सायबर गुन्हेगारांचं एक हत्यार म्हणजे स्पायवेअर, नावातच स्पष्ट आहे त्यानुसार हे गुप्तहेरगिरी करणारं सॉफ्टवेअर आहे. आपल्या यंत्रणेत हे स्पायवेअर घुसवून सायबर चोरटे पासवर्ड, डेबिट-क्रेडिट कार्डचा तपशील आणि त्याचबरोबर वैयक्तिक डेटा वगैरे संवेदनशील माहिती चोरून फसवणूक करतात.
औरंगाबादमध्ये राहणार्या प्रथमेश गोडबोलेला कसा फटका बसला, त्याची गोष्ट वाचा. प्रथमेशने नुकतीच आर्थिक सेवा पुरवणारी एक छोटी कंपनी सुरू केली होती. गुंतवणूक, शेअर, म्युच्युअल फंड, विमा याबाबत गुंतवणूकदारांना तो या कंपनीच्या माध्यमातून मार्गदर्शन करत असे. प्रथमेश डिजिटल कामकाजातही प्रवीण होता. त्याला सायबर गुन्हे, त्यांचे विविध प्रकार यांची चांगली माहिती होती. त्यामुळे कंपनीतीत डेटा अधिक सुरक्षित ठेवण्यासाठी तो व्यवस्थित लक्ष द्यायचा.
एका सोमवारी तो ऑफिसात काम करत होता. त्याच्या मोबाईलवर मोहन नावाच्या एका गुंतवणूकदाराचा मेसेज आला. त्यात मोहनने लिहिले होते, मला दोन दिवसांपूर्वी एक माहिती लिंकच्या माध्यमातून आली आहे. त्यात वार्षिक गुंतवणुकीवर २० टक्क्यांच्या आसपास रिटर्न देणारी योजना सांगितली आहे. मी तुमच्याकडेच नेहमी गुंतवणूक करत असतो. त्यामुळे तुम्ही त्याची छाननी करून मला त्याबाबत मार्गदर्शन कराल का? तसे केले तर मला पुढचा निर्णय घेणे सहज शक्य होईल. त्याचबरोबर मोहनने असेही लिहिले होते की तुमच्याच क्लायंट्सपैकी विशाल नावाच्या गुंतवणूकदाराने देखील त्याबाबत मेसेज केला होता. त्यामुळे आपल्याकडे त्या नावाचा कुणी आहे का, हे पण तपासा असे त्याने लिहिले होते.
प्रथमेशने मोहनच्या मेसेजची तपासणी करताना विशाल नावाचा कोणी गुंतवणूकदार आपल्याकडे आहे का, याचीही तपासणी केली. मोहनला आलेला मेसेज प्रथमेशलाही ईमेलवरून आला होता. ई-मेल अॅड्रेस दिसत होता. त्याने त्या लिंकवर क्लिक केले आणि त्यावर लॉगिन करून ती आकर्षक योजना नेमकी काय आहे, याचा शोध घ्यायला सुरुवात केली. पण, त्याला त्या ठिकाणी काही वेगळीच माहिती असल्याचे दिसले. त्याने मोहनला फोन केला आणि अशी कोणतीच योजना नाही, काहीतरी भलतेच आहे, असे संगितले.
दरम्यानच्या काळात त्याने ज्या लिंकवर क्लिक केले होते, त्या माध्यमातून स्पायवेअरने प्रथमेशच्या संगणकात घुसखोरी केली होती. त्याने प्रत्येक कीस्ट्रोक, प्रत्येक पासवर्ड आणि त्याने केलेला प्रत्येक व्यवहार याची माहिती जमा करून ती सायबर गुन्हेगारांना पाठवण्यास सुरुवात केली होती. प्रथमेशला या गोष्टीची काहीच माहिती नव्हती. प्रथमेशच्या ग्राहकांची फसवणूक करण्याच्या उद्देशातून त्या सगळ्या माहितीचा वापर करण्यात येणार होता. याच संगणकावरून प्रथमेश ऑनलाईन आर्थिक व्यवहार करायचा, त्यामुळे त्याची माहिती देखील स्पायवेअरच्या माध्यमातून चोरीला गेली होती. यानंतर भलताच प्रकार सुरू झाला. प्रथमेशच्या ग्राहकांना फोन केले जायला लागले. प्रथमेशच्या कंपनीमधून बोलत आहोत, तुमचा एक आर्थिक व्यवहार पूर्ण करायचा आहे, त्यामधून तुमचा चांगला आर्थिक फायदा होणार आहे, तुम्हाला ओटीपी पाठवलाय, तो मला सांगा, असं ग्राहकांना सांगितलं जायचं. प्रथमेशच्या कंपनीवर विश्वास असल्यामुळे विश्वास ठेवून काही ग्राहक ओटीपी समोरच्या व्यक्तीला सांगून टाकत होते. त्यातून त्यांची आर्थिक फसवणूक केली जात होती.
लुबाडले गेलेले ग्राहक प्रथमेशला फोन करू लागले. त्याच्यावर ठपका ठेवू लागले. पोलिसांत जाण्याच्या, त्याच्याविरोधात तक्रार करण्याच्या धमक्या देऊ लागले. नेमकी त्याच वेळी तो महाराष्ट्रात असताना नोएडामध्ये त्याच्या क्रेडिट कार्डवरून खरेदी झाली होती. हादरलेल्या प्रथमेशने सायबर तज्ज्ञाची मदत घेण्याचे निश्चित केले. पोलिसांत देखील तक्रार दिली. सायबर तज्ज्ञ अमित याला प्रथमेशच्या संगणकावर स्पायवेअरचा अॅटॅक झाल्याचे कळले. त्यानंतर वेगाने चक्रं फिरवली गेली. प्रथमेशची सगळी सिस्टिम स्वच्छ केली गेली, पासवर्ड बदलले गेले. वेळेत सायबर तज्ज्ञांची मदत घेतल्यामुळे प्रथमेश या प्रकारातून सहीसलामत बाहेर पडला.
आयुष्य उद्ध्वस्त करू शकणार्या या घातक स्पायवेअरपासून बचाव करण्यासाठी प्रत्येकाने काळजी घ्यायला हवी.
अशी घ्या काळजी :
संगणकामध्ये मालवेअरपासून रिअल-टाइम संरक्षण देण्यासाठी प्रतिष्ठित अँटीव्हायरस आणि अँटी-स्पायवेअर सॉफ्टवेअरचा वापर करा. ते कायम अपडेट ठेवा.
संगणकाची ऑपरेटिंग सिस्टीम आणि सॉफ्टवेअर कायमच अपडेटेड ठेवा : तुमची ऑपरेटिंग सिस्टम, वेब ब्राउझर आणि सर्व इन्स्टॉल केलेले सॉफ्टवेअर नियमितपणे अपडेट करा. संगणकावर काम करताना सुरक्षित ब्राउझिंग सवयींचा सराव करा. फायली डाउनलोड करण्याबद्दल किंवा अज्ञात किंवा अविश्वसनीय स्त्रोतांकडून, विशेषत ईमेल किंवा संशयास्पद वेबसाइटवरील लिंकवर क्लिक करण्याबद्दल सावधगिरी बाळगा.
फायरवॉल सक्षम करा: संगणकावर येणार्या आणि जाणार्या नेटवर्कचे निरीक्षण करण्यासाठी फायरवॉलचा वापर करा. तुमच्या ऑपरेटिंग सिस्टीममध्ये समाविष्ट असलेली किंवा तृतीय-पक्ष फायरवॉल वापरा.
ई-मेलपासून सावध रहा: आपल्या परिचित नसणार्या ई-मेल उघडू नका. अज्ञात किंवा अनपेक्षित स्त्रोतांकडून आलेल्या ई-मेलमधील लिंकवर क्लिक करू नका. ई-मेल उघडण्यापूर्वी पाठवणार्या व्यक्तीची खात्री करा, त्याबद्दल काही शंका असल्यास त्याच्याबरोबर संपर्क साधून नंतरच ती मेल ओपन करा.

