एकनाथ शिंदेंच्या शिंदेसेनेचे, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मंत्री, आमदार यांच्या उन्मत्त माजोरडेपणामुळे हैराण झालेले महायुतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सतत टीकेचा मारा होत असूनसुद्धा ते या सार्याला खंबीरपणे तोंड देत आहेत हे पाहिल्यावर माझा मानलेला परमप्रिय मित्र पोक्या याला त्यांचं खूप कौतुक वाटतं. तो माझ्याकडे तसं बोलूनही दाखवतो. महायुतीला नेहमीच आपल्या चक्रम वागण्याने बदनाम करण्याचं काम करीत असलेल्या अशा महाभागांमुळे कुठली झक मारली आणि अशा येड्या लोकांचं लोढणं गळ्यात अडकवून घेतलं असं त्यांना वाटत असलं तरी त्यांची खरडपट्टी काढत, त्यांना इशारा, वॉर्निंग देत फडणवीसांची माध्यमांसमोरील बडबड पूर्वीच्याच त्वेषाने अखंड सुरू असते, याचंही पोक्याला आश्चर्य असतं. अशी पात्रं सांभाळताना एखादा मुख्यमंत्री खचून गेला असता, पण फडणवीस सतत उत्साहाने येणार्या आणि आलेल्या संकटांना तोंड देण्यासाठी सदैव आत्मविश्वासाने तयार असतात, हे पाहून पोक्याला कमाल वाटते. रामदास कदमांचे डान्स बार प्रकरण झाल्यानंतर पोक्यानेच फडणवीसांना गाठून मुलाखत देण्याची विनंती केली. त्यातील एकही शब्द न छापण्याच्या अटीवर त्यांनी ही मुलाखत दिली होती. पण पोक्या लबाड. त्याने शब्द पाळला नाही. तीच ही मुलाखत…
– नमस्कार मुख्यमंत्री साहेब.
– नमस्कार. विचार काय विचारायचं ते. मनात साचलेलं पत्नीशिवाय कुणाशी धड बोलताही येत नाही. तू आग्रह केलास म्हणून बोलतोय, पण कुठे छापू नकोस हो. नाहीतर नको ते गैरसमज होतील माझ्या बोलण्यामुळे. रोज इतका ताण सहन करतोय तरी कुणालाही त्याची फिकीर नाही.
– मग द्यायचा ना डच्चू एकेकाला. त्याशिवाय ते वठणीवर येतील असं वाटत नाही.
– इतकं सोपं नसतं ते पोक्या. यांच्या सगळ्या लफड्यात माझी गोची होते रे पोक्या. कसले कसले लोक भरलेयत या मंत्रिमंडळात आणि या दोन पक्षांत.
– तुमच्या पक्षातले तरी कुठे धुतल्या तांदळासारखे स्वच्छ आहेत? ते हनीट्रॅप फेम…
– त्यांचं राहू दे. सगळ्यांच्या तसल्या ट्रॅपचे पेनड्राईव्ह आहेत माझ्याकडे. अगदी आमच्या किरीटजींसकट. पण नाही करता येत काही तेवढ्याच कारणामुळे. आता ते अजितदादांचे कोकाटे. अरे साधी गोष्ट आहे. विधिमंडळ सभागृह ही काय मोबाईलवर रमी खेळायची जागा आहे? ते शिंदेंचे बॉक्सर संजय गायकवाड. ती डाळ आंबलेली नव्हती हे तिच्या तपासणीत सिद्ध झालंय आता. तरीही एखाद्याला ठरवून मारहाण करायची हे शोभतं काय या आमदाराला. दुसरे ते रामदासजींचे सुपुत्र. अरे आपण गृह राज्यमंत्री आहोत याचं तरी भान ठेवायचं ना त्यांनी. वाचवतायत दोघे बापलेक एकमेकांना. शिंदेसाहेबांच्या त्या शिरसाटांनी तर ताळतंत्रच सोडलंय. कसले लोक बसवलेत आम्ही जनतेच्या डोक्यावर! यांच्यामुळे छी:थू होतेय आमची आणि महायुतीची. आता ते धनंजय मुंडे वागताहेत महान साक्षात्कार झाल्यासारखे. अरे कुणाच्या कसल्या खुनशी संगतीतून आलायत तुम्ही! कितीही सोज्वळपणाचा आव आणलात तरी तुमची पापं नाही धुवून जाणार. अनेकदा मीच मला एकांतात प्रश्न विचारतो की किती काळ आणि कशासाठी या सगळ्यांना सहन करतोयस तू. एकदाच काय तो सोक्षमोक्ष लाव त्यांचा आणि हो मोकळा. निदान मानसिक समाधान तरी मिळेल. ही आवळ्याभोपळ्याची महायुतीची मोट सांभाळण्यापेक्षा बुडू दे ती महायुती जनतेच्या महासागरात. या असल्या मूर्ख लोकांना पोसण्यापेक्षा शहाण्या जनतेसाठी काहीतरी चांगले कर म्हणून बजावतो मी माझंच मला. पण हात बांधलेले असतात, जिम्नॅस्टिकसारखी कसरत सुरू ठेवावी लागते. नाईलाज होतो माझा. रोज नवीन लफडी. नवीन राडे. कुणाकुणाला पुरा पडू मी?
– माझ्या मंत्र्यांना डच्चू देण्याआधी शिंदेसाहेबांच्या मंत्र्यांना हाकला असं अजितदादा म्हणतात, तर माझ्या मंत्र्यांना हाकलण्याआधी अजितदादांच्या मंत्र्यांची हकालपट्टी करा, असं शिंदेसाहेब म्हणतात. अशी सगळी अडवणूक चाललीय माझी. आता फक्त कोण अधिक भ्रष्ट, आधी कोणाला हाकलू यासाठी राज्यातल्या जनतेचाच कौल मागण्याचं बाकी आहे. आता त्या कोकाट्यांना क्रीडामंत्री करायचं ठरवलंय. नाईलाज होता माझा. आता बसा म्हणावं रमीक्रीडा करत. द्या त्या रमीला राज्य क्रीडास्पर्धेत मानाचे स्थान.
– तुमची गोची समजून घेऊ शकतो साहेब. पण हे सगळं किती काळ लोंबकळत ठेवणार आहात तुम्ही.
– त्यांचे मंत्री त्या दोघांनी नेमलेले. त्यांच्या परवानगीशिवाय मी त्यांना हाकलू शकत नाही हा त्यातला खरा पेच. मी त्यांना फक्त चांगलं वागावं, खरं बोलावं, चोरी करू नये, मस्ती करू नये, सिगारेट ओढू नये, चड्डी बनियनवर फिरू नये एवढाच साने गुरुजींसारखा उपदेश करू शकतो. त्याचा काही उपयोग होणार नाही हेही मला माहीत आहे. घरात नोटांनी भरलेल्या बॅगेतील नोटा मोजत बसणारे शिरसाट काय आणि डान्स बार चालवणारे कदम काय, ही काही शाळकरी मुलं नाहीत. संजय गायकवाड, कोकाट्यांचं माणिक यासारखे हेकेखोर नेते समज देऊन वठणीवर येतील हेही संभवत नाही. काय करणार, छडी लागे छमछम, विद्या येई घमघम, छमछमछम हे गाणं छडी पाठीमागे लपवून फार तर नाचून म्हणेन मी त्यांच्यापुढे. पण त्याने काही फरक पडणार नाही हे मलाच काय सर्वांनाच माहीत आहे. इतके निगरगट्ट आहेत हे विद्यार्थी. त्यांचे गुरू तर त्यांच्यापेक्षा चेंगट. आपली जुनी मैत्री निभावताहेत ते. आपल्या आणि आपल्या शिष्यांच्या वागण्यामुळे जनतेत काय संदेश जातोय याची काडीचीही पर्वा नाही या गुरु-शिष्यांना. इतके निबर आणि गब्बर झालेयत. ही तीन पायांची शर्यत कशी तरी पुढे नेतोय मी. सप्टेंबरमध्ये सुप्रीम कोर्टाचा निकाल एकदा का आला की कसे तीन तेरा वाजतील यांचे ते पाहशीलच तू!