काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्यासंदर्भात बरेच लिखाण प्रसिद्ध झाले आहे. परंतु काही गोष्टी पुढे आणणे आवश्यक वाटते.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे १९९५ ते १९९९ या काळात महाराष्ट्रातील शिवसेना भाजप युतीच्या शिवशाही सरकारचे रिमोट कंट्रोल म्हणून ओळखले जात. शिवसेना नेते मनोहर जोशी हे मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे हे उपमुख्यमंत्री म्हणून कार्यरत होते. अभिनेते नाना पाटेकर हे प्रिन्सिपॉल मनोहर जोशी यांचे विद्यार्थी. या नात्याने जोशी पाटेकर यांचे घनिष्ठ संबंध. सुरेश कलमाडी आणि नाना पाटेकर यांची मैत्री होती. राज्यसभेसाठी कलमाडी यांना अपक्ष म्हणून निवडणूक लढवायची होती. यासाठी शिवसेनाप्रमुखांचे मन वळविणे महत्त्वाचे होते.
मनोहर जोशी हे राजकारणातील चाणक्य. नाना पाटेकर हे मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी मनोहर जोशी सरांना भेटायला आले. मी सामनासाठी मंत्रालय आणि विधिमंडळ प्रतिनिधी या नात्याने हे वृत्त घेण्यासाठी वर्षा बंगल्यावर पोहोचलो होतो. नाना सरांना भेटून बाहेर येताच आम्ही पत्रकारांनी त्यांना घेरले. नानांनी स्पष्टपणे सांगितले की कलमाडी राज्यसभेसाठी अर्ज भरणार आहेत, त्यांना शिवसेना भाजप युतीचा पाठिंबा हवा असल्याने मी सरांकडे रदबदली करायला आलो होतो.
झाले. मनोहर जोशी, गोपीनाथ मुंडे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे मन वळविले. बाळासाहेबांनी जोशी-मुंडे यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेऊन कलमाडी यांना पाठिंबा देण्याचे जाहीर केले. या पत्रकार परिषदेत बाळासाहेबांनी परखडपणे सांगितले की, आम्ही दिलाय खरा कलमाडींना पाठिंबा पण हा बेडूक टुण्णकन उडी मारुन पलिकडे गेला तर काय घ्या! दलबदलूंच्या राजकारणावर हा बाळासाहेबांच्या खास शैलीतील तडाखा होता.
सुरेश कलमाडी हे रेल्वे राज्यमंत्री असतांना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना मानणार्या सर्वांनाच धक्का दिला. ब्रिटिशांच्या काळात बोरीबंदर ते ठाणे ही सर्वात पहिली रेल्वेगाडी सुरू करण्यात जगन्नाथ शंकरशेठ उर्फ नाना शंकरशेठ यांचा महत्त्वाचा वाटा होता. म्हणून शिवसेनाप्रमुखांंच्या मनात बोरीबंदर म्हणजे व्हिक्टोरिया टर्मिनस या मध्य रेल्वेच्या मुख्य स्थानकाला जगन्नाथ शंकरशेठ यांचे नाव देण्यात यावे, असे होते. परंतु रेल्वे राज्यमंत्री सुरेश कलमाडी यांनी व्हिक्टोरिया टर्मिनस या स्थानकाला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्याचा निर्णय त्यांनी मार्च १९९६मध्ये घेतला. त्या काळात पी.व्ही. नरसिंह राव हे पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळात सुरेश कलमाडी हे रेल्वे राज्यमंत्री होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाला सर्वांचीच संमती मिळाली. नंतर मुंबई सेंट्रल या पश्चिम रेल्वेच्या मुख्य स्थानकाला जगन्नाथ शंकरशेठ यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली. या मागणीसाठी शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत, संजय राऊत, अनिल देसाई यांच्यापासून अनेकांनी संसदेत आवाज उठविला. परंतु केंद्र सरकारकडून अद्याप नाना शंकरशेठ यांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही. निवडणुका समोर दिसताच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देणारे सरकार केव्हा निर्णय घेणार हे त्यांचे त्यांनाच माहीत.
(लेखक ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आहेत).

