संतोषराव, आम्हीदेखील तुमच्याप्रमाणेच चौसष्टच्या चौसष्ट कलांमध्ये जबरदस्त पारंगत आहोत. मात्र आमच्या अंगी असलेल्या या कलागुणांचा आजवर या धरतीला तर काडीचाही उपयोग झाला नाही, पण दस्तुरखुद्द आम्हालाही झाला नाही… याचे नेमके कारण काय असावे?
– संजय क्षीरसागर, पिंपळे गुरव, पुणे
आपल्या अंगात कलागुण आहेत असं तुम्हाला वाटतं हेच नेमके कारण आहे. ही अंधश्रद्धा असते. ती सोडा. जे खरोखर जमतंय तेच करा. (तुमच्या अंगात आहेत ते कलागुण आहेत की आणखीन काही आहे… हे लोक ठरवतील). आमच्याबद्दल म्हणाल तर आम्हाला जे जमतं त्याशिवाय दुसरं काही येत नाही म्हणून ‘जे’ जमतं तेच आम्ही करतोय. लोकांना ते कलागुण वाटतात. त्यासाठी भांडवल काहीच लागतं नसल्याने जे मिळतं तोच फायदा आहे यात आम्ही समाधान मानतो. तसंच तुम्ही मानलंत तर तोच फायदा समजा.
आजाराने बिछान्याला खिळलो आहे, असं सांगणारे नेते खुर्चीला धोका उत्पन्न होण्याच्या कल्पनेनेही बरे होऊन २४ तास खडखडीतपणे राजकारणाचे डावपेच टाकताना दिसतात… हा वैद्यकीय चमत्कार कसा घडून येत असेल?
– नितीन भुजबळ, येवला
गटांगळ्या खाताना बुडणार म्हटल्यावर हात पाय नसलेला माणूससुद्धा हातपाय मारायला लागतो… वैद्यकीय भाषेत म्हणाल तर ऑक्सिजनवर असलेल्या माणसाच्या ऑक्सिजन पुरवणार्या नळीवर पाय दिलात तर तो सुद्धा हातपाय हलवताना दिसेल. हे उदाहरण थोडसं क्रूर असेल (पण तुम्ही म्हणताय त्या नेत्यांच्या वागण्यापुढे या उदाहरणाची क्रूरता काहीच नसेल ) पण या उदाहरणातच तुमच्या प्रश्नाचं उत्तर असेल… असं आम्हाला वाटतं.. मग भुजबळ राव, तुम्ही तर येवल्याला राहता, तुम्हाला किती काय वाटत असेल!
आमच्या काळात पंडित नेहरू हे पंतप्रधान आईनस्टाईनसारख्या महान वैज्ञानिकाला जाऊन भेटल्याचे फोटो पाहिले होते. अलीकडच्या काळात कोणी आईनस्टाइनच्या तोडीचा एपस्टीन नावाचा वैज्ञानिक होऊन गेला की काय? जगातल्या सगळ्या महान नेत्यांचं, उद्योगपतींचं, सेलिब्रिटींचं नाव त्याच्याशी जोडलं जातंय म्हणून प्रश्न पडला हो!
– जयंत बेल्हेकर, खडकी, पुणे
जे गुण दिसलेयत त्याबद्दल बोलू नका.. जे दिसलेले नाहीत त्या गुणांबद्दल बोला. एखादा कलाकार आपल्या माणसांसमोर वेगवेगळी वाद्यं वाजवताना दिसतो. पण नाचताना गाताना दिसत नाही. त्याला नाचण्या-गाण्यासाठी परदेशात जावं लागत असेल तर त्याला किती यातना होत असतील, त्याचा विचार करा.. गब्बर सिंगसमोर बसंती नाचते ती आपल्या मनाने नाचत नाही. पण आपण नतद्रष्ट ते एन्जॉय करतो. हे जर कळत नसेल तर, कोणीतरी आहे जो आपल्या करोडो लोकांचं प्रतिनिधित्व करतोय, यात तरी समाधान माना. करोडो लोकांमधला एकही माणूस जागतिक नेत्यांबरोबर, उद्योगपतींबरोबर नाव जोडण्यासारखा नाही असं झालं असतं तर कसं वाटलं असतं तुम्हाला? थिंक पॉझिटिव्ह! सगळं चांगलं दिसेल… चांगलं बोलण्यातच फायदा आहे ही काळाची गरज ओळखा…
परवा माझ्या गर्लफ्रेंडचा फोन शोधण्यासाठी मी रिंग दिली, तिचा फोन सापडला, त्यावर माझा फोन रद्दीवाला या नावाने
वाजत होता हो! फार वाईट वाटलं.
– गौरव पाटील, बेलापूर
रद्दीवाल्याचा नंबर तुमच्या नावाने फीड केलाय काय ते चेक करा… नसेल तर त्यात समाधान माना… आणि तसं असेल तर सावध राहा… लग्न केलंत तर हनिमूनला जाताना बॉडीगार्ड घेऊन जा… आमचं उत्तर कळत नसेल तर क्राईम स्टोरीज बघत चला…
अहिल्याबाई होळकरांनी बांधलेला ऐतिहासिक मणिकर्णिका घाट बुलडोझर लावून उद्ध्वस्त केला गेला. अशावेळी इकडे या गडावर, त्या वाड्यावर रंग फासत फिरणारे आणि धर्मरक्षणासाठी प्राण देण्याच्या बाता मारणारे सगळे भांग पिऊन कुठे पडले असतील? एकाच्याही तोंडून चकार शब्द निघत नाही.
– जयमाला शिंदे, कराड
कोणी ‘चकार’ शब्द काढला आणि त्याच्या आयुष्यातल्या ‘चुकार’ फाईल ओपन झाल्या तर त्या तुम्ही बंद करू शकणार आहात का? प्राण देण्याच्या गोष्टी कोणीही कितीही केल्या तरी प्रत्येकाला आपला जीव प्यारा असतो. कोणी कितीही रिक्षाने, टॅक्सीने, स्वतःच्या वाहनाने फिरला, तरी कधीतरी हेलिकॉप्टरने प्रवास करावाच लागतो. हे उत्तर गुंतागुंतीचं वाटत असेल तर तुम्ही म्हणताय त्या भांग पिऊन गप्प पडलेल्यांना विचारा, ते तुम्हाला ‘विस्कटून’ सांगतील.
महापालिका निवडणुकांनंतर शतप्रतिशत भाजप, महादेवेंद्र, महाभाजप वगैरे हेडिंगांची चाटुकारिता करणारे पेपर आता नेमक्या किती ठिकाणी आणि कोणत्या मार्गांनी भाजप आघाडी सत्तेत आली आहे, याच्या बातम्या का दाखवत नाहीत?
– महेंद्र देसाई, वाळवा
उद्या त्यांच्या पेपरची ‘बातमी’ दुसर्या पेपरमध्ये छापून यायला नको याची ते काळजी घेत असतील. पापी पेट का सवाल असतो. ते भरण्यासाठी काही पापं करावीच लागतात.
विचारून टाका प्रश्न
तुम्हालाही अभिनेते संतोष पवार यांना प्रश्न विचारायचाय…? मग वाट कसली बघताय…? उचला पेन आणि टाका विचारून प्रश्न… हा प्रश्न थेट ‘मार्मिक’च्या [email protected] या ईमेल आयडीवर पाठवून द्या… किंवा आमच्या पत्त्यावर पाठवा. मार्मिक प्रश्नाला संतोष पवार उत्तर देतील…

