संतोषराव, मी काहीही बोललो तरी बायकोला ते पटत नाही. ती नेहमी विरोधी मतच व्यक्त करते. आपल्यात काही जुळत नाही, आपण घटस्फोट घेऊ असं तिला म्हणालो, तर तिला तेही पटत नाही. आता मी काय करू?
– अरुण वाघमारे, खोपोली
सोडून द्या, तुमची भरभराट होईल… नाही नाही… बायकोला सोडून द्या असं म्हणत नाही… हा विषय सोडून द्या. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक बाई असते आणि ती बायकोच असते हे लक्षात ठेवा (अपवाद लक्षात ठेवू नका). बोलीभाषेत बोलायचं तर हल्लीच्या युत्यांसारखं वागा, xxxx सारखं वागू नका. ‘लवचिक’ बना, ‘भाऊ’बंद काय म्हणतील याचा विचार करू नका… ‘माझा यात काही स्वार्थ नाही’ असं जाहीरपणे म्हणा. पण स्वतःचा फायदा पाहा, भले बाहेर एकमेकांना विरोध करा. पण लोकल लेव्हलला (घरात) जुळवून घ्या.
कोणत्याही निवडणुकीत उमेदवारी मिळण्यासाठी उमेदवाराला किती मुलं असावीत, याबद्दल जशी मर्यादा आहे, तशीच मर्यादा एकाच घरातल्या कितीजणांना उमेदवारी दिली जावी, यावरही असावी, असं मला वाटतं. तुमचं काय मत आहे?
– वैभवी पाटील, रोहा
याबद्दल तुम्हाला मत सांगितलं आणि कुटुंबच नसणार्या माणसाने आमच्यावर प्रेशर आणलं, दम दिला, खोके दिले आणि आमचं मत बदललं, तर तुमचं काय मत असेल? त्यामुळे अशा विषयावर आम्ही आमचं मत मांडत नाही. कारण आम्हाला सकाळी बोललेलं संध्याकाळी आठवतं. आणि आम्ही आमचं मत बदललं की आमचं मन आम्हाला खातं. आणि ते पचत नाही. त्यामुळे लोकांच्या शिव्या खाऊन त्या हजम करण्याची कला ज्या दिवशी आम्हाला अवगत होईल त्या दिवशी आम्ही आमचं मत मांडू.
आतापर्यंत अनेकदा आवर्जून मराठी बोलणारा प्रेक्षकांचा लाडका अण्णा सुनील शेट्टी आता, मला वाटलं तर मराठीत बोलेन, तुम्ही मला मराठी बोलायला भाग पाडू शकत नाही, असं का बोलू लागला असेल?
– राहुल सावंत, पाषाण, पुणे
त्याला तसं बोलायला भाग पाडलं असेल किंवा आता आपल्याला कोणी कुत्रा विचारत नाही तर लोकांनी आपल्या नावाने भुंकाव तरी असं त्याला वाटलं असेल किंवा आता त्याचं पोट भरलं असेल म्हणून तो खाल्ल्या घराचे वासे मोजत असेल. किंवा तसं बोलण्याची त्याला किंमत मिळाली असेल. शेवटी धंदा करणारे फुकट काहीच करत नाहीत.
नितीन नबीन हे भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष आता आपले बॉस आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आणि त्यानंतर लगेचच लोकांना हात हलवून अभिनंदन करू पाहणार्या नबीन यांना त्यांनी हाताला धरून बाजूला खेचले आणि स्वत: अभिवादन करू लागले… म्हणजे मग बॉस कोण?
– कीर्ती पाथरे, इंदापूर
बॉस ही उपाधी चोर-दरोडेखोरांच्या गँगमध्ये असते… त्यामुळे तुमचा प्रश्न चुकीच्या माहितीवर आधारित आहे असं आम्हाला वाटतं. आणि समजा तुमचा प्रश्न बरोबर असेल आणि पंतप्रधान असे बोलले असतील तरी इतरांनी ‘नवीन’ माणसाला बॉस म्हणायला हवं. ते सोडा, ‘नवीन’ अध्यक्षांनी आधी स्वतःला बॉस समजायला हवं, इथे खुद्द महामहिम राष्ट्रपती स्वतःला बॉस समजू शकत नाहीत. कारण लोकशाहीमध्ये जनता बॉस असते… अर्थात ही एक अंधश्रद्धा होती.. ती मोडीत काढण्यासाठी हे नरेशन असावं. कारण राजकारणात कुठलीच गोष्ट सहज होत नाही…
दोन गल्ल्या पलीकडे राहणार्या उद्योगपतीशी करार करण्यासाठी मुख्यमंत्री दावोसला जातात, ज्याची १५ हजार कोटीची एकूण उलाढाल आहे, तो एक लाख कोटीचा करार करतो आणि या सगळ्यासाठी जनतेचे कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. ही बनवाबनवी लोकांच्या लक्षात कशी येत नाही?
– सुरेश पटवर्धन, डोंबिवली
ती बनवाबनवी लक्षात येऊ नये म्हणून वेगवेगळ्या बनवाबनवींवर अब्जावधी रुपये खर्च केले जातात… ( दावोसला जाऊन करार करणं ही तशीच एक बनवाबनवी… तुम्ही त्यावर प्रश्न विचारलात. पण करार काय झाले याच्यावर प्रश्न विचारला का? म्हणजे मूळ बनवाबनवी राहिली की नाही बाजूला?) म्हणजे कोट्यवधी खर्च करण्याला ‘अर्थ’ आहे की नाही… आणि करार काय झाले? हा प्रश्न विचारलातच तर जाहीर करायला कोणाच्या बापाचं काय जातंय? हे खुद्द करार करणारेच बोललेयत… त्यावर वेगळं काय बोलायचं?
मला काहीतरी गंभीर आजार झालेला आहे संतोष भाऊ, डोळे मिटले की मला काहीच दिसत नाही हो हल्ली. मी कोणत्या डॉक्टरचा सल्ला घेऊ?
– मायकल मच्याडो, सांताक्रूझ
ते डोळे तसेच मिटून कुठल्याही डॉक्टरवर विश्वास ठेवा… तो सांगेल त्या तपासण्या करा… त्याला नाहीच निदान झालं, तर तसेच डोळे बंद करून स्पेशालिस्टचा सल्ला घ्या…तो काहीतरी प्रॉब्लेम नक्कीच शोधून काढेल. आणि नंतर त्याचं बिल बघून तुमचे डोळे नक्की उघडतील. (विशेष सूचना… डोळे बंद करून कोणाची भक्ती करू नका… का ते विचारू नका… डोकं बंद नसेल तर ते चालवा, उत्तर सापडेल.)
विचारून टाका प्रश्न
तुम्हालाही अभिनेते संतोष पवार यांना प्रश्न विचारायचाय…? मग वाट कसली बघताय…? उचला पेन आणि टाका विचारून प्रश्न… हा प्रश्न थेट ‘मार्मिक’च्या [email protected] या ईमेल आयडीवर पाठवून द्या… किंवा आमच्या पत्त्यावर पाठवा. मार्मिक प्रश्नाला संतोष पवार उत्तर देतील…

