भारतीय जनता पक्ष हा फार मजेशीर पक्ष आहे.
आज या पक्षाला डोळे झाकून मतदान करणार्यांना अतिशय भाबडेपणाने असे वाटते की देशाच्या विकासासाठी, स्थिरतेसाठी, संरक्षणासाठी आणि हिंदूंच्या हितरक्षणासाठी आपण या पक्षाला मतदान करतो आहोत. यातल्या कशासाठी या पक्षाने गेल्या ११ वर्षांत नेमकं काय केलं, याचा तटस्थ ताळेबंद कोणी मांडला तर या मंडळींना लक्षात येईल की आपण फारच मूर्खात काढलो गेलो आहेत. या पक्षाने धार्मिक भावना चेतवून आपल्याला एका भ्रमजाळ्यात अडकवले होते आणि आपण स्वेच्छेने त्यात पुरते अडकलो होतो. अर्थात, हे मान्य केलं जाईल का, याबद्दल शंकाच आहे. बेंबीत बोट अडकलं की गार लागतं, असंच म्हणावं लागतं ना!
नगरपालिका आणि पंचायतींमध्ये आपल्याच पक्षाचा डिंडिम वाजला, आमचीच घोडदौड झाली असा दावा नुकताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. कोण आहे हो तुमच्या पक्षात? किती मूळ भाजपेयी आहेत? किती जण ठिकठिकाणाहून आयात केलेले बाहुबली आणि गणंग आहेत? विजयाची राक्षसी आणि अनैसर्गिक भूक लागलेल्या या पक्षाने या निवडणुकीत भलतेच प्रकार केले. आपल्या उमेदवारांच्या विरोधात उमेदवारच उभा राहू द्यायचा नाही. आमची सत्ता आली नाही तर तुम्हाला निधी मिळणार नाही, अशा दमदाट्या करायच्या. अरे, तुम्ही काय मनरेगामध्ये खडी फोडून स्वकष्टार्जित पैसा आणता की काय सरकारी तिजोरीत? लोकांचाच पैसा लोकांच्या कामाला वापरताना केवढा हा माज? दुसर्या एखाद्या पक्षाने एखाद्याला उमेदवारी दिली की त्याला दमदाट्या करून आपल्या पक्षाच्या पॅनेलमार्फत उभं राहायला भाग पाडायचं, असा सगळा प्रकार.
एकेकाळी हा पक्ष आणि त्याचे कार्यकर्ते नाकाने कांदे सोलायचे चारित्र्य आणि साधनशुचितेचे, सचोटीचे. ज्यांना संधी मिळत नाही ते निव्वळ संधी मिळाली नाही म्हणून सज्जन राहतात, तशातली ही कमळी गँग. यांना ज्या क्षणी संधी मिळाली तेव्हापासून वरपासून खालपर्यंत खाबूगिरी सुरू झाली. एक केंद्रात आणि एक नागपुरात असे दोनचार प्रवचनकार चारित्र्य, नैतिकता, देशहित, हिंदूरक्षण, भ्रष्टाचाराला विरोध वगैरे विषयांवर प्रवचनं देत फिरतात, खाली सगळा अनाचा. वर झगमगाटी अंगरखा आणि कंबरेला फाटकी लंगोटी असला हा कारभार.
या पक्षातल्या शिस्तीचं आणि निरलस वृत्तीचं फार कौतुक केलं जातं. असली निर्जीव शिस्त कोणाच्या उपयोगाची? राजकीय पक्षात चैतन्य हवं, सतत नवं काही आत्मसात करून आजच्या युगाला साजेसं समाजहिताचं राजकारण करण्याची नवोन्मेषी ऊर्मी हवी. वादविवाद हवा, त्यातून दिशाबदल हवा. सतत पुराणातल्या वांग्यांचं भरीत हाच एक पदार्थ पंचपक्वान्नांसारखा खात राहायचा आणि डोक्याचा बिलकुल वापर न करता, कसलीही चिकित्सा न करता नंदीबैलाप्रमाणे वरून जे सांगितलं जाईल त्याला मान डोलावायची, याला शिस्त म्हणत नाहीत, मठ्ठपणा म्हणतात. त्यातून होत असेल संघटन, पण ते राजकारणाला सकारात्मक दिशा देण्यात नापासच होतं.
मुख्यमंत्री ज्या पक्षाबद्दल बोलतायत, त्या पक्षात मूळ भाजपवाले अल्पसंख्याक आहेत. आपण हवा भरून कितीही फुगायचा प्रयत्न केला तरी आपण मुळात बेडकीच आहोत, बैल नाही, हे कळल्यामुळे इकडून तिकडून खोगीरभरती करून पक्षाचा फुगा फुगवलेला आहे संपूर्ण देशपातळीवर. या सगळ्यात पंचरंगी पोपट झाला आहे तो मूळच्या कार्यकर्त्यांचा. पक्षासाठी त्याग, संघटनेसाठी त्याग, अंतिम ध्येयासाठी त्याग असले निरर्थक त्याग करण्यासाठीच आपला जन्म आहे, याची आता त्यांची खात्री पटली असेल. देशात सगळीकडे या कार्यकर्त्यांना सतरंजीउचले म्हणून हिणवलं जातं. पक्षाकडे राजकीय सत्ता नव्हती, त्या काळात या कार्यकर्त्यांनी कसलीही अपेक्षा न ठेवता तळागाळातून पक्ष उभा केला, त्यांनाच मतदान करणारी पारंपरिक पॉकेट्स तयार केली. पण सगळ्या राज्यावर, देशावर अंमल गाजवायला या मूठभर पारंपरिक मतदारांचा काहीही उपयोग नाही, हे लक्षात आल्यावर हे कार्यकर्ते बाजूला सारले गेले आणि इतर पक्षांतून आलेल्यांना हारतुरे देऊन पक्षात घेतलं गेलं. आदल्या दिवशी ज्याला जेलमध्ये चक्की पिसायला धाडू अशा गर्जना करायच्या, भ्रष्टवादी पक्षाशी युती नाही नाही नाही, त्रिवार नाही, असला नाटकी आविर्भाव दाखवायचा आणि दुसर्या दिवशी त्यांनाच सत्तेत घेऊन त्यांच्या मांडीला मांडी लावून बसायचं. ज्यांच्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश केला म्हणून लोकांना मूर्ख बनवायचं, त्यांना त्याच आरोपांमधून क्लीन चिट देऊन मूर्खांना आणखी मूर्ख बनवायचं. मग बिचारे स्वत:लाच दिलासे देत बसतात, यांनी केलंय तर कुछ सोचकेही किया होगा! सोशल मीडियावरचे हमाल निबंधांचे पो टाकायला तयार, कार्यकर्त्यांच्या त्यागातून कसा भविष्यातला देश उभा राहणार आहे. डॉक्टरांचं, गुरुजींचं स्वप्न साकार करण्यासाठी हा त्याग कसा आवश्यक आहे. यांचे चाळीस पैसे बंद झाले तर हे असा त्याग करणार आहेत काय? अलीकडेच रमणा बंद झाल्यावर गोदी मीडियातल्या दोनपाचजणांना खरीखुरी पत्रकारिता करण्याची कशी उबळ आली आहे ते पाहा.
मूळ कार्यकर्त्यांनी मात्र आयुष्यभर या अन्यपक्षीय गणंगांच्या स्वागत समारंभांसाठी सतरंज्या अंथरायच्या, त्यांना उमेदवारी मिळाली की दारोदार प्रचार करायचा, विजय मिळाला की गुलाल उधळत नाचायचं आणि तो मंत्री-संत्री बनला वâी साहेब म्हणून त्याची सरबराई करायची, हाच एक कार्यक्रम. हे किती काळ चालणार? कसं सहन होणार? नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये भाजपमधल्या अशा मूळ कार्यकर्त्यांनी बंडाचं निशाण रोवलेलं आहे. बाहेरची माणसं आमच्यावर लादू नका, असा निर्वाणीचा इशारा दिला आहे. कोणती ना कोणती गोळी देऊन या बंडोबांना थंडोबा केलं जाईलच. पण, ही झाकपाक किती दिवस चालणार?
गळू पिकलं आहे, ते कधी ना कधी फुटणारच.
त्याबरोबर ‘बैल झालो’ म्हणून फुशारलेल्या बेडकीचाही फुगा फुटणार.
ही वेळ आल्यावर जे मूळ मातृपक्षाचे झाले नव्हते, ते यांचे राहणार आहेत का? तेही पांगणारच.
तेव्हा या पक्षात सतरंज्या उचलणारेही राहणार नाहीत…फक्त विस्कटलेल्या, विरलेल्या, फाटलेल्या सतरंज्याच शिल्लक राहतील.
