
शिक्षणाचे माहेरघर पुणेनगरी.
तिथल्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे फर्ग्युसन महाविद्यालय. ब्रिटीश काळात स्थापन झालेल्या या शिक्षणसंस्थेचा अमृतमहोत्सवी दिमाखदार सोहळा आयोजित केलेला. व्यासपीठावर तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद प्रमुख पाहुणे म्हणून विराजमान. राष्ट्रपतींना भाषणासाठी निमंत्रित करण्यात आले. पण ते सारे संकेत नियम बाजूला ठेवून पायर्या उतरून खाली आले. सुरक्षारक्षकांची एकच तारांबळ उडाली. संयोजकही गोंधळलेले. तिथे पहिल्या रांगेत बसलेल्या वयोवृद्ध तपस्वीला त्यांनी वाकून नमस्कार केला. नतमस्तक झाले. सारे वातावरण भारावून गेले. ते तपस्वी होते महर्षी धोंडो केशव कर्वे! ही घटना म्हणजे देशाच्या राष्ट्रपतींनी महर्षींच्या सेवाभावी कार्याला विनम्रपणे वंदन करून कृतज्ञता व्यक्त करणारी होती. जी सुवर्णअक्षरात नोंदविली गेली…
एकोणीसाव्या शतकात महाराष्ट्राने उभ्या जगाला अशी पहाडासारखी माणसं दिली. उत्तुंग व्यक्तिमत्वांनी तो कालखंड भारावलेला. नाटककार प्रा. वसंतराव कानेटकर यांनी आपल्या काही नाटकांसाठी अशा दिग्गजांना निवडले. काही कल्पित जोड देऊन त्यावर प्रभावी कथानक उभे केले. बाबा आमटे यांच्यावरले ‘वादळ माणसाळतंय!’ इतिहासाचार्य राजवाडे यांच्यावर ‘विषवृक्षाची छाया’ आणि महर्षी कर्वे यांच्यावरले ‘हिमालयाची सावली’ यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. त्यातून महाराष्ट्रातील विभूतींचे दर्शन रसिकांना झाले. परिपूर्ण चरित्र जरी नसते तरी महत्वाचे नाट्यपूर्ण संदर्भ त्यात आहेत. समाजसुधारणेसाठी अर्पण केलेल्या या महामानवाचं तेजस्वी दर्शन नाट्यातून ओघानं येतंय.
नाटककार वसंतराव कानेटकर लिखित ‘हिमालयाची सावली’ हे नाटक आज पुन्हा एकदा ५४ वर्षानंतर रंगभूमीवर आलंय. काळ बदलला पण विषय आजही प्रेरणादायी अन् चौकटीबाहेरचा आहे. समाजसुधारक प्रा. गुंडो गोविंद भानू उर्फ नानासाहेब आणि त्यांची पत्नी सावित्री उर्फ बयोबाई या वृद्ध दांपत्यांची तशी ही काल्पनिक गोष्ट. पर्वतीच्या पायथ्याशी घर. काळ १९वे शतकाचा अखेर. घरात सूनबाई अरुंधती, मुलगा पुरुषोत्तम. थोरला मुलगा जगन्नाथ हा आप्रिâकेत व्यापार करतोय. ‘कार्यकर्त्याच्या पायात प्रपंचाची बेडी नसावी!’ असे नानांना वाटते खरे, पण तरीही काही प्रमाणात त्यांचा प्रयत्न दिसतोय. त्यांनी केलेल्या मृत्युपत्रातून ही बाब उघड होते. नानांनी स्वतः विधवेशी म्हणजे बयोशी लग्न करून घरापासूनच सुधारणेचा पाया भक्कम केलेला. अनाथ अबलाश्रम आणि महिला शिक्षण मंदिर या संस्था स्थापन करुन विधवा, अनाथ यांना साथ देत आहेत. तत्कालीन सामाजिक जुनाट चालीरीतींना विरोध करून स्त्रियांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. तो काळ, त्यावेळची माणसं, त्यांची मानसिकता ही एकेका पात्रांच्या देहबोलीतून तसेच प्रसंगातून आकाराला येते.

पुरुषोत्तम हा पहिल्या बायकोचा मुलगा पण बयोने कधीही परकेपणा हा केलेला नाही. कृष्णाबाई, जगन्नाथ, केशव पांडू ही पात्रेही आहेत. नानासाहेबांचा विश्वासू कार्यकर्ता तातोबा, संस्थाचालकांपैकी आबाजी यांचाही वावर यात आहे. आश्रमाच्या घटनेनुसार नानासाहेबांना आश्रम सोडावा लागतो. त्यांचे स्वार्थी सहकारी एक डाव जिंकतात. सभेत तसा निर्णय होतो. पण त्याविरोधात कुठेही तक्रार न करता ‘संस्था महत्त्वाची माणसं नव्हेत!’ असा ते पवित्रा घेतात. बयो मात्र या निर्णयाविरुद्ध ठामपणे उभी राहाते- पण नानांचा निर्णय अंतिम आणि बंधनकारक मानला जातो. एकीकडे कुटुंबातील ताणतणाव दुसरीकडे सामाजिक सेवाभावी कार्य या दिव्यातून नाना संघर्ष करताहेत. शेवटी कर्मयोगी मठाची स्थापना करून तिथे जाण्याचा निर्णय घेतात. अर्थात या निर्णायक क्षणी बयोची त्यांना सोबत मिळते. तत्पूर्वी अर्धांगवायूचा झटका आल्याने नानांना दुबळेपणा येतो. तरीही ते सेवेचे व्रत सोडत नाहीत. माघार घेत नाहीत. धर्मप्रचारासाठी बौद्ध भिक्षूंनी त्याकाळी जसे विहार निर्माण केले तसेच समाजसेवेसाठी संन्यास पत्कारणार्या कर्मयोगी कार्यकर्त्यांचे मठ स्थापन केले पाहिजेत. अशी संकल्पना या मठाबद्दल मांडली आहे. तन, मन, धनासह सर्वस्व अर्पण केलेल्या आश्रमाला सोडून नव्या कर्मयोगी मठासाठी दोघेजण नवा संकल्प हाती घेऊन आत्मविश्वासाने बाहेर पडतात.
त्याग, निष्ठा, समर्पण, संयम यांचं दर्शनच कथानकातून घडते. ‘नटसम्राट’ आणि ‘हिमालयाची सावली’ या दोन्ही नाटकातील वयोवृद्ध जोडपं डॉ. श्रीराम लागू आणि शांता जोग यांनी ताकदीने साकारलं होतं. त्यांची आठवण यातील शरद पोंक्षे आणि शृजा प्रभुदेसाई यांच्या पात्रनिवडीतून होते. काहीशी सडेतोड, फटकळ, व्यवहारी बयो चांगली उभी राहाते. नवर्याशी असलेले भावबंध किती खोलवर आहेत हेच नजरेत भरतात. अभिनयातली सहजता, ताकदीची संवादफेक यामुळे बयोने बाजी मारली आहे. एका उत्तुंग व्यक्तिमत्वासमोरचं श्रेष्ठत्व ‘सावली’ने नेमकं टिपलं आहे. एखाद्या भूमिकेत शिरणं त्याला परकाया प्रवेश असं म्हणतात, पण इथे शरद पोंक्षे हे नानांच्या भूमिकेवर अक्षरश: स्वार झालेत. देहबोली तसेच भावनांवर असलेली विलक्षण हुकमत पदोपदी सिद्ध होते. पहिल्या अंकात कुटुंबियांबद्दलचा तटस्थपणा आणि समाजसेवेला दिलेले प्राधान्य दिसते. तर तिसर्या अंकातील अर्धांगवायूचा झटका त्यामुळे झालेली विकलांगता मनाला चटका लावून जाते. जड जिभेने झालेले उच्चार हेलावून सोडतात. त्याचे अर्थ बयोकडून उलगडून मांडणेही आहे. दोघांचे ट्युनिंग फिट्ट आहे. डॉ. लागू यांनी त्यांच्या काळी केलेल्या नानासाहेबांच्या एकूणच भूमिकेची छाप दिसते. अर्थात संहितालेखनात खुद्द डॉ. लागू यांची साथ ही प्रा. कानेटकरांना मिळाली होती. त्याचाही परिणाम असावा. पोंक्षे यांच्या रंगकारकीर्दीतील वळणावरली महत्वाची ही भूमिका ठरेल यात शंकाच नाही. शेवटच्या काही प्रसंगात एकही संवाद नसतांनाही केवळ अभिनयाच्या जोरावर नाट्य आणि भूमिका एका उंचीवर नेण्यात ते यशस्वी झालेत. बयो आणि नाना अशा व्यक्तिरेखा या भारावून सोडतात. त्याला न्याय मिळालाय. दोघेही एकमेकांना पूरक ठरतात.

डझनभर कलाकारांची टीम यात आहे. विघ्नेश जोशी यांचा तातोबा पूर्वी अशोक सराफ यांनी केलेला. तर आबाजी ही संस्थाचालकाची भूमिका जयंत घाटे करीत आहेत. लीलाधर कांबळी यांनी ती आधी केली होती. दोघेही अनुभवी कलाकार, सृजन देशपांडे यांचा केशव हा देखील रुबाबदार आहे. अन्य भूमिकेत प्राची रिंगे (कृष्णाबाई), चैतन्य राव (पुरुषोतम), ओमकार कर्वे (जगन्नाथ), सोनाली राजे (अरुंधती), विजय मिगरे (मारत्या) यांची हजेरी आहे.
गाजलेली आणि काळाआड जाणारी नाटके पुन्हा एकदा रंगभूमीवर आणण्याच्या हक्काची जणू ‘मान्यता’ असलेले नव्या दमाचे कल्पक दिग्दर्शक राजेश देशपांडे यांचे दिग्दर्शन ही देखील एक जमेची बाजू. त्यांनी यापूर्वी पु.ल. देशपांडे यांचे ‘ती फुलराणी’ नंतर ‘सुंदर मी होणार’ तसेच प्रा. मधुकर तोरडमल यांचे ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’ आणि आता प्रा. कानेटकरांचे ‘हिमालयाची सावली’ हे एक आव्हान त्यांनी म्हणून दिग्दर्शक म्हणून पेललंय. आजच्या पिढीला पन्नास वर्षापूर्वीची नाटके कितपत पचनी पडतील, ही शंका असतानाच हिमालयाएवढे हे नवे डॉक्युमेंटेशन रंगभूमीवर समर्थपणे आणलं आहे. एक आव्हान त्यांनी दिग्दर्शक म्हणून म्हणून पेललंय. तीन अंकी नाटक दोन अंकी केल्यास ते अधिक सुसह्य होईल तसेच पहिल्या अंकातील तारेचा प्रसंगही संकलित केल्यास उत्तम. पण एकूणच अशी नाटके सादरीकरणासाठी आवश्यक असणारा अभ्यास हा दिग्दर्शनात दिसून येतो पात्रनिवड, तांत्रिक बाजूंवरही पुरेपूर लक्ष आहे.
नेपथ्यकार संदेश बेंद्रे यांनी उभारलेले दोन लोकेशन हे तो काळ उभी करतात. त्या काळातील टिपिकल पुणेरी वाडा, घर, त्यातील वस्तू, रंगसंगती हे सारं काही उत्तम. वेशभूषाकार मंगल केंकरे यांची वस्त्रनिवड चांगली तर राहुल रानडे यांचे संगीतही नाट्याला अनुरूप. श्याम सावंत यांची प्रकाश योजना आणि संदीप नगरकर, प्रदीप दुणे यांची रंगभूषा नोंद घेण्याजोगी.
नाटककार प्रा. कानेटकरांनी चाळीस एक नाटके रंगभूमीला दिली. प्रत्येक संहितेतलं वेगळेपण नजरेत भरणारं. आजही त्यांचं ‘सूर्याची पिल्ले’ हे आदर्श विडंबननाट्य म्हणून अधून-मधून रंगभूमीवर येतंय. ‘हिमालयाची सावली’ या नाटकासाठी तत्कालीन, लेख, पत्रे, भाषणे, बातम्या यांचा अभ्यास आहे. त्यामागे संशोधनात्मक वृत्ती आहे. त्यामुळेच तो काळ, ती माणसं संहितेतून जिवंत झालीत. त्याला काल्पनिक जोड जरी असली तरी सत्यघटना असल्यागत आहेत. कर्वे यांच्या सूनबाई इरावती कर्वे एके ठिकाणी म्हणतात- ‘माझे भाग्य की अशा माणसाची सून झाले! त्याहीपेक्षा केवढे माझे भाग्य की अशा माणसाची बायको झाले नाही!’ यातच हिमालयाची सावलीची कौटुंबिक वनलाइन दडलेली आहे. इरावतीबाईंच्या या एका वाक्यामुळे कानेटकरांची लेखणी हिमालयाच्या सावलीपर्यंत पोहोचली…
या नाटकातील कलाकारांभोवती अनेक योगायोग जुळलेले आहेत. ‘पिंजरा’ चित्रपटात डॉ. लागू यांच्यासोबत भूमिका करणार्या सरला येवलेकर हिची कृष्णाबाईसाठी निवड करण्यात आली आणि नव्या चित्रपटांच्या ऑफर्स डावलून त्या नाटकात आल्या. हे नाटक रंगभूमीवर आणण्याचा निर्माते गोविंद चव्हाण यांनीही प्रयत्न केला होता. नंतर कोरोनाकाळ आणि शरद पोंक्षे यांचे गंभीर आजारपण, यात काही वर्षे गेली. आता नव्या दमात पोंक्षे यांचा नानासाहेब ऊर्जेने भरलाय. डॉ. श्रीराम लागू यांनी दिग्दर्शित केलेले हे नाटक. काचेचा चंद्र, नटसम्राट ही त्यांची नाटके तुफान सुरू असतानाच ‘कलावैभव’चे मोहनशेठ तोंडवळकर यांनी ही निर्मिती तेव्हा केली होती. यातल्या शांता जोग अपघातात गेल्या. बयोच्या आठवणी मागे ठेवून गेल्या. नाटकाच्या प्रवासात प्रयोग दहा वर्षे थांबले होते. पण २००१ साली अमेरिकेत याचे तीन अंकी नाटक ‘डीव्हीडी’च्या नव्या तंत्रात प्रकाशित झाले. त्यात डॉ. लागू यांच्यासोबत ‘बयो’च्या भूमिकेत रोहिणी हट्टंगडी होत्या. या निमित्ताने जुन्या नाटकाचे डॉक्युमेंटेशन झाले. अनेक कलाकार, तंत्रज्ञ यांची नावे या नाटकाभोवती प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष जुळली आहेत.
‘सावलीत वर दिसतंय फक्त आभाळ. शिखर कुठेही दिसत नाही. शिखरापर्यंत मुळी नजरच पोहचत नाही’- हेच खरे! बयो-नाना, आश्रम-मठ, घर-दार अशा कौटुंबिक संघर्षाचे नाट्य म्हणून शिल्लक उरत नाही तर ते समाजजीवनावरल्या मूल्यांवर प्रभावी भाष्य करते. एका कर्मयोगी तपस्वीची हृदयस्पर्शी शोकांतिका म्हणून नाट्य खुणावते, यातच या नाट्याचे यश आहे.
हिमालयाची सावली
लेखन- प्रा. वसंतरात कानेटकर
दिग्दर्शन – राजेश देशपांडे
नेपथ्य – संदेश बेंद्रे
प्रकाश- श्याम चव्हाण
वेशभूषा- मंगल केंकरे
छायाचित्रे – संजय पेठे
निर्मिती – मोरया/ भूमिका/ अर्थव

