वेगवान युगाचे पंख लावून नवी नाती घरापासून, भावनांपासून दूर चालली आहेत. कारण लग्न झालं असलं तरी मनं जुळता जुळत नाहीत. त्याला अनेक कारणं आहेत. नवरा-बायको यांची परस्परविरुद्ध टोकाची जीवनशैली आणि त्यातून निर्माण होणारे दोघांमधले वादळी वादविवाद. शेवट अर्थातच घटस्फोट, पुनर्विवाह- अतिच झालं तर आत्महत्याही! या विषयावरील कुटुंबप्रधान नाटके ही येतच असतात- त्यांना रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो… त्याच पार्श्वभूमीवर नव्या तंत्रज्ञानाच्या आधारे एक भन्नाट पर्याय शोधण्यात आलाय, जो ‘परफेक्ट नवरा’ म्हणून उभा राहतो आणि चक्रावून जाणं भाग पडतं. आता प्रश्न आहे की हा पर्याय ही प्रगती की अधोगती? उपाय की अपाय? हा वाद की समेट? की तडजोड की मोड? एकूणच ‘परफेक्ट’ बिघडलेल्या नवर्याला ‘परफेक्ट’ पर्याय शोधणारी बायको आणि त्यातून हादरून गेलेला अगतिक नवरोजी!- यांची ही आजच्या पिढीची नव्या वळणाची गोष्ट!
या नाटकाच्या निमित्ताने नुकत्याच घडलेल्या घटनेकडे लक्ष वेधले गेले. नवी दिल्ली येथील भारतीय तंत्रज्ञान संस्था म्हणजे ‘आयआयटी’ने एका प्रयोगशाळेत काम करणार्या शास्रज्ञाला चक्क जन्म दिलाय! हा ‘एआय’ मानवी शास्त्रज्ञांसोबत आता दिसणार आहे. जो वैज्ञानिक प्रयोगही स्वतंत्रपणे करू शकतो. याचं बारस ‘आयला’ (AILA) असं केलंय. आता बोला! उभं आयुष्य प्रयोगशाळेत खर्ची करणार्या संशोधकांपुढे हा ‘परफेक्ट’ असा शास्त्रज्ञ दिल्लीच्या प्रयोगशाळेत आज ‘इन अॅक्शन’ आहे.
आनंद आणि अपेक्षा हे पतीपत्नी. दोघेही उच्च सुशिक्षित. नवतंत्रज्ञनाशी जवळचे नाते असलेले. एका आलिशान बंगल्यात हे जोडपं गेली वर्षभर राहातेय. एक वर्ष झालं तरी पाळणा हालला नाही. त्यामुळे आनंदचे कोल्हापूरचे आईवडील सतत विचारणा करताहेत. लग्नापूर्वी प्रेमात असणारे हे दोघं आज निव्वळ वादविवादासाठी सोबत आहेत काय, असा प्रश्न पडतोय. आनंदचं घरातलं जगणं तस अघळपघळ, अव्यवस्थित तर अपेक्षा शिस्तप्रिय. वेळेला पक्की. जागची वस्तू जागीच ठेवणारी परफेक्ट! दोघांची छोट्या गोष्टीवरून भांडणे सुरुच आहेत. आनंद हा अपेक्षेवर जणू शाब्दिक अतिक्रमण करतोय. आणि अपेक्षा त्यामुळे पुरती कंटाळली आहे. तिला ऑफीसचा एक प्रोजेक्ट पूर्ण करायचाय. त्यामागे ती आहे. या दोघांच्या संवादात विसंगती आणि आता तर प्रकरण संघर्षाच्या टोकापर्यंत पोहचलाय. अपेक्षाला यातून सुटकेसाठी घटस्फोटाचा पर्याय दिसतोय. त्याची कागदपत्रेही येतात. पण आनंदला यात कुठेतरी समेट हवाय. अखेर एके दिवशी अपेक्षाच्या अपेक्षेप्रमाणे परफेक्ट शिस्तीत राहणारा एक माणूस तिला सापडतो. त्याचं वागणं, बोलणं, चालणं, कृती- हे सारंकाही या ‘चिरंजीव’मध्ये गच्च भरलेलं. तो येतो. लग्नाच्या वाढदिवसाचा बुके देतो. अभिनंदन करतो. एक परिपूर्ण ‘परफेक्ट’ पार्टनर म्हणून ती त्याचा स्वीकारही करते. दुसरीकडे आनंद मात्र उदास. तो चिरंजीवला कमी लेखण्याचा प्रयत्न करतो. पण गाणं म्हणण्यात ‘तो’ सरस ठरतो. बोलण्यात तो बाजी मारतो. तिच्या वैयक्तिक, शाररिक खाणाखुणाही तो अचूक सांगतो. विचारातही तो अपेक्षाला साथसोबत करतो. त्याचं या घरात असं अचानक येणं गूढता वाढवतं. त्याचं वागणंही तसं संशयी. परफेक्टपणाचा कळसच जसा. एखादा चमत्कारच! चिरंजीव नामक या तरुणाला घरातून बाहेर काढायचा की आता तिघांनी एकत्र राहायचं, इथपर्यंत चर्चाही होते. परफेक्ट वागेन, असं वचन देऊनही अपेक्षा आनंदवर आता विश्वास ठेवत नाही. ‘पती, पत्नी और वो’ असा डाव रंगतो.

चिरंजीवच्या आगमनामुळे वैतागलेला आनंद आता निर्णायक भूमिका घेण्याचा विचार करतो… त्यातून धक्के देत उभा राहणारा शेवट प्रत्यक्ष बघणं उत्तम. या नाट्यात तिघेच कलाकार. त्यामुळे दोन्ही अंकात त्यांचाच वावर- श्रेयस जोशीचा नवरोजी आनंद आत्मविश्वासाने सामोरा येतो. पहिल्या अंकात काहीसा लाऊड, भांडखोर वाटणारा पण दुसर्या अंकातील कलाटणीनंतर हादरून गेलेला, गोंधळलेला दिसतो. त्याची देहबोली शोभून दिसते. बायको- समृद्धी कुलकर्णी हिचं परफेक्ट जगणं भूमिकेला न्याय देणारं. आजच्या पिढीचे प्रतिनिधित्व करणारे दांपत्य म्हणून निवड अचूक आहे. जोडी ‘परफेक्ट’! या दोघांमध्ये प्रगटलेल्या चिरंजीवच्या भूमिकेत वैभव रंधवे याची संवादफेक आणि अभिनयाची समज नजरेत भरते. त्यातली कृत्रिमता, हजरजवाबी वृत्ती ही भूमिकेता उठाव देणारी ठरते. ‘युवती मना दारुण रण’ या आनंदच्या भावगीताचा सामना हा चिरंजीव ‘नाथ हा माझा’तून करतो. तर ‘फड सांभाळ…’ या लावणीला दोघेजण टाळ्यांचा प्रतिसाद मिळवितात. या दोघांना गोड तयारीचा गळा तसेच नृत्याची उत्तम समज असल्याचे जुगलबंदीतून दिसते. या तिघांची ‘टीम’ स्पर्धेतून थेट व्यावसायिकवर आली असली तरी त्यात नवखेपणा जराही नाही. ही जमेची बाजू. भविष्यात अपेक्षा वाढविणारे हे तिघे रंगकर्मी निश्चित आहेत. ऑल द बेस्ट! कोल्हापूरचे आनंदचे आई-बाबा हे फोनवरून रसिकांना भेटतात. लाफ्टर क्लबच्या कॉमेडी क्वीन वनिता खरात आणि निर्माता, दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी रंगमंचावर न प्रगटताही नुसत्या आवाजातून हजेरी लावतीय हे वेगळेपण लक्षवेधी ठरते.
या नाटकाचे कुळ अन् मूळ हे एकांकिका स्पर्धेचे आहे. नाट्य परिषदेच्या एकांकिका स्पर्धेत ही एकांकिका पुरस्कार विजेती ठरली. स्पर्धेचे परीक्षक असलेले चंद्रकांत कुलकर्णी यांनी तात्काळ पूर्ण नाटक करण्याचा प्रस्ताव दिला. आणि ज्येष्ठ नाट्य निर्माते दिलीप जाधव, श्रीपाद पद्माकर यांनी त्याला होकार देऊन नाटक दिमाखात रंगभूमीवर आणले. एकांकिका ते नाटक असा प्रवास करणार्या या नाटकात ‘टीम’ कायम ठेवली आहे. तिघे कलाकार तसेच तांत्रिक बाजू नवोदितांच्याच हाती आहे, त्यामुळे प्रवेश ट्रीटमेंट लक्ष वेधून घेते. हौशी रंगकर्मीमध्ये ओळख असणारा लेखक-दिग्दर्शक विनोद रत्ना याने एकहाती हा डोलारा उभा केलाय! ‘कुटुंब कीर्तन’ची कथा त्याची होती. त्यावर संकर्षण कर्हाडे यांनी नाटक बेतले होते. मूळ एकांकिकेचा जीव पण दोन अंकी करताना कल्पकता नजरेत भरते. पहिल्या अंकापेक्षा दुसरा अंक अधिक पकड घेतो. पहिल्या अंकातील भांडणातला तोचतोचपणा जरा संकलित केल्यास उत्तम. विषयापासून ते सादरीकरणापर्यंतचा ‘सूत्रधार’ एकच असल्याने नेमकेपणा आलाय. बदलत्या काळात विषयातील बदल हा अपरिहार्य आहे. तो कितपत स्वीकारायचा की नाकारायचा हे सर्वस्वी रसिकांच्या हाती, पण प्रगत तंत्रज्ञानाचा पर्याय या गोष्टीतून झिरपला आहे. संहितेतली भाषा, शब्द, प्रतिसाद यात चटपटीतपणा व ताजेपणा दिसतोय.

स्पर्धेपासून सोबत असल्याने व्यावसायिकवरही तांत्रिक बाजू त्याच सुरक्षित तंत्रज्ञानाच्या हाती कायम आहे. नेपथ्यकार ऋतुजा बोठे यांनी मजल्यावरली गॅलरी सुरेख उभी केलीय. त्यावरले काही महत्त्वाचे प्रसंगही आहेत. जिना, किचन, फ्लॅटफॉर्म, दिसतो. आनंद हा बायोटेक्नॉलॉजी क्षेत्रात असल्याने पानाफुलांच्या कुंड्या आहेत. रंगसंगती उत्तम. एकूणच घरात श्रीमंती थाट आणि नव्या संकल्पनेतल्या सुखसोई त्यात वापरण्यात आल्यात. त्यातून वातावरण निर्मिती पूरक ठरते. अभिप्राय कामठे याची प्रकाशयोजना तसेच कलादर्पण पुणे व वैभव टकले यांचे संगीत चांगले आहे. पूजा काळे हिने दिलेली नृत्याची तालही यात आहे. रसिकांच्या ‘मार्कशीट’मध्ये शंभरापैकी शंभर गुण मिळविण्यात यशस्वी झालेत.
काही नाटकांमूळे रंगकर्मींना ओळख मिळते. श्रेष्ठत्व सिद्ध करण्याची संधी मिळते. एके काळी भरत जाधव, केदार शिंदे यांना ‘सही रे सही’ने एका उंचीवर पोहोचविले तर संतोष पवारच्या ‘यदाकदाचित’चा करिष्मा आजही कायम आहे. देवेंद्र प्रेम याच्यासाठी ‘ऑल द बेस्ट’ बेस्ट ठरले. हे रंगकर्मी आणि त्यांची नाटके जणू काही त्यांच्या कारकिर्दीला उजळा देणारी ठरली. त्याच वाटेवरून निघालेले हे नाटक. दिग्दर्शक विनोद रत्ना आणि तीन तरुण कलाकार हे निश्चितच व्यावसायिकवर नवीन वाट सिद्ध करतील. अष्टविनायक आणि जिगीषा या अनुभवी नाटक संस्था त्यांच्यामागे भक्कमपणे उभ्या आहेत. विषय, आशय, सादरीकरण हे सबकुछ आजच्या परिस्थितीत नाट्यविषयक सुदृढपणाचे लक्षण म्हणावे लागेल.
‘लग्नबंधन ‘या विषयावर प्रशांत दळवीचं ‘चारचौघी’ नाटक आलं होतं. त्यात लग्नाशी संबंधित अनेक कंगोरे होते. स्त्रियांच्या भावभावनांवर नाट्य उभं केलेलं. आज त्यानंतर बदलत्या कालानुरूप ‘चिरंजीव’ची संहिता आहे. जी ‘मैलाचे निशाण’ म्हणून खुणावते आहे. १९९१ ते २०२६- ‘चारचौघी’ ते ‘चिरंजीव’ या कालप्रवाहात स्त्रियांच्या चष्म्यातून नवर्याला दिलेला निर्णय दोन्हीकडे दिसला. काळ बदलला. जिवंत माणसांसमोर कृत्रिम नगास नग मिळू लागला. एआय तंत्रज्ञान घरादारात पोहोचले. उभं जग जसं एका बोटावर आलं. हे बदल झाले तसेच बदल हे त्यामुळे मानवी जीवनशैलीवर झाले. त्याचे पडसाद उमटले. पर्याय प्रत्येक बाबतीत मिळू लागले.
एकीकडे नाट्यसृष्टीचा जुन्या नाटकांना नवी रंगरंगोटी करून झळाळी देण्याचा कल दिसत आहे. दुसरीकडे नव्या दमाने रंगकर्मी आजचे विषय व्यावसायिकवर आणण्याची धडपड करताहेत, जी लाखमोलाची आहे. कृत्रिम नातेसंबंधांवर खेळकर दर्शन या निर्मितीत असले तरी कथेतील हे तंत्रज्ञान मानवी भावभावनांवर एक पर्यायी उपाय म्हणून कधीही जागा घेऊ शकणार नाही. असो.
-भिडणारा विषय अन् नावीन्यपूर्ण प्रयोग बघितल्याचे समाधान ‘चिरंजीव’ निश्चितच देतंय.
चिरंजीव परफेक्ट बिघडलाय !
लेखन-दिग्दर्शन- विनोद रत्ना
नेपथ्य- ऋतुजा बोठे
संगीत-कलादर्शन, पुणे/ वैभव टकले
प्रकाश – अभिप्राय कामठे
रंगभूषा – उल्लेश खंदारे
नृत्ये – पुजा काळे
सूत्रधार – प्रणित बोडके
निर्माते – श्रीपाद पद्माकर/ दिलीप जाधव
सादरकर्ते – चंद्रकांत कुलकर्णी
निर्मिती – जिगीषा

