावर आहे, तशी त्यांची श्रद्धा त्यांच्या देवावर आहे श्रद्धा ताई. तुमचा देव तुम्हाला पावत नसेल कदाचित, पण त्यांचा देव त्यांना पावतो, समर्थन करणार्या लोकांना मिळालेली पदं आणि प्रतिष्ठा कशी मिळाली असेल? या प्रश्नाचे उत्तर शोधलं तर तुम्हालाही पटेल की जगात अशा लोकांचा देव आहे.

