बॉलीवूड उत्तर प्रदेशला नेण्यासाठी मुंबईत येणार अशी वातावरण निर्मिती करणारे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बॉलीवूड मुंबईबाहेर नेणे म्हणजे एखाद्याच्या खिशातील पाकीट मारण्याएवढे सोपे नाही अशी जाहीर कबुली आज दिली. मुंबईतील फिल्म सिटी आहे तशीच काम करीत राहील. आम्ही काहीही हिसकावून घेत नाही. मात्र उत्तर प्रदेशात जागतिक दर्जाची फिल्म सिटी उभारण्याची योजना आहे. त्यासाठी नोएडाजवळ एक हजार हेक्टर जमीन खरेदी करणार आहोत अशी सारवासारव करण्यास योगी आदित्यनाथ विसरले नाहीत.
उत्तर प्रदेशात फिल्म सिटी उभारण्यात येणार असल्याची मागील अनेक काळापासून चर्चा होती. मुंबईच्या दौऱयावर योगी यांनी अधिकृत घोषणा केली. मुंबई दौऱयावर आलेल्या योगी आदित्यनाथ यांची मंगळवारी अभिनेता अक्षय कुमार यांच्यासह काही गायक व निर्मात्यांनीही भेट घेतली. या दौऱयात योगी आदित्यनाथ बॉलीवूडच्या सेलिब्रेटींची हॉटेल ट्रायडंटमध्ये भेट घेत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवक्त्या विद्या चव्हाण यांनी आंदोलनही केले. उत्तर प्रदेशमधील महिला अत्याचारांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिलांनी उत्तर प्रदेश सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही केली.
या सर्व पार्श्वभूमीवर योगी आदित्यनाथ यांची पत्रकार परिषद झाली. उत्तर प्रदेशात जागतिक दर्जाची फिल्म सिटी उभारण्याचे काम आम्ही करीत आहोत. या क्षेत्रातील कलाकार, दिग्दर्शक, निर्मात्यांशी आमची चर्चाही झाली आहे. नोएडा यमुना प्राधिकरणाजवळ ही फिल्म सिटी उभारण्याची योजना आहे. या ठिकाणांहून उत्तर प्रदेश, दिल्ली आग्रा, मथुरा व देशातील इतर भागांशी जोडणारी दळणवळणाची सर्व साधने असतील. सिनेसृष्टीतील कलाकारांनीही त्यामध्ये स्वारस्य दाखवल्याचा दावा योगी आदित्यनाथ यांनी यावेळी केला.
मुंबईतील फिल्म सिटी उत्तर प्रदेशला नेण्याची योजना आहे का, असा प्रश्न पत्रकारांनी केला. त्यावर कोणीही काहीही हिसकावून घेणार नाही. सर्व खुली स्पर्धा आहे. कोण चांगल्या सुविधा देते यावर सर्व अवलंबून आहे. मुंबईतील फिल्म सिटी काम करीत राहील आणि उत्तर प्रदेशातील फिल्म सिटी आपले काम करील असे ते म्हणाले.
पाकीट मारण्याएवढे सोपे आहे का?
बॉलीवूड इंडस्ट्री मुंबईबाहेर नेणे म्हणजे एखाद्याच्या खिशातले पाकीट मारण्याइतकी सोपी गोष्ट आहे का, असा प्रतिप्रश्न योगी आदित्यनाथ यांनी पत्रकारांना केला. आम्हाला कोणाची गुंतवणूक पळवायची नाही किंवा कोणाच्या विकासात अडथळाही आणायचा नाही. मी काहीही हिसकावून घेण्यासाठी मुंबईत आलो नाही, असा खुलासाही त्यांनी यावेळी केला.
सौजन्य- सामना