
देवेंद्र फडणवीस
निवडणुका कशा असाव्या
आदर्श आम्ही घालून दिला
लोकशाहीला वरवंट्याने
चेचून तिचा भुगा केला

बिनविरोधच्या वस्तर्याने
लोकशाहीची भादरली मी
कसले मतदान, कसली जनता
ऊबदार चादर पांघरली मी
झोडा फोडा राज्य करा
मुळीच लाज बाळगू नका
हाच मंत्र मनी जपून
सत्तेचा मी घेतो मुका
एकनाथ शिंदे
गद्दारांच्या सरदाराला
मुळीच नसते कसली भीती
सत्तेच्या या लोभापायी
तोडून टाकली सगळी नाती
आमचा वापर करून भाजपा
आम्हालाच देई टांग
महायुती नावापुरती
संपवते ती आमची गँग
आताच्या या निवडणुकीत
कुणाचा गेम ठरेल सरस
आम्ही बसलो हात चोळत
गद्दार-गाणी गात सुरस
अजित पवार
काकांशिवाय मला कुणाची
आता मुळीच गरज नाही
साधायचे ते साधून झाले
काकाच माझे बाबा-आई

आमची वादळे आणि भांडणे
पेल्यातीलच असतात नेहमी
घड्याळाचे काटे बघूनच
तुतारीही वाजवतो मी
झाले आहे आमचे काम
महायुतीला राम राम राम
तरी का फुटलाय अंगाला या
दरदरून हा आत्ता घाम
जनता
जगात कुणी अशी निवडणूक
केव्हा कधीच पाहिली नाही
धनदांडग्या मुजोरांची
एवढी गुर्मी साहिली नाही

वखवखलेल्या भाजपाने
लोकशाहीचे तोडले लचके
तरीही यांचे पोट रिकामे
बोट चाटत मारती भुरके
लांडीलबाडी करून आता
निवडणुकाही जिंकता येतात
जेव्हा त्यांना कळून चुकते
जनतेचीही मेंढरे होतात
अमित शहा
मुंबईला या गिळण्यासाठी
सगळी शक्ती लावू पणाला
लवकर तिचा गुजरात करून
आमची पॉवर दावू जगाला
मुंबईकर तर केव्हा गेला
ठाणे-कल्याण-डोंबिवली पार
उरला सुरला तोही जाईल
मग तर मुंबई आमचीच यार

अजिबात शिल्लक नाही राहणार
मुंबईकरांचे नामोनिशाण
अशीच पावले टाकू आम्ही
स्वप्न आमचे आहे महान
