□ अजित पवारांना काही संस्था स्क्रिप्ट लिहून देतात, त्यानुसार ते स्क्रिप्टचे वाचन करतात : रवींद्र चव्हाण.
■ हे कोण बोलतंय तर टेलिप्रॉम्प्टर बंद पडला तर ज्यांची बोबडी वळते, ततपप होतं आणि स्वबुद्धीने पत्रकार परिषदेत थेट प्रश्नांना उत्तरं देण्यापासून जे पळ काढतात, अशा सर्वोच्च नेत्यांच्या पक्षातले राज्य पातळीवरचे चावीचे बाहुले!
□ प्रदूषणमुक्त, सुरक्षित मुंबई घडवणार : देवेंद्र फडणवीस.
■ अहो, गैरमार्गांनी बनलेले का असेनात, मुख्यमंत्री आहात ना महाराष्ट्राचे. अडीच वर्षांचा अपवाद वगळता सलग सत्तेत आहात. तेव्हा कुणी हात बांधले होते तुमचे? महापालिकेवर तुमचीच सत्ता आहे हा सर्व काळ? त्यात मुंबई प्रदूषणयुक्त आणि असुरक्षित झाली असेल, तर तो दोष कुणाचा? पाकिस्तानचा की कोण्या ‘खान’चा?
□ पोलिस महासंचालकपदी सदानंद दाते.
■ योग्य पदावर योग्य व्यक्ती आल्याचा आनंद तर असतोच, पण त्याहून मोठा आनंद असतो तो त्या पदावरून अयोग्य व्यक्ती हटवली गेल्याचा. हे दोन्ही आनंद एकाच नियुक्तीत मिळाले म्हणायचे! फक्त त्या पाळतकर काकू आता कुठेतरी राज्यपाल वगैरे बनतील, हा एक धोका आहेच.
□ उद्धव ठाकरे भ्रष्टाचार सम्राट! : एकनाथ शिंदे.
■ काय सांगता? हे कधी कळलं? ईडीच्या ससेमिर्याच्या भीतीने कढी पातळ झाल्यावर? की ज्यांच्यावर प्रखर टीका करत होतात, त्यांच्या मांडीवर जाऊन बसल्यावर. जनाची नाही, मनाची तरी बाळगा.
□ मुंबईत हिंदू आणि मराठी महापौर बसवू : देवेंद्र फडणवीस.
■ अरेरे, मुंबईत अनाठायी ‘खान’बाजी करून ठाकरेंवर थुंकायला गेलात आणि आपलेच गाल बरबटवून घेतलेत. तेव्हा फक्त हिंदू महापौर बनवायचा होता. दोन ठाकरे एकत्र येताच ‘मराठी’ महापौर बनवू अशी दुरुस्ती करण्याची वेळ आलीच ना!
□ भाईंदरमध्ये भाजपची एमआयएमबरोबर युती… मुस्लिमबहुल भागांमध्ये उमेदवार दिलेच नाहीत.
■ एमआयएम ही भाजपची बी टीम आहे असं म्हणतात ते उगाच नाही. गंमत म्हणजे कमळीचा हा बुरखा फाडतायत, ते मिंध्यांचे आमदार… कलियुग कलियुग म्हणतात ते हेच!
□ नवी मुंबईत १११पैकी ५८ जागांवर कुटुंबकबिला, कार्यकर्ते नाराज.
■ आता कसले नाराज होताय? आता बंड केलंत तरी ते थंड करण्याची ताकद तुम्हीच या राक्षसांना दिली आहेत. तुम्ही निवडून येऊच शकणार नाही. मग उगाच फडफड कशाला? उचला आयुष्यभर सतरंज्या… करा हमाल्या… उपर्यांसाठी घाला गालिचे…
□ आरएसएसला भाजपच्या चष्म्यातून बघणं चुकीचं : मोहन भागवत.
■ तुम्ही आधी संस्थेची नीट नोंदणी करा अधिकृतपणे. सगळा कायदेशीर हिशोब ठेवा. तुमचं नेमकं खरं ध्येय काय आहे, ते सांगा. मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली, हा खेळ किती दिवस खेळणार? कधीतरी अमृतकाळातलं तुम्ही पसरवलेलं हलाहल संपेलच, मग सत्तेत येतील ते कोणत्याही चष्म्याविना नीट ‘पाहतील’ तुमच्याकडे!
□ भाजपचा डीएनए आता भाजपमध्ये राहिला नाही : लक्ष्मण हाके.
■ तो डीएनए नाही, व्हायरस आहे. परिस्थिती पाहून रंग बदलतो. ओबीसी बांधवांना याचा अनुभव लवकरच येईल. सावध राहा.
□ भाजपची राक्षसी भूक पाहावत नाही, पुण्याचे कारभारी बदलण्याची वेळ : अजितदादा पवार.
■ तुम्हा तिघांपैकी कोणाकडेही पाहिलं तर सरडा शरमून आत्महत्या करील, इतके बेमालूमपणे रंग बदलून पब्लिकला गंडवता तुम्ही हातोहात. इतकं पाहावत नाही तर पडा की युतीच्या बाहेर. मारा सत्तेला लाथ आणि मग तसं करण्याची किंमत मोजण्याची हिंमतही ठेवा. उगाच निवडणूक काळात हुलाहूल कशाला करता?
□ विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी माजी खासदार हरिभाऊ राठोड यांना धमकावले… पोलिस संरक्षण काढून घेण्याची धमकी!
■ हे स्वत:ला फार मोठे कायदेपंडित मानायला लागलेले आहेत आणि सत्तेच्या ऊबेने मस्तवाल बनले आहेत. आचारसंहिता भंग केला तरी निवडणूक आयोग आपलं कूसही वाकडं करणार नाही, अशी त्यांना खात्री आहे. त्यातून अशी भाषा आणि अशी देहबोली तयार होते. यांच्या मतदारांनी हे नीट पाहून घ्यावं.
□ वाढती स्पर्धा, दर्जाहीन संघांची भरताड यामुळे टी २० वर्ल्ड कप कुणी पाहणार नाही : अश्विनची भविष्यवाणी.
■ बाकी कुणी पाहो ना पाहो, भारतात रिकामटेकड्या क्रिकेटवेड्यांची संख्या कमी नाही, बीसीसीआयकडे जाहिरातबाजीसाठी पैशाची कमी नाही. जगात सर्वात कमी ठिकाणी खेळल्या जाणार्या या एकाच खेळात भारताला काही ओळख आहे. दबदबा आहे. त्यामुळे हे सामने इथे पाहिले जातीलच. जाहिरातदारांना तेवढंच पुरेसं आहे.
□ उत्तर भारतीयाला मिरा भाईंदरचा महापौर बनवू : कृपाशंकर सिंह.
■ याआधीही इथे मराठीद्वेष्ट्या आणि पर्युषण पर्वासाठी सगळ्या शहरातला मांसाहार सात आठ दिवस बंद करण्याचा प्रयत्न करणार्या गीता जैन या महापौर होत्याच की! त्यातूनच ही मग्रुरी तयार होते. इथल्या मराठीजनांनी मतदान करताना हे लक्षात ठेवायला हवं.
□ देशातील सर्व भाषा राष्ट्रीय; जिथे जाल तिथली भाषा बोला : मोहन भागवत.
■ ही शिकवण महाराष्ट्रात कुणाला द्यायचं कारण नाही. एक व्याख्यानमाला उत्तर भारतात सर्वत्र आयोजित करा आणि तिथे त्यांच्या किंवा त्यांना समजणार्या भाषेत हे सांगा. त्यांना जिथे पोट भरायला जाऊ तिथेही हिंदीच बोलायची सवय आहे आणि त्या राज्यातल्या लोकांनीही आपल्याशी हिंदीतच बोललं पाहिजे असा फुकटचा अहंगंड आहे.
