• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

केजरीवाल अजूनही ‘अण्णा’च आहेत?

marmik by marmik
March 9, 2026
in मर्मभेद
0
केजरीवाल अजूनही ‘अण्णा’च आहेत?

‘मला काँग्रेसला विचारायचं आहे, केजरीवाल तुरुंगात गेला- रॉबर्ट वड्रा तुरुंगात गेले का? संजय सिंग तुरुंगात गेले का? राहुल गांधी तुरुंगात गेले का? सोनिया गांधी तुरुंगात गेल्या का? काँग्रेस काय बोलते आहे? त्यांना काही शरम आहे का?’… हे उद्गार आहेत आम आदमी पक्षाचे संस्थापक आणि सर्वेसर्वा, दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे. तथाकथित मद्य धोरण घोटाळ्याच्या आरोपातून दिल्लीच्या न्यायालयाने त्यांची मुक्तता केली आणि त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते काँग्रेसवर तुटून पडले.

केजरीवालांना तुरुंगात डांबलं केंद्र सरकारने. तथाकथित मद्य घोटाळ्याचा सूडबुद्धीने तपास करणारी यंत्रणा होती सीबीआय, ती केंद्राच्या अखत्यारीत येते. उलट केजरीवालांना आणि त्यांच्या सहकार्‍यांना अटक झाली त्याच्या विरोधात काँग्रेस आपसोबत उभी राहिली होती. रामलीला मैदानात केजरीवाल आणि झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या अटकेच्या विरोधात झालेल्या आंदोलनातही राहुल आणि सोनिया गांधी सहभागी झाले होते. तरीही केजरीवालांनी तुरुंगाबाहेर आल्यावर आपल्याला खोट्या आरोपांखाली छळणार्‍या, आपली राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त करणार्‍या भारतीय जनता पक्षाच्या किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या दुकलीच्या नावाने खडे फोडले नाहीत- त्यांना काँग्रेसवरच तोंडसुख घ्यावंसं वाटलं, हे आश्चर्यकारक वाटलं तरी तसं नाही.

कारण, मद्यधोरणात काहीतरी गडबड आहे, अशी तक्रार करून चौकशीची मागणी करणारे काँग्रेसजनच होते दिल्लीतले. केंद्र सरकार या चौकशीच्या मिषाने केजरीवाल आणि त्यांच्या पक्ष सहकार्‍यांना छळेल, तुरुंगात डांबेल आणि त्याचा वापर करून दिल्लीतली त्यांची सत्ता उलथवेल, अशी कल्पना तेव्हा त्या काँग्रेसनेत्यांनाही नसावी. कारण नंतर त्यांनी कायम हीच भूमिका ठेवली होती की आम्ही आरोप केले असले तरी हा खुनशी तपास आम्हालाही मान्य नाही, त्याचा आम्ही निषेधच करतो. शिवाय, काँग्रेसजनांच्या आरोपांमुळे आपल्याला तुरुंगवास घडला, याबद्दल खार खाऊन बोलण्याचा केजरीवालांना काही अधिकार आहे का? त्यांनी व्यवस्थित नियोजन करून, एका राजकीय कारस्थानाच्या स्वरूपात उभ्या केलेल्या भंपक अण्णा आंदोलनाच्या माध्यमातून काँग्रेसची सत्ता देशातून उलथली गेली आणि भाजप नावाचा भस्म्या रोग झालेला, देश लुटून खाणारा आणि देशात जातधर्मांच्या आधारे दुफळ्या माजवून ठेवणारा राक्षस गेल्या १२ वर्षांसाठी देशाच्या डोक्यावर बसला आहे, त्याचं काय? केजरीवाल आणि कंपनी विनोद राय नावाच्या निर्लज्ज अधिकार्‍याच्या नादी लागून टूजी घोटाळा, कोळसा घोटाळा म्हणून रोज सकाळ-दुपार-संध्याकाळ काँग्रेसच्या नावाने बोंब ठोकत होते. त्यात काहीही तथ्य आढळलं नाही, त्याबद्दल केजरीवालांचे वकील मित्र प्रशांत भूषण यांनी दोन वेळा माफी मागितली; केजरीवाल यांनी त्याबद्दल काँग्रेसची आणि खरंतर सगळ्या देशाची माफी मागायला हवी होती, ती मागितली का?

प्रशांत भूषण अलीकडच्या माफीनाम्यात म्हणाले आहेत की आम्हाला अण्णा आंदोलनाचे सूत्रसंचालक कोण आहेत, हे माहिती नव्हतं. अण्णा हजारे यांनाही ते माहिती नसावं. पण, केजरीवाल यांना ते माहिती नसणार, अशी शक्यताच संभवत नाही. अजित डोवाल यांनी स्थापन केलेल्या विवेकानंद इंटरनॅशनल सेंटरमध्ये हा सगळा राजकीय कट शिजला होता. सरकारमधले काही वरिष्ठ अधिकारी आणि केजरीवालांसारखे महत्त्वाकांक्षी उपटसुंभ यांनी मिळून हे नियोजन केलेलं होतं. आंदोलनाचं स्वरूप, त्याची दिशा हे सगळं ठरवण्यात केजरीवाल आणि इतर ज्या ज्या व्यक्तींचा सहभाग होता, त्या सगळ्यांना भाजपची सत्ता आल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे लाभ मिळालेले आहेत. रामदेव आणि रविशंकर या बाबागिरीच्या व्यवसायातल्या व्यापार्‍यांची साम्राज्यं या आंदोलनानंतर वैâकपटींनी विस्तारली. बाकी कित्येकांचे कोटकल्याण झाले. केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष झपाट्याने वाढून दोन राज्यांमध्ये सत्ता स्थापन करण्याइतका मोठा झाला. हे सगळे त्या आंदोलनाचे लाभार्थी.

त्यामुळेच तुरुंगवास आणि दिल्लीतला पराभव यांचे खरे सूत्रधार कोण आहेत, हे माहिती असतानाही केजरीवाल त्यांच्याबद्दल बोलत नाहीत. केजरीवालांच्या मुक्ततेमुळे खर्‍या अर्थाने तोंड फुटलं ते दिल्लाश्वरांचं. सुटकेनंतर केजरीवालांची तोफ त्यांच्यावर धडधडेल अशी अपेक्षा होती. दारूगोळाही भरपूर होता. एपस्टीन फाइल्स, अमेरिकेबरोबरचा देशघातकी करार, ऑपरेशन सिंदूरचं रहस्य इथपासून ते एआय समिटच्या फजितवाड्यापर्यंत कशावरही ते सत्ताधीशांच्या चिंधड्या करत बोलू शकले असते. पण, ते घसरले संकटकाळात पाठराखण करणार्‍या काँग्रेसवर; तेही हा तुरुंगात गेला का, तो तुरुंगात गेला का, असले बालिश प्रश्न विचारत. तुमच्यावर आरोप होते, त्यांचा वाईट पद्धतीने का होईना तपास झाला आणि तुम्हाला सूडबुद्धीने तुरुंगात डांबलं गेलंष्ठ अशा प्रकारचा आरोप राहुल गांधी, सोनिया गांधी किंवा इतरांवर असता तर त्यांच्यावरही अशा प्रकारची कारवाई या सरकारने केली नसती का? आणि मुळात तुरुंगात जाणं हा नेमका कसला मापक आहे? तुम्ही काय स्वातंत्र्यलढ्यात तुरुंगात गेला होता का?

केजरीवालांच्या बाबतीत भाजप आणि रा. स्व. संघाच्या विरोधकांना कायम शंका असते ती यामुळेच. ते भाजपची बी टीम असल्याप्रमाणेच राजकारण करतात, हे आता लपून राहिलेलं नाही. इंडिया आघाडीचा पाया असलेल्या सर्वसमावेशकतेच्या बाबतीत केजरीवालांवर प्रश्नचिन्ह आहे. ना ते शाहीनबागच्या लढ्याच्या दिशेने कधी फिरकले, ना त्यांनी भाजपच्या द्वेषाच्या राजकारणावर कधी त्वेषाने प्रहार केला. उलट हिंदुत्वाची टोपी आपल्यालाही कशी फिट होते, हे दाखवण्याकडेच त्यांचा कल होता.

केजरीवालांचं राजकारण ही टिपिकल बनियागिरी आहे. त्यात तत्त्वांचा भाग सोयीपुरता आहे. भाजपबरोबर लढण्याची आपली ताकद नाही, तो राक्षस आपल्याला कधीही संपवू शकतो, हे त्यांना माहिती आहे. त्याउलट काँग्रेस गलितगात्र होईल तितकं चांगलं; ती जागा आपल्याला व्यापता येईल, हे त्यांचं राजकारण. ते दिल्लीत यशस्वी ठरलं. गुजरात आणि गोवा इथे त्यांनी विरोधकांची मतं खाऊन भाजपचा मार्ग सोपा करून दिला. आता तुरुंगाबाहेर येताच त्यांनी भाजपऐवजी काँग्रेसवर दुगाण्या झाडायला सुरुवात केली.

‘मैं भी अण्णा’ अशा टोप्या घालून खुद्द अण्णांना आणि अख्ख्या देशाला टोपी घालणार्‍या टोळीचे केजरीवाल हे प्रमुख सदस्य होते, त्यांच्यातली ‘अण्णागिरी’ कधीच संपणार नाही, हेच यातून दिसले. याची काँग्रेसनेही नोंद ठेवलेली बरी!

Previous Post

नाय नो नेव्हर

Next Post

ज्योतिषांच्या मगरमिठीत

Next Post
नाव शिवाजीचे घ्यावे, पुढे पाऊल टाकावे…

ज्योतिषांच्या मगरमिठीत

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.