• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

शपथ घ्या! चुकणार नाही, मुकणार नाही!

marmik by marmik
January 22, 2026
in मर्मभेद
0
शपथ घ्या! चुकणार नाही, मुकणार नाही!

मार्मिकच्या या अंकावरची तारीख आहे १७ जानेवारी, म्हणजे मतमोजणी झाल्याच्या दुसर्‍या दिवशीची. पण, तो तुमच्या हातात येतो आहे १५ जानेवारी रोजी, म्हणजे मतदानाच्या दिवशी. आज मुंबईच्या, महाराष्ट्राच्या, मराठी अस्मितेच्या दृष्टीने महत्त्वाचा दिवस. आज मतदान करताना आपण काय लक्षात ठेवायचं?

शिवतीर्थावरच्या विराट संयुक्त सभेत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या बंधुद्वयाने आपल्याला कळकळीने सांगितलं आहे की मुंबईवरचा मराठी ठसा टिकवायचा असेल, आपल्याच राज्याच्या राजधानीत आश्रित बनून राहायचं नसेल, तर या वेळी मतदानात चुकू नका. चुकाल तर मुंबईवरच्या अधिकाराला कायमचे मुकाल! मुंबईच कशाला, संपूर्ण महाराष्ट्रातच हे लागू आहे. राज ठाकरे म्हणाले की जमीन आणि भाषा यांना मुकलात की विषय संपला! आजचे सत्ताधारी असे आहेत की ते हा विषय कायमचा संपवून टाकू शकतात. या निवडणुकांनंतर महाराष्ट्राचे तीन तुकडे करण्याचा त्यांचा मनसुबा आहे, अशा बातम्या आतल्या गोटातून दिल्या जात आहेत. त्यामुळे, मतदानाचा दिवस वैर्‍याचा ठरू देऊन चालणार नाही. कोणत्याही धर्मांध, विषारी, विखारी, समाजात आगी लावणार्‍या प्रचाराला बळी पडून किंवा चार वस्तू, एखादं पाकीट यांनी मिंधे होऊन मतदान कराल, तर आपणहून मुंबई आणि महाराष्ट्र अशा सत्तामदांधांच्या हाती स्वाधीन कराल, जे मराठीचे द्वेष्टे आहेत, महाराष्ट्राचे द्वेष्टे आहेत. ज्यांना महाराष्ट्राचे तुकडे तुकडे करायचे आहेत आणि ते आपल्या लाडक्या मालकांना बहाल करायचे आहेत… लाडकी बहीण, लाडके भाऊ, लाडके दाजी… हे सगळं झूट! तुम्हाला अन्नाला मोताद करून हे मेवाभाऊ सगळा देश मालकाच्या घशात दोन्ही हातांनी कसा भरतायत, हे राज ठाकरे यांनी एका नकाशातून दाखवून दिलं ना? अजून उघडले नाहीत का डोळे? आता काय खाचा झाल्यावर उघडणार आहेत? मग उपयोग तरी काय त्यांचा?

जरा आठवा. मुंबईचा महापौर हिंदू असेल, असं सांगितलं ना यांनी प्रचाराच्या सुरुवातीला? मुंबईचा महापौर मराठी असेल, असं का सांगितलं नाही? मराठी हिंदू ही ओळख यांना मान्य नाही का? या हुशारीमुळे मराठी जनमानसाचा दणका बसेल, असं लक्षात आल्यावर मग मुंबईचा महापौर मराठी असेल, अशी दुरुस्ती करायला लागलीच ना! हा दोन ठाकरे एकत्र आल्याचा परिणाम होता, मराठी शक्ती एकवटते आहे, हे दिसल्याचा परिणाम होता. कोणतरी टिल्लू टॉम आलटून पालटून ठाकरेंना कोण विचारतो, संपले मुंबईतून ठाकरे, वगैरे तुरतुर्‍या सोडत असतात. अशांच्या पेकाटात लाथ घालण्याचं काम जागरूक मतदार म्हणून आपल्याला करायला लागणार आहे.
मुळात एक विचार करा, या निवडणुकीत कोण कुणाविरुद्ध लढतंय? महायुती एकत्र आहे? रोज येता जाता एकमेकांचे कपडे फेडतायत, कोण कुणाचा टांगा पलटी करायला निघालाय, कोण ‘हा भ्रष्टाचार मला पाहवत नाही’ असे नक्राश्रू ढाळतोय, मारामार्‍या, खुनाखुनी, उमेदवार पळवापळवी यांना ऊत आलेला आहे. हे सत्तेतले भागीदार आहेत? यांच्या हाती तुम्ही राज्य सोपवलेलं आहे? हे कसा कारभार करत असतील आणि कशासाठी करत असतील? काय अजब घर आहे हे? कमळीचे दोन दादले कमळीवरून भांडत नाहीत, कधी कमळीशी भांडतायत, कधी एकमेकांशी भांडतायत, गचांड्या धरतायत, झिंज्या उपटतायत!
कोकणातला एक ढकूण ठाकरेंकडे सत्ता आली तर मुंबईचा महापौर मुसलमान होईल हो, अशी बांग ठोकतो आहे. मुंबईत मुस्लिमांचा ठाकरेंना पाठिंबा आहेच. राष्ट्रप्रेमी मुसलमान आमचेच आहेत, असं बाळासाहेबांनीही कायम छातीठोकपणे सांगितलं होतं. लोकांमध्ये अकारण मुस्लिमद्वेष पेरायचा आणि आतून एमआयएमबरोबर छुपी किंवा उघड युती करायची, असले यांचे धंदे! यांचे प्रदेशाध्यक्ष, आपण कोण, आपली योग्यता काय, याचा विचार न करता लातूरमध्ये जाऊन स्व. विलासराव देशमुखांच्या आठवणी पुसून टाकण्याच्या गोष्टी करत होते. तिकडे असे काही थोबडले लोकांनी की बिनशर्त माफी मागायची वेळ आली. तेच नंतर इम्तियाज जलील यांच्या पाया पडताना दिसले सगळ्या महाराष्ट्राला! अरे, ज्यांचा कोथळा बाहेर काढण्याच्या गोष्टी करता, त्यांच्या सर्वांदेखत पाया पडता, खासगीत पाय चेपूनही देता का? ढोंगं करावीत किती? आता तो छोटा ढकूण कुठल्या मदरशात गेला आहे कलमा पढायला?

मुस्लिम असतील, अन्यप्रांतीय असतील, एकदा मुंबईत आला, इथे राहिला की मुंबईकर झाला, अशी शिवसेनेची विशाल दृष्टी कायमच राहिली आहे. महाराष्ट्रात, मुंबईत मराठी माणसाचा, भाषेचा, त्याच्या अस्मितेचा सन्मान झालाच पाहिजे, हा शिवसेनेचा आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचाही प्रखर आग्रह राहिलेला आहे. त्यात चुकीचे काय आहे? आदित्य ठाकरे यांनी शिवतीर्थावर चैतन्य निर्माण करणारं जबरदस्त भाषण केलं, ते ऐका जरा नीट. शिवसेना सत्तेत असते तेव्हा सर्व मुंबईकरांना ‘नागरिक’ म्हणून वागवते. इथल्या दवाखान्यात मोफत उपचार करताना मराठी-अमराठी भेदभाव होतो का? पालिकेच्या शाळेत प्रवेश देताना तू मराठी आहेस, तर तुला प्राधान्य, बाकीच्यांना बघू नंतर, असं केलं जातं का? बेस्टच्या बसमध्ये मराठी माणसाला दोन रुपये तिकीट आणि इतरांना दहा रुपये तिकीट असं काही केलं गेलं आहे का? महाराष्ट्राचा सन्मान राखा, ज्या राज्यात, ज्या शहरात जगायला आलेले आहोत, पोट भरायला आलेले आहात, कामधंदा करायला आलेले आहात, त्या प्रांताचा सन्मान राखा. इथली संस्कृती स्वीकारा-न स्वीकारा; पण तुमची संस्कृती लादू नका, हेही मराठी माणसाने म्हणायचं नाही. आपलीच मोरी आणि… असो.

स्वत:ला प्रतिचाणक्य वगैरे समजणार्‍या भाजपच्या इथल्या नेत्यांनी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून हिंदीसक्तीचं पिल्लू सोडून दिलं. त्यांना वाटलं होतं की आता मराठी अमराठी फूट पडेल, अमराठी मतं तर आपलीच आहेत. मग ठाकरेंना मुंबईतून कायमचं संपवून टाकण्याचं स्वप्न पूर्ण होईल. तुमच्या सात नव्हे, सातशे पिढ्या आणि पितरही उतरले आकाशातून, तरी ते शक्य नाही. शिवसेना तुमच्यासारखी इकडचा तिकडचा कचरा गोळा करून फुगलेली बेडकी नाही- बाळासाहेबांशी, ठाकरेंशी, महाराष्ट्राशी, मराठीशी नाळ जोडलेल्या सैनिकांना स्फुरण देणारा वाघ आहे हा! मराठी माणसाची भक्कम एकजूट तर ठाकरे बंधूंमागे आहेच, पण स्वत:ला मुंबईकर किंवा मराठी माणूस म्हणवून घेणार्‍या अन्यभाषिकांनाही माहिती आहे की ठाकरे शब्द देतात, तेव्हा ते करून दाखवतात.
त्यामुळे आपणही शपथ घ्या, आज मतदान करताना चुकणार नाही आणि महाराष्ट्रावरच्या, मुंबईवरच्या अधिकाराला, शिवशक्तीच्या कल्याणकारी शासनाला मुकणार नाही!

Previous Post

यातला एक निवडायचा आहे…

Next Post

रोखठोक, सडेतोड आणि खणखणीत

Next Post
रोखठोक, सडेतोड आणि खणखणीत

रोखठोक, सडेतोड आणि खणखणीत

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.