माझा मानलेला परमप्रिय लाडका मित्र पोक्या आज सकाळी मला भेटायला आला़ तोच मुळी एखाद्या पोक्त विद्वान पंडिताचा चेहरा करून. त्याच्या झोळीतून व्हिडिओ कॅसेट, वृत्तपत्रातील बातम्यांच्या कात्रणांचे संच आणि बरीचशी जाडजूड कागदांची भेंडोळी डोकावत होती. एखाद्या तत्त्वज्ञान्यासारखे गंभीर भाव त्याच्या चेहर्यावर होते. मी म्हणालो, पोक्या हा सारा काय प्रकार आहे? त्यावर तो म्हणाला गुरुवर्य, जगात ज्या विषयावर अजूनपर्यंत कोणीही संशोधन केलेलं नाही त्यावर संशोधन करून मला बोस्टन विद्यापीठाची डॉक्टरेट मिळवायची आहे. त्याची मी प्राथमिक तयारीही सुरू केलीय. सध्या पुरावे गोळा करण्याचं आणि त्यांची छाननी करण्याचं काम सुरू केलंय. नंतर संबंधितांच्या मुलाखती घेऊन संशोधनाला पूर्णत्व देण्याचा प्रयत्न करणार आहे. जगात असा महाप्रबंध कोणी लिहिलेला नाही आणि माझ्यानंतर कोणी लिहील असं वाटतही नाही. कदाचित यासाठी माझा जागतिक स्तरावर गौरव होईल आणि मला डोनाल्ड ट्रम्प यांच्या आधी खास संशोधनाबद्दल नोबेल पारितोषिकही मिळेल. अनेक देशांमधून व्याख्यानांसाठी निमंत्रणे येतील आणि काम्पुचियासकट सार्या जगात माझं नाव होईल.
मी त्याला म्हटलं, पोक्या, तू आता अधिक ताणून न धरता तुझ्या प्रबंधाचा विषय सांग आणि माझ्या उत्सुकतेचा मोक्ष लाव. मग पोक्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, विषय आहे- `महाराष्ट्रातील नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकांमध्ये पडलेला ५० अब्ज रुपयांचा बेफाम पाऊस.’ या विषयाला अनेक बाजू असल्यामुळे मी त्याचा सर्वांगीण शोध घेणार आहे. निवडणुकीच्या आधी भाजपा आणि शिंदे गटाने मतदारांवर पैशाची अतिवृष्टी केली. तिचं वर्णन करायला प्रसारमाध्यमांनाही उपमा तोकड्या पडल्या. पैशाचा धोधो पाऊस, महापूर, बरसात, पैशांच्या लाटा, वादळ, तांडव… बाप रे बाप! आणि पैसे वाटपाचे अगणित प्रकार आणि पद्धती पाहून मी तर थक्कच झालो. एवढे पैसे आले कुठून यांच्याकडे असा प्रश्न जनतेला पडलाच, पण अनेक देश विदेशांनाही पडला. देश कर्जबाजारी असला तरी केंद्र सरकारला पैशाचा तुटवडा कधीच भासत नाही. यांचे मुख्यमंत्री कोटीकोटींच्या आकड्याशिवाय कधीच बोलत नाहीत.
आपण सहज चालता-बोलता चणे- शेंगदाणे खातो तसे त्यांचे अनेक नेते, मंत्री, आमदार, खासदार, नगरसेवक कोटीकोटीच नव्हे तर अब्जावधी रुपये सहज खातात. एकेकाची संपत्ती बघा, बेहिशेबी मालमत्ता बघा. महाराष्ट्रातला शिंदे गटाच्या, अजित पवार गटाच्या मंत्र्यांची, नेत्यांची गेल्या दहा वर्षात कितीतरी पटीने वाढलेली संपत्ती बघा. त्यामुळे या नेत्यांना निवडणुकीत मतदारांना पैसे वाटून मतं विकत घेण्यास काहीच अडचण वाटत नाही. मतांचे रेटही पाच हजार रुपयांपासून एकेक लाखापर्यंत असतात. त्यात एखाद्या मोहल्ल्याचा गँगस्टर दादा असेल तर पाच-दहा लाखांपासून पन्नास लाखापर्यंत पैसे घेऊन तो मतं मिळवून देतो. अगदी घराघरातही प्रचारपत्रकांबरोबर पाच-पाच हजारांचे पाकीट बिनधास्त दिलं जातं. अनेक मतदार निवडणूक म्हणजे दिवाळी-दसरा हातपाय पसरा समजून आनंदाने पैशाचा स्वीकार करतात. लाडक्या बहिणींनाही त्याचे लाडके भाऊ कस्पटासमान दीड दीड हजार रुपये लाच मतांसाठी देण्यास सिद्ध असतात. अरे, द्यायचेच असतील तर द्या ना प्रत्येक लाडक्या बहिणीला महिना किमान वीस-वीस हजार रुपये.
हा पैसे देऊन मतं विकत घेण्याचा श्रीगणेशा विश्वगुरूंनी बिहार निवडणुकीपासून केला आणि आता त्याला एका सार्वजनिक लाचखोरीचं रुप आलं आहे. मला या सगळ्याचा पर्दाफाश करून या मतांच्या लाचखोरीचा इतिहास, उगम आणि विकास पद्धतशीरपणे माझ्या प्रबंधात मांडायचाय. नोटांची पुडकीच्या पुडकी मतदारांना वाटताना मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय. अनेक चॅनेल्सनी पैसे वाटायची दृश्य टिपलीत. मतदारांना वाटण्यासाठी सत्तर-ऐंशी लाख रुपयांची रोकड घेऊन जाणार्या गाड्या निवडणुकीच्या आधी पोलिसांनी पकडल्यात. त्याशिवाय देशी-विदेशी दारूच्या हजारो बाटल्या जप्त केल्यात. मला हा जांगडगुत्ता महाप्रबंधात उलगडून दाखवायचाय. काही लाचखोर मतदारांच्या मी मुलाखतीसुद्धा घेतल्यात. ते म्हणतात की निवडणुकीच्या निमित्ताने आम्हाला रोख रक्कम मिळते. त्याशिवाय प्रेशर कुकर, घरघंटी, मिक्सर, महिलांना साड्या, मोबाईलसारख्या वस्तू फुकटात मिळतात. मग आम्ही ते देणार्या उमेदवाराशी प्रामाणिक राहून मतदान केलं तर काय बिघडलं? आम्हाला राजकारणात, पक्षापक्षात रस नाही.आमची आजची गरज भागली की झालं! शिवाय प्रचाराला गेलं की दिवसाला पाचशे किंवा हजार रुपये मिळायचे. त्याशिवाय सकाळी नाश्ता, दुपारी उत्तम दर्जाचं जेवण, रात्री प्रचार संपल्यानंतर डिनर, विदेशी दारू… हे कोण कधी कुठल्या जन्मात देणार आहे आम्हाला, ही या लोकांची भावना! मग का नाही ते त्या उमेदवाराशी प्रामाणिक राहणार? निवडणुकीच्या दोन दिवस आधी एके ठिकाणी मतदारांना लाच म्हणून देण्यासाठी सत्तर फ्रिजचा टेम्पो पोलिसांनी पकडल्याची बातमी त्या व्हिडिओसकट टीव्ही चॅनेल्सवरून प्रसारित झाली होती. मतदारांना एवढं मोठं घबाड मिळत असेल तर ते त्या उमेदवाराला का मत देणार नाहीत? मतदारांच्या अशा मनोवृत्तीमुळे महाराष्ट्राच्याच नव्हे तर संपूर्ण देशाच्या निवडणूक प्रक्रियेला किती हिडीस, बीभत्स आणि विकृत मनोवृत्तीचं ग्रहण कसं लागलंय आणि याला या देशाचे दोन प्रमुख केंद्रीय नेते कसे जबाबदार आहेत, हे सिद्ध करण्याचा प्रयत्न मी करणार आहे… पोक्याच्या या कार्याला मी मनापासून शुभेच्छा दिल्या.
