बाळासाहेबांच्या कुंचल्यातून उतरलेलं हे मुखपृष्ठचित्र आहे ८ डिसेंबर १९६३ या तारखेचं. संदर्भ आहे गोव्याच्या निवडणुकीचा. गोवा महाराष्ट्रात असावा, असा विचार असलेल्या संयुक्त महाराष्ट्रवादी उमेदवारांनाच मतदान करू या, असं इथे कोंकणी आणि मराठी या भाषाभगिनी ठरवत आहेत, असं चित्रण बाळासाहेबांनी केलं आहे. वास्तवात गोवा महाराष्ट्रात विलीन झाला नाही, पण त्या पक्षावर महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाची सत्ता बराच काळ राहिली. या चित्राची आठवण होते आज मतदान होत असलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने. या निवडणुकीच्या काही महिने आधी महाराष्ट्रात हिंदीसक्तीचा कसल्याच अग्रक्रमावर नसलेला विषय राज्य सरकारने काढला तो मराठी आणि अन्यभाषिक यांच्यात फूट पाडण्यासाठी. मराठीवादी शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे पक्ष या निवडणुकीत एकटे पडतील, एकमेकांमध्ये लढतील आणि हरतील, ही सत्ताधार्यांच्या अकलेची झेप. त्यांना धोबीपछाड देऊन उभय ठाकरे बंधू एकत्र आले आणि त्यांनी यांचा डाव उलटवला. शिवाय सत्ताधार्यांच्या एक लक्षात येत नाही की महाराष्ट्रात मराठीचा वरचष्मा असला पाहिजे, ही ठाकरेंची नॉन-निगोशिएबल भूमिका असली तर अन्यभाषिकांनी महाराष्ट्रात, मुंबईत येताच कामा नये, इथे राहताच कामा नये, ते मुंबईकर नाहीत, असा काही आततायी आग्रह कोणत्याही ठाकरेंनी धरलेला नाही. जो मुंबईचा झाला, तो आपला झाला, जो मराठीचा आदर करतो, तो मराठीच, अशी शिवसेनेची भूमिका आहे. त्यामुळे, अनेक अन्यप्रांतीय मतदारही ‘मुंबईत ठाकरेच असले पाहिजेत’ असं ठामपणे सांगतात. या निवडणुकीत फक्त मराठीजन ठाकरेंना मतदान करतील, या भ्रमातून बाहेर या. मराठी आणि अन्य भाषाभगिनी मिळून मुंबईचं, मुंबईकरांचं भलं करण्याची इच्छा आणि क्षमता असलेल्या ठाकरेंच्या शिवशक्तीलाच मत देतील, हे लक्षात ठेवा.

