
अध्वर्यू आज सकाळी लवकर उठला. पटकन आवरून त्याने तयारी केली. आज तालुक्याला एमआयडीसीत कुठल्या कंपनीत इंटरव्ह्यू द्यायला जायचं आहे. तेव्हा सगळे कागदपत्रं बॅगमध्ये भरून घाईघाईने दोन घास खाऊन तो बुटाची लेस बांधून निघणार तर आईने पाठीत धपाटा घालते.
‘अर्ध्या, इथंच डिग्रीचे सर्टिफिकेट विसरला तर त्या सायबांना काय दाखवशील?’ आईनं डिग्री अर्ध्याच्या तोंडावर फेकत विचारते.
‘राहिलं का?’ अर्ध्या हवेत तरंगणारं सर्टिफिकेट पकडतो. नि बॅग पुन्हा उघडून त्यात सर्टिफिकेट ठेऊन पाठीला अडकवतो. आणि घाईने बाहेर पडतो. आज शेजारच्या वहिनी अजून घरात असाव्यात त्यामुळे टाईमपास होण्याचा प्रश्न नाही. अर्ध्या घाईने पुढे निघतो. नम्याच्या घरासमोर नम्या कामावर जाण्याच्या तयारीत उभा आहे. अर्ध्या जाऊन त्याच्या गाडीवर मागे बसतो. गाडी वेग घेते.
‘अर्ध्या काही विसरला नाहीस ना?’ नम्या अर्ध्याला प्रश्न करतो. अर्ध्या कावराबावरा होऊन डोकं खाजवतो. खरंच काही राहिलं ना? त्याला प्रश्न पडतो.
‘अर्रर्रर्र बायोडाटा विसरलो रे! रिझुम. पण मागं गेलो तर म्हातारी खेटरानं पूजा बांधील. जाऊ दे! नवीन प्रिंट कुठं काढायला जमली तर काढून घेईन,’ अर्ध्या आठवून सांगतो.
‘अरे तू मोजे पण विसरलास! बुटं घातले आणि…’ नम्या अर्ध्याला अर्ध्याचे पाय दाखवतो. अर्ध्या खजिल होऊन बघतो. तोवर ते गावाबाहेर फाट्यावर पोहोचतात. दूर धूर सोडत पळणारी बस नजरेआड गुडूप होते.
‘च्यामारी, बस पण गेली. टाइम टेबलात अर्धा तास होता जसा! मग लवकर…’ अर्ध्या बोलता बोलता विचारात पडतो.
‘यंटम! तू आकड्यात मराठी-इंग्रजी पाहिले नसतील नीट, नेहमीच्या धांदरटपणात. बस नसंल तर दुसरं कोणाला हात करून जाय. नाही तर बसशील इथंच दिसभर! चल येतो मी!’ नम्या किक मारून भणाट निघून जातो.
आता काय करायचं? फाट्यावर अर्ध्याच एकटा उभा. मागंपुढं कोणी नाही. आता गाडी भेटायची कधी? आणि इंटरव्ह्यूला पोहोचायचं कधी? हा प्रश्न अर्ध्याला पडतो. अर्ध्या उखडलेल्या रस्त्यावरचे खडीचे एक दोन बारके दगड घेतो अन् जुन्या मैलाच्या दगडाला नेम धरून मारून फेकू लागतो. त्या नादात वेशीजवळच्या मोहल्ल्यातील रफिक चाचा जवळून निघून जातात.
‘यायला हक्काची गाडी गेली!’ अर्ध्या चरफडतो.
‘आखिर तुम्हें आना है, जरा देर लगेगी।’ गाणं मोठ्याने वाजवत एक रिक्षा येते. फाट्यावर एक बाजूला दाबून लावून तिच्या आतून चंद्या उतरतो. रिक्षाच्या पुढल्या मोठ्या काचेवर रंगीत अक्षरांत सोनपरी लिहिलंय. मागच्या बाजूने ‘देख मत पगली प्यार हो जायेगा।’ ही लाइन खाली तर वर सैय्याराचं पोस्टर. पुढल्या बाजूने गोंडे लोंबलेले. चित्रविचित्र झिरमळ्या लावलेल्या.
‘मग अर्ध्या आज कुठं?’ चंद्या अर्ध्याजवळ येत विचारतो. चंद्याचे मोकार केस वाढलेले, दाढी वाढलेली. शेंडी राखलेली. त्यात अर्धं मनगटभर एक हातात धागेदोरे दुसर्या हातात कडे. गळ्यात तुळशीच्या माळा, कसल्या तरी खड्यांच्या माळा. आणि आणखी काही बाबा-बुवांच्या माळा वगैरे घातलेलं. कपाळावर भगवा टिळा. असा चंद्याचा अवतार! चंद्या वेशीच्या लायनीत राहणारा. वय अर्ध्याच्या आसपासचं. फक्त त्याचं लग्न व्हयेल. (याचंही? अवघड आहे?) पोराबाळांचा धनी!
‘इंटरव्ह्यूला चाललोय रे! पण बस थोडक्यात हुकली माझी!’ अर्ध्या उत्तर देतो. ‘ तू लगेच जाणारे का?’ अर्ध्या त्यालाच विचारतो.
‘आपलं कसं शिटा पूर्ण मिळायवर र्हातं. तेवढ्या दहा शिटा झाल्या का निघणार!!’ चंद्या कंडिशन सांगतो. तसं बी बस गेल्यावर सुनाट रस्त्यावर शिटा पूर्ण व्हायच्या कधी? आणि त्यात एखादी बस आली का आहे ती पब्लिक गाठोडं घेऊन बसमध्ये चढणार. अशा रिक्षा, जीपड्याचा उपयोग चालत्या-फिरत्या टेम्पररी शेडसारखाच पब्लिक करते. त्यात बाया-पोरी तर अर्ध्या तिकिटामुळं बसकडंच पळतात. त्यात पन्नाशीतले ढवळे बगळे साठीचं कार्ड काढून दणादण अर्ध्या तिकीटावर फिरतात. त्यामुळं सार्यांचा ओढा बसकडं. त्यामुळं खाजगी रिक्षा-जीपला धंदे आहेत कुठं?

‘मग तुला वेळ लागंल!’ अर्ध्या निराशेने बोलतो.
‘हे पहाय शिटा मिळायवर र्हातं ते! कसं? भरली का चालली. आणि आता एक तास कुठं बस आहे?’ चंद्या त्याला रियालिटी सांगतो. त्याचं हे नवं थोडंच आहे का? रोजचं टाइमटेबल त्यांना तोंड पाठ असतं. कुठली बस कव्हा येणार? कव्हा जाणार? सगळं! त्याच्यावर तर ट्रिपा ठरतात त्यांच्या! बस येण्याआधी एखादं अर्धं शीट सोडून काहीवेळा पळतात इथले रिक्षावाले! नको आहे ती लोकं बसकडं पळायला!
‘एक तास? तू तरी लवकर सोड बाबा! नाहीतर मला पोहोचायला वेळ व्हायचा!’ अर्ध्या चिंतेने बोलतो.
‘तुझ्यासाठी स्पेशल जायला देतो का २०० रुपये? जाऊ आपण?’ चंद्या त्याला ऑफर देतो नि खिशातून इमलची पुडी फोडून ती दुसर्या पुडीत टाकून हलवतो नि घश्यात ओततो. ह्या पुड्या गुटखाबंदीनंतर अगदी पन्नाशीत पोहोचल्यात, असं मागं चंद्याचं बोलला होता. मग कधी कधी दिसातून एकच ट्रिप ४००ची करणार्या चंद्याला ही चैन परवडते कशी? विचारावं का? मरू दे! हे फाटक्या तोंडाचं काहीबाही घाण बोलून बसायचं!
‘तुला दोनशे रुपये द्यायला एवढा श्रीमंत लागून गेलो का मी? इथं काँट्रॅक्ट बेसवर कामाला जातो. त्यात काय परवडतं?’ अर्ध्या विषयावरच बोलत जातो. तितक्यात गावाकडून पाठीला बॅग अडकवलेली तोंडाला स्कार्फ गुंडाळलेली एक कॉलेजवयीन पोरगी चालत येताना दिसते.
‘चला, चला! यायचं का? बस आताच गेली. एक तास गाडी नाही. एक शीट, एक शीट? कुठूनपण बसा, कुठंही उतरा! फक्त वीस रुपये! ओ, ताई! बसा ना!’ चंद्या अगदी त्या पोरीला गाडीपर्यंत येईस्तोवर पटवायचा प्रयत्न करतो. पण ती त्याच्याजवळ आल्यावर खुदकन हसते नि जवळच्या वस्तीकडे बोट दाखवून निघून जाते. ‘हे असं र्हातं पहाय, अर्ध्या! तू काही का होईना जॉबला आहे. आमच्यासारखं असं रस्त्यावर उभं राहवून हसू तर करून घेत नाही ना? स्वतःचं? इथं रोजच्या रोज रस्त्यात उभं राहवून वीसवीस रुपड्यांसाठी घसा खर्डावा लागतो. तव्हा दिवसात किमान एक-दोन ट्रीपा होतात. म्हणजे सरासरी आठशे रुपडे. त्यात पेट्रोलपाणी गेलं, किती उरत्या? वर हे रस्ते अशे उखडलेत. सगळी खडीच खडी! यावरून रिक्षा चालवायची म्हणजे मौत का कुंवाच! तव्हा आमच्यापेक्षा काँट्रॅक्ट बेसिसवरचे पोरं पण श्रीमंतच म्हणायचे! काय?’ बोलता बोलता चंद्या पचकन रस्त्यावरच्या फुफाट्यात थुकतो. हा तोंडात एवढा गुटखा असताना बोलला? अर्ध्या आश्चर्यानं पाहतो.
‘अरे मग पोलीस म्हणतात तसं मीटरप्रमाणे भाडं घ्यायचं…’ अर्ध्या त्याला काही समजावू पाहतो.
‘असं का? चल बस तू रिक्षात. मी मीटर टाकतो. परवडंल का तुला पहाय. महाराष्ट्रात मीटरला काय रुपये-पैशे चालूयेत निदान तुला माहित्येय का? ग्रामीण भागात लोकं शेरिंगलाच कण्हून-कुथून पैशे देतात, त्यांना नुसतं मीटर दाखवलं तरी रिक्षात कोणी बसायचं नाही. आधीच धंदे स्लॅक चालले…’ चंद्या तावातावाने बोलतो.
‘मग पोलीस का येडे…’ अर्ध्या अक्कल पाजळू लागतो.
‘ते नाही. मिनिस्ट्रीत बशेल बाबू लोकं पागल आहे. त्या चुक्ष्त्र् इथं ग्रामीण भागातले रस्ते, लोकांच्या खिशाचा अंदाज आहे कुठं? इथं आम्हाला काय मगजमारी करावा लागती त्यांना काय माहित? काही खुळ्यागत
पॉलिश्या काढित्या…’ चंद्या आवाज वाढवितो.
‘मग शीट शेअरिंग करायचं तर चार-पाचच शीट भरावा!’ अर्ध्या अक्कल उगळू बघतो.
‘हे बसवाल्यांना सांगावा! प्रवासीक्षमतेपेक्षा एकही प्रवासी जास्त भरू नये म्हणून! रेल्वेवाल्यांना पण सांगावा. आणि हां, मागं कुठली मेट्रो का मोनो रेल बंद पडली होती? ज्यादा प्रवासी भरल्यामुळं? आणि कुठलं विमान का हेलिकॉप्टर कोसळलं? जास्त प्रवासी भरले म्हणून? अश्या सरकारी परिवहन सेवेला दंड लावायला आर.टी.ओवाले घाबरत्या का? उलटे पडात्या? प्रवासी क्षमता फक्त आम्हीच पहायची? आमचीच वाहतूक बेकायदा? अरे वाळू वाहतो का आम्ही? बिना लायसनची?’ चंद्या इंजिनागत गरम होतो.
‘मग हे खाजगी वाहतुकीला अवैध वाहतूक का म्हणत्या..?’ अर्ध्या तरी पण प्रश्न विचारायची डेअरिंग करतो.
‘त्या म्हणणार्यांना म्हणा, एसटीत आमची आख्खी पोरं भरा. आम्ही टपावर बसवून लोकं वाहतो. आम्हाला नोकरीपाणी मिळंल. बोलणार्यांना आमच्या शुद्धीकरणानं थंडावा मिळंल. सरकारला खाजगी वाहतूक संपवल्याचं समाधान मिळंल. फक्त आरटीओवाल्यांना आणि पोलिसायला हफ्ते गोळा करायला नवे लोकं शोधावे लागतील. काय?’ चंद्या राग आवरत तिरकं बोलतो. तसा अर्ध्या गपगुमान पुढल्या शीटवर बसतो. एकदोन जण गावाकडून येताना पाहून चंद्या घसा खरडून आवाज देऊ लागतो.
‘चला, काका-मावशी…..’

