• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

बांगला देशाचा स्वातंत्र्यलढा

निळू दामले (युद्धाची चटक)

marmik by marmik
January 2, 2026
in युद्धाची चटक
0
बांगला देशाचा स्वातंत्र्यलढा

२६ मार्च १९७१ ते १६ डिसेंबर १९७१.
बांगलादेशाचे सुमारे ३५ हजार सैनिक आणि २० ते २५ लाख नागरिक मेले.
भारत आणि बांगला देश यांचे मिळून ४ लाख २५ हजार आणि पाकिस्तानचे ३ लाख ७० हजार सैनिक लढले. युद्ध बांगला देशात, काहीसं पाकिस्तानात आणि काहीसं भारतात झालं.
भारताचे १५०० सैनिक मेले, ४ हजार सैनिक जखमी झाले.
पाकिस्तानचे ८ हजार सैनिक मेले आणि सुमारे ९० हजार जखमी झाले.
युद्धाच्या शेवटी पाकिस्तानचे ९५ हजार सैनिक भारताला शरण गेले.
***

युद्ध आणि बांगला देशाची निर्मिती.
थोडं मागं जायला हवं.

१९४७ला देशाची फाळणी झाली. फाळणीचा मुख्य मुद्दा धर्म हा होता. इस्लामच्या आधारावर पाकिस्तान झाला, भारतानं स्वतःला सेक्युलर म्हणून घेतलं. भारत हे हिंदुराष्ट्र झालं नाही. पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान असे तुकडे झाले. दोघांमध्ये एक हजार मैलांचं अंतर. बांगला देश १.४८ लाख चौरस मैल होता आणि पश्चिम पाकिस्तान ७.९६ लाख चौरस मैल होता.

बांगला देशाची भाषा होती बांगला. बांगला देश नद्यांचा प्रदेश, शेती हा आधार. पश्चिम पाकिस्तानात उर्दू, सिंधी, पंजाबी, पश्तो, बलुची या भाषा बोलल्या जात. पश्चिम पाकिस्तानात हॉकी आणि क्रिकेट खेळलं जात असे. पूर्व पाकिस्तानात फुटबॉल. बांगला देशातलं हवामान त्रासदायक होतं, पूर येत असत, सतत पूर-दुष्काळाचं संकट असे, अर्थव्यवस्था कायम बिकट असे. त्या मानानं पश्चिम पाकिस्तानाची आर्थिक स्थिती बरी होती. पश्चिम पाकिस्तानचं क्षेत्रफळ बांगला देशाच्या क्षेत्रफळाच्या पाचपट आहे. पूर्व पाकिस्तानची लोकसंख्या होती ४.२० कोटी, पश्चिम पाकिस्तानची लोकसंख्या होती ३.३७ कोटी.

पश्चिम पाकिस्ताननं पूर्व पाकिस्तानाला सावत्र भावनेनं वागवलं. पूर्व पाकिस्तानचा विकास होऊ दिला नाही, विकासाच्या सर्व संधी पश्चिम पाकिस्तानानं हडप केल्या. १९५० सालच्या लोकसंख्येचा हिशोब मांडला तर पूर्व पाकिस्तानावर ६० टक्के रक्कम खर्च व्हायला हवी होती. तसं झालं नाही, पूर्व पाकिस्तानच्या वाट्याला ४६ टक्के रक्कम आली. स्वतंत्र झाल्यापासूनच पाकिस्ताननं सरकारी नोकर्‍यांत पश्चिम पाकिस्तानातली माणसं घुसवायला सुरुवात केली. बांगला युद्ध सुरू झालं तेव्हां सरकारी नोकर्‍यांत १९ टक्के माणसं बांगला देशीय होती. पाकिस्तान सरकारात सेक्रेटरीपदांवर फक्त तीन बंगाली होते. सैन्यात फक्त एकच बंगाली जनरल होता.

पूर्व पाकिस्तानातले लोक म्हणत की त्या विभागाचं होणारं उत्पादन आणि निर्यात यातला योग्य वाटा त्यांच्या वाट्याला यायला हवा होता. ताग, चहा ही पाकिस्तानातली प्रमुख निर्यात होती, त्यातून पाकिस्तानला सर्वात जास्त परकीय चलन मिळत असे. पण त्यातलंही उत्पन्न पश्चिम पाकिस्तानकडं वळवलं जात असे.

पूर्व आणि पश्चिम, दोघेही मुसलमान आणि दोघेही सुन्नी. तरीही पूर्वेच्या लोकांवर अन्याय होत असे, कारण ते भाषेनं आणि संस्कृतीनं बांगला होते. बांगला देशामधला एक मुसलमान नेता चिडून प्रश्न विचारी, ‘आम्ही मुस्लीम आहोत हे सिद्ध करण्यासाठी आम्ही लुंग्या वर करून फिरत रहायचं काय?’

पूर्व पाकिस्तानात असंतोष होता. मुजीब उर रहमान यांनी असंतोष संघटित केला. मुजीब फाळणीपूर्वी मुस्लीम लीगचे कार्यकर्ते होते. विविध व्यवसायातल्या कामगारांच्या युनियन ते चालवत. भारताच्या फाळणीचा विषय निघाला तेव्हां बंगालमध्ये शरच्चंद्र बोस आणि सुर्‍हावर्दी यांनी संयुक्त बंगाली देशाची मागणी केली होती. बांगला भाषिकांचा स्वतंत्र देश, त्यांना पाकिस्तान आणि भारत यात कुठंही जायचं नव्हतं. पण ही चळवळ फार टिकली नाही. भारत-पाकिस्तान यांच्यातच विभागणी झाली.

स्वतंत्र पाकिस्तानात मुजीब कामगार नेते म्हणूनच प्रसिद्ध होते. ते सतत पाकिस्तान सरकारच्या धोरणावर टीका करत, आंदोलन करत. मुजीब यांचा एक पाय तुरुंगात असे. १९४९ साली त्यांनी मुस्लीम अवामी लीग स्थापन केली. मुस्लीम लीगपेक्षा वेगळी संघटना. मुजीब मुस्लीम होते पण त्यासोबतच कामगार नेतेही होते. कामगार क्षेत्रात काम करताना कामगार ही व्यक्ती श्रमिक असते, कामगाराला धर्म नसतो; मुजीब या विचाराचे होते. मुस्लीम अवामी लीग या नावातून त्यांनी मुस्लीम हा शब्द काढून टाकला. अवामी लीग, लोकांची संघटना. पाकिस्तानतल्या हिंदू आणि ख्रिस्ती लोकांच्या हक्कांसाठीही अवामी लीग लढत असे.

पश्चिम पाकिस्तानतलं राजकारण धर्माच्या बाजूनं जात होतं. विभागीय, भाषिक, सांस्कृतीक ओळखी पुसून धार्मिक ओळखच शिल्लक ठेवायची असा प्रयत्न पाकिस्तानी राजकारणानं सुरू केला. कुराण, उर्दू. येवढ्या दोनच ओळखी. पाकिस्तानी सत्तेनं लष्कराचं बळ वापरून पाकिस्तानचं इस्लामीकरण आरंभलं. कामगारांचे अधिकार, मानवी हक्क, भाषिक हक्क इत्यादी गोष्टी संपवण्याची खटपट सरकारनं केली.

परिणामी थेट १९५०पासूनच अवामी लीग आणि पाकिस्तान सरकार; पाकिस्तानची सत्ता आणि मुजीब यांच्यात संघर्ष सुरू झाला. पाकिस्ताननं उर्दू ही पाकिस्तानची अधिकृत भाषा केली तिथं पूर्व पाकिस्तान पश्चिमी पाकिस्तानपासून वेगळा व्हायला सुरुवात झाली. पाकिस्तानातली लोकशाही आणि निवडणुका हे नाटकच असे. पाकिस्तानचं राजकारण लष्करशहाच चालवत असत. लोकसंख्येच्या हिशोबात बांगला भाषिक बहुसंख्य असल्यानं स्वाभाविकपणे सरकार बांगला भाषिकांचं असायला हवं होतं. पण लष्करानं ते होऊ दिलं नाही. परिणामी अवामी लीगनं पूर्व पाकिस्तानसाठी स्वायत्ततेची मागणी केली, तोच त्यांचा जाहीरनामा झाला.

१९५१पासून पाकिस्तानात लष्करी राजवट सुरू झाली. १९५८मध्ये जनरल अय्युब खान यांनी गायडेड डेमॉक्रसी सुरू केली. म्हणजे अय्युब खान म्हणतील तशी लोकशाही. अवामी लीगचं स्वायत्ततेचं आंदोलन सुरू होतं. १९६९मध्ये अय्युब खाननी सत्ता सोडली, त्यांची जागा जनरल याह्या खान यांनी घेतली. याह्या खानांनी तुकडा पाडायचं ठरवलं. अवामी लीग आणि मुजीब यांना खतम केलं की स्वायत्त बांगला विचार संपेल असं त्यांना वाटलं. याह्या खान हा खाकी माणूस. खाकी पद्धतीनं त्यांनी योजना आखली. निवडणूक जाहीर केली. एक अट होतीच. निवडून आलेली लोकसभा एक नवी राज्यघटना तयार करेल; या राज्यघटनेला याह्या यांची मान्यता लाभली तरच ती अमलात येईल. निवडणुका जाहीर झाल्यावर मुजीबनी बंगाली स्वायत्ततेची मागणी करणारा जाहीरनामा निवडणुकीचा कार्यक्रम म्हणून जाहीर केला.

याह्या खानांनी दोन्ही पाकिस्तानात ३५ धार्मिक पक्ष उभे केले. या पक्षांना लष्करानं पैसे दिले. कोणीही सोम्या गोम्या उभा राहात होता. अनेकांनी ही पैसे मिळवण्याची संधी मानली. त्या पक्षांनी खूप ढोल बडवत प्रचार मोहीम चालवली.
झुल्फीकार अली भुत्तो यांची पीपल्स पार्टी मैदानात उतरली होती. भुत्तो हा माणूस लष्करी नव्हता, राजकीय होता. याह्या खानांनी भुत्तोला पैसे दिले. भुत्तो लष्करविरोधी होता. पाकिस्तानात मुलकी सरकार आलं पाहिजे अशी भुत्तोंची भूमिका होती. याह्याच्या मदतीनं निवडणूक जिंकायची आणि जिंकल्यानंतर याह्याना-लष्कराला टांग मारायची असा त्यांचा डाव होता. याह्याचं डोकं वेगळंच होतं. पस्तीसपेक्षा जास्त पक्षांच्या जंजाळात भुत्तो एक अल्पसंख्य पक्ष झाला की त्यांना मापात ठेवायचं असा याह्याचा डाव होता.
अवामी लीगकडं पैसे नव्हते पण लोकमत अवामी लीगच्या मागं होतं.

लोकसभेत ३१३ जागा होत्या. अवामी लीगला १६७ जागा मिळाल्या. सर्व धार्मकि पक्षांचा धुव्वा उडाला. अवामी लीगला भक्कम बहुमत मिळालं. आश्चर्य म्हणजे भुत्तोना ८१ जागा मिळाल्या. याच्या अर्ध्यापेक्षाही कमी जागा भुत्तोंना मिळतील अशी याह्याची अपेक्षा होती. भुत्तो चाल खेळले. मुजीबना भेटले. दोघं मिळून सत्ता स्थापन करायची, संयुक्त सरकार असेल आणि मुजीब पंतप्रधान रहातील असं ठरलं.
याह्यांनी नवी रणनीती आखली. लोकसभा भरूच द्यायची नाही. १ मार्च १९७१ रोजी लोकसभा भरायची होती. याह्यानी लोकसभेचं अधिवेशन पुढे ढकललं.

१ मार्च.
ढाक्क्यात इतर कुठल्याही दिवसासारखाच दिवस उगवला. माणसं कामाला लागली. दुकानं उघडली. रस्त्यावर आण्याआण्याला अननसाचे काप विकणार्‍यांनी रस्त्यावर ठेले थाटले. यथावकाश रेस्टॉरंट उघडली, क्लब उघडले. रेडियोवर, रेडियो पाकिस्तानवर बातम्या सुरू झाल्या. पहिलीच बातमी होती की ढाक्क्यातलं विधिमंडळाचं अधिवेशन प्रेसिडेंट याह्या खानानी पुढं ढकललं आहे. निवडणुक झाल्या होत्या, विधिमंडळात रीतसर सरकार स्थापन होणार होतं, मुजीब प्रधान मंत्री होणार होते. लोकांना धाकधूक होतीच. कारण याह्या खानाना मुजीबच्या हाती सत्ता सोपवायची नव्हती. इस्लामाबादमध्ये ते डाव टाकत होते ते लोकांच्या कानावर होतं. पण तरीही शेवटी लोकांनी घेतलेला निर्णय ते कसा उलथवू शकतील असं लोकांना वाटत होतं.

अधिवेशन पुढे ढकललं याचा अर्थ ते आता कायम पुढंच ढकललं जाणार आहे असा होत होता. पूर्व बंगालमधल्या लोकांना स्वायत्तता मिळणार नव्हती. बातमी पूर्ण झाली. एकाएकी लोक रस्त्यावर उतरले. दुकानं बंद झाली. कोणीही आदेश दिला नव्हता, काही सुचवलंही नव्हतं. हॉस्टेलवर रहाणारे विद्यार्थी बाहेर पडले. गावातले विद्यार्थी त्यांना सामिल झाले. हां हां म्हणता विद्यार्थ्यांच्या जमावाचं रूपांतर मिरवणुकीत झालं. मिरवणूक गावभर फिरू लागली. सारं ढाक्का रस्त्यावर उतरलं. पश्चिम पाकिस्तानातल्या मालकांच्या दुकानांवर लोक गेले. मोडतोड आणि लुटालूट केली. जिन्ना बाजारात पाकिस्तानी दुकानं आणि कचेर्‍या होत्या. पाकिस्तान एयर लाईन्सचं ऑफिस तिथं होतं. लोकांनी त्या ऑफिसावर हल्ला केला. दुपार होईपर्यंत ढाक्का बंद झालं.

लोक पलटन मैदानाकडं निघाले. त्यांच्या हातात काठ्या, सळ्या, बांबू होते. पलटन मैदान सभांसाठी वापरलं जातं. मोठ्या सभा तिथं होतं. मैदान तुडुंब भरलं. तरीही लोक येतच होते. कोणी त्यांना बोलावलेलं नव्हतं, तिथं सभा होईल असंही जाहीर झालेलं नव्हतं. लोकांची उत्स्फूर्त समजूत होती की आता तिथं मुजीब सभा घेतील. मैदानात जमलेल्या लोकांना कळलं की पुरबणी हॉटेलवर अवामी लीगच्या कार्यकारिणीची बैठक भरलीय. मुजीब या बैठकीत होते. लोक पुरबणी हॉटेलकडं निघाले. हॉटेलच्या बाहेर गर्दी फुगू लागली. चौक भरला. चौकात येणारे सर्व रस्ते भरले. जमाव घोषणा देत होता. भुत्तो-याह्यांचा निषेध. मुर्दाबाद. आम्हाला स्वायत्तता हवीय. मुजीब बाहेर या, भाषण करा. स्वातंत्र्य. स्वातंत्र्य. स्वातंत्र्य.
सारं अनपेक्षित होतं.

मुजीब हॉटेलच्या गच्चीत आले. थोडंसं बोलले. लोकांची अपेक्षा होती की बांगला देश स्वातंत्र्याची घोषणा मुजीब करतील. मुजीब म्हणाले, ‘आपल्याला लोकशाही पद्धतीनं जायचं आहे. उद्या ढाक्का बंद करा. परवा हा विभाग. तेरवा देशभर हरताळ. आपण सरकारवर बहिष्कार घालायचा आहे, असहकार आंदोलन सुरू करायचं आहे… मी ऐकलंय की काही लोक हिंसा करत आहेत, लुटालूट करत आहेत. माझं त्यांना सांगणं आहे की हिंसा ताबडतोब थांबवा. ज्यांनी दुकानं फोडलीत त्यांनी दुकानात पुन्हा जावं, लुटलेल्या वस्तू दुकानदारांना परत कराव्यात, दुकानदारांची क्षमा मागावी. आपला लढा सरकारशी आहे, जनतेशी नाही. आंदोलन शांततेनंच चाललं पाहिजे…’
लोक चिडलेले होते. मुजीबच्या भाषणात अडथळे आणून म्हणत होते, ‘स्वातंत्र्य जाहीर करा…’
मुजीबनी त्यांना झापलं, ‘आपल्याला जे काही करायचंय ते लोकशाही मार्गानंच. विचार विनिमय करून. तुम्ही परत जा. हरताळ यशस्वी करा.’

हरताळ सुरू झाला.
बातमी आली की बंदरात एमवी स्वात हे जहाज आलंय, त्यावर याह्यानं पाठवलेले सैनिक आणि दारुगोळा आहे. हज्जारो लोक बंदराकडं रवाना झाले. बंदर कामगारांनी हरताळ सुरू केला होता, त्यांनी बोटीवरचे खोके उतरवायला नकार दिला. सैनिक उतरून वाहनांमध्ये जात असताना चिडलेल्या लोकांचा सामना त्यांना करावा लागला. लाठीमार झाला, गोळीबार झाला. गोळीबाराची बातमी पसरली. लोक बंदराकडं निघाले…

मुजीबनी जाहीर केलं की ते ७ जूनला भाषणात त्यांची भूमिका जाहीर करतील. लोकांनी त्यांचं त्यांचं ठरवलं होतं. मुजीबच्या घोषणेची वाट पहायला लोक तयार नव्हते. बांगला देशाचा स्वातंत्र्य लढा सुरू झाला होता.

Previous Post

भारतीय क्रीडापटूंचा नववर्ष संकल्प!

Next Post

कीर्ती पावभाजी

Next Post
कीर्ती पावभाजी

कीर्ती पावभाजी

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.