फॅमिली डॉक्टर म्हणून नियमित प्रॅक्टिस करणार्या आधुनिक वैद्यकाच्या तज्ज्ञाला रोज नवनवीन पेशंट भेटत असतात. त्यांच्या तपासण्यांमधून हल्लीच्या काळात कोणत्या व्याधींचा जोर आहे, तो का आहे, याचा त्यांना अंदाज येत जातो. पेशंट हमखास काय चुका करतात, त्यातून काय उद्भवतं हे दिसत जातं. फॅमिली डॉक्टर ही संस्थाच लुप्तप्राय झालेली असताना एका डॉक्टरच्या डायरीतून मिळणारं हे मार्गदर्शन अनमोल ठरू शकतं…

आजकाल दवाखान्यात नियमित थकवा, सांधेदुखी, अशक्तपणा आणि स्नायू दुखण्याच्या तक्रारी घेऊन येणार्या रुग्णांची संख्या वाढत आहे. रुग्णही हल्ली हे सगळे कोविडपश्चात परिणाम आहेत, लस घेतली म्हणून असं झालं, असं व्हॉट्सअप फॉरवर्ड ज्ञान सांगत असतात. कोविडच्या लागणीचा यात वाटा असला तरी आणखी खोलवर तपासणी केली की आणखी एक कारण कळतं… अँटासिड्सचं अतिरिक्त सेवन!
अँटासिड म्हणजे पित्तशामक औषधं.
अॅसिडिटीवरच्या गोड गोळ्या लोक लिमलेटच्या गोळ्यांसारखे येता जाता पटापट खातात आणि सिव्हियर अॅसिडिटी असलेले लोक अँटासिडच्या द्रवरूप औषधाचे घुटके मारतात. दीर्घकालीन आणि अनियंत्रित पित्तशामक औषधांच्या सेवनाचा मोठा वाटा आहे हे कशामुळे कळते?
अशा रुग्णांच्या रक्त तपासणीत फॉस्फेटची पातळी खूप कमी दिसते. याला आम्ही हायपोफॉस्फेटेमिया होणे असे म्हणतो. त्याचबरोबर या रुग्णांमध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे असंतुलन दिसते तसेच डेक्झा स्कॅन या तपासणीत हाडांची घनता प्रचंड कमी झालेली दिसते. रुग्णांना आपल्यात काही डेफिशियन्सी आहेत किंवा आवश्यक रसायनांचं असंतुलन आहे हे कळल्यावर प्रचंड आश्चर्य वाटते. ते म्हणतात की, ‘मी तर सर्व काही खातो, मला कुठलाही आजार किंवा चिवट व्याधीही नाही, मग हे कसे झाले?’

याचे मुख्य कारण असते पित्तशामक औषधांचे अतिरेकी आणि सतत सेवन. काय असतं या औषधांमध्ये? सामान्यतः या प्रकारच्या औषधांत अॅल्युमिनियम हायड्रॉक्साईट, मॅग्नेशियम हायड्रॉक्साईट किंवा कॅल्शियम कार्बोनेट यांसारखी संयुगे असतात. ही संयुगे आतड्यात फॉस्फेटशी बांधली जाऊन त्यांचे शरीरात शोषण होणेच रोखतात. परिणामी शरीरात फॉस्फेटची कमतरता निर्माण होते. फॉस्फेट हे हाडांच्या आणि स्नायूंच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे खनिज आहे. त्याची कमतरता झाली की हाडे कमकुवत होतात, ती थोड्या श्रमानेही दुखतात आणि हाड मोडण्याची शक्यता वाढते. दीर्घकालीन पित्तशामक सेवनामुळे हायपोफॉस्फेटेमिया आणि ऑस्टिओमालेशिया अर्थात हाडांचा ठिसूळपणा होतो, हे अनेक संशोधने आणि अभ्यासांतून स्पष्ट झाले आहे. एका अभ्यासानुसार सामान्य किडनी फंक्शन असलेल्या रुग्णांमध्येही अॅल्युमिनियम- मॅग्नेशियमयुक्त पित्तशामकांच्या दीर्घकालीन सेवनाने गंभीर फॉस्फेट कमतरता,
ऑस्टिओमालेशिया आणि अॅल्युमिनियमचे हाडांमध्ये संचय झाल्याचे दिसले. यातल्या एका रुग्णाने ८ वर्षांत अँटासिडच्या माध्यमातून तब्बल १८ किलो अॅल्युमिनियम घेतले होते. ज्यामुळे हाडांची घनता कमी झाली. पित्तशामक बंद करून फॉस्फेट आणि कॅल्शियमयुक्त पूरक आहार दिल्यानंतर सुधारणा झाल्याचेही आढळले. दुसर्या एका केसमध्ये मॅग्नेशियम-अॅल्युमिनियम हायड्रॉक्साईड असलेल्या मालॉक्स आणि सुक्राल्फेट या औषधांच्या संयुक्त वापराने हायपोफॉस्फेटेमिया आणि ऑस्टिओमालेशिया झाले होते. पित्तशामक बंद केल्यानंतर आणि फॉस्फेटपूरक आहार दिल्यानंतरच पेशंट पूर्ण बरा झाला. स्टॅटपर्ल्स (र्ण्ँघ्) यांच्या एका अहवालानुसार अॅल्यूमिनियम, मॅग्नेशियम किंवा कॅल्शियमयुक्त पित्तशामक फॉस्फेटशी बांधले जाऊन शोषणयोग्य नसलेले क्षार तयार करतात ज्यामुळे आतड्यातून फॉस्फेट शोषण कमी होते. यामुळे हायपोफॉस्फेटेमिया होऊन हाडांचे खनिजीकरण बिघडते. क्लिव्हलँड क्लिनिकच्या एका अभ्यासानुसार जास्त पित्तशामक सेवनाने (विशेषतः अॅल्युमिनियम युक्त) फॉस्फेट बंधनाद्वारे हायपोफॉस्फेटेमिया निर्माण करते ज्यामुळे स्नायू कमजोरी, हाड दुखणे आणि हाडे मोडण्याचा धोका वाढतो.
या औषधांच्या अतिवापराने कॅल्शियम वाढण्याचाही धोका असतो. अॅल्युमिनियमयुक्त पित्तशामकांची मुख्य यंत्रणा आतड्यात
फॉस्फेटशी बांधून त्याचे उत्सर्जन वाढवणारी असते. मात्र ती त्याच वेळी कॅल्शियम कार्बोनेटही फॉस्फेट बंधनीकरणही करते. त्यातून कॅल्शियमचे अतिरिक्त प्रमाण वाढून ‘हायपरकॅल्सेमिया’ होण्याची जोखीम जास्त असते. मॅग्नेशियमयुक्त पित्तशामकानं अतिसार होतो आणि मूत्रपिंडाचे आजार असलेल्या रुग्णांमध्ये अतिरिक्त मॅग्नेशियम वाढणे अर्थात ‘हायपरमॅग्नेसिमिया’ निर्माण करू शकतात.
प्रोटॉन पंप इन्हिबिटर्स (पीपीआय, उदा. ओमेप्रॅझोल) ही औषधे हल्ली फार लोकप्रिय आहेत. या कॅप्सूल असतात. सकाळी नाश्त्याच्या आधी एक खाल्ली तर दिवसभरात अॅसिडिटीची जाणीवच होत नाही. मात्र या औषधांच्या दीर्घकालीन वापरानेही हाड ठिसूळ होण्याचा धोका वाढतो असे पुरावे आहेत.
आपण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला हवी की म्हणजे प्रत्येक पित्तशामक गोळी किंवा औषध एकसमान नसते. मुळात आपल्या
अॅसिडिटीची कारणं वेगवेगळी असतात, त्यामुळे त्यांच्यावरची उपाययोजना वेगवेगळी असते. आपली शरीरप्रकृती, आपले आधीपासूनचे आजार यांचा विचार करून डॉक्टर वेगवेगळी औषधं देतात. मळमळ, जळजळ, करपट ढेकर, तोंडात आंबट पाणी येणे हे सगळे अॅसिडिटीचे सिम्प्टम सारखेच भासतात. पण, प्रत्येकाचे कारण वेगळे असू शकते. त्या कारणानुसार पित्तशामकाचे प्रकार निवडले जाते.
कोणकोणते प्रकार असतात अँटासिडचे, ते पाहू या.
– तोंडात विरघळणारे (चघळण्याचे) – तात्काळ आरामासाठी.
– पोटात हळू रिलीज होणारे – दीर्घकालीन नियंत्रणासाठी.
– फेस तयार करणारे (जसे जेल्युसिल)-रिफ्लक्स रोखण्यासाठी.
आपल्याला अॅसिडिटी कशामुळे झाली आहे, याचा विचार न करता रुग्ण मात्र डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय वर्षानुवर्षे डायजीनच्या गोळ्या चघळतात. मनाला येईल तेव्हा ईनो किंवा सोडा घेतात. जेल्युसिल लिक्विड किंवा मालॉक्स यांच्यासारखी औषधे घुटक्या घुटक्याने घेत राहतात. मेडिकल दुकानात ही औषधे ओव्हर दि काऊंटर, प्रिस्क्रिप्शनविना दिली जातात. अनेकदा रुग्ण अमुक औषधाने आपल्याला फरक पडत नाही, स्ट्राँग औषध द्या, असं सांगतात. त्या औषधांचा साठा करून ठेवतात. ‘साधे पित्तशामक तर आहे, त्याने आपल्याला इतर काही होणार नाही’ असा गैरसमज करून घेतात. या औषधांनी आरामही पडतो, पण तो फारच तात्पुरता असतो. त्यातून इतर व्याधी जडू शकतात.
त्यामुळेच दीर्घकालीन अॅसिडिटी झाली असेल तर मेडिकल दुकानातून औषधं आणून तीच सतत घेत राहण्याऐवजी डॉक्टरकडे जाऊन मूळ कारण समजून घ्यायला हवे. आहारातील बदल, वजन वाढ, ताणतणाव अशी अॅसिडिटीची मूळ कारणं असतात. काही वेळा इतर व्याधींसाठीच्या औषधांमुळे तात्कालिक अॅसिडिटी होऊ शकते. पण अॅसिडिटीची कारणं शोधूनच उपचार करावे लागतात. गरज पडली तर डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली या औषधांचा मर्यादित स्वरूपात वापर करावा लागतो.
माझ्या दवाखान्यात या तक्रारी घेऊन येणार्या काही रुग्णांचे पित्तशामक पूर्णपणे बंद करून त्यांना फॉस्फेट आणि कॅल्शियमची औषधे दिली आणि आहारात बदल करायला लावला. रोजच्या जेवणात दूध, ताक, हिरव्या भाज्या, नट्स यांचा समावेश करायला लावा. हे बदल केल्यानंतर काही महिन्यांत त्यांचा थकवा, अंगदुखी आणि सांधेदुखी कमी झाली अन् डेक्झा स्कॅनमध्येही सुधारणा दिसली.
आता लागलीच आपणही अँटासिड बंद करून ‘कॅल्शियम-फॉस्फेट घेऊ या का?’ असा विचार करू नका. स्वतःहून तशी औषधंही घेऊ नका. तुम्ही वर्षानुवर्षे चणे-फुटाण्याप्रमाणे पित्तशामक घेत असाल तर प्रथम ते बंद करा आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या. रक्त तपासणी, सीरम फॉस्फेट, कॅल्शियम, मॅग्नेशियम, विटामिन डी आणि डेक्झा स्कॅन करून स्थिती तपासा. कधी कधी पित्तशामक आवश्यक असले तरी त्यांचा अनियंत्रित वापर टाळा.
बाकी आम्लपित्ताच्या मूळ कारणांचा शोध घेऊन दीर्घकालीन उपचार केल्यास पोटाचे आरोग्य अबाधित राहीलच परंतू अतिरिक्त औषधांचा मारा टाळून हाडांचे आरोग्य टिकवता येईल आणि अनावश्यक गुंतागुंतीही टाळता येतील.

