२०१४ मधली ही घटना असेल. पुण्यातील मध्यवस्तीमधल्या भागात एका गँगस्टरचा खून झाला होता. दोन गँगमधल्या वादातून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती मिळाली होती. तेव्हा मी पुण्यात क्राईम ब्रँचला सहायक पोलीस आयुक्त म्हणून काम करत होतो. या प्रकाराची चौकशी करत असताना कळले की विरोधी गँगमधील गुन्हेगारांनी त्या गँगस्टरवर लक्ष ठेवून फायरिंग आणि कोयत्याने वार करून हा प्रकार केला होता. भर दुपारी चार वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला होता, त्यामुळे आरोपी शोधण्याचे मोठे आव्हान पोलिसांच्या समोर उभे ठाकले होते. संध्याकाळपर्यंत हा प्रकार कुणी केला याची माहिती खबरीच्या माध्यमातून मिळाली होती. आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू केले. त्यासाठी पोलिसांच्या पाच टीम तयार करून त्या वेगवेगळ्या भागांमध्ये पाठवण्यात आल्या होत्या. पैशांच्या वादातून हा प्रकार घडला होता.
आरोपींना शोधण्याचे काम वेगात सुरू होते. पण ते काही केल्या सापडत नव्हते. माध्यमांचा व वरिष्ठ अधिकार्यांचा दबाव वाढत होता. क्राईम ब्रँचमधील दोन हवालदारांचे खबर्यांचे नेटवर्क चांगले होते, त्यामुळे हे आरोपी शोधण्याची जबाबदारी त्यांच्याकडे देखील सोपवण्यात आली होती. खबरे म्हणजेच एकतर माजी गुन्हेगार किंवा छोटे-मोठे गुन्हे करणारे गुन्हेगार किंवा त्यांच्याबरोबर फिरणारे पंटर असतात. त्यांच्या माध्यमातून हे हवालदार त्या गुन्हेगारांचा शोध घेत होते. खबरी फरार आरोपींची संधान साधून त्यांना हजर होण्याविषयी सांगत होते. फरार आरोपींचे फोन इंटरसेप्शनला टाकून ते कोणाशी काय बोलतात यावर क्राईम ब्रँच लक्ष ठेवून होती. या हवालदारांचे यश काही वरिष्ठ अधिकार्यांना पाहवले गेले नाही. त्यामुळे त्यांनी हे हवालदार गुन्हेगारांना मदत करीत आहेत असा ठपका त्यांच्यावर ठेवून त्यांना निलंबित केले. त्यामुळे अन्य कोणीही पोलीस कर्मचारी खबर्यांशी बोलण्यास धजावेना.
मात्र त्या पोलिसांनी मिळवलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी कसब पणाला लावत खून करणार्या गँगचा शोध घेतला, तेव्हा धक्कादायक प्रकार समोर आला. त्या गँगमधील गुन्हेगारांपैकी दोन तीन जण उच्चशिक्षित होते. एक इंजिनीयर होता. त्याचे वडील शाळेत शिक्षक होते. गँगस्टरांबरोबर राहणार्या नंबरकारींबरोबर (पंटर) तो कायम फिरत असायचा. पंटर लोकांचे राहणीमान उंची होते, महागडी अत्तरे, भारी जॅकेट, जीन्स, गळ्यात लॉकेट, ब्रँडेड बूट हे सगळे पाहून तो त्यांचा मित्र झाला. त्याने त्यांच्याशी दिल से मैत्री केली होती. या नादात तो अलगदपणे त्यांच्या गँगमध्ये ओढला गेला होता. हा इंजिनियर बेधडक आणि धाडसी स्वभावाचा होता, त्याला भाईगिरी करणे हे हिरोगिरी करण्यासारखे वाटत असे, तेव्हा घरच्यांनी देखील त्याच्याकडे लक्ष दिले नाही. आपल्याला विचारणारे कोणी नाही, अशी धारणा झाल्यामुळे त्याचा बेतालपणा वाढत गेला आणि गँगमध्ये तो मनापासून सहभाग घेऊ लागला होता. त्याचे राहणीमान देखील चैनीचे बनले होते.
दुसर्या एका चांगल्या घरातल्या मुलाला दोन वाईट मित्रांची संगत मिळाली आणि त्याची चांगली चाललेली गाडी बिघडून गेली. आपण भाई आहोत हे दाखवण्यासाठी सगळीकडे चमकोगिरी करण्याचे यांचे उदयोग सुरू असताना ते पोलिसांना सापडले होते. हे पाहून गँग नावाचा प्रकार किती भयंकर बनत चालला आहे, हे दिसून आले. वास्तविक पाहता गुन्हेगारीकडे वळणार्या तरुणांवर लक्ष ठेवण्यासाठी, त्यांचे कौन्सिलिंग करण्यासाठी, गुन्हेगारी प्रवाहातून त्यांना बाहेर काढून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याची गरज आहे, त्यासाठी पोलिसांच्या गुन्हे शाखेने विशेष प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.
पुण्यातल्या गँगचा इतिहास
पुण्यात १९६१ साली पानशेत धरण फुटून पूर आला. त्यानंतर पहिल्यांदा पुण्याचा कायापालट होण्यास सुरुवात झाली. त्यानंतर १९७०च्या दरम्यान रजनीश आश्रम पुण्यात आला. मोठ्या संख्येने विदेशी नागरिक पुण्यात राहायला आहे. त्यामुळे घरभाडे वाढले, महागाई वाढली. राहणीमानाचा स्तर उंचावला. पुण्यातील गुन्हेगारीला सुरुवात झाली ती साधारणपणे १९७० सालानंतर. त्यावेळी हे गुन्हेगारी विश्व मर्यादित होते कसब्यातील तारू गँग व मंडईतील जगताप गँग यांच्यात आपसात वाद होता, तो त्यांच्या दारू, मटका, गांजा, पत्त्याचे क्लब इत्यादीपुरताच मर्यादित होता. पुढे १९७५ ते ७७च्या दरम्यान आंदेकर टोळी उदयाला आली. त्या टोळीमध्ये आपसात वाद झाले आणि त्यातून माळवदकर टोळी तयार झाली. दोघांनीही एकमेकांच्या टोळीतील सदस्यांचे खून केले व वैर वाढतच गेले. माळवदकर टोळीने पुढे पिंपरी चिंचवड औद्योगिक क्षेत्रात पाय पसरायला सुरुवात केली आणि तिथे बस्तान बसवले. या टोळ्यांचा मुंबईतील काही टोळ्यांशी संपर्क होता. क्वचित प्रसंगी मुंबईतील गँगस्टरही पुण्यातील गँगस्टरांंना वापरून घेऊ लागले.
त्यानंतर खर्या अर्थाने पुण्याची हवा बदलली ती २००० साली. त्यादरम्यान पुण्यात आयटी कंपन्या आल्या आणि पुणे बेसुमार वाढू लागले. कामगारांचे संप, कंपन्यांना कामगार पुरवणारे कंत्राटदार, पाणी पुरवठा करणारे टँकरचालक, वाळू माफिया तयार होऊ लागले. त्यामधून टोळ्यांचा उदय झाला. या टोळ्या औद्योगिक वसाहतीपुरत्याच मर्यादित होत्या. नोकरी-व्यवसायानिमित्ताने पुण्यात येणार्या मंडळींचा वाढता ओघ पाहून मोठ्या प्रमाणात टाऊनशिप, गृहप्रकल्प उभे राहू लागले. बांधकामासाठी लागणार्या जागा कमी पडू लागल्या. एकाच जागेवर बांधकाम व्यावसायिकांचे खरेदीचे व्यवहार होऊ लागले. त्यावेळी जागेचा ताबा घेणे, जागेवरील बांधकामाला संरक्षण देणे, इत्यादी कारणासाठी माणसे लागू लागली. मुळशी, मावळ, या भागात पैलवानकीचा छंद मोठ्या प्रमाणात असल्याने सशक्त मुले आयतीत मिळू लागली. त्यासाठी बिल्डर लॉबीकडून मोठ्या प्रमाणात पैशाची रसद पुरवली जाऊ लागली. त्यामुळे या मुलांना हाताशी धरून गुंडांच्या टोळ्या तयार झाल्या. मुलांना नोकर्या नाहीत, कष्टाचे काम करण्यास कुणी तयार नाही. कमी श्रमात जास्त पैसे मिळवण्याचे साधन म्हणजे या टोळ्या. हे तरुण साहसी असल्याने हळुहळू चॉपरचा वापर मारामारी करण्यासाठी होऊ लागला. पुढे हीच मुले रिव्हॉल्वर, पिस्तूल यांचा वापर करू लागली, त्यामधून गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडू लागले.
महापालिका निवडणुका, विधानसभा निवडणुका या वेळेस या गुंड टोळ्यांची मदत घेतली जाऊ लागली. हळूहळू त्यांना राजकीय संरक्षण प्राप्त होऊ लागले. त्यामुळे ते कायद्याला जुमानेनासे झाले. या टोळ्यांच्या आपसात भानगडी होत्या. पुढे त्याची झळ सामान्य नागरिकांना बसू लागली. जागा खाली करून घेणे, पैशांची वसुली करणे, इत्यादिंसाठी या टोळ्या काम करू लागल्या. काही खलप्रवृत्तीच्या पोलिसांना हाताशी धरून या टोळ्या गुन्हे करू लागल्या. बर्याचदा खुनाच्या वेळी प्रत्यक्ष जागेवर असणारे मारेकरी वेगळेच असत व अटक होताना भलतेच कुणीतरी आरोपी हजर केले जात. ज्या अग्निशस्त्राचा वापर करून खून करण्यात आला, त्याच्याऐवजी दुसरीच अग्निशस्त्रे जप्त करण्यात येऊ लागली. त्यामुळे टोळ्यांमधील गुन्हेगार आणखीनच निर्ढावले.

प्रचलित भारतीय कायद्यानुसार सज्ञान मुलगा म्हणजे १६ वर्षाच्या वरील. त्याच्या आतील मुले ही अज्ञान असल्याने त्याच्यावर गुन्हा केला तरी नेहमीच्या न्यायालयात खटला चालवला जात नाही. त्यांना शिक्षा झाली तरी त्यांना तुरुंगात न ठेवता सुधारगृहात ठेवण्यात येते. त्याचा फायदा गुन्हेगारी टोळ्यांनी घेतला आणि १६ वर्षाखालील अज्ञान मुलांचा वापर ते गुन्ह्यात करू लागले. वाढती बेकारी, गुन्हेगारीचे आकर्षण, कमी श्रमात अधिक चैन यासाठी तरुण मुले आपोआपच टोळ्यांमध्ये सामील होऊ लागली. या टोळ्यांमधील सदस्य हे ‘भाई’ म्हणून ओळखले जाऊ लागले. या भाईंच्या वाढदिवसाचे फ्लेक्स रस्त्यावर चौकाचौकात झळकू लागले. भर रस्त्यावर तलवारीने केक कापून ते साजरे होऊ लागले. रात्री उशिरापर्यंत वाढदिवसाचे कार्यक्रम साजरे होऊ लागले. जोराने आवाज करत मोटारसायकलचे जथे फिरताना दिसू लागले. भर दिवसा मोटारसायकलवरून ट्रिपल सीट जाणे, फुटपाथवरून गाडी दामटणे, फुटपाथवर अनधिकृतपणे व्यवसाय करणे, खाद्यपदार्थांच्या हातगाड्या रात्रभर सुरू ठेवणे, अशा छोट्या-छोट्या गुन्हेगारी कृतींचा परिणाम जनमानसातील खलप्रवृत्तीच्या मुलांमध्ये होत गेला. कायदा मोडण्याची त्यांची मानसिकता वाढू लागली. ही मुले मोठे गुन्हे करू लागली. यामध्ये पथारी व्यावसायिकांकडून हप्ते घेणे, हॉटेल व्यावसायिकांवर दादागिरी करणे, लहान-मोठे अवैध धंदे करणे, त्यामधून त्यांना मोठी अर्थप्राप्ती होऊ लागली.
पुण्यातील महाविद्यालयांत बाहेरून शिक्षणासाठी येणार्या तरुणांची संख्या मोठी आहे. आयटी कंपनीत काम करणारे अभियंते तरुण असतात. अशी मुले व स्थानिक तरुण चंगळवादी संस्कृतीकडे वळू लागले. त्यातून मद्यविक्रीचा व्यवसाय तेजीत आला. शहरामध्ये पब संस्कृती उदयाला आली आणि ती फोफावत गेली. जोपर्यंत या पब्जची वेळ मर्यादित होती, तोपर्यंत तेथील मुले मद्याच्या अंमलाखाली दोन ते तीन तास नाचत. परंतु हे पब्ज पहाटेपर्यंत चालू राहिल्याने सहा-सात तास नाचण्यासाठी मद्याचा वैâफ अपुरा पडू लागला आणि ती मुले मेफेड्रोन, हशीश, चरस, इत्यादी अमली पदार्थांकडे वळू लागली. ड्रग अॅडिक्ट बनू लागली. पुण्यात अलीकडच्या काळात ड्रग्जचे मोठे-मोठे साठे पकडण्यात आले. ड्रग्ज आणि पब यांचा ‘चोली दामनाचा’ रिश्ता आहे. यासाठी पबची संख्या कमी करण, दिलेल्या वेळेतच पब चालवणे, ड्रगच्या रॅकेटची पाळेमुळे खणणे अत्यंत गरजेचे आहे.
या टोळ्यांव्यतिरिक्त गुन्हेगारी प्रवृत्तीचे धाडस अंगी असणारी मुले लहान समूहात एकत्र येऊन गुन्हे करू लागली. गुंत्यात वापरण्यात येणारी शस्त्रे उदा. चॉपर, छोट्या तलवारी, अगदी सहज आणि कमी किंमतीमध्ये मिळू लागल्याने अशा शस्त्रांचा वापर सहजपणे होऊ लागला. यापूर्वी लाथा-बुक्क्यांनी होणार्या हाणामारीची जागा चॉपरने घेतली. सर्व भाई जनमानसात दहशत व्हावी म्हणून समाजमाध्यमे वापरू लागली. गुन्हेगारी कृत्यांचे रिल्स तयार होऊ लागले, त्याकडे अनेक तरुण आकर्षित झाले. गुन्हेगारीकरण वाढू लागली. या गुन्हेगारावर वेळीच कारवाई करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणायला हवे.
सात आठ वर्षांपूर्वीपर्यंत पुण्यात १३ ते १४ टोळ्या सक्रिय होत्या. परंतु आज पुण्यातील टोळ्यांचा आकडा ८२च्या घरात गेलेला आहे. अलीकडच्या सहा-सात वर्षात तरुण मुलांवर म्हणजे साधारणतः २० ते २५ या गटातील मुलांवर मोका मोठ्या प्रमाणावर लावण्यात आलेला आहे. साधारणता १५० ते २०० टोळ्यांवर मोका लावण्यात आला आहे. कमीत कमी पाच सदस्य एका टोळीत असतात, म्हणजेच एकूण ८०० ते १००० लोकांवर मोकाची कारवाई करण्यात आली. या कायद्यात आरोपीने गुन्हेगारीच्या पैशातून स्थावर मालमत्ता विकत घेतल्या आहेत, वगैरे पुरावा कोर्टात सिद्ध करावा लागतो. तो सिद्ध न झाल्यास कोर्ट आरोपींना जमिनीवर सोडते. असे सात-आठशे आरोपी जामिनावर तीन-चार वर्षात बाहेर आलेले आहेत. या आरोपींच्या गळ्यात मोकाची पाटी आहे, त्यामुळे समाज त्यांना स्वीकृत करत नाही. मोकाचे क्वालिफिकेशन त्यांच्याकडे असल्यामुळे ही मुले छोटे छोटे गुन्हे करण्यास प्रवृत्त होतात. त्यातून गँगच्या पोटातून गँग वाढतच आहेत.
(लेखक पुण्याचे निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त आहेत.)

