बाळासाहेबांनी रेखाटलेले हे मार्मिकचे मुखपृष्ठ आहे ७ जुलै १९७४च्या अंकावरचे. म्हणजे किमान ५१ वर्षांपूर्वीचे. त्यावेळी एक राक्षस जन्माला येतो आहे, याची चाहूल त्यांना लागली होती, आज त्या राक्षसाच्या माध्यमातून दिल्लीचा महाराक्षस मुंबईचा घास घ्यायला सज्ज झालेला असताना जागृत मराठी माणूस बाळासाहेबांच्या दूरदृष्टीला दाद देईल, पण मुंबई वाचवण्यात यशस्वी होईल का? हा मोठा प्रश्न आहे. त्यावेळच्या काँग्रेसच्या सरकारने महानगर प्राधिकरण योजना या साळसूद नावाने ही योजना महाराष्ट्रात आणली. आज तिचं नाव आहे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात एमएमआरडीए. मुंबईसारख्या सोन्याची अंडी देणारी कोंबडी असलेल्या महानगरातल्या मराठी माणसांनी काँग्रेसची सत्ता घालवून महापालिका शिवसेनेच्या हाती सोपवली आणि दिल्लीश्वरांचा पोटशूळ जागा झाला. त्यांना मुंबई मराठी माणसांच्या ताब्यात राहणं परवडणारं नव्हतं. मग मुंबईत आणि आसपासच्या परिसरात ढवळाढवळ करण्यासाठी हे प्राधिकरण नेमण्यात आलं आणि आज अशी परिस्थिती आहे की मुंबई आणि रायगड, ठाणे, पालघर या जिल्ह्यांचा मुंबईलगतचा परिसर महाराष्ट्रात असूनही महाराष्ट्रात नसल्यात जमा आहे. यावेळच्या महापालिका निवडणुकांमध्ये या परिसरावर कब्जा करण्याचा कमळाबाईचा मनसुबा आहे, तो त्यासाठीच! ठाणे-मुंबईकरांची सुज्ञता हे मनसुबे उधळून लावू शकली तरच या परिसरातला मराठी माणूस ताठ मानेने जगू शकेल. नाहीतर शीर्षासन करायची तयारी ठेवा!

