• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

क्रिकेट जगतातली महासत्ता भारतच!

प्रशांत केणी (खेळियाड)

marmik by marmik
February 20, 2026
in खेळियाड
0
क्रिकेट जगतातली महासत्ता भारतच!

भारताच्या युवा संघाने विश्वचषक जिंकला. काही महिन्यांपूर्वी महिला संघाने जगज्जेतेपद पटकावले. आता भारताचा वरिष्ठ संघ ट्वेंटी-२० विश्वचषक जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे. भारताचे सर्वच प्रकारच्या आणि गटांच्या क्रिकेटमध्ये वर्चस्व दिसून येते. ते क्रिकेट क्रमवारी आणि प्रशासन, आदी अनेक आघाड्यांवरही दिसते. जागतिक क्रिकेटमधील या भारतीय महासत्तेला आव्हान देणे, बांगलादेश-पाकिस्तान यांना परवडणारे नाही.

भारताच्या युवाशक्तीने गेल्याच आठवड्यात आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली इंग्लंडला हरवून विश्वविजेतेपदावर नाव कोरले. अंतिम सामन्यात भारताचा १४ वर्षीय उदयोन्मुख तारा वैभव सूर्यवंशी याने १७५ धावांची वेगवान आणि संस्मरणीय खेळी साकारली. १९ वर्षीय क्रिकेटमधील वर्चस्व भारताने पुन्हा एकदा दाखवून दिले. या वयोगटाचा हा १५वा एकदिवसीय विश्वचषक. पण भारताने सर्वाधिक सहाव्यांदा तो जिंकण्याचा पराक्रम गाजवला. भारतीय क्रिकेटचे यश हे एवढ्यावर सीमित राहात नाही. काही महिन्यांपूर्वी २ नोव्हेंबर २०२५ या दिवशी भारतीय महिला संघाने एकदिवसीय प्रकारातला पहिला विश्वचषक जिंकला. आणि आता आपण सज्ज झालो आहोत, सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली ट्वेंटी-२०मध्ये पुन्हा विश्वविजेतेपद काबीज करण्यासाठी. या प्रकारातील २००७चा पहिला विश्वचषक आपण महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली जिंकला आहे, तर २०२४चा या आधीचाही भारताने जिंकला आहे. त्यावेळी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली हे यश मिळवले होते. मागील विश्वचषकात भारतीय संघ अपराजित होता. या दोन ट्वेंटी-२० विश्वचषकातील भारताची कामगिरी तितकीच स्पृहणीय. भारताने आठ द्विराष्ट्रीय मालिका आणि आशिया चषक जिंकला. याशिवाय विजयाची टक्केवारी सर्वाधिक ८४.६ टक्के. त्यामुळेच विजयाची सर्वाधिक संधी भारताला आहे. आतापर्यंत कोणत्याही यजमान संघाने ट्वेंटी-२० विश्वचषक जिंकलेला नाही आणि सलग दुसर्‍यांदाही तो टिकवलेला नाही. हेच कर्तृत्व सिद्ध करण्याची भारताला नामी संधी आहे.

सत्तरीच्या दशकात क्रिकेटमध्ये विश्वचषकाचा अध्याय सुरू झाला. सुरुवातीला तो एकदिवसीय प्रकारापुरता मर्यादित होता. या क्रिकेट प्रकारात अव्वल संघांचा थरार पाहता यावा, म्हणून आयसीसी चॅम्पियन्स करंडक स्पर्धा सुरू करण्यात आली. २००७पासून ट्वेंटी-२०च्या वेगवान विश्वचषक पर्वाला प्रारंभ झाला. अगदी मागच्या दशकात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) कसोटी क्रिकेट टिकवण्याचे धोरण स्वीकारले. त्यामुळे आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपदाची मानाची गदा देण्याची प्रथा सुरू झाली. याशिवाय क्रिकेटच्या तिन्ही प्रारूपांची जागतिक क्रमवारी आहेच. भारताने मागील शतकात कपिल देवच्या नेतृत्वाखाली १९८३चा एकमेव विश्वचषक जिंकला. पण २०००पासून आजमितीपर्यंतची आकडेवारी ही अधिक दिपवणारी आहे. एकूणच मोजायचे झाल्यास दोन एकदिवसीय विश्वचषक, दोन ट्वेंटी-२० विश्वचषक, तीन चॅम्पियन्स करंडक अशी भारताच्या पुरुष संघाची ७ जागतिक यशांची कामगिरी. याचप्रमाणे १९ वर्षांच्या संघाचे सहा विश्वचषक, भारतीय महिला संघाने जिंकलेला एक, १९ वर्षांच्या महिला संघाचे दोन विश्वचषक अशी ही एकंदर आकडेवारी १६पर्यंत उंचावते. भारताला दोनदा जागतिक कसोटी अजिंक्यपदाने हुलकावणी दिली आहे.

भारतापेक्षा उत्तम कामगिरी फक्त ऑस्ट्रेलियाची. त्यांच्या खात्यावर एकूण २७ जागतिक क्रिकेट चषक/करंडक. या दोन संघांची तुलना केल्यास जसे कसोटी आणि एकदिवसीय प्रकारात ऑस्ट्रेलियाने अनुक्रमे २-० आणि ६-२ असे वर्चस्व गाजवले आहे, तसेच महिला क्रिकेटमध्येही त्यांची १३-१ अशी मक्तेदारी दिसून येते. पण ट्वेंटी-२०मध्ये २-१, १९ वर्षांखालील पुरुष गटात ६-४ आणि १९ वर्षांखालील महिला गटात २-० अशी भारताची सरस कामगिरी. गेल्या काही वर्षांतील भारताची कामगिरी पाहता हे अंतर सहज कमी होईल आणि आपणऑस्ट्रेलियाच्या पुढे जाऊ अशी आशा आहे. आयसीसी क्रिकेट क्रमवारीतही भारत ऑस्ट्रेलियापेक्षा वरचढ आहे.

ऑस्ट्रेलियाकडे कसोटी क्रमवारीतील अव्वल स्थान आहे, तर एकदिवसीय आणि ट्वेंटी-२० या दोन्ही क्रिकेट प्रकारांतील अग्रस्थान हे भारताकडे आहे. आयसीसीच्या क्रिकेट प्रशासनातही भारत प्रकर्षाने दिसून येतो. जगमोहन दालमिया आणि शरद पवार यांनी आयसीसीचे अध्यक्षपद भूषवले आहे, तर २०१६मध्ये आयसीसीकडून अध्यक्षपद संपुष्टात आणण्यात आले आणि कार्याध्यक्ष हेच सर्वोच्च पद निश्चित करण्यात आले. पण २०१४पासूनच कार्याध्यक्ष पद सुरू झाले, तेव्हा एन श्रीनिवासन यांना ते देण्यात आले होते. पुढे शशांक मनोहर यांनी हा मान मिळवला, तर सध्या जय शाह या पदावर विराजमान आहेत.

भारत ही क्रिकेटमधील महासत्ताच; पण ती कशामुळे झाली? याचे एक उत्तर जसे भारतीय क्रिकेट प्रशासक आहे. तसेच दुसरे उत्तर येथील देशांतर्गत क्रिकेटचा आराखडा यात दडले आहे. भारतातला वयोगटांच्या क्रिकेटचा ढाचा अत्यंत मजबूत आहे. त्यामुळेच त्याची रसाळ गोमटी फळे अनुभवयास मिळत आहेत. आता फक्त मुंबई, दिल्ली, कोलकाता, बेंगळुरू, चेन्नई येथूनच क्रिकेटपटू घडत नाहीत, तर अनेक छोट्या राज्यांतली गुणवत्ताही प्रकाशझोतात येत आहे. झारखंडमधून धोनीसारखा जगज्जेता कर्णधार क्रिकेटमध्ये नावारूपास येतो. नवा तारा वैभव सूर्यवंशी हाही बिहारचा. पण इतक्या कमी वयात त्याला नाव, प्रतिष्ठा मिळाल्याने मोठमोठे ब्रँडसुद्धा त्याच्याकडे वळतील.

भारतीय क्रिकेटच्या गुणवत्ता शोधनात महत्त्वाची ठरली, ती इंडियन प्रीमियर ट्वेंटी-२० लीग. ‘इथे प्रतिभेला संधी मिळते’ हे ‘आयपीएल’चे बोधवाक्य. या लीगने जशी आर्थिक परिभाषा बदलून जागतिक क्रिकेटला हे आदर्शवत सूत्र दिले. तसेच देशाच्या कानाकोपर्‍यातून अनेक क्रिकेटपटू या व्यासपीठावर चमकू लागले. जी कथा पुरुष क्रिकेटची, तीच उशिरा का होईना महिला क्रिकेटची. २०२३मध्ये वुमन्स प्रीमियर लीगला प्रारंभ झाला. त्यामुळे महिला क्रिकेटमधूनही मोठ्या प्रमाणात गुणवत्ता दिसून येऊ लागली आहे. भारतीय महिला संघाला मिळालेले ताजे विश्वविजेतेपद हे त्याच मोहिमेचे फलित.

भारतात चालू असलेल्या ट्वेंटी-२० विश्वचषकाकडे पाहिल्यास देशातली अतिरिक्त गुणवत्ता अन्य देशांमध्येही दिसते आहे. या विश्वचषकात २० देश सहभागी झाले आहेत. यापैकी नऊ देशांमधून ४० भारतीय वंशाचे क्रिकेटपटू खेळत आहेत. यापैकी सर्वाधिक मूळ भारतीयांची संख्या कॅनडा (११), अमेरिका (९), ओमान (७), संयुक्त अरब अमिराती (७) या संघांमध्ये आहे. न्यूझीलंड (२), दक्षिण आप्रिâका (१), वेस्ट इंडिज (१), नेदरलँड्स (१), इटली (१) या संघांमध्येही भारतीय खेळाडू आढळतात. फक्त खेळाडूच नव्हे, तर अन्य देशांच्या क्रिकेट मार्गदर्शकांच्या भूमिकेतही भारतीय खेळाडू कार्यरत आहेत. सुलक्षण कुलकर्णी ओमानचे उपमुख्य प्रशिक्षक आहेत. लालचंद रजपूत अमिरातीच्या मुख्य प्रशिक्षकपदावर आहेत, तर विक्रम राठोड आणि आर श्रीधर हे श्रीलंकेचे अनुक्रमे फलंदाजीचे आणि क्षेत्ररक्षणाचे प्रशिक्षक आहेत. अमेरिकेचे फलंदाजीचे प्रशिक्षक व्हिन्सेंट विनय कुमार आहेत, तर ऋषी भारद्वाज क्षेत्ररक्षणाचे प्रशिक्षकपद सांभाळत आहेत.

मैदान आणि प्रशासनातील याच वर्चस्वामुळे भारताशी पंगा घेणे, हे अन्य देशांना आव्हानात्मक ठरते. बांगलादेश क्रिकेट मंडळाने त्रयस्थ म्हणजेच श्रीलंकेत ट्वेंटी-२० विश्वचषकाचे सर्व सामने खेळण्याची मागणी फेटाळल्यामुळे चक्क माघारीचा निर्णय घेतला. हा बहिष्कार म्हणजे त्यांनी स्वत:च्याच पायांवर कुर्‍हाड घातली आहे. ‘आयपीएल’मध्ये बांगलादेशाचे खेळाडू नको, हे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) धोरण जिव्हारी लागल्यामुळे त्यांनी आपल्या देशात या लीगच्या प्रक्षेपणावरही बंदी घातली आहे. बांगलादेशच्या बंडात पाकिस्तानही सामील झाले आहे आणि त्यांनी भारताशी सामनाच न खेळण्याचे जाहीर करून टाकले. पण भारत-पाकिस्तान सामना न झाल्यास क्रिकेटचे मोठे आर्थिक नुकसान होईल. यातील मोठा भाग हा आयसीसी, प्रक्षेपण कंपनी आणि यजमान श्रीलंकेचा असल्याने हे नुकसान पाकिस्तानकडूनच वसूल केले जाऊ शकते. त्यामुळे हे प्रकरण चिघळले आहे. इथे आड, तिथे विहीर अशी स्थिती पाकिस्तानची झाली आहे. क्रिकेटमधील महासत्तेच्या वाट्याला कुणीही जाऊ नये, हाच त्यातून भारताने जगाला दिलेला धडा आहे.

चला, ‘पाकिस्तान-बांगलादेश भाऊ-भाऊ’ अशी गर्जना फोल ठरली. ट्वेंटी-२० विश्वचषक झोकात सुरू आहे. भारतीय क्रिकेट महासत्ता आता आणखी एक विश्वचषक जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे. येत्या पाच वर्षांत भारत जागतिक स्पर्धांच्या जेतेपदाच्या आकडेवारीत ऑस्ट्रेलियाला मागे हीच आशादायी चिन्हे आहेत. तूर्तास ट्वेंटी-२० विश्वचषकाचा आनंद लुटूया!

Previous Post

फक्त कोंडी नव्हे, व्यवस्थेचे अपयश

Next Post

फटकारे बाळासाहेबांचे

Next Post
फटकारे बाळासाहेबांचे

फटकारे बाळासाहेबांचे

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.