बांगलादेशामध्ये होत असलेल्या हिंदूंवरील अत्याचार आणि हत्येच्या घटनांमुळे दोन्ही देशांमधील वातावरण तापलं आहे. क्रिकेट हा दोन्ही देशांचा प्राणवायू. सध्या याच व्यासपीठावर बांगलादेशानं भारताला आव्हान द्यायला सुरुवात केलीय. पण त्याचा त्यांच्यावरच उलटा परिणाम होत आहे. आंतरिक सत्तास्पर्धेत होरपळणार्या बांगलादेशाला भारताशी घेतलेला पंगा परवडणारा नाही…
आशियातले तसे बरेच देश अस्वस्थ, आंतरिक बंडाळीनं पोखरलेले. तेथील अंतर्गत लढाया या रक्तरंजित आणि इतिहासाची नवी पानं लिहिणार्या. बांगलादेशाचीसुद्धा एक कलंकित आशियाई देश म्हणून गणना होते. बांगलादेशाचं राजकारण हे गेली अनेक दशकं अवामी लीगच्या शेख हसिना आणि बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीच्या खलिदा झिया या दोन बेगमांनी व्यापलेलं होतं. म्हणूनच या
सत्तास्पर्धेला ‘बॅटल ऑफ बेगम्स’ म्हटलं जायचं. जुलै २०२४मध्ये विद्यार्थ्यांचं रक्तरंजित आंदोलन झालं. त्यामुळे राष्ट्राध्यक्ष शेख हसिना यांचा विरोध वाढत गेला आणि त्यांनी बांगलादेशामधून पलायन केलं. पण भारतानं त्यांना आश्रय दिल्यामुळे बांगलादेशी जनतेचा द्वेष खदखदत आहे. ३० डिसेंबर २०२५ या दिवशी त्यांच्या प्रतिस्पर्धी खालिदा यांचं निधन झालं. त्यामुळे बांगलादेशाची आगामी सार्वत्रिक निवडणूक ही बेगमांमधील द्वंद्वाविना होत असेल. पण गेल्या दोन वर्षांत लष्करी नियंत्रण मिळवणार्या नव्या सत्ताधीशांनी इस्लामी राष्ट्रीयत्व आणि भारतविरोधी भावना या बांगलादेशात प्रक्षुब्ध केल्या आहेत.
क्रिकेटपुरता विचार करायचा झाल्यास पाकिस्तानच्या पावलांवर पाऊल ठेवत बांगलादेशानं भारताशी उघडपणे आव्हान द्यायला सुरुवात केलीय. क्रिकेटमध्ये ‘बिग-थ्री’ या वर्चस्वसूत्राचं नेतृत्व करणार्या भारताशी घेतलेला पंगा बांगलादेशासाठी धोकादायक ठरतोय. या दुष्टचक्रात ते अडकले जातायत. बांगलादेश क्रिकेटला ते हानीकारक ठरेल, असा इशारा देणार्या माजी कर्णधार तमीम इक्बालला काहींनी देशद्रोही ठरवलं आणि ‘भारतीय एजंट’ असा शिक्का मारला; परंतु काही माजी क्रिकेटपटूंनी इक्बालची पाठराखणही केलीय.
बांगलादेश म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळात अखंड हिंदुस्थानाचाच एक भाग. त्यामुळे भारतीय संस्कृती आणि परंपरा हेच त्यांचं मूळ. १९७१मध्ये पूर्व आणि पश्चिम पाकिस्तानमधील दुफळीनंतर आणखी एक राष्ट्र जन्माला आलं, तोच हा बांगलादेश. या देशाच्या निर्मितीसाठी जी क्रांती झाली, त्यात भारतीय पाठबळाचं महत्त्वाचं योगदान होतं. कोलकातापासून जवळ आणि बंगाली भाषा यामुळे सुरुवातीच्या काळात तेथे फुटबॉल मोठ्या प्रमाणात खेळला जायचा. पण कालांतरानं फुटबॉलला मागे टाकून क्रिकेट हा खेळ तेथील जनमानसात उत्तमपणे रुजला आणि लोकप्रिय झाला. यालाही भारताचा शेजार हेच कारण. १९९९मध्ये बांगलादेश पहिल्यांदा एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धा खेळला. मग त्यांना कसोटी क्रिकेटचा दर्जाही मिळाला. भारत, पाकिस्तान आणि श्रीलंका या तीन आशियाई देशांनी मागच्याच शतकात विश्वचषक उंचावण्याची किमया साधली; पण या स्पर्धेत बांगलादेशाची वाटचाल अतिशय कूर्मगतीनं चालू होती आणि आहे. २०१५च्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेची उपांत्य फेरी आणि २०१७च्या आयसीसी चॅम्पियन्स करंडक स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठून बांगलादेशानं क्वचितच अचंबित केलं.
राहुल द्रविडच्या नेतृत्व कारकीर्दीतील सर्वात वाईट क्षण बांगलादेशाशी संबंधित आहे. २००७च्या एकदिवसीय विश्वचषकामधील पहिल्याच लढतीत बांगलादेशाकडून पत्करलेल्या पराभवामुळे पुढे साखळीतच गारद होण्याची नामुष्की भारतावर ओढवली. त्यानंतर २०१८मध्ये श्रीलंकेत झालेली निदाहास करंडक क्रिकेट स्पर्धा आणि मैदानावर अवतरलेले असंख्य ‘बांगला नाग’ आठवतायत. म्हणजे प्रत्यक्षात नाग आलेले नव्हते. ती घटना अशी की, बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यातील उपांत्य सामन्यात श्रीलंकेचे आव्हान पेलताना बांगलादेशाला शेवटच्या षटकात १२ धावांची आवश्यकता होती. पण ईसुरू उडानाचे दोन खांद्याच्या उंचीवरील चेंडू पंचांनी नोबॉल ठरवले नाहीत. त्यामुळे मैदान तापलं. प्रेक्षक भडकले आणि कर्णधार शाकीब उल हसननं थेट दोन्ही खेळाडूंना माघारी येण्याचं फर्मान काढलं. जर शाकीब आपल्या निर्णयावर कायम राहिला असता तर बांगलादेश थेट स्पर्धेबाहेर आणि श्रीलंका अंतिम फेरीत पोहोचणार होते. पण शाकीबचा राग शांत झाला आणि खेळ पुढे सुरू झाला. मग इरेला पेटलेल्या बांगला खेळाडूंनी एक चेंडू राखून विजय साकारला. नंतर बांगलादेशाच्या खेळाडूंनी मैदानावर नागीण नृत्य करून श्रीलंकेच्या खेळाडूंना हिणवलं. पुढे बांगलादेशाची अंतिम सामन्यात भारताशी गाठ पडली. हा सामनाही अखेरपर्यंत रंगला. दिनेश कार्तिकनं शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकून भारताला अनपेक्षित विजय मिळवून दिला. त्यामुळे बांगला खेळाडू आणि चाहत्यांच्या नागीण नृत्यावर विरजण पडलं. पण यावेळी भारतानं बांगलादेशाला हरवलं म्हणून यजमान श्रीलंकेच्या प्रेक्षकांनी नागीण नृत्यावर ठेका धरला.
क्रिकेटमधील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंमध्ये शाकीब अल हसनची गणना केली जाते. शाकीबसह असंख्य बांगलादेशी खेळाडूंनी ‘आयपीएल’ ट्वेंटी-२० लीग गाजवलीय. त्यांनी ‘आयसीसी’चे काही पुरस्कारही मिळवलेत. त्यांच्या १९ वर्षांखालील संघानं विश्वचषकही जिंकलाय.
हा झाला बांगलादेशाचा क्रिकेट इतिहास. परंतु गेल्या काही वर्षांत ‘आयपीएल’मध्ये बांगलादेशाच्या क्रिकेटपटूंना ओहोटी लागलीय. गेल्या वर्षी वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रहमान हा एकमेव बांगलादेशी खेळाडू ‘आयपीएल’मध्ये खेळला, तेही फक्त तीन सामने. आगामी ‘आयपीएल’साठी झालेल्या लिलावात ७ बांगलादेशी खेळाडूंची नावं होती. परंतु प्रत्यक्षात फक्त मुस्तफिजूरची पुन्हा लॉटरी लागली. कोलकाता नाइट रायडर्स संघानं ९ कोटी २० लाख रुपयांची बोली लावून त्याला संघात स्थान दिलं. पण नेमक्या याच कालखंडात झालेल्या हिंदूंची हत्या आणि त्यांच्यावरचे अत्याचार यामुळे वातावरण तापलं. परिणामी बांगलादेशी मुस्तफिजूर नको, असा आवाज भारतात दुमदुमला. कोलकाता नाइट रायडर्स आणि त्याचा मालक शाहरुख खान यांना जबाबदार धरण्यात आलं. मुस्तफिजूरला कोलकाता नाइट रायडर्सनं काढलं तर त्याचं मानधन पूर्ण द्यावं लागलं असतं. पण बांगलादेश क्रिकेट मंडळ किंवा भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (बीसीसीआय) मुस्तफिजूरला न खेळण्याचे निर्देश दिले, तरच कोलकाता संघाला हा भुर्दंड बसणार नव्हता. हे प्रकरण चिघळतंय हे लक्षात येताच केंद्र शासनाच्या आदेशानुसार ‘बीसीसीआय’नं मुस्तफिजूरला स्पर्धेबाहेर करण्याचा निर्णय घेतला. त्याला प्रत्युत्तर म्हणून बांगलादेश क्रिकेट मंडळानं त्यांच्या देशात ‘आयपीएल’ प्रसारणावर बंदी घातली. तसंच सुरक्षेच्या कारणास्तव काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या ट्वेंटी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतले आपल्या संघाचे सामने भारतातून हलवावेत, अशी मागणी बांगलादेशानं केली. यासाठी पाकिस्तानचे सामने श्रीलंकेत होणार असल्याचे आणि पाकिस्तानमधील चॅम्पियन्स करंडक स्पर्धेचे भारताचे सामने दुबईत झाले होते, याचे दाखले दिले गेले. पण आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (आयसीसी) शिष्टमंडळ पाठवून बांगलादेशाचे सामने भारतातच होणार असल्याचा निर्वाळा दिला. त्यामुळेच बांगलादेशापुढे आता निमूटपणे स्पर्धेत खेळावं किंवा माघार घ्यावी, असे दोनच पर्याय उरलेले आहेत.
बांगलादेशानं माघार घेतल्यास ते काही क्रीडा क्षेत्रात प्रथमच होणार नाही. विश्वचषक क्रिकेट स्पर्धा, ऑलिम्पिक, ‘फिफा’ विश्वचषक फुटबॉल अशा अनेक स्पर्धांना त्याचा फटका बसलेला आहे. ‘आयसीसी’चं ८० टक्के अर्थकारण पाहणार्या भारताशी घेतलेला पंगा बांगलादेशला महागात पडू लागलाय. कारण या घटनांचे पडसाद म्हणून बांगलादेश क्रिकेटच्या आर्थिक कोंडीला प्रारंभ झालाय. भारतातील पुरस्कर्त्यांनी बांगलादेशामधील खेळाडूंशी असलेले वैयक्तिक करार रद्द करायला सुरुवात केलीय. लिटन दास, मोमिनुल हक यांच्याशी एसजी बॅट कंपनीनं फारकत घेतलीय. मुशफिकर रहीम, शब्बीर रहमान आणि नासिर होसेन यांचे सरीन स्पोर्ट्स इंडस्ट्रीजशी असलेले करार संपुष्टात येण्याची चिन्हे आहेत. राजकीय वैमनस्यामुळे पाकिस्तानी खेळाडूंवर ‘आयपीएल’मध्ये बंदी आहे. २०२३पर्यंत पाकिस्तान विश्वचषकाच्या निमित्तानं तरी भारतात यायचा. पण यापुढे तो येणार नाही. बांगलादेशावरील ‘आयपीएल’ बंदीही यावर्षीपासून लागू होईल. द्विराष्ट्रीय दौरेही स्थगित होतील. आशिया चषक स्पर्धा यापुढे संयुक्त अरब अमिरातीतच खेळवावी लागेल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे स्थित्यंतर बांगलादेशच्या क्रिकेटसाठी पर्यायानं तेथील एकंदर क्रीडा संस्कृतीसाठी हानीकारक ठरेल. तिथले माजी खेळाडू हाच सावधगिरीचा इशारा देतायत. बांगला क्रिकेट एकंदरीतच अंधकाराकडे वाटचाल करतेय, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. किमान बेगमद्वयीच्या अस्तानंतर धुमसत्या बांगलादेशामध्ये उदयास येणार्या नव्या शासनकर्त्यांना याची जाणीव होणं गरजेची आहे.

