मुंबई महानगरपालिकेसह राज्यात २९ महापालिकांच्या निवडणुका झाल्या, तरी सगळ्या राज्याचंच नव्हे, तर देशाचं लक्ष लागलं होतं मुंबईच्या निवडणुकीकडे. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे इतर महापालिकांच्या एकत्रित बजेटपेक्षा जास्त बजेट या महापालिकेकडे आहे. ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे. दुसरे कारण म्हणजे दिल्लीत जो कोणी सत्तेत असतो, त्याला या महानगरावर आपला अंकुश हवा असतो. मुंबई केंद्रशासित करायची, मुंबईचं स्वतंत्र राज्य करायचं, मुंबई गुजरातला जोडायची किंवा आजचे सत्ताधारी करू पाहतात त्याप्रमाणे मुंबईचं अर्थकारण खच्ची करायचं आणि तिच्यात अमराठी टक्का वाढवून तिच्यावरचा मराठी ठसाच पुसून काढायचा, असे एकापेक्षा एक नीच डावपेच सुरू असतात.
दिल्लीकरांचे हे नापाक मनसुबे मुंबईने कायम उधळून लावले ते ठाकरेंच्या बळावर, त्यांच्यावर विश्वास ठेवून. महाराष्ट्रात मुंबई आहे, पण मुंबईत महाराष्ट्र नाही, हे किती गंभीर आहे, हे ओळखून मराठी माणसात हिंमत भरण्याचं काम शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केलं, त्याबद्दल मुंबई आणि महाराष्ट्रातला मराठी माणूस त्यांचा कायम ऋणी राहील. त्या काळात बाळासाहेबांना राष्ट्रीयतेचं महत्त्व न समजलेले कोत्या प्रादेशिकतेचे नेते मानणार्या बहुतेक विचारधारांनी आता प्रादेशिक अस्मिता जपणं हाच संघराज्यात्मक लोकशाहीचा प्राण आहे, हे ओळखलं आहे. बाळासाहेबांचं द्रष्टेपण त्यांनाही समजलं आहे. बाळासाहेब नुसते बोलके सुधारक नव्हते, त्यांनी मार्मिक साप्ताहिकाच्या माध्यमातून आधी मराठी माणसाच्या गळचेपीच्या विरोधात आवाज उठवला आणि शिवसेनेच्या झेंड्याखाली त्यांना मराठी म्हणून एकजुटीने एकत्र आणलं.
मराठी अस्मितेच्या या विराट एकजुटीने त्यांच्या हातात मुंबईची सत्ता दिली आणि शिवसेनेने मराठी अस्मिता जपताना मुंबईच्या सर्वसमावेशक, कॉस्मोपोलिटन रचनेला अजिबात धक्का लागू दिला नाही. शिवसेनेचं आणि बाळासाहेबांचं हे फार मोठं श्रेय आहे, पण ते त्यांना दिलदारपणे, उमदेपणाने दिले जात नाही. बाळासाहेबांनी मराठीच्या शत्रूंशी लढा दिला, कालांतराने त्यांना अपेक्षित हिंदुत्वाच्या विरोधकांशी दोन हात केले. पण, त्यांनी कटुतेचं, सुडाचं राजकारण केलं नाही. दोन द्या, दोन घ्या आणि ताळ्यावर या, सगळं विसरून एकत्र पुढे जाऊ या, असा त्यांचा खाक्या होता. त्यामुळेच तर विधानसभेच्या, लोकसभेच्या आणि आता महापालिका निवडणुकीच्या वेळी मुंबईतील मुस्लिम समुदायही मोठ्या प्रमाणावर शिवसेनेच्या पाठिशी उभा राहिला होता.
महाराष्ट्रात ठाकरे आणि पवार या आडनावांना जे वलय आहे, जनमानसात जे स्थान आहे, त्याला शह दिल्याशिवाय आपला पक्ष मोठा करता येणार नाही, हे भारतीय जनता पक्षाच्या धूर्त नेत्यांना उत्तम प्रकारे माहिती आहे. त्यामुळेच तर त्यांनी सत्तेच्या राक्षसी लालसेपोटी शिवसेना फोडली, गद्दारांचा गट हीच खरी शिवसेना हे लोकांच्या गळी उतरवण्याचा प्रयत्न केला. तेच शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या बाबतीत केलं गेलं. सत्तेचा प्रचंड प्रमाणावर गैरवापर केला गेला, पाण्यासारखा पैसा वाहवला गेला. माणसं तर पळवलीच, पण पक्षाचं चिन्हही पळवलं. त्यामुळेच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत आणखी एका गोष्टीकडे लक्ष लागलं होतं, शिवसेना कोणाची हा निकाल जिथे शिवसेनेची स्थापना झाली त्या मुंबईतून येणार होता… शिवसेनेसाठी हेच खरे सर्वोच्च न्यायालय.
मराठी माणसांनी हा निकाल दिला. सर्व प्रकारचे गैरप्रकार करून, पैसे वाटून, मुंबईच्या मराठी माणसाने मिंध्यांना लाथाडलं आणि यापैकी कसलंही पाठबळ नसलेल्या, एकापाठोपाठ एक हादरे बसल्याने गलितगात्र झालेल्या मूळ शिवसेनेत मराठी माणसांनी, पक्षफुटीनंतर राहिले होते, त्याच्या जवळपास अडीच पट नगरसेवकांचं बळ भरलं. धनुष्यबाण ही शिवसेनेची निशाणी आणि वाघाचं चिन्ह चोरणार्यांना शिवसेनेची खरी संपत्ती समजलीच नाही… शिवसेनेवर, ठाकरेंवर कमालीचं प्रेम करणार्या आणि त्यांच्यावर विश्वास असलेले मराठी, अमराठी मुंबईकर, ही संपत्ती ते कसे लुबाडून नेणार होते? शिवसेनेचे खरे वाघ, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले आणि मुंबईच्या मराठी माणसांमध्ये खर्या अर्थाने जोश संचारला. त्यांनी सगळी ताकद लावून भाजपच्या बुलडोझरची चाकं अशी पंक्चर केली की आता रिक्षाचं चाक aलावल्याशिवाय त्यांना पुढे चालणं अशक्यच झालं आहे.
या विजयाच्या निमित्ताने कुणी शतप्रतिशतकडे भाजपची वाटचाल सुरू आहे असा शोध लावला, कुणाला निकालात महाभाजपचे दर्शन झाले, कुणाला महादेवेंद्र दिसले. मतदान पूर्ण होण्याआधी एक्झिट पोल आणि मतमोजणी सुरू होण्याच्या आधी निकालाचा कल जाहीर करणार्यांकडून वेगळी काय अपेक्षा करणार म्हणा! भाजप एकट्यानेच सत्ता काबीज करणार असा दोन दिवस नंगा नाच चालवल्यानंतर थोबाडीत मारल्यासारख्या चेहर्याने त्यांना भाजपचा खरा आकडा जाहीर करायला लागला. सगळे संकेत, नियम धाब्यावर बसवून जागा वाढल्या किती, तर अवघ्या सात. बाकी महाराष्ट्रात सर्वाधिक जागा मिळवून सर्वात मोठा पक्ष बनूनही सत्तेत येण्यासाठी कुबड्या घ्याव्याच लागणार, पक्ष फोडावेच लागणार, सत्तेचा गैरवापर करावाच लागणार. तरी इकडे भाटांनी फडणवीसांचा दिल्लीतला शपथविधी इकडेच उरकून घेऊन त्यांची भविष्यातली वाटचाल बिकट करून ठेवली.
या निवडणुकीत आकड्यांमधल्या यशापयशाची चिकित्सा होत राहील, पण आकड्यांपलीकडचं सर्वात मोठं यश निर्विवादपणे शिवसेनेचंच आहे आणि मराठी माणसांचं आहे. मुंबई ताब्यात घेऊन महाराष्ट्राच्या राजधानीत मराठी माणसाला धाब्यावर बसवण्याचं कारस्थान सुरू आहे, हे ठाकरे बंधूंनी लक्षात आणून दिलं आणि मराठी माणूस भाजपने दिलेल्या भोंदुत्वाच्या नशेतून टक्क जागा झाला. आपण हिंदू आहोतच, पण मराठीही आहोत आणि आपल्या राज्यात आपली अस्मिता टिकलीच पाहिजे, हे त्याच्या लक्षात आलं. बटेंगे तो कटेंगेची पोपटपंची करणारा हा पक्ष प्रत्यक्षात कोणासाठी काम करतो आणि तो मराठीजनांच्याच मुळावर कसा आलेला आहे, याचा साक्षात्कार झाल्यावर त्यांनी दिल्लीचं हे आव्हान परतवून लावण्याचा निर्धार केला. शेवटच्या क्षणी झालेली मराठी एकजूट किती भक्कम आहे, हे दाखवून दिलं. मुंबईवरचा मराठी ठसा पुसण्याची हिंमत कोण हरीचा लाल करतो, ते पाहून घेण्याइतकी ताकद त्यांनी ठाकरेंच्या मागे उभी केली…
स्वर्गीय बाळासाहेबांना शंभराव्या जन्मदिनानिमित्त पहिली भेट उद्धव आणि राज या बंधूंच्या मनोमीलनातून मिळाली आणि दुसरी भेट त्यांचं अतीव प्रेम असलेल्या मुंबईतल्या मराठी माणसांनी दिली… मराठी बाणा अजून शाबूत आहे, मराठी कणा अजून ताठ आहे, हे पाहून त्यांना किती आनंद झाला असेल!
