राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या १०० वर्षांचा इतिहास असलेल्या, पण १०० वर्षांत कुठेही नोंदणी न झालेल्या (शिवाय स्वातंत्र्यानंतर बरीच वर्षे संघस्थानावर तिरंगा राष्ट्रध्वज न फडकवण्याचाही विक्रम नावावर असलेल्या) संघटनेच्या शताब्दीनिमित्त अनेक कार्यक्रम आयोजित होत आहेत. त्यात बळेबळे धरून आणल्यासारखे अनेक क्षेत्रांमधले अनेक लोक फार मौलिक ज्ञानतीर्थ प्राशन करत आहोत, असा गंभीर चेहरा करून बसलेले दिसतात. एखादाच करण जोहर, ज्याला सरसंघचालक मोहन भागवत यांची तरतरीत विनोदबुद्धी दिसते आणि त्यांचे (विनोदी) कार्यक्रम वारंवार आयोजित करायला हवेत, असं तो सांगतो.
अशाच एका संघसत्संगात मोहन भागवतांनी महाराष्ट्रात मराठीचा आग्रह धरणार्या आंदोलनाची संभावना ‘आजार’ अशी केली. त्यांच्या संघटनेच्या अद्भूत वैचारिक बैठकीनुसार चालायचे ठरवले तर या देशात प्रत्येकाने आधी हिंदी बोलायला हवे आणि नंतर मातृभाषेत बोलायला हवे. इंग्लिश ही जगाची ज्ञानभाषा बोलण्याचा तर विषयच नाही. ती कामापुरती बोलायची. भागवतांनी एकदा आपल्या संघटनेतल्या किंवा संघविचार मानणार्या मंडळींचे सर्वेक्षण करावे. यांच्यातले बहुतेक जण आपल्या मुलांना इंग्लिशमध्ये शिकवून परदेशांत धाडून सेटल केलेलं आहे. आता गोरगरीबांच्या, बहुजनांच्या मुलांच्या उत्कर्षाची वेळ आली तर हे हिंदीप्रेमाच्या चिपळ्या वाजवू लागतात, हे लक्षणीय आहे…दुर्दैवाने हा बनाव समजून घेण्यासाठी बहुजनांच्या खांद्यावर स्वत:चे डोके हवे. तिथेच सगळी गडबड आहे.
भागवतांचा वैचारिक परिवार गांधी-नेहरूंच्या आयडिया ऑफ इंडियाच्या थेट विरोधात उभा आहे. त्यामुळेच तर ते स्वातंत्र्यलढ्यात हिरीरीने लढत होते, पण ब्रिटिशांच्या बाजूने. देशाचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांची चौफेर, अश्लाघ्य आणि तथ्यहीन, आधारहीन बदनामी करण्याकरताच आपली नेमणूक झाली आहे, तेच आपले काम आहे, असे समजणारे नरेंद्र मोदी भागवतांच्या विचारधारेने पंतप्रधानपदावर बसवले आहे, ते उगाच नव्हे. पण, नेहरूंचं आणि भागवतांच्या विचारधारेचं एका विषयावर वरकरणी एकमत झालेलं दिसतं… त्याबद्दल नरेंद्र मोदींनाही नेहरूंचं कौतुकच करावं लागेल (त्यांच्या तोंडून नेहरूंचं कौतुक ऐकून मोदीभक्त केस उपटत फिरतील तो विषय वेगळा). नेहरूंना भाषावार प्रांतरचना मान्य नव्हती, प्रत्येक भाषेचं एक राज्य ही कल्पना राष्ट्रीय एकात्मतेच्या आड येईल, प्रादेशिक अस्मिता बळावतील आणि आधुनिक अर्थाने पहिल्यांदाच राष्ट्र, एक संघराज्य बनलेल्या या देशातील भारतीयत्वाची भावना लोप पावेल, अशी भीती त्यांना होती. त्यामुळेच त्यांनी महागुजरात हे महाराष्ट्र आणि गुजरात यांचं एकत्र राज्य होता होईल तो कायम ठेवण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्रात नेहरूंना मानणार्या अनेक नेत्यांनी नाईलाजाने नेहरूंविरोधात संयुक्त महाराष्ट्राचा लढा उभारला. नेहरूंनाही हिंदी ही राष्ट्रभाषा म्हणून सगळ्याच भारतवर्षाने शिकावी, तीच संपर्कभाषा म्हणून वापरावी, अशी आंतरिक इच्छा होतीच.
नेहरू अनेक बाबतीत द्रष्टे होते आणि कोणी कितीही पुसायचा प्रयत्न केला तरी त्यांचा वारसा बेनामी संघटनांच्या अपप्रचाराने पुसला जाणारा नाही. पण, या बाबतीत मात्र पं. नेहरूंचे हेतू कितीही उदात्त असले तरी त्यांची राष्ट्रीय एकात्मतेची ही कल्पनाही प्रादेशिक वैविध्याला आणि विविधतेत एकात्मता या संघराज्याच्या मूळ पायाला धक्का देणारीच ठरली असती. भागवत आणि त्यांच्या संघटनेचा ‘आजार’ नेहरूंच्या भाबड्या आजारापेक्षा वेगळा आहे. त्यांना ब्रिटिशांनी इथून जाताना उत्तर पेशवाईच्या स्वरूपात हा देश सोडून जावा, अशी अपेक्षा होती. अस्पृश्यता, मागासलेल्या धर्मकल्पना, तर्कदुष्ट अंधश्रद्धा, महिलांच्या स्वातंत्र्याला आणि उत्कर्षाला खीळ घालणारी धोरणं, समाजातली कृत्रिम उतरंड, विज्ञानविरोध हे सगळं कायम ठेवणारी मध्ययुगीन समाजरचना परत निर्माण करायची, हे त्यांचं ध्येय होतं आणि आहे. भारतातली प्रादेशिक विविधता, स्थानिक अस्मिता आणि जाज्वल्य भाषाभिमान जोवर जागरूक आहे, तोवर इथे ही मागासलेली एकात्मता लादता येणार नाही, याची त्यांना कल्पना आहे. त्यामुळे सत्तेचा वरवंटा फिरवून पहिलीपासून हिंदी शिकवण्याच्या कल्पना यांच्या चेल्याचपाट्यांना सुचतात आणि मातृभाषेचा अभिमान बाळगणं हा एक आजार आहे, असं त्यांना वाटतं. मराठी माणूस कुर्हाडीचा दांडा ठरून गोतास काळ बनत आलेला आहे कायमच… त्यातच यांचाही समावेश दुर्दैवाने करायला हवा. हिंदी भाषा ही मागास विचारांची उत्तम वाहक आहे, याचा वेगळा पुरावा देण्याची गरज नाही. आपल्या अवधी, ब्रज, बुंदेली, भोजपुरी वगैरे स्थानिक भाषांचा बळी देऊन कृत्रिम हिंदीचा स्वीकार आंधळेपणाने केलेला पट्टा आज हिंदीभाषक राज्यांचा पट्टा म्हणून ओळखला जातो. ही राज्यं सर्वार्थाने मागास आहेत ती उगाच नव्हेत. आणि हिंदीला मुक्तद्वार दिलेली राजस्थान-गुजरातसारखी राज्यं प्रगत असती, तर इथली प्रजा पोट भरण्यासाठी देशाच्या आणि जगाच्या सर्व भागांमध्ये स्थलांतर करताना दिसली नव्हती. मोदींच्या अमृतकाळात मुंबईतला किंवा देशाच्या कोणत्याही भागातला गुजराती माणूस परत आपल्या राज्यात स्थलांतर करून गेलेला दिसत नाही… तीच गत विकासाचे ढोल पिटणार्या योगी आदित्यनाथांच्या उत्तर प्रदेशाची.
दक्षिणेतली सगळी राज्यं, विशेषत: केरळ आणि तामीळनाडू, पंजाब आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये विलक्षण भाषाभिमान आहे, आपल्या संस्कृतीचा अभिमान आहे. त्यामुळेच त्यांनी हिंदीला वेळेत अटकाव केला आहे. त्यामुळेच त्यांची संस्कृती बचावली आहे. महाराष्ट्राने मात्र नेहमीचा भोटपणा करून हिंदीचं आणि हिंदीभाषकांचं दोन्ही हात पसरून स्वागत केलं आहे. त्याचेच परिणाम आता भोगावे लागत आहेत, यापुढेही भोगावे लागणार आहेत. हिंदीने मराठीचा गळा घोटला की मराठी अस्मिताही संपुष्टात येईल. भागवत आणि कंपनीला हेच अपेक्षित आहे.
महाराष्ट्र आजारी नाही. या देशातलं एकही स्वभाषाप्रेमी राज्य आजारी नाही. ज्या स्वातंत्र्याच्या लढ्यात आपला शून्य सहभाग होता आणि इतरांनी कमावलेल्या संपत्तीवर आपण आयत्या रेघोट्या ओढत आहोत, याचा विसर भागवतांना पडलेला दिसतो आहे, हा खरा बनेल विस्मरणाचा आजार आहे. हा देश एक आधुनिक संघराज्य म्हणून आकाराला आला आहे. त्यात प्रादेशिक अस्मिता सांभाळून देशाचा कारभार हाकणे अपेक्षित आहे. भारतीय जनता पक्षाची एकाधिकारशाही या संघराज्य संकल्पनेला सुरुंग लावणार असेल, तर त्यातून देशाची छकलं उडतील. भागवत आणि त्यांच्या संघटनेला जो असाध्य आजार जडलेला आहे, त्याची ही फळं देशाला भोगावी लागतील.
तेव्हा देशहिताच्या दृष्टीने डॉक्टर भागवत लवकर बरे व्हावेत, हीच शुभेच्छा!

