रविवारी दुपारी म्हावरे घ्यायला लालबागच्या मार्केटमध्ये गेलो. ताजी सुरमई पिशवीत ढकलून म्हटले जरा भारतमातापर्यंत एक चक्कर टाकावी. जमलेच तर लाडू सम्राटमधून चार बटाटा वडे पार्सल घ्यावे असा विचार करत गणेश गल्लीपर्यंत आलो आणि गर्दी दिसली. थांबलो. शिवसेना उबाठाचे उमेदवार किरण तावडे यांची ही गल्ली म्हणजे कर्मभूमी. त्यांचेच कार्यकर्ते कोंडाळे करून होते. वाटले प्रचार फेरी असेल. तर उमेदवारच प्रचार सोडून टाटा रुग्णालयात गेल्याचे समजले. चौकशी केली तेव्हा सांगितले की मंगेश चव्हाण या कार्यकर्त्यांचे कर्करोगाने निधन झालेय, त्यासाठीच किरण तेथे गेला आहे. रविवार म्हणजे प्रचाराची धामधूम हे सारे सोडून उमेदवार एका कार्यकर्त्यांसाठी धावून जातो?… कार्यकर्त्यांसाठी धावून जाण्याची ही प्रक्रियाच विजयाचा मार्ग प्रशस्त करणार का?… चर्चा तर आहे बुवा!
किरण तावडे विरुद्ध अनिल कोकिळ अशी अटीतटीची लढत या मतदारसंघात होणार हे निश्चित. कोकिळ हे शिवसेना उबाठाचे नगरसेवक. यावेळी पक्षाने तिकीट नाकारल्याने त्यांनी थेट उडी मारली ती शिवसेना (शिंदे) गटात. किरण तावडे शाखाप्रमुख, मुंबईचा राजा गणेशोत्सव मंडळाचे प्रमुख अशी राजकीय, सामाजिक जमापुंजी त्यांच्या गाठीला. त्यामुळे कोकिळ विरुद्ध तावडे ही लढाई घमासान होणार यात काहीच वाद नाही. मात्र एक गोष्ट इथे विसरून उपयोगाची नाही. ती म्हणजे, केवळ हाच मतदारसंघ नव्हे, तर दादर ते भायखळा व्हाया परळ, लालबाग, शिवडी, करीरोड, वरळी हा सगळा भाग शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. बाळासाहेब ठाकरे आणि त्यांची शिवसेना एवढेच गणित येथील जुन्या नव्या सैनिकांच्या डोक्यात फिट्ट बसलेले आहे. शिवसेना (शिंदे) आणि शिवसेना उबाठा असे दोन पक्ष राजकीय साठमारीत निर्माण झाले असले तरी पक्ष निर्माण तारखेपासून आजमितीपर्यंत एकनाथ शिंदे यांना या भागात बस्तान बसवता आलेले नाही, हेच सत्य आहे. शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे या समीकरणाची ही ताकद आहे. त्या ताकदीची कल्पना अनिल कोकिळ यांना नक्कीच आहे. म्हणूनच त्यांनी जेव्हा शिंदे गटात उडी मारली तेव्हा या मतदारसंघात संताप पहायला मिळाला. लालबागमधील एकाने तर कोकिळ यांनी दिलेली बॅग जाळून आपल्या संतापाची वाट मोकळी केली. सोशल मीडियावर त्या जाळपोळीचा व्हिडिओ पाहिला तेव्हा लक्षात आला एक अंडर करंट… कोकिळ, संताप आणि ‘बॅग’!…
या बॅगमध्येच खरी गंमत आहे. ‘त्या’ मतदाराने जाळलेली बॅग, कोकिळांची बॅग आणि निकालानंतर भरलेली बॅग… हीच तर निवडणुकीची गंमत आहे!!
कोकिळ यांनी नगरसेवक असताना मतदारसंघात कामे केली, त्यापेक्षा अधिक व्हिडिओ त्यांचे सोशल मीडियावर झळकले, असा येथील रहिवाशांचा आक्षेप आहे. जाहिरातीतून घराघरात पोहचलेले कोकिळ विरुद्ध कामाच्या माध्यमातून मनामनात पोहचलेले तावडे असा हा सामना रंगणार, असे काहींचे म्हणणे. मंडळाच्या माध्यमातून तावडे यांनी केलेल्या कामांची यादीच मग मांडली जाते. नव्या तंत्रज्ञानाची सांगड घालून गरजूंना नोकरी व्यवसाय उपलब्ध व्हावा, याकडे प्रामुख्याने लक्ष वेधले जाते. लालबाग परिसरातील सर्वच गणेशोत्सव मंडळांचे कार्यकर्ते तावडे यांच्यासाठी झपाटून कामाला लागले आहेत. त्यामुळे मतदानाचा दिवस जसा जवळ येईल तशी ही लढाई अधिकच ७० एमएम सिनेमासारखी होणार आहे. सध्यातरी कोकिळ किरणच्या ‘तावडे’त सापडले आहेत, असेच चित्र आहे. कारण उमेदवारीसाठी कोकिळ यांनी एका रात्रीत शिंदे यांच्या तंबूत जायला नको होते, हा नाराजीचा अंडर करंट कोकिळ यांच्या लक्षात आलाच नाही.
असे काहीच लक्षात न येणे, किंवा उशिरा त्याची जाणीव होणे… हीच तर निवडणुकीची गंमत आहे. तावडे यांच्या एका कार्यकर्त्याची टिप्पणी मार्मिक आहे. तो म्हणतो, भाजपच्या चित्रा वाघ यांच्या हस्ते फीत कापून प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करणार्या कोकिळ यांनी आपला सामना खर्या शिवसेनेच्या वाघाशी आहे हे लक्षात ठेवावे!..
हे असे टाळीबाज संवाद आता दोन्ही कनातीतून ऐकू येणार आहेत. कारण…हीच तर निवडणुकीची गंमत आहे!
ऐकत, बघत अर्ध्या मतदारसंघाचा फेरा कधी पूर्ण झाला कळलेच नाही. ताजी फडफडीत सुरमई तव्यावर लवकर जायला हवी… तोपर्यंत कोकिळ आणि तावडे यांना कोण किती मतदार गळाला लावणार याचा हिशेब करण्याची संधी देऊया आणि आपण मात्र सारभातावर आडवा हात मारुया… कारण… हीच तर निवडणुकीची गंमत आहे!
