बहुतांश राजकीय पक्षांची त्यांचा पक्षीय विचारांचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी वृत्तपत्रे आहेत. त्यात दैनिके आहेत तशी साप्ताहिके देखील आहेत. पक्ष स्थापन झाल्यानंतर त्या सर्व साप्ताहिकांचा, मासिकांचा जन्म झाला आहे. पण साप्ताहिकातून एखाद्या संघटनेचा/पक्षाचा जन्म होतो, याचे एकमेव उदाहरण हे ‘मार्मिक’ साप्ताहिकाचे आहे. देशातील हे बहुधा एकमेव उदाहरण असावे. थोर व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे यांनी १३ ऑगस्ट १९६० रोजी प्रामुख्याने व्यंगचित्रांचा समावेश असलेले ‘मार्मिक’ हे व्यंगचित्र साप्ताहिक सुरू केले. पुढे ‘मार्मिक’मधील व्यंगचित्रांनी, लेखांनी आणि अग्रलेखांनी एक क्रांती केली आणि इतिहास घडवला. बाळासाहेबांच्या कुंचल्याने आणि लेखनाने मुंबईतील मराठी माणसांवरील होणार्या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम केले. मराठी माणसाचे स्फुल्लिंग चेतवले. झोपी गेलेला मराठी माणूस जागा केला. त्यातून १९ जून १९६६ रोजी मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी लढणार्या शिवसेनेचा जन्म झाला.
‘मार्मिक’मुळे शिवसेनेसारख्या लढाऊ संघटनेचा जन्म झाला. मराठी वृत्तपत्रांच्या इतिहासातील हे एकमेव उदाहरण आहे. ‘मार्मिक’ला आता ६५ वर्षे पूर्ण झाली आहेत, तर शिवसेना पक्ष हा पुढील वर्षी ६० वर्षे पूर्ण करणार आहे. सार्या अडचणींवर मात करून आज ‘मार्मिक’ आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची घोडदौड सुरू आहे. स्व. बाळासाहेब ठाकरे आणि स्व. श्रीकांत ठाकरे या बंधूंनी सुरू केलेल्या साप्ताहिकाला सुरुवातीला साहित्यिक, पत्रकार द. पा. खांबेटे हे सहसंपादक लाभले. त्याकाळी कार्यकारी संपादकाची प्रथा नव्हती आणि पदही नव्हते. तेव्हापासून तर आताचे संपादक उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि कार्यकारी संपादक मुकेश माचकर हे ‘मार्मिक’ची धुरा यशस्वीरित्या सांभाळत आहेत. गेल्या २० वर्षांत मराठीतील अनेक मासिके आणि साप्ताहिके बंद पडत असताना त्यांनी शिवसैनिकांनाच नव्हे तर मराठी वाचकवर्गाला मराठी साप्ताहिक वाचण्याची सवय लावलीही आहे आणि जिवंतही ठेवली आहे. विविध विषयांवरील सडेतोड लिखाणांमुळे आणि मार्मिक व्यंगचित्रांमुळे ‘तरुण ते वयोवृद्ध’ वाचकांचे ‘मार्मिक’शी घट्ट नाते जोडले आहे.
महाराष्ट्र निर्मितीनंतरच्या काळातील ‘मार्मिक’ हे एक वैशिष्ट्यपूर्ण साप्ताहिक होय. बाळासाहेब आणि श्रीकांतजी या बंधूंनी मार्मिकसाठी १३ ऑगस्ट तारीखच का निवडली? कारण १३ ऑगस्ट हा महाराष्ट्राचे झुंजार पत्रकार-लेखक आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील एक अग्रणी शिलेदार, ‘मराठाकार’ आचार्य अत्रे यांचा तो जन्मदिवस. संयुक्त महाराष्ट्र लढ्यानिमित्त प्रबोधनकारांचे आणि अत्र्यांचे घनिष्ठ संबंध झाले होतेच. त्याशिवाय अत्र्यांच्या मराठासाठी व्यंगचित्रे काढण्यानिमित्ताने ठाकरे बंधूंचे अत्रेंशी नाळ जुळली होतीच. त्यामुळे ‘मार्मिक’च्या पहिल्या अंकात ‘मराठा शिलेदाराला आमचे विनम्र प्रणिपात’ या मथळ्याखाली आचार्य अत्रे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी एक निवेदन छापले होते. त्या ‘प्रणिपाता’त म्हटले होते की, ‘मार्मिक’ हे त्यांच्या पितृवत उत्तेजनाचे फळ आहे आणि ते नवमहाराष्ट्राच्या सेवेसाठी काय-वाचा-मने आपल्या करामतीची शिकस्त करीत राहील, ही त्यांनी खात्री ठेवावी. त्यांच्या सेवेच्या यज्ञात आम्हा दोघा बंधूंना नवयुग आणि मराठामध्ये व्यंगचित्रांची त्यांनी जी छोटीशी कामगिरी देऊन आमच्या कारागिरीला मनमोकळे उत्तेजन दिले, त्या ऋणाची भरपाई केवळ कृतज्ञ प्रणिपाताने होण्यासारखी नाही. – बाळ आणि श्रीकांत ठाकरे.’
तसे पाहिले तर ‘भारतातील पहिले वृत्तपत्र सुरू करण्याचे भाग्य जेम्स ऑगस्ट्स हिकी याला लाभले. भारतातील ख्रिश्चन मिशनर्यांनी ख्रिश्चन धर्माचा प्रसार स्थानिक भाषेत करण्यासाठी पत्र हे माध्यम निवडले. २९ जानेवारी १७८० रोजी ‘बेंगाल गॅझेट’ किंवा ‘कलकत्ता जनरल अॅडव्हर्टायझर’ या नावाने हिकीने इंग्रजी साप्ताहिक सुरू केले. देशातील इतर भाषेत वृत्तपत्रे सुरू होण्याला तीस वर्षे गेली. श्रीरामपूर (बंगाल) येथे विल्यम कॅरे यांनी एप्रिल १८१८ मध्ये ‘दिग्दर्शन’ हे बंगाली मासिक सुरू केले तर मे १८१८ मध्ये ‘समाचार दर्पण’ हे बंगाली भाषेतील साप्ताहिक सुरू केले. देशी भाषेतील हे पहिले वृत्तपत्र साप्ताहिक होय. हिंदी भाषेतील वृत्तपत्रही कलकत्त्यात प्रथम सुरू झाले. जुगलकिशोर शुक्ल यांनी मे १८२६ रोजी ‘उदन्त मार्तंड’ हे हिंदी वृत्तपत्र सुरू केले. मौलाना बाकिर अली देहलवी यांनी दिल्ली येथून एप्रिल १८३६ रोजी पहिले अधिकृत उर्दू वृत्तपत्र. ‘उर्दू अखबार’ सुरू केले. ख्रिश्चन रिली ट्रॅक्ट सोसायटीने १८३१ साली ‘तमिळ मॅगझिन’ तामिळीमध्ये सुरू केले. तेलगू भाषेतील खर्या अर्थाने वृत्तपत्र १९३६ मध्ये ‘सत्यदूत’ नावाचे मासिक ख्रिश्चन मिशनर्यांनी सुरू केले. १८९२ साली ‘कन्नड समाचार’ हे कन्नड भाषेतील वृत्तपत्र बेल्लारी (कर्नाटक) येथून सुरू केले. १८६७ साली पंजाबी भाषेतील ‘अखबार श्री दरबार साहिब’ हे अमृतसर येथून सुरू झाले. तर गुजराती भाषेतील पहिले वृत्तपत्र १८२२ साली फर्दुनझी मर्झबान यांनी मुंबईतून ‘मुंबईना समाचार’ हे साप्ताहिक सुरू केले. नंतर १८५५ सालापासून दैनिकात रुपांतर झालेले ‘मुंबई समाचार’ हे २०० वर्ष पूर्ण करून आजही सुरू आहे. २०० वर्षाचा पल्ला गाठणारे हे एकमेव देशी वृत्तपत्र आहे. ६ जानेवारी १८३२ रोजी मुंबईतून बाळशास्त्री जांभेकरांनाr ‘दर्पण’ हे वृत्तपत्र वयाच्या विसाव्या वर्षी सुरू केले. हे मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र आहे असे म्हटले तरी जुलै १८२८ पासून ‘मुंबापूर वर्तमान’ हेही पत्र निघत असे परंतु ते पत्र मालक आणि संपादक याची माहिती उपलब्ध नसल्यामुळे ‘दर्पण’ हेच मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र मानले जाऊ लागले.
‘मार्मिक’च्या आधी गेल्या शतकाच्या शेवटच्या दशकात सुरू झालेले ‘हिंदुपंच’ हे साप्ताहिक व्यंगचित्रात्मक होते. परंतु त्यातील चित्रे यथार्थ अशा व्यंगाचे विशेष दर्शन घडविणारी नसत. उपहास, टिंगल-टवाळीदर्शक असत. हिंदुपंचाची व्यंगात्मक चित्रांची व लेखनाची प्रथा महाराष्ट्रात सर्वत्र झाली. अनेक लहानमोठ्या पत्रांतून त्याचे अनुकरण झाले. अच्युतराव कोल्हटकर, अनंतराव गद्रे आदी संपादकही अशी चित्रे आपल्या वृत्तपत्रातून देत. पण ही चित्रे ढोबळ स्वरूपाची असत. थोडक्या रेषांत चित्र उभे करून व्यंगाचे मार्मिक दर्शन घडविण्याचे कसब तेव्हा साधलेले नव्हते. त्यामुळे ते प्रयत्न अपुरे होते. याला पूर्णत्व देण्याचा प्रयत्न ‘फ्री प्रेस’चे व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचे बंधू श्रीकांत ठाकरे यांनी ‘मार्मिक’ला १३ ऑगस्ट १९६० साली जन्म देऊन केला.
राजकीय व्यंग शोधणे, त्याला लोकमानसात पक्का आकार देणे आणि त्या अनुरोधाने एक प्रकारची राजकीय टीकालेखन करणे, ही गोष्ट वाटते तितकी सोपी नाही. त्या मानाने राजकीय लिखाण सोपे असते. कारण तिथे विस्ताराला वाव असतो. गरजेनुसार आपली टीका सौम्य अथवा प्रखर करता येते. राजकीय व्यंगचित्रात सूक्ष्म निरीक्षणाने त्या व्यक्तीवर फक्त एखाद्या व्यंगातून टीका करणे म्हणून कठीण आहे. परंतु बाळासाहेबांनी ही कामगिरी लिलया पेलली आणि एक मराठी व्यंगचित्र साप्ताहिक म्हणून ‘मार्मिक’ला अल्पावधीतच नावारुपास आणले. केवळ व्यंगचित्राला वाहिलेले व्यंगचित्र साप्ताहिक सुरू करण्याचे धाडस आत्मविश्वासाने बाळासाहेबांनी आणि श्रीकांजी यांनी केले. ठाकरे बंधूंचा आत्मविश्वास अनाठायी ठरला नाही. ‘मार्मिक’ला चांगला प्रतिसाद मिळाला. ‘मार्मिक’च्या ज्वलंत अग्रलेखांमुळे, इतर लेखांमुळे आणि व्यंगचित्रांमुळे मराठी मन चाळवले गेले आणि चाळवले गेल्यानंतर चवताळले गेले आणि मग एक क्रांती झाली. त्यातून १९ जून १९६६ रोजी शिवसेना जन्मास आली. त्याचे श्रेय ‘मार्मिक’ला जाते. ‘मार्मिक’मधून ‘शिवसेना’, नंतर ‘सामना’ आणि १९९५ साली शिवसेनेचे शिवशाही सरकार असे कालठसे उमटले. ठाकरे बंधू एकत्र आले की इतिहास घडतो.
१३ ऑगस्ट १९६० रोजी प्रकाशित झालेले व्यंगचित्र साप्ताहिक ‘मार्मिक’ गेली ६५ वर्षे दर गुरुवारी मराठी वाचकांच्या भेटीस येत आहे. हा मराठी वृत्तपत्रक्षेत्रातील एक चमत्कारच म्हणावा लागेल. कारण ‘मार्मिक’चे समकालीन साप्ताहिक आणि त्यानंतर निघालेली मराठी साप्ताहिक काळाच्या उदरात कधी गडप झाली ते कळलेच नाही. दैनिकांची सुरू झालेली साप्ताहिक व द्विसाप्ताहिक पुरवणी, दिवसेंदिवस मराठी वाचकांचा घटत असलेला प्रतिसाद, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे वाढते प्रस्थ, विविध सामाजिक माध्यमांचे उठलेले पेव, प्रकाशन संस्थांवर आलेली आर्थिक संकटे आदी कारणामुळे बरीचशी मराठी साप्ताहिकांची प्रकाशने बंद पडली; हे दुर्दैव आहे. पण ‘मार्मिक’ हे व्यंगचित्र साप्ताहिक असल्यामुळे, एका विचारधारेशी नाळ जुळल्यामुळे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ‘ठाकरे’ नावाचा ब्रॅन्ड असल्यामुळे, ‘मार्मिक’ आजही तेवढ्याच दिमाखाने प्रकाशित होतो आणि वाचकांचाही तसाच प्रतिसाद लाभतो.
महाराष्ट्रातील समाजवादी पक्षाचे ‘जनवाणी’ हे साप्ताहिक १९४७च्या सुमारास पुण्यातून प्रकाशित होत होते. ते त्या पक्षाचे मुखपत्र होते. पण ते फार काळ चालू शकले नाही. जून १९५२ मध्ये ‘जनवाणी’चा शेवटचा अंक निघाला. त्याच दरम्यान कम्युनिष्टाचे ‘युगांतर’ हे साप्ताहिकही मे १९५२ मध्ये बंद पडले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (जनसंघाचेही) ‘विवेक’ साप्ताहिक हे १९४७ पासून सुरू असले तरी त्यानंतर काही काळ ते बंद पडले होते. पण १९८१ सालापासून ते पुन्हा सुरू झाले. काँग्रेसचे ‘शिदोरी’ हे सुरू आहे. काही राजकीय पक्षांची हाऊस जर्नल्स सुरू आहेत. त्याचा बाहेर आम वाचकवर्ग नाही. परंतु शिवसेनेच्या राजकीय विचारसरणीला वाहिलेले ‘मार्मिक’ साप्ताहिक आपल्या वैविध्यपूर्ण लेखांमुळे आणि व्यंगचित्रांमुळे शिवसैनिकांसह इतर मराठी वाचकवर्गात गेली ६५ वर्ष लोकप्रिय आहे. यातच ‘मार्मिक’चे यश दडले आहे. मराठी माणसाचे मन, कान आणि डोळे याची भूमिका ‘मार्मिक’ने आजपर्यंत वठवली आहे. पुढेही अशीच भूमिका वठवत राहिल. मराठी भाषा, अस्मिता आणि महाराष्ट्र धर्मरक्षणासाठी ‘मार्मिक’ची अशीच यशस्वी घोडदौड सुरू राहण्यासाठी ‘मार्मिक’ला जन्मदिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!