मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकांच्या दृष्टीने माजलेले आमदार असा उल्लेख विधानसभेत केल्यानंतर माझा मानलेला परमप्रिय मित्र पोक्या इतका खूश झाला की मुख्यमंत्र्यांचे कौतुक कोणत्या शब्दांत करू असा पेच त्याला पडला. सगळे मंत्रीसुद्धा आमदारच असतात. त्यात भानगडबाज मंत्र्यांचा समावेश सरकारात असल्यामुळे ‘ढवळ्याशेजारी पवळ्या बांधला, वाण नाही पण गुण लागला’ या म्हणीप्रमाणे खुद्द सरकारलाच कुणी माजलेलं सरकार असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही, असा दावा तो करू लागला. त्यावर मी त्याला म्हटलं की, अशा दावे-प्रतिदावे यांच्या मागे न लागता तू खुद्द अशा काही ‘माजलेले’ म्हटलं जाणार्या नेत्यांच्या प्रतिक्रिया घेऊन त्यांची न्याय्य बाजू मांड, म्हणजे त्यांचंही समाधान होईल. पोक्याने ते मनावर घेतलं. त्याच या प्रतिक्रिया.
– जय महाराष्ट्र रामदास कदमजी.
– जय महाराष्ट्र, जय एकनाथ.
– तुमच्या ‘सावली’ या डान्स बारमधून २२ बारगर्ल्स तरुणी आणि २२ पुरुष गिर्हाईकं यांना पोलिसांनी रंगेहाथ पकडलं याची तुम्हाला काहीच लाज वाटत नाही?
– त्यात कसली लाज?
– तिथे लॉजही आहेत ना?
– असतील. पण तिथे काय धंदे चालतात हे मला कसं माहीत असणार? आम्ही तिथे फिरकतही नाही. त्या डान्सबारची मालकी आमची असली तरी तो शेट्टी चालवतो. आमच्या घराण्याचा त्याच्याशी काहीही संबंध नाही.
– भाडे घेता ना वेळच्या वेळी. मग तिथे काय धंदे चालतात याची माहिती नाही?
– पोक्या, मी ऐकून घेतोय म्हणून काहीही बरळू नकोस.
– मी शुद्धीवर आहे. पण तुम्हा बापलेकांचं सध्या जे काही चाललंय ना ते पाहून शरम वाटतेय सार्या महाराष्ट्राला तुमची आणि तुमच्या गृह राज्यमंत्री बेट्याची. अनिल परबांनी विधानसभेत हे प्रकरण समोर आणल्यानंतर काय फाफलली होती त्याची. कुंपणच शेत खातंय म्हटल्यावर कोण काय बोलणार! त्यात वाळू माफियागिरीतही बेट्याचा हात असल्याचे आरोप झालेत. अरे, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र तुम्ही!
– हा मला आणि माझ्या निष्पाप मुलाला बदनाम करण्याचा प्रयत्न चालवलाय ठरवून काही लोकांनी. पण आम्ही दोघे किती पवित्र आहोत हे अनुभवलंय यापूर्वी महाराष्ट्राने. एकेकाळी ड्रायव्हरची नोकरी सोडल्यानंतर बाळासाहेबांनी मला सन्मार्गावर आणलं. आता शिंदे साहेबांनी मार्ग बदलल्यावर मलाही मार्ग बदलावा लागला, त्यात माझा काय दोष? आमचं, शिंदे साहेबांचं कार्य बघा आणि मग बोला.
– दिसतंय तुमचं कार्य किती मोठ्ठं आहे ते. गृह राज्यमंत्रीच जर बेकायदा, अनैतिक धंद्यात गुरफटल्याचे आरोप होत असतील, तर दुसरी दुर्दैवाची गोष्ट कुठली ते सांगा. आणि वर समर्थन करताय या सार्याचं. यालाच माज म्हणतात. मुख्यमंत्र्यांनी बरोब्बर हाणलंय अशा आमदारांना, मंत्र्यांना आणि नेत्यांना. सांभाळा स्वत:ला आणि आपल्या बेट्याला.
– – –
– नमस्कार माणिकरावजी. विधिमंडळात मोबाईलवर रमी खेळण्याच्या तुमच्या छंदामुळे तुमच्याविरुद्ध जे कोकटताहेत की केकटताहेत त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं?
– आताच खेळतोय थोडाच. जुनाच छंद आहे तो माझा. त्या रोहित पवारला मला ट्रॅपमध्ये पकडायला इतके दिवस लागावेत याचीच खंत वाटतेय मला. असतो एखाद्याला छंद. पोर्न तर बघत नव्हतो ना!
– पण सभागृहात कामकाजाकडे लक्ष देण्याऐवजी असल्या छंदात टाईमपास करायचा हे बरं नव्हे.
– कसला बोडक्याचा टाईमपास. माझ्या कृषिखात्यात सगळे आलबेल आहे. जे आजपर्यंत घडत होतं तेच पुढे चाललंय. अशावेळी झोप काढण्यापेक्षा रमी खेळणं बरं वाटतं. करा म्हणावं काय कारवाई करायची ती. काढून टाका मला मंत्रीपदावरून. मी घाबरत नाही. माझ्या खात्याचा कारभार चोख आहे. गेले सगळे उडत.
– धन्य आहे तुमची. येतो.
– – –
– नमस्कार शिरसाट साहेब.
– नमस्कार. सारख्या सारख्या काय माझ्या प्रतिक्रिया घ्यायला येतोस? आता कुठला नवा आरोप आहे आमच्यावर?
– आरोप नाही. काहीही बरळणारे संजय शिरसाट म्हणून तुमचं वर्णन एका वृत्तपत्राने केलंय. त्याबद्दल…
– मी पेपर वाचत नाही. मला त्यांची गरज नाही.
– असं कसं? मुख्यमंत्री आमदारांबद्दल काय म्हणाले तेही तुमच्या कानावर आलं नाही? सभागृहात असूनसुद्धा?
– मी सध्या कानात कापसाचे बोळे घालून बसतो. फक्त शिंदेसाहेब बोलत असतील तेव्हाच ते काढतो.
– ठीकाय! पण मुख्यमंत्री सरसकट सगळ्या आमदारांना माजोर्डे म्हणाले ते तरी आवडलंय का तुम्हाला? ही लोकभावना असल्याचं बोलले ते.
– असेल. काहीही असेल.
– त्या वृत्तपत्राने काय तारे तोडलेत वाह्यात लोकप्रतिनिधींबद्दल, ते तरी ऐकलेत का तुम्ही? ते म्हणतात, एकमेकांस तोडीस तोड असा राणा दांपत्याचा जोडा, गोपीचंद पडळकर, संजय गायकवाड, काहीही बरळू शकतात असे संजय शिरसाट, कमालीचं निंदनीय कृत्य नावे असलेले संजय राठोड, संतोष बांगर, एका दिवसात मद्य परवाने मिळवू शकणारे संदिपान भुमरे, भरत गोगावले या पंगतीत बसू शकतील असे मोहित कंबोज, करून करून भागले आणि देवपूजेला लागलेले आधुनिक श्रावणबाळ राम कदम, ‘हो आहे माझ्या पत्नीच्या नावे डान्सबारचा परवाना’ असं बाणेदारपणे कबूल करणारे रामदास कदम, असं वर्णन केलंय त्यांनी. तुम्हाला याबद्दल काय वाटतं?
– मला काय वाटणार? मीच वैâचीत सापडलोय. विधानसभेच्या प्रांगणातील हाणामारी, धक्काबुक्की, यांचा तीव्र निषेध मी केलाय वेळोवेळी. आमदाराने, मंत्र्याने, नेत्याने असले प्रकार करण्यापेक्षा आपल्या पुढल्या सात पिढ्यांची कमाई करण्यात लक्ष घालावे, हा माझा संदेश आहे.