‘द किरण माने शो- स्टोरी शिवराज्याभिषेकाची’ या म्युझिकल नाटकाचा ‘शिवारंभा’चा प्रयोग पाहायला कोल्हापूरच्या दिशेने निघालो, तेव्हा रवींद्र पोखरकरांना म्हणालो, नाटकांच्या, रंगमंचीय आविष्कारांच्या पहिल्या दुसर्या शोमध्ये बारीक बारीक गडबडी होत असतात. त्यामुळे सहसा प्रयोग दहा पंधरा प्रयोगांमध्ये सेट झाल्यानंतरच त्याला बोलावतात नाट्यकर्मी मंडळी. किरणने पहिल्याच शोला बोलावलं आहे… कसं होईल? पण, प्रयोग पाहिल्यानंतर हे शब्द गिळावे लागले… कड्डक वाजला प्रयोग. हा पहिला प्रयोग आहे असं वाटूच नये, इतका तो परफेक्ट झाला, रंगलाही तुफान.
दुसरी एक विलक्षण गोष्ट पाहायला मिळाली.
कोल्हापूरचे श्रीमंत शाहू छत्रपती यांच्यासह अनेक नामवंत पाहुणे या शोला अनेक शहरांमधून आले होते. शुभारंभ असल्याने बाहेरचं आवारही सजवलेलं होतं… असा सरंजाम असला की प्रयोगाची वेळ पाळली जात नाही. प्रेक्षक स्थिरावले की स्टेजवर मान्यवरांची भाषणं, दीप प्रज्वलन, कौतुकारत्या ओवाळणं हा सगळा प्रकार होतो आणि मग सावकाशीने नाटक सुरू होतं. त्यात प्रेक्षक मरगळतो… या प्रयोगाच्या कर्त्यांनी मात्र या प्रकाराला संपूर्णपणे फाटा दिला आणि सात वाजण्याची वेळ दिलेल्या नाटकाचा प्रयोग सव्वासातच्या आत सुरूही झाला…
…’स्टोरी शिवराज्याभिषेकाची’ हे काय प्रकरण आहे?
शिवराय छत्रपती झाले याची एक ढोबळ गोष्ट आपल्याला माहिती असते. काशीहून गागाभट्ट नावाचे पंडित आले. त्यांनी प्रचंड दक्षिणा घेऊन शिवरायांचा राज्याभिषेक केला. त्या वेळी राजांची तुला झाली, सोनं, नाणं, धान्य वगैरे वाटलं गेलं. रायगडावर पंचपक्वान्नांच्या पंगती झाल्या. हा सगळा एक आनंद सोहळा(च) होता, अशा प्रकारे राज्याभिषेकाची मांडणी केली जाते. त्यातून एक प्रश्न उद्भवतो… भव्य राजवाडे, शाही ऐषोआराम यांचा अजिबात सोस नसलेल्या श्रीमान योगी असलेल्या, स्वयंभू राजा असलेल्या शिवरायांनी इतका प्रचंड खर्च करून राज्याभिषेक का करून घेतला असेल?

या प्रश्नाचा माग काढला की शिवरायांचा राज्याभिषेक होऊ नये यासाठी कोणते स्वकीय सक्रिय होते, त्यांचा त्यात अडथळे आणण्यात काय हेतू होता आणि ते अडथळे शिवरायांनी कमालीच्या संयमाने का आणि कसे हाताळले, ते कसे अंतिम ध्येयाप्रत पोहोचले, त्यांचं नेमकं ध्येय काय होतं, याची कहाणी, ग्रामीण भाषेत सांगायचं, तर ‘इस्कटून’ सांगणारी ही राज्याभिषेकाची थरारक आणि रोमांचक स्टोरी आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी जीवनपटाकडे लोक आपापल्या पद्धतीने पाहतात. कोणी व्यवस्थापनाच्या अंगाने पाहतो, कोणी युद्धनीतीच्या अंगाने पाहतो, कोणी रणनीतीच्या अंगाने पाहतो, कोणी धर्माच्या अंगाने पाहतो, कोणी रयतेमध्ये भेदभाव न करणारा, कुळवाडीभूषण राजा अशा नजरेने पाहतो. धर्मनिरपेक्षतेसारख्या आधुनिक काळातल्या संकल्पनांच्या उजेडातही शिवरायांना पाहण्याचे प्रयत्न झालेले आहेतच. हे सगळे दृष्टिकोन खरंतर निरोगी आणि परस्परपूरक असू शकले असते. पण दुर्दैवाने तसं होताना दिसत नाही.
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास ‘आपल्या सोयीने’ मांडायचा आणि तोच खरा, तेच अंतिम सत्य म्हणून दामटवायचे, असा प्रकार सुरू आहे. शिवरायांची धर्मपरायण प्रतिमा अलीकडे फार ठळक केली जाते. इतिहासकार, शिवशाहीर आणि शिवव्याख्यात्यांच्या एका फळीने ठराविक घटनांची आवर्तनं करून त्याच प्रतिमेवर फोकस ठेवला आहे. त्याच अंगाने साहित्य, नाटक, सिनेमा यांची मांडणी झाली आहे.
त्याला प्रतिक्रिया म्हणून परिवर्तनवादी, बहुजनवादी चळवळीतून या प्रतिमेला छेद देणारी मांडणी उभी राहू लागली आहे. शिवराज्याभिषेकाची किरण मानेंनी सांगितलेली स्टोरी इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांच्या दुर्बीणीतून पाहिलेली आहे, हे लक्षात घ्यायला हवं. त्यातून अनेक शिक्के आणि पूर्वग्रह मनात तयार होतात. किरण माने-इंद्रजीत सावंत हे जोडसमीकरण डोक्यात ठेवून साशंक मनाने नाटक पाहायला आलेल्या प्रेक्षकांना जिथे जिथे ‘हे खरं कशावरून मानायचं’ असा प्रश्न पडू शकतोच. तो प्रश्न पाडून घेणारा एकजण शाहीर पृथ्वीराज माळी यांच्या रूपाने किरण मानेंच्या बरोबर वावरतो. प्रेक्षकांच्या वतीने तो हा प्रश्न विचारतो आणि मग माने त्याला एकेक पुरावा वाचून दाखवतात, अशी चतुर रचना नाटककार सतीश तांदळे यांनी केली आहे.

इतिहासाचा गंभीरपणे अभ्यास करणार्या मंडळींना ‘हा पुरावा का ग्राह्य धरला, तो का धरला नाही, हा अर्धवट पुरावा झाला, हा काही विश्वासार्ह पुरावा नाही’ असा अॅकॅडेमिक वादविवाद करता येईल. पण, मग अशाच प्रकारे असंख्य रसाळ वगैरे चरित्रांमधून आणि सिनेमा-नाटकांमधून इतिहासाचे सोयीस्कर टेकू घेतलेल्या निखळ कल्पनारंजनातून शिवाजी महाराज सादर झालेले आहेतच की! काही वेळा सगळेच निव्वळ कल्पनारंजन वाटावे, असे प्रचारकी प्रसंग आणि अध्यायच शिवचरित्रात बेमालूमपणे घुसडले गेले आहेत. गैरसोयीच्या घटना, उल्लेख सफाईने टाळलेही गेले आहेत. या प्रयोगात आधुनिक विचारसरणीच्या अनुषंगाने शिवकाळावर भाष्य आहे, पण, ‘पुराव्याने शाबित करता येण्याजोग्या’ परिघातच नाट्यरचना केलेली आहे, हे महत्त्वाचे.
या म्युझिकल नाटकाचा एकंदर घाट आणि थाट जबरदस्त आहे. किरण मानेंच्या रूपाने खूप काळ रंगभूमीपासून दूर राहिलेला आणि रंगमंचावर पुनरागमनासाठी आतुरलेला, नाट्यगृहातल्या जिवंत प्रतिसादाची भूक असलेला विलक्षण ताकदीचा अभिनेता मध्यवर्ती बहुरूपी भूमिकेत आहे. त्याच्यासोबत शाहिरी, कोरस, अभिनय, सामूहिक अभिनय यांच्या गरजा भागवणारा कमालीचा गुणवान, तरुण मुलांचा, ऊर्जेने भारलेला संच आहे. त्याचबरोबर सगळा वाद्यवृंद आणि त्यांचा संयोजकही मंचावरच आहे. ‘द फोक आख्यान’ आणि त्या धर्तीवरच्या अनेक कार्यक्रमांची आठवण करून देणारी ही रचना आहे. (शोमधली बहुतेक गायक-वादक मंडळी ‘जियारत’ या कोल्हापूरकरांच्या लाडक्या कार्यक्रमातलीच आहेत, असं कळलं). हे सगळे वाद्यांवर, गायनावर तुफान हुकुमत असलेले कसबी कलावंत आहेत. त्यांना समर्पक प्रकाशयोजनेची जोड आहे.
लोकनाट्याप्रमाणे एकाच ठिकाणी उभे राहून अनेक काळांमध्ये फिरणारी, डोळ्यांचं पारडं फेडणारी, क्षणभरही नजर हटणार नाही, अशी नजरबंदी करणारी मांडणी लेखक सतीश तांदळे आणि तोडी मिल फँटसी फेम दिग्दर्शक विनायक कोळगावकर यांनी केली आहे. चाबूक प्रयोग बसवला आहे दिग्दर्शकाने. इकडून तिकडे, तिकडून इकडे, या कलेतून त्या कलेत, तिच्यातून पुन्हा इकडे, या काळातून त्या काळात, हे सगळं चपखलपणे सादर होतं आणि एकजीव परिणाम करतं.
लोकसंगीताच्या, भावसंगीताच्या थाटात सादर होणारी या शोमधली गाणी हा एक स्वतंत्र विषय आहे. श्रीनाथ म्हात्रे आणि हृषिकेश देशमाने या तरुण संगीतकारांनी आधुनिक आणि शिवकालीन वाद्यांच्या सुमेळातून अप्रतिम सांगितिक खेळ बांधलेला आहे. अनेक लोकगीतांबरोबरच इथे शिवरायांवरचं रॅपही येऊन जातं, पण ते खटकत नाही. कोल्हापूरच्याच परिसरातल्या, अठरापगड जातींमधून निवडलेली गायक अभिनेत्यांची टीमही अफाट आहेत. या गाण्यांचा एक स्वतंत्र आल्बम रिलीझ व्हायला हवा. नाटक पाहणार्यांना तो पुन:प्रत्ययाचा आनंद देईल आणि हा प्रयोग न पाहिलेल्यांना त्याकडे खेचून आणेल, इतका भन्नाट प्रकार आहे.

‘द किरण माने शो’ असं नाव देऊन किरण मानेंनी दुहेरी जोखीम पत्करली आहे. एकतर शोचं भविष्यात जे काही होईल, त्याची संपूर्ण जबाबदारी आपलं नाव दिल्यावर घ्यावी लागते. शिवाय, एक वेगळा धोका संभवतो. शोमध्ये सबकुछ किरण मानेच असेल आणि बाकीच्यांना वावच नसेल, असं आत्मलुब्ध कलाकारांच्या बाबतीत घडू शकतं. मानेंनी घेतलेली पहिली जोखीम त्यांना यशच देऊन जाईल, अशी खात्री देणारा अप्रतिम परफॉर्मन्स त्यांनी सादर केलेला आहे. त्यात दुसरा, विषयापेक्षा मोठं होण्याचा धोका मात्र त्यांनी फार प्रयत्नपूर्वक आणि कौशल्याने टाळला आहे. कायिक, वाचिक, आंगिक, भाषिक अशा सर्व प्रकारच्या अभिनयांचा उत्तम आविष्कार ते बहुरूपी भूमिकेत सादर करतात. प्रत्येक व्यक्तिरेखेचा वेगळा आवाज, वेगळा बाज, लागोपाठ वेगवेगळ्या व्यक्तिरेखा सादर करणं, अभिनेत्यांच्या सूत्रसंचालकाची भूमिकाही चपखलपणे सादर करणं हा सगळा खेळ ते अफाट ऊर्जेने रंगवतात. रंगमंचावर त्यांच्या रूपातच छत्रपती शिवराय आणि छत्रपती संभाजीराजेही अवतरतात ते पूर्ण आब राखून. नेमके. जेवढ्यास तेवढे. अडीच तासांच्या प्रयोगात ९० टक्के वेळ ते मंचावर आहेत आणि ७० टक्के वेळ अभिनयाचं बहुढंगी सादरीकरण आहे. आपल्या खांद्यांवर सगळा प्रयोग वाहून नेणारा चोख परफॉर्मन्स त्यांनी सादर केला आहे. त्यांना इतर कलावंतांची दमदार साथ आहेच. पण त्यांच्याबरोबरीने विविधरंगी भूमिका सादर करणारा आणि खणखणीत गाणारा शाहीर पृथ्वीराज माळी चपखल साथ देतो आणि काय गातो महाराज हा तरुण!
किरण माने आणि इंद्रजीत सावंत यांच्या अनेक वर्षांच्या चिंतनातून, आदानप्रदानातून, कळकळीतून, शिवरायांवरील असीम श्रद्धेतून आणि लेखक-दिग्दर्शक-कलावंतांच्या सात आठ महिन्यांच्या अथक परिश्रमांमधून, चोख तालमींमधून आणि जबरदस्त ऊर्जेतून हा भव्य, दिव्य, ऊर्जादायी प्रयोग आकाराला आला आहे. निर्माते अभयसिंग जगताप यांनी हे शिवधनुष्य उचललेलं आहे. छत्रपती शिवरायांना मानवंदना देणारा, नक्की अनुभवावा असा हा अनोखा प्रयोग आहे. प्रेक्षकाला खिळवून ठेवणारा, कलेतल्या सर्व रसांचा आविष्कार करणारा देखणा प्रयोग सादर करणार्या सगळ्या टीमचे आभार आणि शुभेच्छा!

