• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

माओच्या गरूड झेपेचे बळी

निळू दामले (युद्धाची चटक)

marmik by marmik
December 25, 2025
in घडामोडी, युद्धाची चटक
0

शेतमालाचं उत्पादन वाढवण्यासाठी माओच्या चीनमध्ये पीकपद्धतीमधे बदल करण्यात आले. रशियन वैज्ञानिक ट्रॉफिन लायसेंको यांच्या मार्गदर्शनाखाली शेती केली गेली. लायसेंको यांचा वनस्पतीशास्त्राबाबतचे सिद्धांत चुकीचे आणि संशयास्पद होते. पीक वाढवायचं असेल तर पेरणी जवळ जवळ करावी. दिलेल्या जागी जास्त बिया पेरल्या तर धान्याची जास्त ताटं उगवतील आणि उत्पादन जास्त होईल, हा सिद्धांत कोणीही तपासून पाहिलेला नव्हता. लायसेंकोनं सांगितलं, माओनी ऐकलं. जमिनीतला कस, पोषणमूल्य शेवटी मर्यादित असतं, ते ताटांच्या संख्येत विभागलं, परिणामी धान्याचं उत्पादन कमी झालं. अपुर्‍या पोषणामुळं झाडं वाढली नाहीत.

खोलवर पेरणी. बी जमिनीत खोलवर पेरलं तर तेवढ्या प्रमाणात मुळं जास्त वाढतील, परिणामी पीक वाढेल असा सिद्धांत सांगितला गेला. हा सिद्धांतही कोणीही तपासून पाहिला नव्हता. जमिनीत कधी एक मीटर ते कधी तीन मीटर इतक्या खोलवर नांगर गेला आणि बिया पेरल्या गेल्या. बीला उगवण्यासाठी प्राणवायू लागतो. बीतून पहिले अंकुर बाहेर येऊन फोटोसिंथेसिस करतात, त्यासाठी अंकुर पृष्ठभागावर यावा लागतो. बी खोलवर पेरल्यामुळं अंकुर जमिनीवर आले नाही, बियांना अंकुरण्यासाठी पुरेसा प्राणवायू मिळाला नाही. उगवण झाली नाही. पीक आलं नाही.

खतांची मात्रा वाढवली की पीकही वाढतं, हा सिद्धांतही कोणी तपासला नव्हता. एका मर्यादेपलिकडं वनस्पतीला खतांचा उपयोग होत नाही. खतं वाया जातात. जमिनीतलं उपलब्ध पाणी, प्राणवायू हे घटक खतांचा परिणाम होण्यात महत्त्वाचे असतात. हे घटक न तपासता खतं दिली गेली की ती वाया जातात, त्यातून विषार उत्पन्न होतो. सूर्यप्रकाश नसेल तर वनस्पती खतांचा उपयोग करू शकत नाहीत, हे वैज्ञानिक नियम न पाळता खतांचा मारा केला गेला. पिकांचं उत्पादन घसरलं.
काही ठिकाणी शेतकर्‍यांनी कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव मोठे खड्डे करून त्यात भरमसाठ बिया फेकल्या. दाटीवाटीनं झाडं उगवून भरमसाठ पीक येईल असा त्यांचा सिद्धांत. बिया वाया गेल्या.

लोखंड पोलाद उत्पादन

उद्योगाच्या इमारती, यंत्र सामग्री, रेलवे, जहाजं इत्यादी गोष्टींसाठी विविध जातींचं पोलाद लागतं. औद्योगिक प्रगती करायची तर पोलाद हाताशी असायला हवं. त्या काळात पोलाद उत्पादन ही एखाद्या देशाच्या औद्योगिक विकासाची कसोटी असे. १९५७ साली चीनचं पोलाद उत्पादन ५३ लाख टन होतं. माओनं एकाएकी जाहीर करून टाकलं की १९५८ साली पोलाद उत्पादन ६२ लाख टन होईल.हा आकडा फेब्रुवारीमधला होता. मे महिन्यात माओनं जाहीर केलं की उत्पादन ८५ लाख टन होईल. नंतर हा आकडा जूनमध्ये एक कोटी टन, सप्टेंबरमध्ये १.२ कोटी टनावर गेला.इतकं पोलाद उत्पादन माओ कशाच्या जोरावर करणार होता?

पारंपरिक उत्पादन माओनं सोडली. घराच्या अंगणात छोटी भट्टी तयार करून त्यात बिड (पिग आयर्न) तयार होईल, नंतर त्यातून दर्जेदार पोलाद होईल अशी माओची कल्पना. माओचा आदेश घेऊन १५०० कार्यकर्ते देशभर विखुरले, प्रत्येक भट्टीत एक टनापेक्षा कमी बिड होता कामा नये. जिथं कमी होईल तिथं संबंधित माणसाला शिक्षा. शिक्षा कोणतीही असू शकेल. देशभर पोस्टर्स लागली, फलक लागले, सभा झाल्या. गाणी आणि नाटकं घेऊन संच देशभर फिरले. प्रचंड गवगवा. देशभर पाच लाख भट्ट्या उभ्या राहिल्या. चार कोटी माणसं बिड निर्मितीला लागली. घराघरातून मिळतील त्या लाकडाच्या वस्तू आणि भांडीकुंडी गोळा केली. ज्यांनी या कामी सहकार्य करायला नकार दिला, घरातली लाकडं दिली नाहीत, त्यांना मारहाण करण्यात आली, त्यांची गावातून धिंड काढण्यात आली.

बिडाचं लोखंड (पिग आयर्न) ब्लास्ट फर्नेसमधे केलं तर त्याचा खर्च टनामागे १०० युआन येत असे. गावरान भट्टीत त्याचा खर्च ३४५ युआन होत असे. सरकार प्रत्येक टन बिडाला १५० युआन देत असे. परिणामी सरकार बिड उत्पादनाला ५ अब्ज युआनची सबसिडी देत होतं. ठरलं होतं त्याच्या एक तृतियांश बिड तयार झालं. त्याचा दर्जा इतका वाईट होता की त्यातून पोलादनिर्मिती झाली नाही. किती पैसे, किती श्रम, किती लोकांच्या घरातल्या किती वस्तू आणि किती माणसं वाया गेली याचं मोजमापच होऊ शकलं नाही.

ग्वांगशान काउंटीतला हुआदिया कम्यून. त्यात ८०२७ कुटुंबं आणि ३६,६९१ माणसं होती. हंगामात कम्यूनच्या जमिनीवर ५९ लाख किलो धान्य झालं. कम्यूनच्या पुढार्‍यानं वरच्यांना कळवलं की २.३ कोटी टन धान्य पिकलं. धान्य कमी पिकलंय असं म्हटलं असतं तर शिक्षा झाली असती, तुरुंगात घातलं असतं, फासावरही लटकावलं असतं.उत्पादनाच्या प्रमाणात केंद्र सरकार धान्यवसुली करत असल्यानं या कम्यूनवर ६० लाख टनाची वसुली लागली. तेवढं धान्य आणायचं कुठून? कम्युनमध्ये सामुदायिक किचन होतं. वसुली अधिकार्‍यानं कोठारातलं सर्व धान्य जप्त केलं, कोठारात एक कण शिल्लक राहिला नाही. सप्टेंबर १९५९ ते जून १९६० या काळात या कम्यूनमधली १२,१३४ माणसं उपासमारीनं मेली. ७८० कुटुंबं पूर्णपणे संपली.

गाव, कम्यून या पातळीपासून तर थेट राज्याच्या पातळीवरचे पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते शेतकरी किंवा पक्ष कार्यकर्त्यांना जबाबदार धरत. त्यांच्यावर ते वाट चुकलेले आहेत, उजवे आहेत, शोषक आहेत असे आरोप लावत. गावात प्रेतं दिसत, मुलं रस्त्याच्या कडेला तडफडत मेलेली दिसत. या घटना म्हणजे वाट चुकलेल्या लोकांनी घडवून आणलेल्या घटना आहेत, असं खालचे कार्यकर्ते वरच्या कार्यकर्त्यांना, खालचे नेते वरच्या नेत्यांना कळवत असत. कागदं वर सरकायची. वरचे लोक अमलबजावणी अधिक कडक करा असा कागद खाली सरकवायचे. प्रत्येक कागद पाच पन्नास माणसांच्या छळाला आणि मृत्यूला कारण व्हायचा. शोषक आणि वाट चुकलेल्यांचा बंदोबस्त केलाय, सारं काही ठीक चाललंय असं सांगणारे कागद तयार व्हायचे. माणसं मरत होती एवढी एकच गोष्ट पक्ष कबूल करत नसे.

हुआँगचुआन विभागातलं टाओलीन कम्यून

८० दिवस झाले. धान्य गायब होतं. लोकांचं वजन घटलं. मग त्यांच्या अंगाला सूज आली. नंतर त्यांना ओकार्‍या झाल्या. नंतर मेले. तिथल्या उत्पादन ब्रिगेडमधे काम करणारा एक माणूस. तो हे सारं पहात होता. त्याला एक तीन वर्षांचा आणि एक चार वर्षांचा मुलगा होता. या मुलांचं काय होणार याची चिंता त्याला वाटू लागली. त्यानं मुलं गावाबाहेर नेउन एका डबक्यात बुडवून मारली…
…गावातल्या लोकांनी नवनवे पदार्थ तयार केले. भाताच्या काड्या छतं शाकारण्यासाठी वापरत असत, जनावरांना चारा म्हणून घालत. गावकर्‍यांनी त्या सुकवल्या. त्याचं पीठ केलं. ते पीठ रताळ्याच्या पिठात मिसळून त्याचा ब्रेड करून खाल्ला. तसंच मक्याच्या ताटावरचं कठीण आणि चिवट आवरण शेतकर्‍यांनी खरवडून काढलं. आतला मऊ भाग गोळा केला. त्याचं पीठ केलं, त्याच्या भाकर्‍या केल्या. गावतळ्यात मोसमात बगळे येत असत. बगळ्यांच्या विष्ठेला घाण वास येत नसे. गावकर्‍यांनी विष्टा गोळा केली. पाण्यानं नीट धुवुन साफ केली, शिजवून विष्ठेच्या वड्या केल्या आणि खाल्ल्या. बगळे मासे खातात. त्यांच्या विष्ठेला अन्नमूल्य असतं.

पार्टीचे लोक कशाकशासाठी दौरे करत असत. पत्रकारही हिंडत. त्यांना काय काय पहायला मिळे… गावात, रस्त्यावर माणसं झाडाशी बसलेली. झाड निष्पर्ण झालेलं, कारण पानं केव्हांच खाऊन झालेली. माणसं आता बुंधा खरवडतात. तो चावून चावून खातात. नंतर आतला मऊ कोवळा भाग खातात. असं करत करत अख्खं झाड संपतं. मुळासकट…माणूस गावात गेला की एकही प्राणी दिसत नाही. पक्षी नाहीत. सरडे, पाली, उंदीर, मांजरं, कुत्रे काहीही शिल्लक नाही. सगळं फस्त झालेलं असतं… कुत्र्यांनी प्रेतं खाल्लेली असतात. मग माणसं कुत्र्यांना खातात…

पक्षाच्या एका कार्यकर्त्यानं लिहून ठेवलं, ‘मी बसनं प्रवास करत होतो. रस्त्याच्या दोन्ही बाजूला प्रेतांचा खच दिसत असे. रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यांत प्रेतं दिसत. मी ऑफिसात पोचले. पक्षाची बैठक होती. मी बैठकीत विषय काढला. सर्वांनी न ऐकल्यासारखं केलं. बैठक झाल्यानंतर आम्ही गेस्ट हाऊसवर गेलो. तिथं चविष्ट जेवण होतं.’

एका कार्यकर्त्यानं लिहून ठेवलंय ‘मी माझ्या गावाला गेलो होतो. गावात पोचेपोचेस्तोवर शेकडो प्रेतं मला दिसली. गावात हालचाल दिसत नव्हती. सर्व प्राणी लोकांनी मारून खाल्ले होते. एकही झाडझुडुप शिल्लक नव्हतं. एका घरात गेलो. तिथं तीन तरूण होते. ते कसे शिल्लक राहिले? त्यांनी त्यांची कथा सांगितली… गावात माणसं मरत होती. सुरुवातीला मेलेल्या माणसाला लाकडाच्या फळीवर टाकून ती फळी बैल ओढत नेत. प्रेत गावाबाहेर नेऊन फेकून देत…बैल शिल्लक राहिले नाहीत. खाऊन फस्त…आई, वडील, मावशा. मेल्यावर आम्ही प्रेतं बाहेर नेणं बंद केलं. आम्ही प्रेतांचं मांस खाऊन दिवस काढले. एक खरं, तळव्याचं आणि पंजाचं मास मऊ आणि चविष्ट असतं…’ त्या घरात हाडांचा ढीग झाला होता.

१९५९ साली लुशानमधे पक्षाची दीर्घ परिषद झाली. परिषदेच्या पहिल्या टप्प्यात तालुका, विभाग पातळीवरच्या कार्यकर्ते-नेत्यांच्या बैठका झाल्या. त्यात गरूड झेप कार्यक्रमाचे अनुभव चर्चिण्यात आले. अमल झाला नाही, लक्ष्य गाठता आलेलं नाही, अनेक ठिकाणी जेवणघरं बंद करण्यात आली, उपासमार झाली, लोकांनी विरोध केला, हे मुद्दे या बैठका, परिषदेत कार्यकर्त्यांनी मांडले.

या बैठकांमधे पेंग देहुआई सक्रीय हजर होता. या बैठकामधे भाग घेण्याआधी तो हुनान या प्रांतात त्याच्या गावात जाऊन आला होता. हुनानमधे पेंग वाढला होता, पक्षाचं कामही त्यानं हुनानमधे केलं होतं, हुनान त्याला व्यवस्थित माहित होता. हुनानची वाताहत झाली होती, दुष्काळ झाला होता, लोकांची अपरिमित हानी झाली होती. पेंग सेंट्रल कमिटीचा आणि पॉलिट ब्यूरोचा सदस्य होता, माओच्या क्रांतिकार्यात पेंग १९३० पासून माओचा सहकारी होता. पेंगनं परिस्थितीचं वर्णन करणारं एक पत्र माओला लिहिलं. पत्रात माओचं, माओच्या कार्यक्रमाचं कौतुक होतं. पण वस्तुस्थिती मांडली होती. माओच्या आज्ञा आपण मानतो, माओची थोरवी आपण मानतो, तथापि परिस्थिती ही अशी आहे असं या पत्रातल्या मजकुराचं रूप होतं.

माओ बैठकांना उपस्थित नव्हता. या बैठकांचा वृत्तांत माओला सांगण्यात आला (बहुदा). शेवटी पॉलिट ब्यूरोची बैठक झाली आणि नंतर सर्वसाधारण सत्र झालं. सर्वसाधारण सत्रामधे तळातल्या कार्यकर्त्यापासून सेंट्रल कमिटी आणि पॉलिट ब्यूरोचे सदस्य असा तमाम पक्ष हजर होता.माओनं सविस्तर भाषण केलं. सामूहिकीकरण आणि ग्रेट झेप कार्यक्रमाची महती माओनं सांगितली. नंतर परिषदेत व्यक्त झालेल्या मतांचा थेट उल्लेख न करता माओनं उपस्थितांना सांगितलं, विविध मतं असली पाहिजेत. ती व्यक्तही झाली पाहिजेत. चर्चा झाली पाहिजे. टीका झाली पाहिजे. काही माणसं मनातलं बोलत नाहीत, खरं मत व्यक्त करत नाहीत. ते बरोबर नाही. विरोधी मत व्यक्त केलं की माणसाला दुःख होतं, माणूस जखमी होतो. पण त्याला इलाज नाही. अशा चर्चांच्या शेवटी योग्य तो निष्कर्ष काढून कार्यक्रमात सुधारणा केल्या पाहिजेत….इत्यादी इत्यादी.

भाषणात शेवटी माओनं पेंगनं लिहिलेल्या पत्राचा उल्लेख केला… काही माणसं माझ्यावर रागावतात, काही माणसं माझ्यावर जास्त रागावतात. पेंग माझ्यावर जास्त रागावतो कारण त्याचं आणि माझं जुळत नाही. पेंगबद्दल माझं मत सांगतो. माझा कोणी अपमान केला नाही तर मी त्याचा अपमान करत नाही. पण कोणी माझा अपमान केला तर मी अपमान केल्याशिवाय रहात नाही… जाहीर सत्रात माओनं पेंग हा उजवा आहे अशी टीका केली.

परिषद झाल्यावर लगेच पेंगला त्याच्या घरात स्थानबद्ध करण्यात आलं. त्यानंतर एकदा माओनं त्याला बोलावून घेतलं.त्याच्या खांद्यावर हात ठेवून अत्यंत प्रेमानं माओ म्हणाला की झालं गेलं विसरून जा, कामाला लाग. त्याला दूरवरच्या एका प्रांतात कामगिरीवर पाठवलं. पेंग तिथं पोचला न पोचला तोच त्याला अटक करून लष्कराच्या बराकीत नेण्यात आलं. तिथं त्याचा छळ करण्यात आला, त्याच्यावर अत्याचार करण्यात आले. वारंवार त्याच्याकडून वदवून घेण्यात आलं की त्याचं वर्तन माओ आणि पक्ष यांच्या विरोधात आहे. नंतर त्याला रेड गार्डनी रस्त्यावर खेचलं. मी उजवा आहे अशी पाटी त्याच्या गळ्यात टांगून त्याची धिंड काढण्यात आली. त्याला जाहीर सभेत तुडवण्यात आलं. त्यात तो लुळापांगळा झाला. त्याला उभं रहाता येत नव्हतं, चालता येत नव्हतं. त्याला खेचत हॉस्पिटलात नेण्यात आलं. तिथं उपचार दिले नाहीत, त्याचा छळ करण्यात आला. शेवटी १९७४ साली त्याचा अंत झाला. त्याचं शव त्याच्या कुटुबियांना देण्यात आलं नाही, जाळण्यात आलं. त्याचे अवशेष एका खड्ड्यात पुरण्यात आलं. त्या खड्ड्यावर तिसर्‍याच माणसाची पाटी लावण्यात आली. पेंगचं अस्तित्व संपलं होतं.

Previous Post

मेसीचं ‘दूरदर्शन,’ फुटबॉलची दशा तीच!

Next Post

आंब्राई

Next Post

आंब्राई

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.