सन्माननीय मंत्री महोदय,
पशु पालन विभाग,
महाराष्ट्र राज्य
सीसी – १. अध्यक्ष, अखिल भारतीय बिबटे संघटना
२. सन्माननीय सदस्या – अखिल भारतीय स्त्री बिबटे संघटना
विषय – बिबट्यांच्या नसबंदीचा निर्णय मागे घेणेबाबत
महोदय,
नुकताच तुमच्या एका मसलतीत आमच्या जुन्नर विभागातील काही बिबट्यांवर नसबंदी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला.प्रायोगिक तत्वावर ११५ बिबट्यांची नसबंदी करण्यात येईल असे यात सांगितलेले आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास अहिल्यानगर आणि नाशिकमध्येही नसबंदीचा प्रस्ताव ठेवण्यात आलेला आहे. त्वरित हा निर्णय मागे घेण्यात यावा अशी विनंती करण्यासाठी हा अर्ज अखिल भारतीय बिबटे संघटनेच्या वतीने करत आहोत. निर्णय तात्काळ मागे न घेतल्यास आम्हाला नाईलाजाने आंदोलनाचे पाऊल उचलावे लागेल असे अत्यंत खेदाने नमूद करावे लागत आहे.
मुळात हा निर्णय घेण्याचे कारणच काय? काही शहरांमध्ये आम्ही फेरफटका काय मारायला गेलो तर तुम्ही लगेच बिबट्याने हैदोस घातला म्हणून आवई उठवलीत. खरे तर माणसाला मारायची वगैरे आमची काही इच्छा नसते. पण मारलेच नाही तर आमचा धाक राहील कसा? तुमच्या राज्यातील वाघाच्या तुम्ही दोन पक्षांत वाटण्या केल्या. आमच्यात देखील नसबंदी केलेले आणि न केलेले अशा वाटण्या तुम्हाला करायच्या असतील तर ते अजिबात खपवून घेतले जाणार नाही.
तुमच्या मालकीचे काही वन अधिवास तुम्ही ठरवले. तिथे आम्हाला राहण्याची सक्ती केलीत. पण तुमच्यासारख्या क्षुल्लक प्राण्याचे ऐकून आम्ही सगळे तिथे वस्ती करू असे तुम्हाला वाटलेच कसे? शिवाय ही जमीन काही तुमच्याच बापजाद्यांची लागून गेलेली नाही. आम्हाला ठाऊक आहे की गुजरातेतील लोथल इथे झालेल्या उत्खननात आमच्या पूर्वजांच्या हाडांचे देखील अवशेष सापडलेले आहेत. म्हणजे तुमच्या आधीपासून आम्ही पृथ्वीतलावर अस्तिवात आहोत. हं, आता ते गुजरातेत सापडलेले अवशेष असल्याने त्यावर विश्वास ठेवणे तुम्हाला क्रमप्राप्तच आहे. तर आमचे म्हणणे एवढेच आहे की जसा इथे राहण्याचा अधिकार तुम्हाला आहे तसाच तो आम्हालाही आहेच. मुळात नसबंदी करण्याआधी आमची शिरगणती करायची असते एवढी साधी गोष्ट तुम्हाला कळत नाही. खरोखरीची शिरगणती करायला तुम्ही वनक्षेत्रात पाय तर ठेवून बघा, मग तुम्ही आहात आणि आम्ही आहोत. तुमच्याकडे कागदोपत्री होते तशी शिरगणती नको. इथे येऊन एक एक करत आमची मोजदाद करून दाखवा.
बरे तुमचा नसबंदीचा अनुभव काही फारसा चांगला नाही. शतकभरापासून तुमचे लोक नसबंदी करतात तरीही तुमची संख्या आमच्यापेक्षा जास्त जोमाने वाढते आहे. नसबंदीची जर कोणाला गरज असेल तर ती तुम्हाला आहे. आज आमची नसबंदी करताय, उद्या आमच्या बायकांना गर्भनिरोधक गोळ्या देखील खायला घालाल. आमच्याकडे म्हणतातच, ‘वसावसा नि फसाफसा, माणसाचा काय भरवसा.’ तुम्ही कुत्र्यांवर नसबंदीचे प्रयोग करता आहात, तरीही प्रत्येक सोसायटीच्या वळचणीला किमान पंचवीस कुत्री असतात. इथे पूर्वीच हाती घेतलेलं आहे ते काम तुम्हाला धड करता येत नाही आणि कुठे आमच्या नसबंदीच्या नादी लागता राव! आपण नसबंदीत माणसाला कसे फसवतो याच्या कित्येक सुरस कथा मी कुत्र्यांकडून ऐकलेल्या आहेत. तुमच्या एका अधिकार्याने म्हणे एकाच कुत्र्यावर शंभर वेळा नसबंदीचा पराक्रम केला. आता हे कसे शक्य आहे तुम्हीच सांगा.
तुम्हाला म्हणून सांगतो, भानगड अशी आहे की मी एकवेळ नसबंदी करून घेतली पण असती. पण काय आहे आमच्या तीन नंबरच्या बायकोची कूस अजून उजवली नाही. आमच्याकडे बायकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे एकेकाला आपल्या प्रजोत्पादनाच्या कार्यकाळात साधारण आठ लग्न करावी लागतात. याच्यावर अजून कोणाला काही एक्सट्रामॅरिटल अफेयर वगैरे करायचे असेल तर त्याला देखील मोकळीक असते. पण अट हीच आहे की प्रत्येकीची कूस उजवली पाहिजे. माझा मॅटर अजून तीनपर्यंतच पोचला आहे. तुम्हीच सांगा, इतक्या लवकर नसबंदी झाली तर मी घरी जाऊन काय तोंड दाखवू? शिवाय तुमच्यात म्हणे मागे एके काळी लग्न न झालेल्या पुरुषांची देखील चुकून नसबंदी केली गेली होती. तुम्हीच सांगा साहेब, इतका मोठा धोका आमचे पुरुष कसे पत्करतील?
शिवाय तुम्ही अत्यंत भेदभाव करत आहात असे आम्हा बिबट्या संघटनेचे स्पष्ट मत आहे. वाघ ही लुप्तप्राय जमाती आहे. आणि त्यांच्याच जवळपासच्या प्रजातीतील असूनही आम्ही मात्र केवळ संख्येने थोडेबहुत जास्त असल्याने एकदम आमच्या प्रजननाच्या
मुळाशीच तुम्ही घाव, म्हणजे टाका, घालताय. तुम्ही लाडाने पाळता ती मांजर जर वाघाची मावशी असेल तर ती आमची किमान काकू किंवा आत्या असेलच की नाही? शिवाय आम्ही वाघ, मांजर यांच्यापेक्षा कितीतरी चपळ असतो, देखणे असतो. माझी दोन नंबर तर मला आमच्यातील अक्षय कुमार म्हणते. मी तिला कितीदा सांगितले आहे की मला अक्षय कुमार म्हणू नकोस, नाहीतर आपल्यातील नसबंदीवर एखादा सिनेमा येईल आणि त्यात माझा रोल अक्षय कुमारच करेल. गेलाबाजार मराठीत जर चित्रपट आलाच तर कॅरॅक्टर रोल म्हणून तो सुबोध भावेकडे द्यायला आमची हरकत नाही.
खरे तर शहरं आणि गावखेड्यातील आमच्या वावराने आम्ही होता होईल तेवढा तुमचा फायदाच केलेला आहे. अक्षय कुमारच्या टॉयलेट सिनेमाने जे साधले नाही, सरकारने कित्येक वर्षे प्रयत्न करून देखील जे साध्य झाले नाही ते आमच्या एका फेरीने साध्य झालेले आहे. तुमची गावं हागणदारीमुक्त होत आहेत.
मला कल्पना आहे साहेब की शासन म्हणून तुमच्यावर कामाचा खूप ताण आहे. शिवाय आता कितीतरी ठिकाणच्या निवडणुका आलेल्या आहेत. अशावेळी तुमच्या जनतेचे काहीतरी भले केलेले आहे असे तुम्हाला दाखवावे लागणार. पण आपण आपल्यात मांडवली करू शकतो. तुमच्या निवडणुका होईपर्यंत तुम्ही आमच्या आणि आम्ही तुमच्या टेरिटरीमध्ये पाय देखील ठेवणार नाहीत.
शिवाय आम्हा प्राण्यांची नसबंदी करणे हे आताच्या काळात तुम्हाला परवडणारे देखील नाही. त्यासाठी तुम्हाला वेगवेगळी टेंडर्स मागवावी लागणार. नसबंदीची यशस्विता सिद्ध करावी लागणार. बरे त्यात नेमक्या म्हातार्या बिबट्यांची शस्त्रक्रिया करण्यात आली तर काय करणार? म्हणजे आधी बिबट्यांचे वय किती झाले आहे हे ठरवावे लागणार. त्यासाठी वेगळी समिती, कॉन्ट्रॅक्ट असे सगळेच आले. हे सगळं सरकारी खर्चात शक्य नाहीच. तरीही तुम्ही लोककल्याणास्तव इतकी उपाययोजना करणार आणि कोणीतरी नतद्रष्ट नंतर माहितीच्या अधिकारात कसली तरी फालतू माहिती पुढे आणणार. आणि बिबटे नसबंदी घोटाळा झाला म्हणून अफवा उठवणार. म्हणजे जिवावर उदार होऊन आम्हा लोकांची नसबंदी करण्याचे काम हाती घेऊनदेखील घोटाळ्याचा शिक्का तुमच्या माथी लागणार. फार फार तर इतके होऊ शकते की तुम्हाला हवेच असल्यास एखाद्या सिनेमात काम करायला आमच्यातील काही म्हातारे बिबटे आम्ही तुम्हाला देऊ करतो. फक्त त्यांना खायला घालण्याची जबाबदारी तुमची आणि काम झाल्यावर वन अधिवासात सुरक्षितपणे परत आणून देखील सोडावे लागेल. अन्यथा त्यांचा मागोवा काढत आमचे काही बंधू शूटिंगच्या ठिकाणी पोचतील.
तुमच्या प्राणिसंग्रहालयात ठेवायला आमच्यातील एखादा एकलकोंडा देखील आम्ही देऊ शकतो. तसे आम्ही कुटुंबवत्सल आहोत. तुमच्या लोकांनी कितीतरी ठिकाणी आम्हाला चार चार जणांना एकत्र बघितलेले आहेच. पण कुटुंबवत्सल असण्याच्या बाबतीत काही बिबटे मात्र आता माणसाचा आदर्श ठेवू लागलेले आहेत. कित्येकांना हल्ली फॅमिली एक्सपान्शन नको असते.

आणि हो साहेब, ते तुमचे रीळ बनवणार्या लोकांना जरा आवरा. मागच्या आठवड्यात मी एकटा नाशिकमध्ये फिरून आलो. तेव्हा कोणीतरी सीसीटीव्ही फुटेजवरून खोटेनाटे रीळ बनवले. त्यात माझ्याबरोबर एक बिबटी आणि तीन पिल्लं दाखवली आहेत. माझ्या तिन्ही बायकांनी ते बघून नुसता डोक्याला ताप करून ठेवला आहे. पहिल्या दोन बायकांना दोन दोन पिल्लं आणि तिसरीला एकही नाही अशी परिस्थिती असताना अजून कोणाची तीन पिल्लं कशी बघवणार? हे फेक रील केवळ सरकारचाच नव्हे तर आमचाही त्रास वाढवणार आहेत.
साहेब, खरे सांगू का. तुम्ही असे फेक रील करून त्यातच आमच्या नसबंदी शस्त्रक्रिया का दाखवत नाहीत? म्हणजे आम्हाला पकडणे नको आणि पुढे उगीच मारामारी करणेदेखील नकोच. तुमचे लोक शिरगणतीला आले तरी आमचे पुरुष बायका असे सगळेच त्यांच्यावर टपून बसलेले आहेत. त्यामुळे तुम्ही आपला तुमचा फायदा बघा. तिकडे माकडं पकडण्याच्या जाहिराती जशा काढल्या आहेत तशा आम्हाला पकडण्याच्या काढा, म्हणजे जनता तुमच्यावर जे निष्काळजीपणाचे आरोप करते ते करणार नाही. आमच्या पंजात येण्याची वेळ स्वत:वर आली की त्यांना जनतेला सरकारी नोकराचे आणि सरकारचे दुःख कळेल.
याउपर तुमची मर्जी.
इतके सगळे दिलेले पर्याय तुम्हाला पटत नसतील. तर मग या, बघूच. कोणाची शेपटी किती लांब आहे ते!
पण कुठल्याही परिस्थितीत आम्ही नसबंदीला शरण जाणार नाही हे लक्षात घ्या. आमच्या प्राणीहक्कावर गदा आणू नका अथवा तुमच्यातीलच प्राणीप्रेमी संघटनेकडे आम्हाला धाव घ्यावी लागेल आणि ते तुम्हाला परवडणार नाही. ‘बिबटे प्रजोत्पादन चालना संघटना’ अशी एक नवी संघटना या नसबंदी विरोधात आम्ही चालू केलेली आहे. तिचे आंदोलन अजून तीव्र करू असा इशारा आम्ही तुम्हाला देत आहोत. बोला.
नसानसात बिबट्या, घराघरात बिबट्या!
तुमचाच
सचिव,
अखिल भारतीय बिबटे संघटना.
( अजून नसबंदी न झालेला एक जीव )
