इंग्लंडविरुद्धची अँडरसन-तेंडुलकर मालिका भारताने २-२ अशी बरोबरीत सोडवली. भारताच्या यशात वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजचे महत्त्व अधोरेखित होते. बुमरा-शमीच्या वर्चस्वगाथेमुळे झाकोळलेला हा तारा या मालिकेत तेजाने चमकला. त्याची इंग्लंड दौर्यावरील कामगिरी आणि कारकीर्दीवर टाकलेला हा प्रकाशझोत.
– – –
क्षण-१ : लीड्सच्या तिसर्या कसोटीत रवींद्र जडेजाने तळाच्या फलंदाजांना हाताशी घेऊन शर्थीने लढत दिली. पण विजय २२ धावांच्या अंतरावर असताना शोएब बशीरचा चेंडू ११व्या क्रमांकावरील मोहम्मद सिराज बचावात्मक पद्धतीने खेळला. पण तो अनपेक्षितपणे वळला आणि अलगदपणे त्याच्या डाव्या यष्टीवर आदळून एक बेल्स खाली पडली. भारताने हा सामना गमावल्याची हुरहूर वेदनादायी होती. सिराज जागच्या जागी खाली बसला. जे घडले, ते स्वीकारणे जड गेले.
क्षण-२ : ओव्हलच्या पाचव्या कसोटीच्या चौथ्या दिवशी हॅरी ब्रूक फक्त १९ धावांवर होता. प्रसिध कृष्णाच्या गोलंदाजीवर ब्रूकने मारलेला फटका फाइन लेगला उभ्या सिराजने अप्रतिम झेलला; पण नेमक्या त्याच वेळी त्याचा पाय सीमारेषेला लागल्याने तो झेल अमान्य ठरला आणि तो षटकार ठरला. संजीवनी मिळालेल्या ब्रूकने मग शतक ठोकले. पुन्हा सिराज टीकेचा धनी ठरला.
क्षण-३ : निर्णायक कसोटीचा पाचवा दिवस आणि ५७ मिनिटांची धुमश्चक्री. असंख्य ट्वेंटी-२० सामन्यांपेक्षाही अधिक रंगत निर्माण झाली होती. इंग्लंड मजल-दरमजल करीत सहा धावांच्या अंतरावर पोहोचली. पण सिराजच्या भेदक चेंडूने गस अॅलटकिन्सनचा यष्टीभेद केला. तितक्याच त्वरेने डावीकडे जात सिराजने आपल्या नेहमीच्या शैलीत ख्रिस्तियानो रोनाल्डोप्रमाणे आनंद साजरा केला. संपूर्ण संघ, स्टेडियमवरील पाठीराखे आणि देशभरात एक ‘आनंदलाट’ उसळली.
– – –
अँडरसन-तेंडुलकर कसोटी मालिकेतील या तिन्ही क्षणांमध्ये वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज केंद्रस्थानी. पहिल्या दोन क्षणांत तो चुकला म्हणून टीकेच्या लक्ष्यस्थानी. तर तिसर्या क्षणात भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरल्याने नायकाच्या भूमिकेत होता. सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत त्याने यशाचे रहस्य उलगडले. सकाळी उठल्यावर रोनाल्डोचा ‘बिलिव्ह’ (विश्वास ठेव) हे छायाचित्र त्याने मोबाइलच्या वॉलपेपरवर ठेवले. हाच शब्द त्याचा आत्मविश्वास वाढवणारा आणि प्रेरणा देणारा ठरला. मॅनिफेस्टेशन आणि संकल्पपट (व्हिजन बोर्ड) ही आजकालचे परवलीचे मनोधैर्य वाढवणारी सूत्रे आहेत. मॅनिफेस्टेशन म्हणजे आयुष्यात जे व्हावेसे वाटते त्याची अतिशय तीव्रतेने कल्पना करणे, आपण जो विचार करू, तसंच होईल, असं मानणे… आठवा- शाहरुखचा ‘ओम शांती ओम’मधला संवाद- किसी चीज को शिद्दत से चाहो की पूरी कायनात तुम्हे उससे मिलाने में जुट जाए…) सिराजने नेमके तेच केले.
जसप्रीत बुमरा भारताच्या वेगवान मार्याचे नेतृत्व करणार हे मालिकेच्या आधी स्पष्ट झाले होते. पण कार्यभार नियोजन त्याच्या वाटचालीच्या आड आले. बुमरा किंवा मोहम्मद शमी असताना किंवा ते दोघेही असताना सिराजचे महत्त्व दुसर्या किंवा तिसर्या क्रमांकाचा गोलंदाज इतकेच होते. म्हणून उशिराने चेंडू दिला जाणे, वाट्याला आलेला गोलंदाजीचा एण्ड स्वीकारणे अशा काही घटना घडत होत्या. अर्थात, एखाद्या खेळाडूच्या मोठेपणामुळे बाकीचे झाकोळले जाणे हे क्रिकेटमध्ये नवे मुळीच नाही. वेगवान गोलंदाजांचे विश्लेषण केल्यास भारताला ऐतिहासिक विश्वचषक जिंकून देणारा कर्णधार कपिल देव याच्या यशोदायी, तेजोमयी कारकीर्दीत चेतन शर्मा, मनोज प्रभाकर हे तितकेसे प्रकाशात आले नाहीत. १९८७च्या विश्वचषकात न्यूझीलंडविरुद्ध हॅट्ट्रिक नोंदवणारा चेतन, नंतर शारजात जावेद मियाँदादने अखेरच्या चेंडूवर षटकार खेचल्यामुळे खलनायकी स्वरूपात अधिक आठवला जातो. तर सामना-निश्चितीमुळे मनोज भारतीय क्रिकेटचाहत्यांच्या मनातून पुरता उतरला. जवागल श्रीनाथच्या काळात वेंकटेश प्रसादसुद्धा असाच दुसरेपणात जगला. न्यूझीलंडच्या रिचर्ड हॅडलीच्या यशोपर्वात इव्हान चॅटफिल्ड दुर्लक्षित राहिला. याला अपवाद ठरली ती जेम्स अँडरसन (७०४ बळी) आणि स्टुअर्ट ब्रॉड (६०४ बळी) ही जोडगोळी.
पण भारत-इंग्लंड मालिकेत जे सामने बुमराने टाळले, त्याच दोन सामन्यांत सिराज तेजाने तळपला, तेच दोन सामने भारताने जिंकले. त्याच दोन सामन्यांमुळे भारताला मालिकेत बरोबरी साधता आली. दमछाक करणार्या या पाचही कसोटी सामन्यांत गोलंदाजी करणारा दोन्ही संघांमधील एकमेव वेगवान गोलंदाज म्हणजे सिराज. पहिल्याच दिवशी झालेल्या दुखापतीमुळे ख्रिस वोक्स हा गोलंदाजीच करू शकला नाही, अन्यथा तोही पाचवी कसोटी खेळला. १८५.३ षटके म्हणजे १,१२२ चेंडू टाकल्यावर सिराजच्या खात्यावर जमा होते, सर्वाधिक २३ बळी. यापैकी भारताने विजय मिळवलेल्या दुसर्या कसोटीत ७ बळी (६/७०, १/५७) आणि पाचव्या कसोटीत ९ बळी (४/८६, ५/१०४) म्हणजेच एकूण १६ बळी. उर्वरित ७ बळी हे अन्य तीन कसोटी सामन्यांमधील, ज्यात सिराज बुमरामुळे झाकोळला गेला होता. सिराजची आकडेवारी कायम दुर्लक्षिली गेली. बुमरा साथीला असताना सिराजने २५ सामन्यांत ७४ बळी मिळवले आहेत, तर त्याच्या अनुपस्थितीत १६ सामन्यांत ४९ बळी मिळवले आहेत. त्याच्या पदार्पणापासून ‘सेना’ (दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रोलिया) राष्ट्रांच्या मैदानांवरील भारताच्या नवव्या विजयाचा तो शिलेदार. परदेशात बुमरा साथीला असताना सिराजने १९ सामन्यांत ६४ बळी मिळवले आहेत, तर त्याच्या अनुपस्थितीत ८ सामन्यांत ४० बळी मिळवले आहेत. हे वास्तव जसजसे क्रिकेटजगतात उलगडत गेले, तसे बुमराचे कसोटी संघातील स्थान प्रश्नांकित झाले. कसोटी खेळणे शक्य नसेल, तर यापुढे बुमरा फक्त मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्येच दिसल्यास आश्चर्य वाटू नये.
यावेळी बुमरासाठी धावून आला तो त्याच्या मुंबई इंडियन्सचा प्रेरक सचिन तेंडुलकर. इंग्लंडविरुद्धच्या दोन्ही विजयांतील बुमराची अनुपस्थिती हा निव्वळ योगायोग आहे. त्यामुळे त्याच्या गुणवत्तेवर शंका घेऊ नये, असे आवाहन सचिनने केले.
ट्वेंटी-२० क्रिकेटच्या भारतीय संघामध्ये क्वचितच दिसणारा सिराज एकदिवसीय संघात स्थान मिळवण्यासाठी आघाडीवर असतो. पण तिथेही बुमरा-शमीमुळे त्याचे महत्त्व कमी होते. २०२३च्या आयसीसी एकदिवसीय क्रमवारीतील गोलंदाजांच्या यादीत तो अग्रस्थानी होता. त्यामुळे आशिया चषकासाठी त्याची निवड झाली. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात २१ धावांत ६ बळी घेत त्याने श्रीलंकेचा डाव फक्त ५० धावांत गुंडाळण्याची किमया साधली. त्या अंतिम सामन्याचा सामनावीरही सिराजच होता. मग एकदिवसीय विश्वचषकात सिराज सर्व सामने खेळला आणि एकूण १४ बळी मिळवले.
सिराजचा क्रिकेटपटू म्हणून घडण्याचा प्रवासही तितकाच प्रेरणादायी. त्याचे वडील मिर्झा मोहम्मद घौस हे रिक्षाचालक. सुरुवातीला टेनिस क्रिकेट खेळणार्या सिराजने १९व्या वर्षी क्लब क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली. म्हणजे तशी उशिराच. पण प्रशिक्षक कार्तिक उडूपाने त्याच्यातील गुणवत्ता हेरून पैलू पाडले. मग देशांतर्गत क्रिकेट, आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट हे टप्पे त्याने इच्छाशक्तीच्या बळावर लीलया गाठले आणि वडिलांचे स्वप्न पूर्ण केले. मेहनत आणि जिद्दी सिराजच्या आयुष्याला क्रिकेटनेही कलाटणी दिली. गेल्याच वर्षी हैदराबादमध्ये त्याला पोलीस उपअधीक्षक हा पदभार देण्यात आला.
‘मियाँ’ या टोपणनावाने ओळखल्या जाणार्या सिराजचा अँडरसन-तेंडुलकर मालिकेत आक्रमक अवतार पाहायला मिळाला. इंग्लिश खेळाडूंना डिवचण्यात तो आघाडीवर असायचा, तसेच ‘अरेला-कारे’ करण्यातही. बेन डकेटशी हुज्जत घालताना त्याच्याकडून मर्यादांचे उल्लंघन झाले. परिणामी ‘आयसीसी’कडून आर्थिक दंड आणि दोषांक ही शिक्षा त्याला सुनावण्यात आली. जोशात होश टिकवणे हे तोही काळानुसार शिकेल, अशी आशा बाळगू. पण इंग्लंड दौर्यावर राज्य केले ते सिराजने हे मात्र नक्की. तेच चिरायू व्हावे, यासाठी शुभेच्छा!