मराठीत विडंबनकाव्याची पताका रोवणार्या ‘झेंडूची फुले’ या आचार्य प्र. के. अत्रे यांच्या कवितासंग्रहाचे हे शतक महोत्सवी वर्ष लेखक, संपादक, कवी, नाटककार, चित्रपट दिग्दर्शक, पत्रकार, राजकारणी पुढारी अशी नानाविध क्षेत्रे दणाणून सोडणार्या आचार्य अत्रे यांच्या महाप्रचंड व्यक्तिमत्त्वामधली ही मिश्किल बाजू उलगडून दाखवणारा कार्यक्रम नुकताच पुण्यात सादर झाला. त्या कार्यक्रमाची ही संपादित संहिता. ‘झेंडूची फुले’ ही काय गंमत होती ते उलगडून सांगणारी.
– – –
आम्ही कोण?
केशवसुत, क्षमा करा.
‘आम्ही कोण?’ म्हणून काय पुसता दाताड वेंगाडुनी ‘फोटो’ मासिक पुस्तकात न तुम्ही का आमुचा पहिला? किंवा ‘गुच्छ’ ‘तरंग अंजली’ कसा अद्याप नावाचिला? चालू ज्यावरती अखंड स्तुतीचा वर्षाव पत्रातुनी? ते आम्ही परवाङ्मयातील करू चोरून भाषांतरे ते आम्ही- न कुणास देऊ अगदी याचा सुगावा परी! डोळ्यादेखत घालुनी दरवडा आम्ही कुबेराघरी!
त्याचे वाग्धन वापरून लपवू
ही आमुची लक्तरे ।।
काव्याची भरगच्च घेऊनि सदा
काखोटिला पोतडी ।
दावू गाउनि आमुच्याच कविता आम्हीच रस्त्यामध्ये दोस्तांचे घट बैसवून करूया आम्ही तयांचा ‘उदे’ दुष्मनावर एकजात तुटुनी की लोंबवू चामडी आम्हाला वगळा-गतप्रणी झणी होतील साप्ताहिके आम्हाला वगळा- खलास सगळी होतील ना मासिके
(पहिली आवृत्ती, १९२५)
केशवसुतांच्या कवितेचे हे उत्कृष्ट अनुकरण आहे. ही केशवकुमारांची प्रसिद्ध झालेली पहिली विडंबन कविता. लटपट्या कवींची आत्मप्रौढी, प्रसिद्धीलोलुपता, काव्यगायनाचे अनावर वेड, परस्परप्रशंसा करून स्वतःच्या लोकांचा उदोउदो आणि विरोधकांवर सामुदायिकपणे टीका करणे, वाङ्मयचौर्य, मत्सरीपणा या गोष्टींवर विडंबनाचा खरा कटाक्ष आहे.
‘आम्ही कोण?’ ही कविता ‘ज्ञानप्रकाश’ दैनिकाच्या ‘काव्यशास्त्रविनोद’ या सदरात प्रसिद्ध झाली, तेव्हा रविकिरण मंडळाच्या सभासदांत बरीच खळबळ उडाल्याची बातमी माझ्या कानावर आली. तेव्हा ‘गोळी लागली रे लागली’ अशी खात्री होऊन मी एकामागून एक विडंबनात्मक कविता प्रसिद्ध करायला सुरुवात केली, अशी आठवण ‘पठाण क्लब’चे एक फकीर शं. कृ. देवभक्त यांनी ‘माझ्या पाहण्यातले बाबुराव’ (आचार्य अत्रे विविध दर्शन, मुंबई, १९५४, पृ.क्र. १२५) यांत लिहिले आहे.
आचार्य अत्रे स्वत: लिहितात, कवितेमधल्या शाब्दिक दोषांचेच केवळ मी विडंबन केले नाही, तर कवितेसाठी निवडलेल्या विषयांची आणि काव्यात ठिकठिकाणी प्रकट झालेल्या कवींच्या स्वभावाचीही मी माझ्या विडंबनामध्ये दखल घेतली. काही विनोदी कविताही मी त्या ओघात लिहून काढल्या. २२ सालच्या मे महिन्यात मी ‘झेंडूची फुले’ लिहिले, तरी त्याचे हस्तलिखित जवळजवळ चार वर्षे माझ्याजवळ तसेच पडून होते.
इतिहासाचार्य राजवाडे यांच्या अध्यक्षतेखाली पुण्याच्या भारत इतिहास संशोधन मंडळामध्ये शारदोपासक संमेलन भरले होते. त्यामध्ये एका संध्याकाळी ‘झेंडूच्या फुलांचा’ वाचन करण्याचा योग आला. कोणीतरी फावल्या वेळची करमणूक म्हणून मला कवितावाचनाचा आग्रह केला. असे काहीतरी घडणार याची मला कुणकुण लागली होती, म्हणून मी हस्तलिखित बरोबर घेऊन गेलो होतो. भीत भीत मी टेबलाजवळ गेलो. हलक्या आवाजात कवितावाचनास सुरुवात केली. पहिल्या दोन ओळी वाचल्या नाहीत तोच बैठकीतले वातावरण एकदम बदलले. ही काहीतरी नवीन भानगड आहे असे प्रत्येकाला वाटले. पहिली कविता वाचून होताच सारे मुक्तकंठाने हसू लागले. रविकिरण मंडळाच्या कविता त्यांपैकी बहुतेकांच्या उत्तम परिचयाच्या होत्या. त्यातील गुण-दोषांची त्यांना चांगलीच कल्पना होती, म्हणूनच आपल्या मनातली टीका असे विनोदी स्वरूप धारण करून काव्यरूपाने प्रगट झालेली पाहून त्या मंडळींना मनस्वी मौज वाटली. त्यानंतर दोन महिन्यांनी ‘झेंडूची फुले’ची पहिली आवृत्ती मी प्रसिद्ध केली. ती पाच-सहा महिन्यांच्या आतच फस्त झाली. झेंडूच्या फुलांमधील विडंबनाचा भाग वजा करूनही त्यातील स्वतंत्र विनोदी भागही रसिकांना आवडतो.
या ठिकाणी विडंबनकाव्यासंबंधी माझे काही विचार सांगणे आवश्यक आहे. काहीतरी विषय घेऊन अद्वातद्वा रचना केली म्हणजे विडंबनकाव्य होतें, अशीच बहुतेक विडंबनकारांची समजूत दिसते. ही समजूत चुकीची आहे. विडंबनकारांची वाङ्मयीन अभिरुची फारच उच्च दर्जाची असावी लागते. वाङ्मयाच्या शुद्ध आणि अभिजात परंपरा काय आहेत ह्याचें त्याला यथार्थ ज्ञान असावें लागतें. त्या बाबतींत त्याची वृत्ति जितकी खाष्ट आणि चोखंदळ असेल तेवढी चांगली.
उत्तम जेवणार्याचें नाक आणि जीभ भारी तिखट असावी लागते. कुठें काय बिघडलें ह्याचा त्याला चटकन वास आला पाहिजे. कोणता मालमसाला कुठें जास्त पडला आणि कुठें कमी पडला हें ताबडतोब त्याच्या चवीला समजलें पाहिजे. तसें विडंबनकाराचें आहे. त्याचा ‘कान’ इतका तयार असावा लागतो कीं, काव्यामधलें शब्दसंगीत आणि ध्वनिसौंदर्य कुठें साधलें आहे अन कुठें बिघडलें आहे, हें चटकन त्याच्या ध्यानांत आलें पाहिजे. ह्याचाच अर्थ हा कीं, काव्यरचनेच्या तंत्रावर प्रभुत्व असल्यावांचून आणि काव्याच्या अंतरंगातल्या बारीकसारीक मख्खींचें मार्मिक ज्ञान असल्याखेरीज विडंबनकाव्य लिहितां येणें अशक्य आहे. सर्कशीमध्यें विदूषक घोड्यावर बसण्याचें विडंबन करून जो हंशा पिकवतो त्याचें एकच कारण, म्हणजे तो स्वत: पट्टीचा घोडेस्वार असतो. स्वतः निर्दोष काव्य जो लिहूं शकतो, तोच दुसर्याच्या काव्यामधल्या दोषांचें यशस्वीपणे विडंबन करूं शकतो. सारांश, विडंबनकाव्य हा वाङ्मयीन टीकेचा एक अत्यंत सुसंस्कृत आणि प्रभावी प्रकार आहे. विडंबनाचें हत्यार फारच कोमलतेने आणि कौशल्यानें वापरायला हवें. ‘विडंबन’ या शब्दाचा अर्थ ‘हास्यास्पद नक्कल करणें’ किंवा ‘वेडावण्या दाखवणें’ असा नव्हे, ‘विडंबन’ म्हणजे ‘विटंबना’ नाहीं.
विडंबन हा एक विरोधी भक्तीचा प्रकार आहे. ह्या दृष्टीने पाहिलें म्हणजे एखाद्या कवीचें विडंबन करणें म्हणजे ह्या कवीबद्दल अप्रत्यक्षपणें आदर व्यक्त करण्यासारखें आहे, असेंच म्हणावें लागेल. मी विडंबन काव्य लिहावयास सुरुवात केली, त्यापूर्वी मराठी भाषेंत कोणी विडंबन काव्यें लिहिलींच नव्हतीं, असे समजण्याचें कारण नाहीं. माझ्या लहानपणीं अण्णासाहेब किर्लोस्करांच्या ‘सौभद्र’ नाटकांतील ‘पांडु नृपति जनक जया’ या लोकप्रिय गाण्याचें ‘पांडु न्हावि जनक जया’ हे विडंबन सुप्रसिद्ध होतें. संस्कृत भाषेंतल्या ‘अमरकोशा’चें विडंबन तर अनेक लोकांच्या तोंडून त्यावेळी ऐकूं येत असे. उदाहरणार्थ, ‘खिडकीर्वातायनो धुइन्डो । गवाक्षो भोंक भिंतिला’ अथवा ‘हजामो बार्बरो न्हावी। नापिको केसकातर:’ इत्यादि.
पण माझ्या आधीं महाराष्ट्रांत विडंबन काव्य जर कोणी लोकप्रिय केलें असेल तर तें सुप्रसिद्ध विनोदी नाटककार माधवराव जोशी ह्यांनी. त्यांनी आपल्या ‘विनोद’ ह्या नाटकांत विडंबनकाव्याची मेजवानीच दिली. खाडिलकरांच्या नाटकांमधील पद्यांवर त्यांचा विशेष डोळा होता. उदा., ‘मानापमान’ नाटकांतील नायक धैर्यधराचें पहिलेंच जें पद ‘माता दिसली समरी विहरत नेत सकल नरवीर रणाशीं । माता!’ ह्याचें माधवरावांनीं जें कमालीचें हास्यकारक विडंबन केलें तें असें : ‘माता बसली स्वगृही रखडत, घांशित ताटपळ्यांशि तव्यांशीं। माता!’
‘विद्याहरण’ नाटकांतील ‘कचचूर्णं चाखितां । मजा आला’ ह्याचें विडंबन त्यांनीं ‘गजकर्ण खाजवितां मजा आला!’ ह्या पदानें केलें, तेव्हां प्रेक्षकांची हंसतां हंसतां पोटें दुखूं लागलीं!
माधवरावांच्या ह्या काव्याचा माझ्या मनावर त्यावेळीं (म्हणजे १९१२ सालीं) एवढा परिणाम झाला कीं, खाडिलकरांच्या ‘मला मदन भासे। हा मोही मना ।’ ह्या गाण्याचें मी ‘मला मटन ताजें । आणा आधीं । अंडीं तरी तीं येतिल कधीं?’ असें ताबडतोब विडंबन केलें. अर्थात् तें केवळ माझ्या मित्रमंडळींसाठीं होतें, हें सांगावयाला नको.
रविकिरण मंडळाच्या कवींचें जे मी विडंबन केलें, त्याचें स्वरूप आणि त्याचा दर्जा ह्यापेक्षां वेगळा होता. तो एक वाङ्मयीन टीकेचा प्रकार होता. पटवर्धनांनी आपल्या काव्यांत उर्दू, फार्शी आणि गद्य शब्दांची जी धेडगुजरी आणि बेंगरूळ भेसळ केली, तिची थट्टा करण्यासाठीं मीं त्यांच्या काव्याचें विडंबन केलें. उदाहरणार्थ, ‘उन्हाळे पावसाळे अन हिंवाळे लोटले भगवन’ किंवा ‘किति मैल अंतर राहिलें अपुल्यात सद्गुणसुंदरी?’ अथवा ‘वन्दे त्वमेकम् अल्लाहु अक्बर!’ ह्या माधवरावांच्या काव्यामधला त्यांचा शाब्दिक विक्षिप्तपणा पाहून कोणाला हंसू येणार नाहीं बरें?
१९२७ सालच्या मे महिन्यात श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांच्या अध्यक्षतेखाली पुण्यामध्ये साहित्य संमेलन भरले होते. त्या संमेलनात किर्लोस्कर नाट्यगृहात काव्यगायनाच्या प्रसंगी मी ‘झेंडूची फुले’मधील काही कविता वाचून दाखविल्या. अर्धा तासपर्यंत सारे नाट्यगृह हशा आणि टाळ्यांच्या कडकडाटाने अगदी दणाणून गेले. ‘झेंडूच्या फुलां’चा महाराष्ट्रीय रसिकांनी केलेला तो पहिला जाहीर सत्कार होता.
रविकिरण मंडळाच्या काही सभासदांनी ही गोष्ट मुळीच भावली नाही. त्यांनी तात्यासाहेबांकडे श्रीकृष्ण कोल्हटकर याबद्दल तीव्र नापसंती व्यक्त करावी, अशी इच्छा व्यक्त केली आणि आपल्या उपसंहाराच्या भाषणात त्यांनी ‘झेंडूच्या फुलां’ची कडक निर्भत्सना केली. तात्यासाहेबांच्या तोंडून निघणारे कटू शब्द अगदी चाबकाच्या फटकार्यांप्रमाणे माझ्या काळजाला झोंबले आणि माझ्या डोळ्यांत अश्रू उभे राहिले. गंमत म्हणजे ‘झेंडूच्या फुलां’वर तात्यासाहेबांनी स्वहस्ते विस्तृत अभिप्राय लिहून माझ्या विडंबनकाव्याची मुक्तकंठाने स्तुती केली. काही काळानंतर रविकिरण मंडळाच्या सभासदांच्या मनामधली माझ्याविषयीची अढीही उलगडून गेली आणि ‘झेंडूची फुले’मधील विनोदाचा आस्वाद अगदी निःसंकोचपणे आणि मनमोकळेपणाने घेण्यासारखी त्यांची मनःसिथती झाली. अनेक वेळी तर एकाच व्यासपीठावरून आम्ही सर्वांनी आपापल्या कविता म्हणून दाखविल्या आहेत.
– – –
‘प्रेमाचा गुलकंद’
बागेतुनि वा बाजारातुनि कुठुनि तरी ‘त्या’ने
गुलाबपुष्पे आणुनि द्यावेत ‘तिज’ला नियमाने!
कशास सांगू प्रेम तयाचे तिजवरती होते?
तुम्हीच उकला बिंग यातले काय असावे ते!
गुलाब कसले? प्रेमपत्रिका लालगुलाबी त्या!
लाल अक्षरे जणु लिहिलेल्या पाठपोट नुसत्या!
प्रेमदेवता प्रसन्न होई या नैवेद्याने!
प्रेमाचे हे मार्ग गुलाबी जाणति नवतरणे!
कधी न त्याचा ती अवमानी फुलता नजराणा!
परि न सोडला तिने आपला कधिही मुग्धपणा!
या मौनातच त्यास वाटले अर्थ असे खोल!
तोहि कशाला प्रगट करी मग मनातले बोल!
अशा तर्हेने मास लोटले पुरेपूर सात,
खंड न पडला कधी तयाच्या नाजुक रतिबात!
अखेर थकला! ढळली त्याची प्रेमतपश्चर्या,
रंग दिसेना खुलावयाचा तिची शांत चर्या!
धडा मनाचा करुनि शेवटी म्हणे तिला, ‘देवी!’
(दुजी आणखी विशेषणे तो गोंडस तिज लावी)
‘बांधीत आलो पूजा मी तुज आजवरी रोज!
तरि न उमगशी अजुनि कसे तू भक्ताचे काज?
गेंद गुलाबी मुसमुसणारे तुला अर्पिलेले
सांग तरी सुंदरी, फुकट का ते सगळे गेले?’
तोच ओरडुनि त्यास म्हणे ती, ‘आळ वृथा हा की!
एकही न पाकळी दवडली तुम्ही दिल्यापैकी!’
असे बोलूनी त्याच पावली आत जाय रमणी
क्षणात घेउनि ये बाहेरी कसलीशी बरणी!
म्हणे, ‘पहा मी यात टाकले ते तुमचे गेंद,
आणि बनविला तुमच्यासाठी इतुका गुलकंद!
कशास डोळे असे फिरवता का आली भोंड?
बोट यातले जरा चाखुनी गोड करा तोंड!’
क्षणैक दिसले तारांगण त्या, – परी शांत झाला!
तसाच बरणी आणि घेउनी खांद्यावरि आला!!
‘प्रेमापायी भरला’ बोले, ‘भुर्दंड न थोडा!
प्रेमलाभ नच! गुलकंद तरी कशास हा दवडा?’
याच औषधावरी पुढे तो कसातरी जगला,
हृदय थांबुनी कधीच नातरि तो असता ‘खपला’!
तोंड आंबले असले ज्यांचे प्रेमनिराशेने
‘प्रेमाचा गुलकंद’ तयांनी चाटुनि हा बघणे!
या कवितेचे विश्लेषण करायची काय गरज? लेखक-दिग्दर्शक अत्र्यांनी एक फक्कड कथानकच रंगवलं आहे की इथे बहारीने.
– – –
परिटास
‘पाखरा येशील कशी परतून’ या रे. टिळकांच्या अतिशय प्रसिद्ध भावगीताचे बाह्यानुकरण करून परिटांच्या धंद्यातील ‘कसब’ यात अतिशय खुमासदार रीतीने वर्णन केले आहे. सर्वसामान्य माणसांच्या अनुभवातला आशय, चित्रमयी, ठसठशीत कल्पनाशक्ती आणि अल्पाक्षरी नीटस अभिव्यक्ती यांचा अपूर्व संगम या कवितेत झाला आहे.
परिटा येशिल कधि परतून? ।।धृ।।
कोट रेशमी लग्नामधला मानेवर उसवून!
उरल्या सुरल्या गुंड्यांचीही वासलात लावून!
बारिकसारिक हातरुमाला हातोहात उडवून!
सदर्यांची या इस्तरिने तव चाळण पार करून!
खमिसांची ही धिरडी खरपुस भट्टिमधे परतून!
तिच्या भरजरी पैठणिची या मच्छरदाणि करून!
गावातिल कपड्यांची सगळ्या गल्लत छान करून!
रुमाल जरिचे आणि उपरणी महिनाभर नेसून!
सणासुदीला मात्र वाढणे घेइ तुझे चोपून!
ही कडक कांजीची विडंबन कविता वाचताच पुलंचा नामू परीटही आठवतो, ही एक वेगळीच गंमत.
(क्रमश:)