विश्वगुरू नरेंद्रजी मोदीजी यांना त्यांचे लाखो अंधभक्त ज्याअर्थी मानतात. त्यांच्यापाशी नक्कीच काहीतरी वेगळेपण असलंच पाहिजे, जे भाजपाच्या इतर नेत्यांपाशी नाही, असं माझा मानलेला परमप्रिय पोक्या मला म्हणाला, तेव्हा मला काहीच आश्चर्य वाटलं नाही. उलट मीच त्याला म्हणालो की अशी दैवी शक्ती असलेली माणसं युगायुगातून एकदाच जन्माला येतात हे आपलं आणि या देशाचं परमभाग्य आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सुद्धा अमेरिकेला लाभलेलं दैवी वरदानच आहे. तुला आपले विश्वगुरू मोदीजी यांच्या महानतेविषयी अधिक जाणून घ्यायचं असेल तर तू एखाद्या निष्ठावंत अंधभक्ताची मुलाखत घे. तो तुला या विश्वरूपाचं साग्रसंगीत दर्शन घडवील. पोक्याने ते मनावर घेतलं आणि तो तडक मुंबईतल्या कट्टर अंधभक्तांची मुलाखत घेऊन आला. तिचाच हा काही अल्पांश-
-नमो नम:
-नमो नम: का येणं केलंत?
-विश्वगुरूंविषयी अधिक जाणून घेण्यासाठी.
-या भारतभूमीचा उद्धार करण्यासाठीच त्यांनी या देशात जन्म घेतला. कधी ते चहावाला बनले, कधी गुजरातचे मुख्यमंत्री बनले, कधी देशाचे पंतप्रधान बनले. त्यांचे विविध अवतार पाहिले तर ते सामान्य माणूस कधीच नव्हते.
-म्हणूनच त्यांच्या जीवनाचं गूढ तुमच्याकडून जाणून घ्यायचंय. त्यांच्या ज्ञानाविषयी, शिक्षणाविषयी, पदवीविषयी, राजकीय प्रवासाविषयी, भौतिक संसाराविषयी, त्यांना होणार्या साक्षात्काराविषयी, त्यांच्या हिटलरप्रेमाविषयी, राममंदिराविषयी, त्यांना वाटणार्या काँग्रेस आणि नेहरू घराण्याच्या द्वेषाविषयी.
-हे बघा. तुम्ही असं वाकड्यात जाऊन बोलू नका. त्यांनी किती अफाट आणि बेफाट देशकार्य केलंय त्याची तुम्हाला कल्पना नाही. ते अयोध्याचं राममंदिर एकदा बघून या, म्हणजे कळेल त्यांचं कार्य किती महान आहे ते.
-मग त्याच निवडणुकीत त्याच मतदारसंघात त्यांच्या भाजपाचा पराभव का झाला?
-त्याची कारणं स्थानिक आहेत. त्याला विश्वगुरू जबाबदार नाहीत.
-मंदिर परिसरातल्या हजारो कुटुंबांना जुलूम जबरदस्तीने बेघर केलं तिथल्या भाजपाच्या योगी सरकारने. हा कुठला न्याय? मग तो श्रीराम तुम्हाला पावणार तरी कसा?
-बघा पावतो की नाही! बिहार विधानसभा निवडणुकीत आचारसंहिता जाहीर होण्याआधी विश्वगुरूंना तिथल्या गरीब जनतेची दया आली आणि त्यांनी त्या लाखो लाडक्या बहिणींच्या खात्यात पंधरा-पंधरा हजार रुपये टाकले. या आधी कोणी दाखवली होती इतकी माया त्या लाडक्या बहिणींविषयी? आता बोला!
-म्हणजे पंधरा-पंधरा हजाराची लाच देऊन मतं विकत घेतली ना भाजपाने! आताही त्यांचं तेच सुरू होतं महाराष्ट्रात. सगळा पैशांचा खेळ. बाजार मांडला होता लोकशाहीचा, संविधानाचा आणि निवडणुकीतील भ्रष्टाचाराचा. त्यात बोगस मतदार, सदोष मतदार याद्या आणि ईव्हीएममधली हेराफेरी. अशा गुंडगिरीने, झुंडशाहीने आणि उघड उघड पैसे वाटपाने का नाही निवडणुका जिंकणार?
-हे बघा, वाटेल ते बोलू नका. भाजपा ही पवित्र पार्टी आहे. सत्तेवर येण्यासाठी काही गोष्टी कराव्याच लागतात. भाजपा महायुती ते प्रेमाने करते. संघाचे संस्कार आहेत आमच्यावर.
-म्हणून तर दुसरे पक्ष फोडून, त्यांच्या निशाण्या चोरून, निवडणूक आयोगाला हाताशी धरून खर्याचं खोटं आणि खोट्याचं खरं करून दाखवलं ना तुमच्या विश्वगुरू आणि महागुरूंनी. सगळ्या पक्षातला भ्रष्टाचार्यांना ईडीचा धाक दाखवून घातले ना वॉशिंग मशीनमध्ये आणि केले ना शुद्ध! याला चारसोबीसगिरी म्हणतात.
-पक्ष वाढवण्यासाठी केलेली ही तडजोड असते.
-मग लढा म्हणावं स्वबळावर आणि जिंका निवडणुका.
-त्याच दिशेने वाटचाल करण्याचा आदेश दिलाय विश्वगुरूंनी. हळूहळू विश्वगुरू सपोर्ट काढून टाकतील अजितदादांच्या नकली राष्ट्रवादीचा आणि शिंदेच्या नकली शिवसेनेचा. ते काहीही असूं दे, पण विश्वगुरू पंतप्रधान झाल्यापासून देशाचा किती कायापालट करून टाकलाय त्यांनी तो पाहताय ना! मेट्रो काय, मोनो काय, झकपक रेल्वे स्टेशन्स काय, अगदी कहर केलाय त्यांनी विकासकामांचा.
-तरीही खेड्यापाड्यात जीव धोक्यात घालून नदी-नाले ओलांडून शाळेत जाणारी मुलं, खडकाळ वाटांमधून मार्ग काढत डोलीतून शेजारच्या गावातील रुग्णालयात बाळंत होण्यासाठी जाणार्या स्त्रिया, अपुर्या आरोग्यसेवा, खाचखळग्यांचे रस्ते दाखवतात किती विकास झालाय देशाचा ते. यांच्या राज्यात गुंड नंग्या तलवारी नाचवत फिरतात पुण्यासारख्या शहरी आणि ग्रामीण भागात. कायदा-सुव्यवस्थेचे तर बारा वाजवलेत यांनी. सरपंच देशमुखांची निर्दयपणे हाल हाल करून हत्या करणारा वाल्या कराड अजून फासावर जात नाही. त्याची आठवण काढून गहिवरणारे त्यांचे जिवलग मित्र आणि बीडमधल्या दादागिरीतले कराडचे सहकारी यांच्यावर अजून कारवाई होत नाही. यांच्या गृहराज्यमंत्र्याचे पिताश्री डान्सबार चालवतात, यांचे एक मंत्री घरात बॅगेतील नोटांची बंडलं मोजत बसतात. रेल्वेगाड्यातील गर्दीत मुंग्यासारखी चिरडून माणसं खाली पडून मरतात. महिलांच्या हत्या, बलात्कार, शाळकरी मुलांवर होणारे अत्याचार यांना सीमाच राहिलेली नाही. उलट, अपराध्यांना कसं वाचवता येईल याचाच विचार सरकार करतं. यालाच विकास म्हणतात का, हे विचारून घ्या एकदा तुमच्या विश्वगुरूंना. आता का दातखिळी बसली?