
संतोषराव, तुमच्या नाटकाच्या प्रयोगात अचानक एखादा बिबट्या रंगमंचावर आलात तर काय कराल?– रंजना फातर्फेकर, रत्नागिरी
आम्ही काय करणार? जे काही करायचे ते बिबट्या करणार… नंतर तुम्हीच म्हणाल एका महान नटाला बिबट्याने कचाकचा खाल्ला (तुम्ही नको ते विचारता, मग आम्ही स्वतःला महान नट म्हटलं तर काही बिघडलं?)
महाराष्ट्रात बिबट्यांच्या प्रश्नावर अनेक लोक उपाय सुचवू लागले आहेत. कोणी त्यांची नसबंदी करायला निघालंय, कोणी जंगलात शेळ्या सोडतंय, कुणी बिबट्यांना पाळायचा सल्ला देतोय… एक ज्येष्ठ कलाकार म्हणून तुम्ही काय उपाय सुचवाल या प्रश्नावर? – श्रीपाद बेंद्रे, सोलापूर
आधी लोकांना तूप रोटी खाऊ दे, जाडजूड होऊ दे, मग बिबट्याने खाऊ दे. या पलीकडे १०१ उपाय सुचवणार्या ‘हुशार’ लोकांना आम्ही काय उपाय सुचवणार? (लोकांना फुकट धान्य देणारे बिबट्यांना फुकट शेळ्या देतायत तर खाऊ दे की त्या बिबट्यांना, की त्या देणार्यांनी लाडकी बिबटीण म्हणून दीड हजार किंवा दहा हजार द्यायचे?? देणार्यानी तेही दिले असते, पण नंतर परत खर्या लाडक्या कोण आणि नावडत्या कोण शोधायचा त्यांनाच बिचार्यांना त्रास…)
महाराष्ट्रात बिबटे इतके आक्रमक झालेले आहेत तर त्यांच्यावर ईडी लावण्याचा, सीबीआय चौकशी करण्याचा उपाय का योजत नाहीये आपलं सरकार?– स्नेहा पाटील, उमरगा
नंतर सगळे बिबटे आम्हाला पण तुमच्या पक्षात घ्या असं सरकारच्या मागे लागले तर? तर बिबट्याच्या गळ्यात उपरणं कोण घालणार? गाढवाला वाघाची झूल पांघरण्या इतकं सोपं नसत ते…
आपल्या देशात अमृतकाळ आलेला असताना, देशाचा डंका सगळ्या जगात वाजत असताना हा देश कायमचा सोडून जाणार्या कोट्यधीशांची संख्या सध्या सगळ्यात जास्त वेगाने वाढते आहे? असा मूर्खपणा का करावासा वाटत असेल या लोकांना? – निनाद शाळिग्राम, श्रीरामपूर
मग तुमचं काय म्हणणं आहे, असा मूर्खपणा तुम्ही आम्ही करावा? मग इथे राहून वंदे मातरम कोण म्हणणार? प्रत्येक गोष्टीवर
टॅक्स कोण भरणार? जातीधर्मासाठी कोण कोणाला मारणार? सगळ्यांना विदेशात पळवून लावल्यावर, पळवून लावणारे राज्य कोणावर करणार? बँकांना लुटणारे पळून जातील हो, मग बँकांकडून कर्ज घेऊन ते आयुष्यभर कोण फेडत मरणार? पळून जाण सोपं असतं, जो इथे राहतो तो खरा हिम्मतवान असतो (असं स्वतःला समजवा, म्हणजे बरं वाटेल स्वतःला).
शाळेत शिकवतात की खोटं बोलणं पाप आहे, सदैव खरं बोलावं. पण, सतत खोटं बोलत राहिलं तर माणूस देशातल्या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचू शकतो, हे बाहेरचं चित्र असेल तर मग मुलं खरं का बोलतील? त्यांना खोटंच बोलावंसं वाटेल ना कायम?
कोणालाही खोटं बोलावसं ढीग वाटेल, पण ते खोटं कसं खरं आहे हे लोकांना पटवून देणारे तयार करावे लागतात. त्यासाठी जगाला माहीत असलेला इतिहासही कसा खोटा आहे हे सांगावं लागतं आणि तसा इतिहास मुलांना शिकवावा लागतो. म्हणजे म्हणजे तीच मुलं पुढे जाऊन हा ‘नवा’ इतिहासच कसा खरा आहे हे जगाला सांगतील… एवढं करूनही मुलं तसं शिकणार नसतील, तर शाळाच बंद कराव्या लागतात. थोडक्यात फक्त खोटं बोलून भागत नाही, तर खोटेपणा करून वागावंसुद्धा लागतं. आणि हे तुमच्या आमच्या खोटं बोलण्याएवढं सोपं नसतं.
ज्यांना वंदेमातरमचं एकही कडवं गाता येत नाही, ज्यांच्या विचाराचा एकही माणूस वंदेमातरम गात फासावर चढलेला नाही, ज्यांच्या उपक्रमांमध्ये वंदेमातरम गायलंही जात नाही, ते इतरांना वंदे मातरम गाण्याची सक्ती कशी करू शकतात?– विनोद चुरी, पालघर
जे वंदे मातरम गाण्याची जबरदस्ती करतात त्यांना ते गाता येत नाही म्हणूनच तर ते दुसर्यावर त्याची जबरदस्ती करतात हे समजून घ्या ना! अहो, जे वंदे मातरम गात नाहीत, त्यांना हे फासावर चढवत नाहीत हे नशीब समजा. की वंदे मातरम गायला पाहिजे असा कायदा करावा लागेल? (पण त्यामुळे आपणच अडचणीत येऊ असं कायदा करणार्यांना वाटत असेल, म्हणून आतापर्यंत असा कायदा झाला नसेल.)
घरात सून आल्यावर प्रत्येक सासू आपणही कधीतरी सून होतो, हे कशी विसरते. आपणही कधीतरी सासू होणार आहोत, याचा सुनेलाही विसर कसा पडतो?– पांडुरंग शिगवण, चेंबूर
काय झालंय पांडुरंगराव? तुमच्या रखुमाईमध्ये आणि सुनेमध्ये तुमचं ‘भज’न होतंय का? तुम्ही कोणाचीही बाजू घेऊ नका, जे जे होते ते ते पाहावे चित्ती असू द्यावे समाधान… अनुभवाचे बोल आहेत हे… कित्येकांच्या, फक्त आमच्या नाही.
