स्वातंत्र्यानंतरच्या सुरुवातीच्या काळात जेव्हा राष्ट्रीय एकात्मतेच्या नावाखाली मुंबई आणि महाराष्ट्राची दारे सर्व अन्यप्रांतीयांसाठी ‘आओ जाओ घर तुम्हारा’ म्हणून खुली करण्यात आली, तेव्हा त्यातून स्थानिक मराठी माणसाचं काय नुकसान होणार आहे, हे पहिल्यांदा ओळखलं ते व्यंगचित्रकार आणि साप्ताहिक मार्मिकचे संपादक बाळासाहेब ठाकरे यांनी. त्यांनी मराठी माणसाला जागं करण्यासाठी जिवाचं रान केलं, मराठी माणसावरच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मार्मिकमध्ये शब्द आणि रेषा या दोहोंचा मोठ्या ताकदीने वापर केला. मराठी माणसाकडे वाकड्या नजरेने पाहणार्याच्या टाळक्यात आपटणारी शिवसेना नावाची वङ्कामूठ तयार केली… त्या काळात सर्वसमावेशक भारतीयत्वाच्या नावाखाली जो प्रकार केला गेला, तोच आता व्यापक हिंदुत्वाच्या नावाखाली सुरू झाला, मराठी माणसांचं ‘मराठी भय्या’करण व्हायला लागलं, आपल्याच घरात इतरांच्या सोयीसाठी त्यांची भाषा वापरण्याची वेळ मराठी माणसावर आली. मात्र, शिवसेनाप्रमुखांनी दिलेला वसा शिवसेनेने जपला आणि साप्ताहिक मार्मिकनेही मुंबई मराठी माणसाचीच कशी, हे वारंवार दाखवून दिलं. मराठीची गळचेपी करण्याचा प्रत्येक प्रयत्न हाणून पाडला. महाराष्ट्रद्रोह्यांनो, मराठी माणसाच्या मुळावर याल तर गाठ शिवसेनेशी आहे आणि गाठ मार्मिकशी आहे!