• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

टिप्सी

- सारिका कुलकर्णी (मी काय म्हणते)

Nitin Phanse by Nitin Phanse
August 14, 2025
in मी काय म्हणते...
0

आम्ही नव्यानेच पंजाब राज्यातील लुधियाना शहरात बदली होऊन गेलो होतो. एक छोटा बंगला भाड्याने घेतला होता. खाली घरमालक आणि वरती भाडेकरू अशी व्यवस्था होती. आम्ही शिफ्ट झालो. आमची दुचाकी तिकडे ट्रान्सपोर्टने पाठवली होती. ती उतरवून घेतली, पण गाडी चालू होईना. गॅरेजमध्ये न्यावी लागणार होती.
करतारसिंग या आमच्या घरमालकांना विचारले, ‘जवळपास कुठे गॅरेज आहे का? म्हणजे आम्हाला गाडी दुरुस्तीला टाकता येईल.’
त्यांनी आजूबाजूला बघितले आणि ते म्हणाले, ‘गड्डी? किथ्थे है गड्डी?’
आम्ही आमच्या दुचाकीकडे बोट दाखवले तसे करतारसिंग जोरजोरात हसू लागले. आम्हाला काहीच समजेना. त्यांचे गडगडाटी हसू थांबल्यावर त्यांना कारण विचारले तर ते म्हणाले, ‘गड्डी तो चार पैंय्योवाली होती है. ये तो मोटारसाइकिल है जी.’
पंजाबी लोक दुचाकीला गाडी मानत नाहीत, फक्त चारचाकीलाच गाडी म्हणतात. शेवटी ती मोटारसायकल आहे, गाडी नाही हे आम्ही मान्य केल्यावर त्यांनी दुचाकीला काय झाले ते विचारले. चालू होत नाहीये असे सांगितल्यावर त्यांनी त्यांच्या मुलाला हाक मारली, ‘ओय अमरिते इधर आ. जा तो जरा वोह टिप्सीको बुला के ला.’
अमरीतने विचारलं, ‘टिप्सी अंकल?’
करतारसिंग उगीचच त्याच्यावर ओरडले, ‘कितने टिप्सीको पेहचानता है तू? फालतूके सवाल मत किया कर. जा जल्दी.’
आता या प्रश्नात फालतू काय होतं त्यांनाच ठाऊक.
अंकल ज्या पद्धतीने ‘टिप्सीको बुला के ला’ असे म्हणाले त्यावरून आजूबाजूला कुठे तरी गॅरेज चालवणारा हा मुलगा असावा, त्याला बोलावून आणले म्हणजे तो गाडी ढकलून नेईल असे वाटले होते. अमरित आला, ‘आरेया बोले.’
‘उसको बताया ना, मैंने बुलाया है,’ कर्तार अंकलनी उगीचच जोर लावला.
‘हांजी, बोला. वोह खाना खा रहा है. बोला दस मिनिटमे आता हूं.’
‘ओ तेरी. खाना कही भागा थोडी ना जा रहा है,’ करतार अंकलच्या अहंकाराला उगीचच धक्का लागला होता.
शेवटी आम्हीच म्हणालो, ‘जाऊ दे अंकल. येऊ दे सावकाश. आम्हाला तरी कुठे घाई आहे.’
आम्ही सगळे तिथेच अंगणात बाजेवर गप्पा मारत बसलो. पाच मिनिटात एक पन्नाशीच्या आसपासचे गृहस्थ करतार अंकलना भेटायला आले म्हणून आम्ही तिथून उठलो. तर अंकल एकदम ओरडले, ‘तुम लोग कहा निकले अबे?’
कुलकर्णी म्हणाले, ‘वो आपसे कोई मिलने के लिये आया, इसलिये हम…’
‘अरे भाई, ये आप के कामसे ही तो आया है. टिप्सी है ये.’
आम्ही डोळे मोठे मोठे करून बघत उभे राहिलो. साधारण पन्नाशीच्या पुढे वय असेल. त्या दिवशी त्यांच्या केसाला पगडी नव्हती. केस धुवून मोकळे सोडले होते. बायकांसारखे लांबसडक केस होते. सहा फुटांच्या वर उंची असेल. या एवढ्या मोठ्या धडाला आमचे करतार अंकल ‘टिप्सी’ असे एकेरीत हाक मारत होते. मला तर टिप्सी अंकलची थोडी भीतीच वाटली. पण ही भीती फार थोडा काळच टिकली. टिप्सी अंकल धिप्पाड, राकट असले तरीही त्यांच्या चेहेर्‍यावर एक वेगळाच गोडवा होता. बोलताना तर ते ‘बेटा बेटा’ म्हणून बोलू लागले की आपण त्यांची खरोखरीची मुलगी आहोत असे वाटावे.
टिप्सी नावाचा माणूस वयाने एवढा मोठा असेल आणि त्याला संपूर्ण कॉलोनी एकेरी नावाने हाक मारत असेल हेच कल्पनेच्या पलीकडचे होते. जवळपास दहा मिनिटे टिप्सी अंकलनी गाडीचे निरीक्षण केले आणि त्यानंतर घरी जाऊन टूल बॉक्स घेऊन आले. गाडीशी काहीतरी खटपट केली आणि पाचव्या मिनिटाला गाडी चालू केली. ट्रान्सपोर्टवाले गाड्यांचे कसे हाल करतात, मग त्यांना धरून कसा हाणला पाहिजे यावर त्यांनी निरुपण केले. या बोलण्यातून अंकलचे पहिले वैशिष्ट्य समजले. अंकलच्या दर दोन वाक्यांच्या मागे एक वाक्य हाणामारीचे असते. आपल्याशी म्हणजे ओळखीच्या लोकांशी इतके प्रेमाने बोलणारे टिप्सी अंकल एखाद्याविषयी विपरीत मत असले की एकदम हाणामारीवर उतरतात. त्यांच्या मते ते जातिवंत पंजाबी आणि शीख आहेत त्यामुळे असे करणे म्हणजे धर्म पाळणे आहे. मला तर ते मनस्वी वाटतात. एकाच माणसात दोन टोकाची माणसे असावीत असे. आत्यंतिक प्रेमळ आणि आत्यंतिक रागीट. शिवाय हाणामारीचे नुसते बोलण्यावर भागत नाही, तर ते खरोखरीच हाणामारीवर उतरतात. त्यांनी कित्येक लोकांना लोळवलेले मी बघितले आहे.
त्या दिवशी आमची दुचाकी ठीक करून टिप्सी अंकल निघाले. पण त्याआधी आमच्याशी खूप गप्पा मारल्या, जणू काही आमची कित्येक वर्षांची ओळख आहे. आमच्या दुचाकीच्या दुरुस्तीचा एक पैसा त्यांनी घेतला नाही. उलट त्यांच्या घरी येण्याचं आमंत्रण दिलं. ‘मैंनु कुछ किया ही नहीं जी. मोटरसाइकिल तो अपने आपही ठीक हो गई. तुम बम्बईवालो को तो बस पैसे की बात आती है. इक काम करो जी. कल मेरे घरपे खाना खाने आईयो. तो मैं समझूंगा के मेरे पैसे मिल गये.’
गजब होते अंकल. ओळख ना पाळख. यांच्या घरी जाण्याचे आमंत्रण असे कसे स्वीकारणार, म्हणून कुलकर्णी आणि मी चांगलेच अवघडलो. टिप्सी अंकल आमच्या तोंडाकडे बघत उभे राहिले. शेवटी म्हणाले, ‘अच्छा चलो. एक काम करो. करतार की फॅमिली भी लेके आईयो साथमे.’
आम्ही अजूनही तसेच उभे होतो. मग टिप्सी अंकलनी पुढचा उपाय सुचवला. ‘अच्छा ये भी नही मानोगे? तो एक काम करते है. तुम लोग नीचे करतार के घर खाना खाने आना. मैं एथे आ जावांगा.’ इतके विचित्र पर्याय यांच्या डोक्यात कुठून येत होते कुणास ठाऊक? करतार अंकलदेखील सगळ्याला हो म्हणत होते. आता अजून तिसर्‍याच कुठल्यातरी शेजार्‍याकडे आम्ही, करतार कुटुंबीय आणि टिप्सी कुटुंबीय अशा सगळ्यांना परस्पर आमंत्रण टाळावे म्हणून आम्ही शेवटच्या पर्यायाला होकार दिला. नंतर हळूहळू उमजत गेलं की हा होकार केवळ जेवणाला नव्हता, तर टिप्सी अंकलच्या मैंत्रीला देखील होता.
वेगवेगळ्या वेळी विविध रूपांत नंतर टिप्सी अंकल आम्हाला दिसत गेले. त्यांचा आणि आमचा करतार अंकलपेक्षा जास्त घरोबा झाला. पण इतरांसारखे आम्ही कधीही त्यांना एकेरीमध्ये बोलू शकलो नाही. त्यांच्या घरातील प्रत्येक प्रसंगाचा आम्ही हिस्सा होऊन गेलो. त्यांची पत्नी सिम्मी आंटी देखील फार गोड बाई. कोणालाही उचलून घरी आणण्याचा अंकलचा स्वभाव त्या अक्षरशः सहन करत होत्या. पण त्याबद्दल तक्रार कधीच नव्हती. उलट त्या अतिशय प्रेमाने, आनंदाने हे सगळं करत.
अंकलबरोबर आम्ही सण साजरे केले, सिनेमे बघितले, सहली केल्या, मालिका बघितल्या. सगळं काही केलं. पण एका गोष्टीतून आमची सुटका कधीच झाली नाही. प्रत्येक ठिकाणी अंकलचे होणारे भांडण. मालिका बघताना देखील अंकल कोणाची तरी बाजू घेत. त्याविरुद्ध कोणी चकार शब्द जरी काढला तरीही त्याची काही खैर नसे. अंकल एकदम हमरीतुमरीवर येत. कित्येकदा मारामारी करत. सिम्मी आंटींना यातील काहीच नवीन नव्हतं. कितीही भांडण झालं तरी त्या लक्ष देत नसत. त्या आणि त्यांचं स्वयंपाकघर एवढंच त्या बघत असत. आलेल्या प्रत्येक माणसाला इथून खाऊन पाठवलं नाही तर मृत्यूनंतर आपला आत्मा भटकत राहील अशी त्यांना भीती होती की काय कुणास ठाऊक?
एकदा आम्ही सगळेच त्यांच्या घरी सिनेमा बघत बसलो होतो. दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे चालू होता. गाव गोळा करून अंकल सिनेमा बघत होते. अंकल अमरीश पुरीच्या बाजूचे होते. कोणीतरी शाहरुखची बाजू घेतली आणि अक्षरशः युद्ध जुंपलं. सहा सात महिन्यांच्या अंकलच्या सहवासाने एक ठाऊक झालं होतं की अशावेळी आपण कोणाचीही बाजू घ्यायची नसते. मी आणि कुलकर्णी शांत राहून भांडण बघत होतो. आता टिप्सी अंकल उठून शाहरुखची बाजू घेणार्‍या धरमच्या तोंडात मारणार तितक्यात सिम्मी आंटी तिथे आल्या. दोघांच्या समोर जाऊन उभ्या राहिल्या तसे दोघे काही क्षण शांत झाले. आंटींना तेवढा वेळ पुरेसा होता, त्या पटकन म्हणाल्या, ‘आप लोग खाने में क्या खाओगे?’
दोघांनी काही क्षण शांत राहून मग उत्तर दिलं, ‘पनीर और चिकन.’ आणि पुन्हा आपसात भांडू लागले.
टिप्सी अंकलचा अजिबात अंदाज बांधता येत नसे. म्हणजे आपल्याला वाटावे की आता अंकल भांडण सुरू करणार तर अंकल त्या माणसाशी अगदी प्रेमाने बोलत असत आणि जिथे प्रेमाने वागणे अपेक्षित असे, तिथे मात्र त्यांचे दमदार भांडण होई. आम्ही आणि टिप्सी अंकल एकत्र पुष्कळ प्रवास करत असू. प्रवासात सिम्मी आंटी खूप काही खायला करून घेत असत. अंकलच्या भांडणात वेळ कसा निघून जाई ते कळत नसे. एकदा आम्ही ट्रेनने निघालो होतो. अंकल वरच्या बर्थवर जाऊन बसले. दुसरा एक प्रवासी आला आणि म्हणाला, ‘हा माझा बर्थ आहे.’ दिवसा बर्थवर बसायचे असते, झोपायचे नसते अशा कारणाने अंकल त्याच्याशी हमरीतुमरीवर आले. ह्याच टिप्सी अंकलचा परतीच्या प्रवासात वरचा बर्थ होता. अंकल दिवसाच त्यावर झोपून गेले. कोणीतरी उठवल्यावर त्याच्यावर ओरडले, ‘बर्थ झोपायला असतो. बसायला असतो का रे?’
सगळ्या पंजाबी लोकांना असते तसे अंकलना बाहेरच्या देशाचे प्रचंड वेड होते. त्यांच्याच भाषेत सांगायचे तर त्यांचा लहान भाऊ ‘कनैडा’मध्ये होता. लहान भावाचे कुटुंब अंकलच्याच घरी होते. ‘कोई गल नही. मैं हूं ना,’ हे अंकलचे भावासाठी ब्रीदवाक्य होते. भावाचा जेव्हाही फोन येईल तेव्हा एकदा तरी अंकल भावाला हे वाक्य म्हणून दाखवत. अंकलच्या एकूण बोलण्यावरून हे जाणवत असे की त्यांना देखील तरुणपणी बाहेरच्या देशात जाण्याची इच्छा होती. पण लहान भाऊ शिकायला म्हणून बाहेरच्या देशात गेला आणि तिथे स्थायिक झाला. बहीण देखील लग्न करून लॉस एन्जेलिसला गेली. म्हातार्‍या आईबापाची काळजी घ्यायला म्हणून अंकल इथेच थांबले. पण कोणीही कुठल्याही देशात गेलेले किस्से सांगू लागले की अंकल लहान मुलासारखा चेहरा करून ते सगळं ऐकत असत. माणूस बाहेरच्या देशात गेलेला म्हणजे हुशारच. त्याच्याशी तर वाद घालण्याचा प्रश्न येतच नाही. दुसर्‍या कोणी बाहेरच्या देशातील माणसाला कसली शंका जरी बोलून दाखवली तरी अंकल ओरडत, ‘ऐवेच गये क्या वो फॉरेन? दिमागवालो का काम है!’
अंकल दोनच प्रकारच्या व्यक्तीशी कधीही वाद घालत नसत. एक म्हणजे बाहेरच्या देशातील व्यक्ती आणि दुसरी म्हणजे मुंबईची माणसं. मुंबईला त्यांची आत्येबहीण राहत असे. तिच्याकडे ते एक दोन वेळा मुंबईत येऊन गेलेले होते. मुंबईच्या कित्येक सुरस कथा त्यांनी ऐकलेल्या होत्या. खर्‍या खोट्या ठाऊक नाही. अंकलना त्या खर्‍या वाटत. मुंबईच्या माणसाला डोके असल्याशिवाय इतक्या आधुनिक नगरीत राहता येणे शक्यच नाही असे त्यांचे ठाम मत आहे. त्यामुळे त्यांच्या सगळ्या नातेवाईकांत आम्ही खूप प्रस्िाद्ध होतो. ‘ये कुलकर्णी है. बम्बईसे आये है. बहोत टॅलेंटेड है.’
मला तर त्यांच्याशी बोलून आपण खरेच खूप हुशार आहोत असे वाटू लागले होते. म्हणजे माणूस मुंबईत येताना तो हुशार असल्याचा परवाना तपासून मगच त्याला मुंबईत येण्याची परवानगी आहे असे काहीसे अंकलमुळे आम्हाला वाटू लागलेले होते. बरे अंकलना आम्ही खरेच इतके हुशार वाटत होतो की ते कुठल्याही बाबतीत आमचा सल्ला मागायला येत. अगदी कुठल्याही बाबतीत! मुलाने विज्ञान शाखेत जावे, वाणिज्य शाखेत जावे की कुठला व्यावसायिक कोर्स करावा यावरील सल्ला असो वा घरात कुठल्या ब्रॅण्डचा टीव्ही घ्यायचा यावर असो, ते सगळे आमच्याशी बोलून मगच ठरवत असत. एकदा तर ते आले, कुलकर्णी घरी नव्हते. अंकल बसले. चहा घेतला. त्यांच्या घुटमळण्यावरून माझ्या लक्षात आले की त्यांचे काहीतरी काम आहे. त्यांना म्हटले, ‘अंकल कुछ चाहिये क्या?’
‘हा बेटी, कुलकर्णी साब कभी आयेंगे?’
ते कुलकर्ण्यांच्या दुप्पट वयाचे असून देखील त्यांना साब म्हणत. मी उत्तर दिलं, ‘पता नही अंकल. मुंबईसे उनके बॉस आये है. तो देर हो जायेगी.’
‘बम्बईसे आए है, फिर तो इम्पॉर्टन्ट काम होगा.’
पुढे अंकल बोलू लागले, ‘चलो बेटा, तुम भी तो बम्बईसे आई हो. तुम भी तो दिमागी हो. तुम्हे ही पूछ लेता हूं.’
मला भयंकर गंमत वाटलेली होती. मी मुंबईहून आल्यामुळे माझ्यात हुशारी आहे हे गृहीत धरून अंकल माझ्याकडून सल्ला मागणार होते.
‘बात ऐसे है ना बेटा की हमारे गॅरेज की और एक ब्रँच खोलने का इरादा है. तो वो खोले या नही ये तुम सोचविचार करके हमे बताओ.’
मला अंकलच्या निरागसपणाने भरून आलं. फार थोड्या काळात अंकलनी आम्हाला फार जीव लावलेला होता. आम्ही बदलीवर त्यांच्या शहरात गेलेलो होतो. त्यांना सोडून दुसरीकडे जाणे फार कठीण असणार होते.
अंकल जसे बाहेरच्या देशासाठी, मुंबईसाठी वेडे होते, तसेच चांगल्या जेवणासाठी वेडे होते. इतरांना खायला घालण्याची त्यांना भयंकर आवड होती. कुठे चांगले हॉटेल उघडले हे अंकलना कळण्याचा अवकाश की ते आम्हाला तिकडे घेऊन जात. फक्त जेवणासाठी तीन तीन तास प्रवास करून त्यांनी आम्हाला चंदीगड, अमृतसर असे सगळीकडे फिरवलेले आहे. त्यांच्याबरोबर कुठेही जाणे म्हणजे चैन असे. दिलदारी त्यांच्यात ठासून भरलेली होती. फक्त अडचण एकच असे. वेळेचा अपव्यय. तोदेखील भांडणामुळे. गाडीचे पार्किंग म्हणू नका, त्यांनी मागवलेली डिश वेगळ्या प्रकारची निघाली हे कारण म्हणू नका, एखाद्या हॉटेलात बसायला स्पेशल सीट मिळाली नाही हे म्हणू नका, अंकल कशावरूनही भांडत. मारामारी करत. मला कमाल सिम्मी आंटीची वाटत असे. त्या कधीही त्यांचे भांडण सोडवायला गेल्या नाहीत. भांडण, मारामारी चालू असली तरी आंटी शांत असत. जणू आजूबाजूला काही घडतच नाहीये इतक्या शांतपणे त्या आपले काम चालू ठेवत. एकदा तर अंकलनी कोणाच्या तरी गालावर ठोसा हाणला तर त्याचा दातच पडला. तो माणूस ओरडत आंटीकडे आला तर आंटी त्याला म्हणाल्या, ‘झगडेसे पेहले मेरे पास आते तो बताती की इस आदमीसे झगडा मत कर. अब मेरे पास आके कोई फायदा नही.’
मारामारी हे अंकलच्या आयुष्याचे अविभाज्य अंग होते. त्यांना सिनेमा बघताना देखील मारामारीच हवी असे. तिकडे सिनेमात मारामारी सुरू झाली की इकडे अंकलच्या अंगात दारासिंग येत असे. ‘अरे मार ना यार. तू भी क्या? ऐसे मार की उसकी हड्डी टूटनी चाहिये,’ अशी वाक्ये अंकलच्या तोंडातून बाहेर पडत. ते ज्याच्या बाजूने असत तो मारामारीत जिंकला तर ठीक आहे नाहीतर चित्रपट तिथेच बंद करावा लागे. अंकलचा संताप होत असे. सिनेमा, मालिका या गोष्टी अंकल अतिशय गांभीर्याने घेत. त्यात घडणारे सगळे खरे म्हणून बघायचे असे त्यांचे म्हणणे असे. त्यामुळे एखादी व्यक्ती मालिकेत वाईट वागू लागली की अंकल सुरू होत, ‘देखो ऐसे होते है आजकालके लोगे. संस्कार नाम की चीज ही नही रही दुनियामे. सब साले खोते है.’
केवळ टिप्सी अंकलमुळे आमचे पंजाबमधील राहणे सुकर झाले. अत्यंत टोकाचे मनस्वी असणे हा गुण आणि दोष असलेले अंकल आम्हाला वडिलांच्या जागी वाटू लागले होते. तिथेच आम्हाला झालेल्या बाळाचे तर अंकलनी कितीतरी लाड केले. पण जेव्हा आमची तिथून बदली झाली तेव्हा अंकल ढसढसा रडले. ‘आप मुझे बस अपने बॉसका नंबर दे दो. मैं देखता हूं कैसे वो यहांसे आपको कहीं ले जाता है. वाहेगुरू और मैं हूं आपके साथ.’ अंकलना समजावून सांगता सांगता आमच्या नाकी नऊ आले होते.
अजूनही पंजाबमध्ये गेलो की आम्ही वाट वाकडी करून त्यांच्या शहरात जातो. त्यांना भेटतो. त्यांनी तर करतार अंकलच्या घराचे नाव बदलून आता ‘कुलकर्णी विला’ असेच ठेवले आहे. अंकल आता थकले आहेत. पण अंगात जोश तोच आहे. अजूनही कुठल्याही मुद्द्यावरून कोणाशीही भांडण होतेच. मुंबई अजून तशीच आहे की आता बदलली आहे विचारतात. अजून तशीच आहे असे उत्तर आम्ही दिले की त्यांना कसली तरी शांतता मिळते.
मी काय म्हणते तुम्ही कधी लुधियानाला गेलात आणि मुंबईहून गेला आहात असे सांगितल्यावर एखादा शीख माणूस तुम्हाला म्हणाला, ‘हमारी कुलकर्णीजी की बम्बई?’ तर ‘हो ‘ म्हणा. ते आमचे टिप्सी अंकल आहेत. ते आता मुंबईला कुलकर्ण्यांच्या नावावर करून मोकळे झाले आहेत.

Previous Post

सिराज `राज’ चिरायू होवो!

Next Post

शतकमहोत्सवी झेंडूची फुले (भाग २)

Next Post

शतकमहोत्सवी झेंडूची फुले (भाग २)

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.