कन्हैय्यालाल यांच्या अनेक भूमिका अगदी त्याच त्या होत्या, तरीही त्यांचे सादरीकरण, संवाद बोली, देहबोली अशी काही असायची की पडद्यावरील त्यांचे प्रसंग कधी कंटाळवाणे वाटत नसत. इतर पात्रांचे संवाद सुरू असताना त्यांच्या प्रतिक्रियाही तितक्याच उस्फूर्त असत.
– – –
लफंगा, ठग, कंजूष शेट, कठोर सावकार, बदमाश मुनीम, लालची बनिया, चलाख नोकर, बेईमान पोस्टमन, खोटा साक्षीदार, फूट पाडणारा सेक्रेटरी, बायकांवर डोळा ठेवणारा बेरकी, नफेखोर कारखानदार… सामान्यत: एकेकाळच्या भारतीय चित्रपटांतले हे खलनायक. हे नसतील तर नायक झिरो. यांच्यामुळेच प्रेक्षकांच्या मुठी आवळल्या जात, तोंडात अपशब्द येत, हे मार खाऊ लागले की प्रेक्षकांना मनस्वी आनंद होत असे, चित्रपटाच्या शेवटी हे मेले पाहिजेत किंवा जेलमध्ये गेले पाहिजेत अशी आंतरिक तळमळ होत राहायची, ती या खलनायकी पात्रांमुळे. फार पूर्वीपासून चित्रपटातील खलनायक दाखवायचा असला की त्याची वेषभूषा किंवा रंगभूषा काहीशी बटबटीत दाखविली जात असे. कारण त्यांची खलप्रवृत्ती स्पष्टपणे प्रेक्षकांच्या लक्षात यावी ही अपेक्षा. नंतर मात्र काळानुसार यात बदल होत गेले आणि खलनायकही व्हाईट कॉलर व सभ्य परंपरेतील दिसू लागले. मात्र एक अभिनेता याला अपवाद होता. त्याने पारंपरिक खलनायकाच्या सर्व संकेतांना छेद दिला. धोतर कुडते, गंजी किंवा जाकिट, डोक्यावर टोपी किंवा साफा, हातात छत्री नाही तर छडी, ओठांवर सामान्य मिशा व चालण्याची विशेष ढब… अशा वेषातील या पात्राची निव्वळ सावली जरी पडद्यावर दिसली तरी लोक अभिनेत्याला सहज ओळखत असत.
१९७०-७५चे दशक असावे. दादरच्या शिवाजी नाट्य मंदिरात ‘कट्यार काळजात घुसली’ या संगीत नाटकाच्या प्रयोगाच्या मध्यतंरात निर्मात्याने एका प्रेक्षकाचा विशेष सत्कार केला. या सत्कारमूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे हा पक्का बनारसी हिंदीभाषिक होता. मग याचा या संगीत मराठी नाटकाशी काय संबंध? ही बातमी मी त्या काळात जेव्हा वाचली होती, तेव्हा मलाही हा प्रश्न पडला होता. तर मुंबईत जेव्हा जेव्हा या नाटकाचे प्रयोग होत असत तेव्हा तेव्हा हा नाटकवेडा माणूस समोरच्या रांगेत हमखास दिसत असे. या नाटकाचे सर्वाधिक प्रयोग या माणसाने बघितले होते. म्हणून हा सत्कार होता. रंगभूमीच्या प्रत्येक घटकाचा कधी ना कधी सत्कार होत असतो, पण प्रेक्षकाचा असा सत्कार हे नाट्यसृष्टीतले अपवादात्मक उदाहरण असावे.
कोण होते हे बनारसी बाबू?
वाराणशीच्या ‘सनातन धरम नाटक मंडळी’चे व्यवस्थापक पंडित भैरोदत्त चौबे यांना सर्वजण चौबेजी याच नावाने ओळखत असत. त्यांचा मुलगाही त्यांच्यासोबत तिथे जाई आणि नाटकवाल्यांनी सांगितलेले कोणतेही काम करत असे. मात्र चौबेजींना मुलाने नाटक कंपनीशी कोणताच करार न करता अशी केलेली कामे अजिबात आवडत नसत. १६ वर्षांचा झाल्यावर मग या मुलाने लिखाण करायलाही सुरुवात केली. मधून मधून तो छोट्या भूमिकाही करू लागला. वडिलांच्या मृत्यूनंतर संकटप्रसाद या त्याच्या मोठ्या भावाने काही काळ नाटक कंपनी चालविण्याचा प्रयत्न केला खरा, पण त्यात ते यशस्वी झाले नाहीत. शेवटी त्यांनी या सर्वावर पडदा पाडला आणि चित्रपटात काही आजमावता येईल या आशेने मुंबईची वाट धरली.
कोणत्याही कलेचा भुंगा एकदा डोक्यात गेला की तो सतत मेंदू कुरतडत असतो. पंडित चौबेजींच्या एका मुलाने मुंबईची वाट धरली, मग या दुसर्याला कसे बांधून ठेवणार? सुरुवातीला किराणा दुकानात बसवून बघितले, पण याच्या डोक्यात वेगळेच ‘किराणा’ घराणे! नाटक, संगीत, लिखाण या त्रयीने याचा ताबा घेतला. ‘पंधरह अगस्त’ या नावाचे एक नाटक लिहून त्याने ते बसवले. ‘मुंबईत प्रयोग केला तर काही मार्ग नक्की सापडेल’ म्हणून त्याने नाटकाचा प्रयोग मुंबईत करायचा ठरवले. पण येथल्या सेन्सॉर बोर्डाने त्याला चांगलाच झटका दिला आणि त्याला बर्यापैकी नुकसान सोसावे लागले. या नाट्यवेड्या तरुणाचे नाव कन्हैयालाल चतुर्वेदी. त्याला चार वेदांचे ज्ञान होते की नाही माहीत नाही, पण त्याच्याकडे चौकस बुद्धी आणि चौरस वृत्ती मात्र निश्चितच असावी. या मायानगरीत स्थान बळकट करायला याच गोष्टींचा तर उपयोग झाला.
नाटकाने काहीसे निराश केले, मग किमान चित्रपटात काही करता येईल या आशेने मग पंडित कन्हैयालाल चतुर्वेदी नावाचा हा तरुण चित्रपटांकडे वळला. १९३९मध्ये ‘एक ही रास्ता’ या चित्रपटात ‘बांके’’ नावाची व्यक्तिरेखा साकार करण्याची पहिली संधी त्याला मिळाली. मेहबूब खान हे या चित्रपटाचे दिग्दर्शक होते आणि चित्रपटाचा नायक होता अरुणकुमार आहुजा म्हणजे आपल्या गोविंदाचे पिताश्री. या चित्रपटाच्या पडद्यावर पहिल्यांदाच ‘पंडित कन्हैयालाल चतुर्वेदी’ या लांबलचक नावाला कात्री लावून फक्त ‘कन्हैयालाल’ हे नाव झळकले आणि या नावाने मग भारतीय हिंदी चित्रपटसृष्टीत आपली मोहर उमटविली.
वर मी जो ‘संगीत कट्यार काळजात घुसली’ या नाटकाच्या उल्लेख केला तो सत्कारमूर्ती प्रेक्षक म्हणजे हेच कन्हैयालाल! आणि लेखाच्या सुरुवातीला ज्या खलनायकाच्या सावलीबद्दल सांगितलेय त्याचे मानकरीही हेच कन्हैयालाल. खरा अतरंगी अभिनेता. भारतीय चित्रपटसृष्टीचे एक अनोखे वैशिष्ट्य म्हणजे इथे जो ज्या प्रदेशातून येतो सोबत तिथल्या मातीचा दरवळ घेऊनच येतो. मेहबूब खान यांना त्यांच्या पुढच्या चित्रपटाचा अस्सल गामीण खलनायक मिळाला होता. १९४०मध्ये मेहबूब खानचा ‘औरत’ हा चित्रपट झळकला. यातली सुखीलाला या सावकाराची खलनायकी अदा कन्हैयालाल यांनी अशी काही पेश केली की मेहबूब खान प्रचंड प्रभावित झाले. खरं तर ‘औरत’मध्ये आणखी काहीतरी सांगण्यासारखं आहे, असं मेहबूब खान यांना सतत वाटे. १७ वर्षानंतर त्यांनी ‘औरत’ चित्रपटाचा रिमेक करण्याचे नक्की केले. तोपर्यंत चित्रपटसृष्टीतही खूप काही बदलले होते. मेहबूब खान यांनी अभिनेते, संगीतकार, गीतकार यांची पूर्ण नवीन टीम तयार केली. यात फक्त बदलले नाही ते सुखीलाला हे पात्र अर्थात कन्हैयालाल. १९५७मध्ये आलेल्या या रिमेकने म्हणजे ‘मदर इंडिया’ने अनेक विक्रम रचले. कन्हैयालाल भारतातील प्रत्येक घरात पोहचले ते याच चित्रपटाने.
कन्हैयालाल यांनी जितक्या भूमिका केल्या त्यात ते अभिनय करत आहेत असे वाटायचे नाही इतकी सहजता होती. त्यांनी केलेल्या व्यक्तिरेखा या आतून बाहेरून एकजीव होत असत. अगदी पायापासून केसापर्यंत शरीराच्या सर्वच अवयवांकडून ते अभिनय करून घेत. मग ती व्यक्तिरेखा खलनायकी असो की प्रेमळ. खरं तर ‘मदर इंडिया’तील एकट्या ‘सुखीलाला’ या पात्रात लफंगा, ठग, कंजूष, कठोर, बदमाश, लालची, चलाख, बायकांवर डोळा ठेवणारा बेरकी, नफेखोर या सर्वच छटा रंगविल्या. यातील प्रत्येक छटा त्यांनी अत्यंत बारकाव्याने साकार केली. पहिल्या प्रसंगातील घोड्यावर बसून येणारा सुखीलाला ते सरते शेवटी डाकू बिरजूसमोर किड्यासारखा रेंगत आणि विव्हळत जाणारा सुखीलाला… काय ताकदीने साकारलाय या अभिनेत्याने! माणूस एकाच वेळी फक्त कृष्णधवल या रंगाचा नसतो तर त्याच्या असंख्य ग्रे छटा असतात, हे अभिनेत्याने पुरते ओळखले होते.
पन्नासच्या दशकातील त्यांचे खलनायकी बाजाचे चित्रपट असो की प्रेमळ… पडद्यावर येताच ते प्रसंग जिवंत करण्याचं कसब त्यांच्याकडे होतं. मग समोर कोणताही आणि कितीही मोठा अभिनेता असो. त्यांचा वावर सहज असे. काहीतरी ओढून ताणून ते करत आहेत असे अजिबात वाटत नसे. ‘मि. संपत’मधील त्यांचा नकली तूप विकणारा शेठ माखनलाल, ‘लाल हवेली’मधील विनोदी पंडित चाचा, ‘मल्हार’मधील कन्हैयालाल याच नावाची व्यक्तिरेखा, ‘एक ही रास्ता’मधील बाँके, बिमल रॉय यांच्या ‘नौकरी’त लॉजमधील नोकर हरी, ‘फुलों की सेज’मधील बनवारी, ‘बिरादरी’मधला विनोदी बाजाचा दूधवाला राममूर्ती, ‘देवदास’ (१९५५ दिलीपकुमारचा) मधील बेरकी पंडित, गुरूदत्तच्या ‘भरोसा’मधील श्रीमंत मालकाचा बेईमान सेवक रौनकलाल, ‘बंधन’मधील व्याजखाऊ मलिकराम, ‘जीवन मृत्यू’मधील शेट जगत नारायण, ‘होली आयी रे’मधील वाईट नजरेचा लाला अनोखेलाल, धमेंद्रच्या ‘दोस्त’मधील संशयी नवरा घडीबाबू, ‘दुश्मन’मधील दुर्गाप्रसाद, ‘गंगा जमुना’मधील मुनीम कल्लू, ‘उपकार’मधील लाला धनीराम, ‘राम और श्याम’मधील लोचट मुनीम, ‘हम पाँच’मधील जहागीरदाराचा चमचा, ‘धरती कहे पुकार के’मधील आपल्या लहान भावांवर जिवापाड प्रेम करणारा मोठा भाऊ, ‘अपना देस’मधील भ्रष्ट अणि खुनात मदत करणारा सेवाराम.. १००पेक्षा अधिक चित्रपटांतून अभिनय करणारे कन्हैयालाल यांनी प्रत्येक भूमिकेत आपली छाप सोडली आहे.
त्यांच्या अनेक भूमिका त्याच त्या होत्या, तरीही त्यांचे सादरीकरण, संवाद बोली, देहबोली अशी काही असायची की पडद्यावरील त्यांचे प्रसंग कधी कंटाळवाणे वाटत नसत. इतर पात्रांचे संवाद सुरू असताना त्यांच्या प्रतिक्रियाही तितक्याच उस्फूर्त असत. त्यांचे संवाद अनेकदा लाऊड होत असत. यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले होते, ‘होय, माझे संवाद अनेकदा तारस्वरात असतात. कारण मी वास्तवात अशी अनेक माणसे बघितली आहेत, जी कारण नसताना विविध प्रकारचे हेल काढून उंच स्वरात बोलत व आपले महत्व टिकविण्याची धडपड करीत.’ एका चित्रपटात ते प्रसिद्ध अभिनेते मोतीलाल यांच्या वडिलांच्या भूमिकेत होते. संवाद खूप लाबंलचक असल्यामुळे ते एका मोठ्या कागदावर मोठ्या अक्षरात लिहून लांबून वाचत असत. त्यामुळे युनिटमधील अनेकजण त्यांच्यावर हसत देखील. पण नंतर ते अशा संवादांत माहिर झाले.
सन १९३९मध्ये त्यांनी ‘साधना’ नावाच्या चित्रपटात आजोबाची भूमिका साकारली होती. त्यावेळी ते फक्त २९ वर्षाचे होते. या चित्रपटातील त्यांचा नातू होता प्रेम अदीब, जो २२ वर्षाचा होता. हा चित्रपट सिल्व्हर ज्युबली ठरला. या चित्रपटातील संवाद आणि गाणी देखील त्यांनी लिहिली होती. त्यांचे वय जसजसे वाढत गेले भूमिकांचेही वय वाढतच गेले. ‘औरत’ चित्रपटाच्या वेळी मेकअपमन त्यांचा मेकअप करण्यास तयार नव्हते. तेव्हा छायाचित्रकार फरदुन इराणी यांनी त्यांचे मेकअपविनाच सुंदर शॉटस् घेतले. खरंतर मेकअप नसेल तर छायाचित्रकार चित्रीकरणास तयार होत नसत, असा तो काळ होता. या चित्रपटाचे संवाद लेखक वजाहत मिर्झा यांनी अतिशय सुंदर संवाद कन्हैयालाल यांच्यासाठी लिहिले आहेत. या दोघांचेही ऋण कन्हैयालाल नेहमीच मान्य करीत असत. अभिनयासोबत उत्कृष्ट संवाद असले की अभिनेते प्रेक्षकांच्या दीर्घकाळ लक्षात रहातात असे त्यांचे मत होते. मेहबूब खान यांना त्यांच्या प्रतिभेची कल्पना होती. म्हणून त्यांच्या ‘बहन’ नावाच्या चित्रपटात त्यांनी त्यांना प्रेमळ खिसेकापूची भूमिका दिली. तर ‘राधिका’ आणि ‘लाल हवेली’ या चित्रपटांत विनोदी पंडिताची भूमिका दिली.
‘औरत’ चित्रपटाच्या एका प्रसंगात त्यांच्या अंगावर घर कोसळते असा एक प्रसंग होता. या प्रसंगात ते बरेच जखमी झाले, पण त्यांनी डॉक्टरांना न बोलावता प्रसंग पूर्ण करा असे सांगितले आणि प्रसंग ओके झाल्यावरच उपचार करून घेतले. या चित्रपटात राधा ही मुख्य भूमिका सरदार अख्तर यांनी केली होती, ज्या मेहबूब खान यांच्या पत्नीही होत्या. हा चित्रपट गोल्डन ज्युबली झाला. सुखीलालानंतर जेमिनी संस्थेच्या १९६२मध्ये आलेल्या ‘गृहस्थी’ या चित्रपटातील त्यांची राम स्वरूप या स्टेशन मास्तरची भूमिका त्यांना मनापासून आवडत असे. सुटाबुटात त्यांनी फारच कमी भूमिका केल्या. त्यापैकी ही एक.
त्यांच्याबद्दल सुनील दत्त एकदा म्हणाले होते की ‘मी कॅमेर्याच्या मागे उभा राहून त्यांचा अभिनय बघत असे. तेव्हा कधी असे वाटतच नसे की हे अभिनय करत आहेत. अत्यंत विनम्र आणि साधा माणूस…’ दिलीपकुमार यांच्यासोबतही त्यांनी अनेक चित्रपट केले. ट्रॅजेडी किंग दिलीप साहब म्हणत, ‘हा माणूस इतक्या अप्रतिमपणे संवाद म्हणून समोरच्या अभिनेत्यास प्रतिसाद देत असे की त्याच्याशी सामना करणे कठीण होत असे.’ दुलाल गुहा दिग्दर्शित ‘दुश्मन’ चित्रपटात त्यांनी राजेश खन्नासोबत काम केले आहे. त्या वेळेस सुपरस्टार राजेश खन्ना म्हणाले होते, ‘ते नैसर्गिक अभिनय करत असत.’ या चित्रपटातले त्यांचे ‘कर भला तो हो भला’ हे पालुपद तेव्हा खूप गाजले होते. ‘गंगा जमुना’’ चित्रपटातील असेच आणखी एक पालुपद ‘राम बचाये कल्लू को अंधा करदे लल्लू को’ हेही खूप गाजले. त्यांच्या तोंडून भेयीेया…हा लांबलचक हेल खूप छान वाटे. लोचटपणाचा अभिनय तर ते फक्त डोळ्यातून साकार करत. त्यांच्या त्या छपरी मिशा, त्यांचे पान खाऊन संवाद म्हणणे सर्वच कसे नैसर्गिक असे. ते एक उत्तम कवी, कथाकार आणि संगीताचे जाणकार होते. सामजिक विषयावर कविता करायला त्यांना आवडत असे. आपल्याकडील अनेक कथाकल्पना त्यांनी शेअर केल्या लपवून न ठेवता. स्वत:च्या घरातही ते धोतीकुर्ता आणि बनियन अशा खास बनारसी ढंगात वावरत असत.
बनारसी पान आणि बनारसी पंडा याचा एक अनोखा संगम या अभिनेत्यात होता. खरं तर अभिनय करणे म्हणजे सोंग वठवणे. हे सोंग खरे की खोटे हे कदाचित नक्की सांगता येणार नाही, मात्र चांगले की वाईट हे सांगता येते आणि कन्हैयालाल हे सोंग उत्कृष्ट वठवित असत. रूढ अर्थाने ते फारसे शिकलेले नव्हते. एखाद्या महाविद्यालयाच्या पदवीचे कागद त्यांच्या भितींवर प्रâेम करून टांगलेले नव्हते, पण त्यांच्या वाट्यास आलेल्या चित्रपटांच्या प्रत्येक प्रâेममध्ये मात्र ते आपल्याला खिळवून ठेवत. १९५८मध्ये ‘सहारा’ नावाचा चित्रपट आला होता. मीना कुमारीने यात आंधळ्या नायिकेची भूमिका साकारली होती. सुखवस्तू चौधरी गमनसिंग ते फाटका गमनसिंग असा प्रवास असलेली ही व्यक्तिरेखा त्यांनी अप्रतिम साकारली आहे. या चित्रपटात तो अनेक भिकार्यांना मोबदल्यात जेवू घालतो. कुणी आठ आणे तर कुणी बारा आणे देतात व हा चौधरी त्यांना त्यांच्या लायकीप्रमाणे जेवण देतो. या प्रसंगात एक भिकारी त्यांना एक रोटी अधिक द्यायची विनंती करतो. पण त्याची कमाई कमी असल्यामुळे चौधरी देत नाही. यावर भिकारी म्हणतो, ‘मला मेहनत मजदूरी करता आली असती तर दहा रुपये दिले असते.’ यावर चौधरी म्हणतो, ‘’मेहनत मजदूरीसाठी खूप रक्त आटवावं लागतं. ते इतकं सोप्पं नाही.’’ या संवादातील कन्हैयालाल यांचा अभिनय अप्रतिम आहे. समाजातील एक वास्तव किती सहजपणे ते सांगून करून जातात.
१९८२मध्ये ‘हथकडी’ या चित्रपटातून त्यांनी अभिनयाचे शतक पूर्ण केले, तेव्हा ते ७२ वर्षांचे होते. नाटकाच्या वेडापायी ते मुंबई नगरीत दाखल झाले त्यावेळी त्यांनी ‘१५ अगस्त’ नावाच्या नाटकाचे प्रयोग केले होते. काय योगायोग पहा १९८२मध्ये त्यांनी देह ठेवला तेव्हा १४ ऑगस्टची तारीख होती. फक्त एकाच दिवसाचा फरक… वर्तुळ पूर्ण करून गेले…