लाडकी बहीण योजनेतून ४५ लाख `लाडक्या बहिणी’ बाद झाल्या असून २६ लाख `लाडक्या बहिणी’ त्या लाभापासून वंचित राहिल्याची बातमी प्रसिद्ध झाल्यापासून माझा मानलेला लाडका मित्र पोक्या खूप अस्वस्थ आहे. ज्या लाडक्या बहिणींच्या मतांचा महायुतीचे सरकार निवडून येण्याला मोठा हातभार लागला, त्यांच्या तोंडाला काम झाल्यावर पानं पुसण्याचा हा प्रकार असल्याचं पोक्याचं ठाम मत आहे. मुळात या योजनेला कोणती महिला पात्र वा अपात्र आहे हे ठरवण्याचे निकष ठरले होते. मात्र त्यावेळी घाईने योजनेचे अर्ज भरून घेण्यात आले. ही मतांची लाच महायुतीच्या पदरात पाडण्यासाठी चौकशीचं नाटक करून निवडणुकीच्या आधी त्यांच्या पदरात महिना पंधराशे रुपयांचं दान टाकण्यात आलं. मात्र सत्तेवर आल्यावर लाडक्या बहिणींवर होणार्या कोट्यवधांrच्या खर्चामुळे सरकारी तिजोरी वेगाने रिकामी होऊ लागली, तेव्हा सरकारला जाग आली आणि या योजनेतील किती महिला अपात्र आहेत त्यांच्या पुराव्यांची पडताळणी सुरू झाल्यावर ४५ लाख लाडक्या बहिणींना बाद ठरविल्या, त्यांच्या खात्यात जाणारे पैसे बंद करण्यात आले. त्याशिवाय आणखीन २६ लाख लाडक्या बहिणींच्या बाबतीत असाच घोळ असल्यामुळे त्यांच्या खात्यातही पैसे जात नाहीत. लाडक्या बहिणींना या योजनेची लालूच दाखवण्यात सर्वात मोठा वाटा महायुतीचे तेव्हाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा होता. त्यांचा लाभ भाजपला आणि नकली राष्ट्रवादीलाही भरपूर मिळाला. पण लाडक्या बहिणींचे तारणहार म्हणून फक्त शिंदे मिरवू लागले. ही योजना कधीही बंद होणार नाही आणि महिना दीड हजारापेक्षा जास्त रक्कम पुढील काळात वाढवून देण्यात येईल असा डंका मुख्यमंत्रीपदावरून उपमुख्यमंत्रीपदावर गच्छंती झाल्यावर शिंदे जोरात पिटू लागले. लाडक्या बहिणींची हौस पुरवण्यासाठी इतर मंत्र्यांच्या खात्यातून पैसे वळते करण्यात येऊ लागल्यावर मात्र त्या खात्याच्या मंत्र्यांची बोंबाबोंब सुरू झाली. या योजनेचा ताण सरकारी तिजोरीवर पडत असल्याचे कळत असूनही मतांचा मलिदा खाण्यासाठी भाजपा आणि शिंदेंचा नकली पक्ष या योजनेला विरोध करत नव्हता. आज ७६ लाख लाडक्या बहिणी या योजनेतून बाद झाल्यातच जमा आहेत. बोगस लाडक्या बहिणींना या योजनेतून बाहेर काढण्यासाठी केवायसी मोहीम राबवण्यात आली. बालकल्याण व महिला विकास मंत्री अदिती तटकरे या नेहमीच या योजनेबद्दल परस्परविरोधी विधाने करून लाभार्थी महिलांना बुचकळ्यात पाडत असतात. मात्र महायुतीत अभूतपूर्व कोंडी होत असलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपणच लाडक्या बहिणींचे उद्धारकर्ते आहोत या थाटात वावरत असून या लाडक्या बहिणी पुढेही आपल्यावर मतांचा वर्षाव करतील या भ्रमात आहेत. त्यामुळे मी या विषयावर त्यांची मुलाखत घेण्याचे आव्हान पोक्याला केलं आणि तो मुलाखत घेऊनही आला. त्याच मुलाखतीतील एकनाथ शिंदे यांचे हे वक्तव्य –
लाडकी बहीण योजना माझ्यामुळे सुरू झाली आणि त्यामुळेच महायुती सत्तेवर आली हे कोणीही नाकारू शकत नाही. कोणाचा कितीही विरोध असला तरी जोपर्यंत मी महायुतीत मंत्री आहे, तोपर्यंत या योजना मी बंद पाडू देणार नाही. कारण ही योजना म्हणजे माझ्या दृष्टीने सोन्याची कोंबडी आहे. ती मतांची अंडी देते म्हणून मला ती प्रिय आहे. यापुढे आम्ही केवळ लाडकी बहीण योजनाच नव्हे तर लाडका भाऊ, लाडके वडील, लाडकी आई, लाडकी आजी, लाडके आजोबा एवढंच नव्हे तर लाडकी मेहुणी ही योजनाही राबवू. ते माझं मोठं स्वप्न आहे. या योजनेला विरोध करणार्यांना मी सांगू इच्छितो की या योजनेसाठी पैशाची चिंता तुम्ही करू नका. पैसा येतो, जसा तो नगरपरिषद, महानगरपालिका निवडणुकीसाठी आला. त्याच्या लाख पटीने तो या भावी योजनांसाठीही येईल मात्र त्यासाठी मी मंत्रिमंडळात असायलाच हवा. सध्या मला डावलण्याचं आणि महायुतीतून संपवण्याचा जे घाणेरडे राजकारण चाललं आहे, त्याला मी पुरून उरेन. मुंबईत भाजपानेच माझ्या पक्षाचे उमेदवार पाडले. पण सध्या तरी या बिकट परिस्थितीत मी फडणवीसांना थेट विरोध करू शकत नाही. इकडे आड तिकडे विहीर आणि धरलं तर चावतं सोडलं तर पळतं अशी अवस्था आहे माझी. तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करतोय मी. कधी कधी असं वाटतं पेटून उठावं आणि ताठ मानेने सरळ सोटपणे भिडावं फडणवीसांना. जे अपमानाचं पित्त पोटात साठलं ते ओतून टाकावं एकदाच. पण नाही धीर होत माझ्या त्या दिल्लीतल्या दोन परमदैवतांकडे पाहून. तेच तारणहार आहेत माझे. जिल्हा परिषदांच्या निवडणुका होऊन जाऊ द्या, मग बघतो या फडणवीसांना. का कोण जाणे, पण मला गेल्या पंधरा दिवसापासून पुन्हा मुख्यमंत्रीपदाची स्वप्नं पडू लागलीत. स्वप्नात विश्वगुरू मोदी आणि माझं कृपाछत्र परमवंदनीय अमित शहाजी मला मुख्यमंत्रीपदाच्या सिंहासनावर बसवताना दिसतात. माझ्या लाखो लाडक्या बहिणी एकाच वेळी आरत्या घेऊन मला ओवाळताना दिसतात. सगळा परिसर प्रकाशमान झालेला दिसतो. माझ्या जयजयकाराच्या घोषणा आसमंतात दुमदुमताना दिसतात. इतक्यात कोणीतरी माझे पाय ओढल्याचा भास होतो आणि मी त्या स्वप्नातून खडबडून जागा होतो. इतक्यात माझ्या ठाण्यातील घराच्या प्रभागात माझ्या पक्षाच्या उमेदवाराचा दारुण पराभव करणार्या उद्धव ठाकरे यांच्या असली शिवसेनेच्या विजयी उमेदवाराची भव्य विजयी मिरवणूक माझ्या दारातून जाताना मी पाहतो आणि हृदयात वेदना होतात. तेवढ्यात मुख्यमंत्र्यांचा फोन येतो आणि मी निमूटपणे त्यांच्या निवासस्थानी जायला निघतो… पाहूया काय होतं ते.

